अजूनकाही
भारत-ऑस्ट्रेलियाच्या एक दिवशीय सामना मालिकेत भारताचा पराभव झाला. पहिल्या दोन सामन्यांत विजयी असणारा भारतीय संघ पुढच्या सलग तीन सामन्यांत पराभूत झाला. भारत २००९ नंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर मालिका हरला. त्यामुळे भारतीय संघ मे महिन्यापासून सुरू होणारा एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल का, ही चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विश्वचषकाची तयारी भारतीय संघाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महेंद्र सिंग धोनीनं आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांत अनेक खेळाडूंना नव्यानं संधी दिली गेली आणि गेल्या सहा महिन्यांत भारतीय संघात बरेच बदल केले गेले.
धवन व रोहित शर्मा ही सलामीची जोडी म्हणून २०१३ च्या चॅम्पियन ट्रॉफीपासून निश्चित करण्यात आली. तिने अनेकदा चांगली सुरुवात करून दिली. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया बरोबरच्या मालिकेत त्या जोडीतील रोहित शर्मानं आठ हजार धावांचा टप्पा गाठला.
त्यानंतर येणाऱ्या विराटनं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारतीय संघात विराट हा एकमेव फलदांज असा आहे की, जो गेल्या चार वर्षांपासून सातत्यानं धावा काढत आहे. एकदिवशीय सामन्याचा कर्णधार झाल्यावर त्याचं सातत्य आणखी वाढलं आहे. पहिल्या तीन क्रमांकांची भारताला तितकी काळजी नसली तरी, मधली फळी मात्र चिंतेचा विषय होऊ शकतो.
२०१५ च्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील विश्वचषकानंतर भारतीय संघानं अनेक खेळाडूंना चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकावर खेळवून पाहिलं आहे. दिनेश कार्तिक, रायडू, राहणे, धोनी, केदार जाधव यांच्याबरोबरच के. ल. राहुल, शंकर या सारख्यांनाही संधी देण्यात आली आहे. पण आपल्या खेळात यांपैकी कुणीही सातत्य दाखवू शकलेलं नाही. गेल्या दोन वर्षांत अनेकांना मधल्या फळीत खेळवून झालं. पण कुणीही असं म्हणू शकत नाही की, कोण कोणत्या क्रमांकावर खेळण्यासाठी येईल.
अलीकडे शिखर धवनदेखील सलामीला धावा काढू शकलेला नाही. रोहित शर्माचंही तसंच झालं आहे. दोघांनी संघाला भक्कम सुरुवात फार कमी सामन्यांत करून दिली आहे. या दोघांऐवजी राहुलला ही संधी मिळाली. पण त्यालाही मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आलेला नाही.
अजिंक्य रहाणे २०१५ च्या विश्वचषकात चोथ्या क्रमांकावर खेळला होता. तिथं त्यानं एक-दोन चांगल्या खेळ्याही केल्या होत्या. त्याला अनेकदा या क्रमांकावर संधी देण्यात आली, पण त्यालाही संघात आपलं स्थान टिकवता आलेलं नाही. आता तर तो येणाऱ्या विश्वचषकात असेल की नाही, याचीही खात्री देता येत नाही. त्याला संघात स्थान मिळावं म्हणून आता मागणी होऊ लागली आहे. दिलीप वेंगसरकर यांनी तर तशी मागणी केली आहे.
केदार जाधवलाही मधल्या फळीत बऱ्याचदा खेळवण्यात आलं आहे. तो स्पिनर आहे. त्याचा नक्कीच भारतीय संघाला फायदा होऊ शकतो, पण त्याच्याही खेळीत सातत्य नाही. काही सामने मात्र त्यानं जिंकून दिले आहेत.
दिनेश कार्तिकनं बांग्लादेश संघाबरोबर झालेल्या सामन्यांत शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारतीय संघाला विजेतेपद मिळून दिलं होतं. त्यानंतर त्यालाही बरेच सामने खेळवलं गेलं. पण त्याच्यातही सातत्य दिसून आलेलं नाही.
धोनीनं एकदिवशीय सामन्यात कुठे खेळावं हे अजूनही भारतीय संघ ठरवू शकलेला नाही. जेव्हा रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असतो, तेव्हा त्याचा कल धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा असतो, तर विराट कोहली कर्णधार असताना धोनीला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळायला पाठवलं जातं.
गेल्या दोन वर्षांत अनेकदा सलामी जोडी अपयशी ठरली आहे, तर मधली फळी यशस्वी; कधी मधली फळी अपयशी, तर सलामी जोडी यशस्वी झाली आहे.
नुकतीच झालेली भारत–ऑस्ट्रेलिया मालिका विश्वचषकापूर्वीची शेवटची होती. आपण तिच्यात पूर्णतः अपयशी ठरलो असून आता आपल्याला थेट विश्वचषकातच एक दिवशीय सामने खेळावे लागतील. त्यामुळे आता कुठलीही संधी भारतीय संघाला मिळणार नाही.
भारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. भारतीय संघाला इथं नक्कीच चिंता नसावी. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला.
असा एखादा सामना विश्वचषकात बाद फेरीत झाला, तर भारतीय संघाला आपला गाशा गुंडाळावा लागेल. शिवाय टर्नर, मॅक्सवेलसारखे फलंदाज भारतीय संघाची गोलंदाजी कोणत्याही खेळपट्टीवर फोडून काढून शकतात. हे फलंदाज एक हाती सामना जिंकण्यासाठी व फिरवण्यासाठी ओळखले जातात. सहा फलंदाज व चार गोलंदाज जर संघात खेळवायचे ठरवलं, तर पाचवा ऑल रॉउंडर असेल. तो कोण असेल हेही पाहण्यासारखं असेल.
विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे. तिथल्या खेळपट्ट्या फास्टर्सना साथ देणाऱ्या असतात. इंग्लंडचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्यांना नक्की या गोष्टीचा फायदा होणार आहे. पण भारतीय संघापुढे केदार की पंड्या की शंकर, हा पेच नक्की असेल.
इंग्लंड हा विश्वचषकाचा मुख्य दावेदार आहे. आणि असं असलं तरी नुकत्याच वेस्ट इंडिजबरोबर झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ २-१नं कसोटी मालिका हरला आहे. त्यामुळे इंग्लंडलादेखील हा विश्वचषक सोपा नक्कीच जाणार नाही.
श्रीलंका गेल्या काही वर्षांत अपयशी ठरलेला संघ आहे, पण त्यांनीही आफ्रिकेला नुकतंच हरवलं आहे. वेस्ट इंडिज हा संघ पूर्ण बेभरवशाचा आहे. ते कुणालाही विश्वचषकातून बाहेर काढू शकतात. आफ्रिका, न्यूझीलंड यांच्या संघांचीही चांगली तयारी आहे. ऑस्ट्रेलियानं भारतातील मालिका जिंकल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. स्मिथ आणि वॉर्नर हे दोघंही आपल्या संघात परतू शकतात.
असं असताना भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं म्हणावं तेवढं सोपं नक्कीच असणार नाही!
............................................................................................................................................................
लेखक सागर शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.
sagararjunshinde6664@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
sagar s
Tue , 19 March 2019
हॅलो मी पाठवलेल्या pdf मध्ये तरी एकदिवसीय असेच होते .. नंतर typo चूक झाली असेल . पण आपण फक्त लेखा बद्दल मत मांडले असते तर बरं झालं असतं . धन्यवाद .
ramesh singh
Tue , 19 March 2019
@Pantoji V: काय हो पंतोजी, तुम्ही 'त्या दिवशी' असे म्हणता की 'त्या दिवसी'? स्वतःच्या अक्कलमर्यादेमुळे आपण एवढे अहंकारी झाले असाल तर त्यावर औषध नाही. भाषेविषयी आपण अजूनही शुद्ध-अशुद्ध असे द्वैत वापरता यावरून आपली मर्यादा उघड होते आहे. लोकसत्तासारखी वृत्तपत्रे वाचणे हे आपल्याला भाषेतील चुका टाळण्याचे मार्ग वाटतात, यातही आपली मर्यादा दिसते. असो. सागर शिंदे, आपण बिनधास्त लिहीत राहा. असल्या पंतोजीरावांकडे लक्ष देऊ नका.
Pantoji V
Tue , 19 March 2019
अरेरे !! किती हे अशुद्ध मराठी. सागरा..प्राण तमळमळला रे, अशुद्ध मराठी वाचून. अरे 'एकदिवशीय' नाही, तर 'एकदिवसीय' असा शब्द आहे तो. लोकसत्तासारखी वृत्तपत्रे जरी रोज वाचली तरी या फुटकळ चुका टाळतां येऊ शकतात. बाकी आजकालच्या शिक्षकांचे मराठी जर या दर्जाचे असेल , तर विद्यार्थ्यांना किती दर्जेदार (?) शिक्षण मिळत असेल याचा अंदाज बांधता येतो.