अजूनकाही
शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिना (२३ मार्च) निमित्त दरवर्षी होणारा नास्तिक मेळावा, या वर्षी रविवार, १७ मार्च २०१९ रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिक मेळाव्याचं हे सहावं वर्षं. महाराष्ट्र, गुजरात राज्यातून आलेले अनेक कार्यकर्ते या वेळी मेळाव्यास उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. टी.एस. पाटील (इतिहास संशोधक), वैभव मांगले (दूरचित्रवाणी अभिनेता), डॉ. शंतनु अभ्यंकर (स्त्रीरोगतज्ज्ञ व लेखक) आणि ज्येष्ठ अभ्यासक य. ना. वालावलकर हे उपस्थित होते. या आधीच्या वर्षांमध्ये नास्तिकता मेळाव्यात ज्येष्ठ अभिनेता श्रीराम लागू, दिग्दर्शक नागराज मंजुळे, लेखक राजन खान, सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे, कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केलं होतं.
नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे. त्यामुळे अलौकिक शक्ती नाकारणाऱ्या सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन प्रगतिशील मार्गानं वाटचाल करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
संशोधक प्रा. टी.एस.पाटील म्हणाले, “भारतामध्ये प्राचीन काळापासून समृद्ध निरीश्वरवादी परंपरा होती. जैन, बौद्ध, सांख्य, चार्वाक, लोकायत परंपरा यांनी पुरातन वेदांपेक्षा वेगळा विचार मांडला. मूर्तिपूजेचे अवडंबर माजवणाऱ्यांनी त्याला विरोध केला. वेदांची बौद्धिक चिकित्सा करणाऱ्यांना हिंसेला सामोरे जावे लागले. आधुनिक काळात राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, माधवराव बागल आणि सत्यशोधक परंपरेतील लोकांनी ही निरीश्वरवादाची परंपरा जिवंत ठेवली. व्हॅटिकन चर्चने काही शतकांपूर्वी डार्विन, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर यांना वाळीत टाकले होते, त्या चर्चने त्यांची माफी मागितली आहे. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या समाजाने आणि विशेषतः धर्मपीठाने स्त्रियांचा, संतांचा आणि एकलव्यासारख्या वंचितांचा जो छळ केला, त्यांची माफी अजूनही मागितलेली नाही. आजच्या काळात विवेकवादाचा तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कांचा संघर्ष करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. अलीकडे प्राचीन काळात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात असल्याचा अवैज्ञानिक प्रचार केला जातो. त्यामुळे नास्तिक लोकांवर वैज्ञानिक पद्धतीने लोकांना शहाणे करण्याची जबाबदारी आहे आणि त्यांच्यावतीने हेच मोठे देशकार्य ठरेल.”
डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी करताना या विषयावर जागतिक पातळीवर काम करणाऱ्या डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या लेखनाची आणि वैचारिक योगदानाची माहिती देणारं भाषण केलं. हे करताना त्यांनी चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतातील महत्त्वाच्या संकल्पना आणि डॉकिन्स यांच्या पुस्तकांतील त्याबद्दल आलेलं विवेचनाचं सार अतिशय सुलभ व ओघवत्या भाषेत सांगून सर्वांची मनं जिंकली. डॉ. अभ्यंकर अलीकडेच ‘कमिटी फॉर स्केप्टिकल एन्क्वायरी’च्या २०१८ च्या अधिवेशनात सामील झाले होते आणि ‘काळा जादूटोणा’ या विषयावर त्यांनी तिथं शोधनिबंध सादर केला होता. “डार्विनच्या उत्क्रांतीच्या संकल्पनेला न मानणाऱ्या काही व्यक्ती वा समूह, हे विश्व म्हणजे देवाची ‘बुद्धिमान संरचना’ (इंटेलिजन्ट डिझाईन) आहे, असा खोटा प्रचार करतात. त्यामुळे त्यांचा हा खोटा प्रचार खोडून काढण्याचे काम, नास्तिक असणाऱ्या माणसाने केले पाहिजे,” अशी भावना यावेळी डॉ. अभ्यंकर यांनी व्यक्त केली.
आपण माणूस म्हणजे जैविक गुणसूत्रांचे वाहक आहोत, निसर्ग हाच यातील सर्वश्रेष्ठ कारागीर आहे आणि कोणतीही दैवी शक्ती यामागे नाही, हे रिचर्ड डॉकिन्स त्यांच्या कामातून दाखवून देतात याचे दाखले डॉ. अभ्यंकर यांनी दिले. “उत्क्रांती अतिशय सावकाशपणे होणारी प्रक्रिया आहे आणि त्यातील सूक्ष्म वैज्ञानिक बदल हे दैवी सिद्धांत मांडणाऱ्या लोकांतर्फे कधीच सांगितले जात नाहीत. धर्मग्रंथ हे तर्काच्या पलीकडे जाणारी विधाने करतात आणि ती विधाने सर्वसामान्य माणसाच्या सद्सद्विवेकालासुद्धा बऱ्याच वेळा पटणारी नसतात. त्यामुळे तर्क, बुद्धिवाद व वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे जगू पाहणाऱ्या सर्वांनी मोठ्या आवाजात आम्ही निरीश्वरवादी आहोत, असं निर्भयपणे सांगितलं पाहिजे,” असं आवाहनही डॉ. अभ्यंकर यांनी यावेळी केलं.
‘आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे माझा प्रवास’ असा अभिनेता वैभव मांगले यांचा विषय होता. या विषयावर बोलताना त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यात दैववाद लहानपणापासून आणि घरातूनच कसा वर्चस्व गाजवतो आणि त्यामुळे सामान्यांची मानसिक कोंडी कशी होते, हे स्वतःच्या उदाहरणावरून समजावून सांगितलं. ते म्हणाले, “देव, धर्म हा एक संस्कार आहे. आपल्याला लहानपणापासून कल्पित जगात नेलं जातं. मनुष्य मूलतः दुर्बल असतो आणि आपल्याला हाव, लोभ असतात. आपल्याला देव पुरत नाही म्हणून आपण बाबा, बुवाकडे जातो. हे करताना मात्र आपण आपला तारतम्यभाव गहाण ठेवतो.” ते पुढे म्हणाले, “अभिनय करताना मी माझ्या भूमिकेचे लॉजिक शोधतो. तर्कसंगती शोधणे हा विज्ञानाचा पाया आहे. जीवनातल्या प्रत्येक घटनेला लॉजिक असते, ते शोधायला आपण सर्वांना प्रवृत्त करू या. नास्तिकता जगण्याची एक पद्धत असू शकते. नास्तिक असल्यामुळे आपल्या जवळच्या लोकांची भावनिक जबाबदारी आपण आपल्या अंगावर घेतो. कारण देवावर, नशिबावर आणि इतर कुणावरही आपल्या कृत्यांसाठी जबाबदार ठरवून पळवाट काढत नाही… आस्तिकतेपासून नास्तिकतेकडे जाणारा प्रवास अवघड आहे, परंतु हा प्रवास करता येतो.”
मांगले यांनी अलीकडे घडणाऱ्या काही घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “आजकाल असहिष्णुता वाढत आहे. गायीच्या मुद्द्यावरून हिंसा होते. हजारो लोक तीर्थक्षेत्री दिवसेंदिवस चालत जातात. याचा दुसरा एक अर्थ असाही आहे की, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आजच्या समाजात असहिष्णुता धोकादायक रीतीने वाढत आहे. त्याचबरोबर आपले सामाजिक भानसुद्धा घसरत आहे. पर्यावरणाची काळजी घेणे, वाहन चालवताना नियम पाळणे व हेल्मेट घालणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, अपघात प्रसंगी शूटिंग/सेल्फी न काढता मदत करणे, हे सामाजिक शिस्तीचे संकेत मला आस्तिकता-नास्तिकता या वादापेक्षाही महत्त्वाचे वाटावेत, अशी आज परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षणातून बाहेर पडून समाजात येण्याआधी सर्वांना सामाजिक शिस्तीबद्दल साक्षर करून नागरिकशास्त्राचे खऱ्या अर्थाने परत एकदा प्रत्येक नागरिकाचे प्रशिक्षण व्हायला हवे.” अशी अपेक्षा मांगले यांनी व्यक्त केली.
संजय सावरकर यांनी यावेळी नास्तिक मेळाव्याच्या जाहीरनाम्याचं वाचन केलं. नास्तिक कोण असतात, या व्याख्येची चर्चा करताना या जाहीरनाम्याद्वारे कामगार हक्क, स्त्री-पुरुष समानता हे जसे पुरोगामित्त्वाच्या चळवळीचे निकष आहेत, त्याचप्रमाणे तो एका चांगल्या नास्तिक कार्यकर्त्याचा कामाचासुद्धा एक निकष आहे. आपल्या लोकशाहीने अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे आपण आपली नास्तिकता घोषित करू शकतो, पण आपली नास्तिकता ही अहंकारी नाही. घटनेने ज्याप्रमाणे उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्याप्रमाणे अज्ञेयवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, तर्कनिष्ठ विचार जोपासून नास्तिक राहण्याचासुद्धा अधिकार आपल्याला संविधानानं दिला आहे, असा या जाहीरनाम्याचा सर्वसाधारण रोख होता. परस्पर जीवन आनंदी असावं आणि नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याची भावना या जाहीरनाम्याचा निमित्तानं व्यक्त करण्यात आली.
विवेक सांबरे यांनी प्रास्ताविक मांडताना नास्तिक मेळाव्याचं उद्दिष्ट मांडलं. नास्तिक समुदायातील सर्वांनी वर्षातील एक दिवस एकत्र येऊन त्यांचे प्रश्न मांडले जावेत, एवढं किमान उद्दिष्ट याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यातूनच विवेकवादी चळवळीतील भविष्याचं नेतृत्व उभं राहू शकतं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राहुल उजगरे, अमित खरात, नितीन हांडे, प्रवीण कुंभार यांनी यावेळी धर्माच्या अतिरेकी प्रवृत्तीचा निषेध करणारी आणि विवेकाच्या शोधात निघालेल्या जीवनाचा मार्ग सांगणारी गाणी सादर केली. क्रांती पोतदार यांनी सूत्रसंचालन केलं, तर अरुणा यशवंते यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी इतिहास संशोधक टी. एस. पाटील यांनी पुढील नास्तिकता परिषद कोल्हापूरमध्ये घेण्यासाठी सर्वांना अनौपचारिक आमंत्रण दिलं.
...........................................................................................................................................
लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.
creativityindian@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 20 March 2019
आयला, भगतसिंगांचा नास्तिकतेशी काय संबंध? भले स्वत:ला नास्तिक म्हणून घोषित केलं असेल, पण तरीही त्यांचं या बाबतीत कसलंही कार्य नाही. त्यांचं कार्य इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचं आहे. असो. लेखातली एकेक विधानं बघूया. १. >> जैन, बौद्ध, सांख्य, चार्वाक, लोकायत परंपरा यांनी पुरातन वेदांपेक्षा वेगळा विचार मांडला. >> पण तरीही हे वेगळे विचार वेदविरोधी नाहीत. बौद्ध आजही वेदांनाच मूळ श्रुती मानतात. लोकायत तत्त्वज्ञान तर इहलोकाबद्दल मत प्रदर्शित करतं. ते परलोकाविषयी एक शब्दही उच्चारीत नाही. याउलट वेद परलोकाविषयी बरंच काही सांगतात. म्हणून वेद व लोकायत या विचारांत तेढ ( = conflict) संभवंत नाही. २. >> मूर्तिपूजेचे अवडंबर माजवणाऱ्यांनी त्याला विरोध केला. >> च्यामारी, हे कोणी सांगितलं पाटीलबुवांना? बुद्धाच्या इतक्या मूर्ती कशाला दिसतात मग? शिवाय वेदांचा मूर्तीपूजेशी कसलाही संबंध नाही. ३. >> वेदांची बौद्धिक चिकित्सा करणाऱ्यांना हिंसेला सामोरे जावे लागले. >> याचा काही संदर्भ मिळेल काय? की दिली आपली एक लोणकढी ठोकून? ४. >> आधुनिक काळात राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, माधवराव बागल आणि सत्यशोधक परंपरेतील लोकांनी ही निरीश्वरवादाची परंपरा जिवंत ठेवली. >> ज्योतिबा फुल्यांनी निर्मिक ही संज्ञा वापरली आहे. ती कशासाठी ते माहीत आहे का? या संज्ञेचा निरीश्वरवादाशी नेमका काय संबंध आहे? ५. >> व्हॅटिकन चर्चने काही शतकांपूर्वी डार्विन, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर यांना वाळीत टाकले होते, त्या चर्चने त्यांची माफी मागितली आहे. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या समाजाने आणि विशेषतः धर्मपीठाने स्त्रियांचा, संतांचा आणि एकलव्यासारख्या वंचितांचा जो छळ केला, त्यांची माफी अजूनही मागितलेली नाही. >> वा, कायपण तुलना आहे. मेकॉलेछाप शिक्षण ओसंडून वाहतंय अगदी. पोप हा क्याथलिक पंथाचा सत्ताधारी प्रतिनिधी आहे. तशी सत्ता हिंदू धर्मपीठाच्या हाती कधीही नव्हती. उगीच हिंदूंच्या धर्मपीठाच्या नावाने बोंबा मारू नका. आणि पोपने गोव्यातल्या भारतीयांवर जे नृशंस अत्याचार केले त्याची माफी मागितलीये का? तुम्हां नास्तिकांना पोपची युरोपातली दडपशाही दिसते, पण भारतीय स्वबंधावांवर केलेले भीषण अत्याचार दिसंत नाहीत. आंधळे आहात तुम्ही. म्हणूनंच तुमच्यावर आजिबात विश्वास टाकू नये असं माझं मत आहे. ६. >> अलीकडे प्राचीन काळात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात असल्याचा अवैज्ञानिक प्रचार केला जातो. >> सुश्रुताने आतडी शिवण्यासाठी मुंगळ्यांचा वापर केल्याचा उल्लेख आहे. तसंच सैनिकांचं तुटलेलं नाकही दुरुस्त करून दिल्याचे उल्लेख संहितेत आहेत. ते खोटे आहेत का? ७. >> त्यामुळे नास्तिक लोकांवर वैज्ञानिक पद्धतीने लोकांना शहाणे करण्याची जबाबदारी आहे आणि त्यांच्यावतीने हेच मोठे देशकार्य ठरेल. >> आयला, लईच भराऱ्या घेताय राव! वस्तुस्थिती समजावून घेऊन आगोदर स्वत: शहाणे व्हा. मग इतरांचं बघा. ८. >> डार्विनच्या उत्क्रांतीच्या संकल्पनेला न मानणाऱ्या काही व्यक्ती वा समूह, हे विश्व म्हणजे देवाची ‘बुद्धिमान संरचना’ (इंटेलिजन्ट डिझाईन) आहे, असा खोटा प्रचार करतात. त्यामुळे त्यांचा हा खोटा प्रचार खोडून काढण्याचे काम, नास्तिक असणाऱ्या माणसाने केले पाहिजे, >> डार्विन कोण मोठा लागून गेलाय की त्याची बाकीची मतं आम्ही डोक्यावर घ्यावी? डार्विन उत्क्रांतीच्या सिद्धांतात सजीवांबद्दल भाष्य करतो. हे सजीव वगळता उरलेलं विश्व निर्जीव आहे. मग डार्विनचा उर्वरित विश्वाशी संबंधच काय मुळातून ? डॉ. अभ्यंकर काहीतरी तोंडाला येईल ते बडबडत सुटलेत. ९. >> निसर्ग हाच यातील सर्वश्रेष्ठ कारागीर आहे आणि कोणतीही दैवी शक्ती यामागे नाही, हे रिचर्ड डॉकिन्स त्यांच्या कामातून दाखवून देतात >> याचाच अर्थ 'निसर्ग हाच देव' असाही होत ना? १०. >> “उत्क्रांती अतिशय सावकाशपणे होणारी प्रक्रिया आहे आणि त्यातील सूक्ष्म वैज्ञानिक बदल हे दैवी सिद्धांत मांडणाऱ्या लोकांतर्फे कधीच सांगितले जात नाहीत. >> वैज्ञानिक बदल ? हा पदार्थ कशाशी खातात ? आम्हांस बदल माहिती आहे. व तो मोजायच्या निरनिराळ्या पद्धती आहेत हेही आम्हांस ठाऊक आहे. पण वैज्ञानिक असं काय असतं बदलात ? डॉ. अभ्यंकरांनी उगीच काहीतरी भोंगळ संज्ञा वापरली आहे. तसंच हे बदल सूक्ष्मही असतात. हे फार छान झालं. मग अध्यात्मात सूक्ष्म इंद्रिये वापरायला शिकवतात ती शिकवणूक वैज्ञानिकच नव्हे काय? ११. >> धर्मग्रंथ हे तर्काच्या पलीकडे जाणारी विधाने करतात आणि ती विधाने सर्वसामान्य माणसाच्या सद्सद्विवेकालासुद्धा बऱ्याच वेळा पटणारी नसतात. >> हे विधान वाळवंटी पंथांबाबत खरंय. याचा हिंदू धर्माची फुटक्या कवडीइतकाही संबंध नाही. १२. >> त्यामुळे तर्क, बुद्धिवाद व वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे जगू पाहणाऱ्या सर्वांनी मोठ्या आवाजात आम्ही निरीश्वरवादी आहोत, असं निर्भयपणे सांगितलं पाहिजे >> आयला, ही जबरदस्ती आहे. माझ्यासारख्या तर्कनिष्ठ, बुद्धिवादी व वैज्ञानिक वृत्तीच्या मनुष्याच्या गळ्यात निरीश्वरवादाची धोंड का म्हणून? मी तर्कनिष्ठ, बुद्धिवादी व वैज्ञानिक वृत्तीचा असून माझी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे. हे विधान मी निर्भयपणे खुलेआम व डंकेकी चोटपे ठणाणा बोंबलून सांगतो आहे. १३. >> .... सामान्य माणसाच्या आयुष्यात दैववाद लहानपणापासून आणि घरातूनच कसा वर्चस्व गाजवतो आणि त्यामुळे सामान्यांची मानसिक कोंडी कशी होते .... >> नेमक्या याच दैववादाशी आम्हां आस्तिकांचा लढा आहे. देवाचा उपयोग दैववादाकडे झुकाण्यात होऊ नये, तर साधना करून ईश्वराची अनुभूती घेण्यासाठी व्हावा. १४. >> आपल्याला लहानपणापासून कल्पित जगात नेलं जातं. मनुष्य मूलतः दुर्बल असतो आणि आपल्याला हाव, लोभ असतात. आपल्याला देव पुरत नाही म्हणून आपण बाबा, बुवाकडे जातो. >> हे वैभव मांगले यांचं वैयक्तिक मत आहे. ते त्यांच्यापरीने बरोबर आहेत. मात्र याउलट कित्येक लोकांना अध्यात्मिक साधना करायची असते. त्यासाठी ते गुरू व/वा देवाच्या शोधात असतात. स्वामे विवेकानंद असेच एक साधक होते. साधना करणे हे मनुष्यजिवाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. १५. >> हे करताना मात्र आपण आपला तारतम्यभाव गहाण ठेवतो. >> साधकाने नेहमी तारतम्य बाळगायचं असतं. १६. >> नास्तिक असल्यामुळे आपल्या जवळच्या लोकांची भावनिक जबाबदारी आपण आपल्या अंगावर घेतो. >> हे जरा विस्कटून सांगणार काय? भावनिक जबाबदारी म्हणजे काय? आणि ती नास्तिकाच्या अंगावर कशीकाय पडते बुवा? १७. >> आजकाल असहिष्णुता वाढत आहे. गायीच्या मुद्द्यावरून हिंसा होते. >> काश्मिरी हिंदूंना दिवसाढवळ्या त्यांच्याच देशात निर्वासित व्हावं लागलं तेव्हा कुठे गेली होती वैभव मंगल्यांची सहिष्णुता? १८. >> हजारो लोक तीर्थक्षेत्री दिवसेंदिवस चालत जातात. याचा दुसरा एक अर्थ असाही आहे की, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. >> गेले तर जाउदे त्यांना. पण त्यांच्यात बेरोजगारांची संख्या अधिक असते याचा काही संदर्भ मिळेल काय? की उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलताहेत? १९. >> नास्तिक कोण असतात, या व्याख्येची चर्चा करताना या जाहीरनाम्याद्वारे कामगार हक्क, स्त्री-पुरुष समानता हे जसे पुरोगामित्त्वाच्या चळवळीचे निकष आहेत, त्याचप्रमाणे तो एका चांगल्या नास्तिक कार्यकर्त्याचा कामाचासुद्धा एक निकष आहे. >> च्यायला, नास्तिकतेचा स्त्रीपुरुष समानतेशी कसला आलाय डोंबल्याचा संबंध ? कामगार हक्कांचा नास्तिकतेशी संबंधच काय मुळातून? आणि त्यांच्यात समानतेची तंगडी कशाला घुसवायची? कसलीतरी आवळ्याभोपळ्याची मोट बांधायची. लोकांच्या मनांत गोंधळ उडवण्याची युक्ती छान आहे. २०. >> परस्पर जीवन आनंदी असावं आणि नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याची भावना या जाहीरनाम्याचा निमित्तानं व्यक्त करण्यात आली. >> आनंदी राहायला नास्तिक कशाला व्हायला पाहिजे? लोकशाहीचा नास्तिक्याशी कसलाही संबंध नाही. मनाला येईल त्या गोष्टींचा बादरायण संबंध जोडून त्याला बुद्धिवादाचं नाव द्यायचं. अडाणीपणा म्हणतात तो हाच. उगीच आस्तिकांना हसायची गरज नाही. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. असो. ते य.ना.वालावलकर आहेत ना, त्यांना मी एक प्रश्न केला होता. तो म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान यांतला फरक काय, म्हणून. तो इथे आहे : https://www.misalpav.com/comment/763168#comment-763168 . बहुतेक वालावलकरांना आजूनही चिंतन करायला वेळ मिळालेला नाहीये. एकदा का पाया पक्का झाला की मग आपण विज्ञानावर बोलूया. आपला नम्र, -गामा पैलवान