अजूनकाही
रितेश बत्राच्या ‘फोटोग्राफ’मध्ये मूर्त गोष्टी आणि अमूर्त भावना एक प्रकारे कथनाचं साधन म्हणून वापरल्या जातात. अगदी त्याचा पहिला चित्रपट असलेल्या ‘द लंचबॉक्स’प्रमाणेच. एरवी एकमेकांच्या संपर्कातही येणार नाहीत, अशा दोन व्यक्ती इथं ‘फोटोग्राफ’नामक एक भौतिक गोष्ट आणि तिच्यामागील भावनांच्या रूपानं जोडल्या जातात. वर्ण ते वर्ग अशा बऱ्याच बाबतीत टोकाचं अंतर असलेल्या या दोघांची कथा जसजशी पुढे सरकत जाते, तशा त्यांना जोडणाऱ्या गोष्टी वाढत जातात.
वरवर पाहता विरोधाभासी भासणारे हे दोघंही मुळात एकमेकांहून फारसे वेगळे नाहीत. आपल्या मित्र/आप्तेष्टांनी वेढलेले असूनही दोघे मुंबई नामक गजबजलेल्या शहरात एकाकी भासतात. जीवनाच्या पारंपरिक चक्रात ती कायम दुसऱ्यांसाठी जगतात, अगदी रात्री जेव्हा एकांत मिळतो, तेव्हाही सगळं दुःख किंवा इतरही भावना व्यक्त न करता इंटर्नलाइज करत राहतात. आकस्मिकपणे एकत्र आलेल्या त्या दोघांनाही एकमेकांच्या विश्वात डोकावून पाहत असताना जणू शहराच्या गोंगाटात स्वतःचं असं एक, काहीसं गुप्तपणे वाढत जाणारं विश्व गवसतं. ‘द लंचबॉक्स’मधील साजन फर्नांडिस आणि इला असो वा इथली प्रमुख पात्रं, बत्राला परिस्थिती आणि स्वभाव, दोन्हींमुळे एककल्ली, मितभाषी असणाऱ्या लोकांच्या कथा सांगायला आवडतात.
रफी (नवाजुद्दीन सिद्दीकी) हा एक फोटोग्राफर आहे. ‘गेटवे के साथ ताज फ्री’ म्हणणारी ही व्यक्ती ‘फोटो काढत असताना कानावर पडणारे आवाज, केसांमधून वाहणारा वारा कैद करता येणारा नसला तरी फोटोतील व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडणारा सूर्यप्रकाश आणि हास्य नक्कीच नश्वर असणार आहे’ असं म्हणत छायाचित्र या कल्पनेला नको तितकं काव्यात्म भासवते. कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करत सीए करणारी मिलोनी (सान्या मल्होत्रा) जेव्हा कुटुंबापासून दूर, निःश्वासाचा असा एक क्षण मिळवण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाजवळ आलेली असते, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर अनंत काळ टिकून राहील असं हास्य (असलेला फोटो) ही कल्पनाच तिला अशक्यप्राय वाटत असावी. पण रफीनं काढलेला हा फोटो त्यानं केलेल्या वर्णनाला जागणारा ठरून, मिलोनीच्या चेहऱ्यावरील हास्य, तिचं सौंदर्य कैद करतो.
मिलोनी पुढे जाऊन त्या फोटोचं वर्णन ‘फोटोमध्ये जणू मी नाही, तर दुसरीच कुणीतरी, कदाचित माझ्याहूनही अधिक आनंदी व्यक्ती आहे असं वाटतं’ अशा शब्दांत करते, ते खरंच आहे. कारण रफीसोबत असणारी मिलोनी ही तिच्या घरातील रूपाहून वेगळीच तर आहे. ती घरी असते तेव्हा लग्न करून परदेशात जाणं किंवा सीए करणं या गोष्टी कायम पुढाकार घेऊन असतात, याउलट त्याच्यासोबत असताना ती अगदीच निःशब्द असली तरी मानसिक, भावनिक पातळीवर अधिक खुललेली असते. किंबहुना काही वेळा तर त्याच्यासोबत असणंही गरजेचं नसतं. त्याची आठवण किंवा त्यानं काढलेला फोटोही त्यासाठी पुरेसा असू शकतो. उदाहरणार्थ, घरी तिला पाहायला आलेल्या स्थळाच्या कुटुंबाला ती रफीनं काढलेला फोटो दाखवते, तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर आलेलं तेज हे तिच्या संपूर्ण संभाषणाहून अधिक बोलकं ठरतं.
मिलोनीच्या छोटेखानी विश्वाच्या विरुद्ध टोकाला, नेहमीप्रमाणे हातात कॅमेरा घेऊन उभा असलेला रफी स्वभाववैशिष्टांच्या दृष्टीनं तिच्याहून वेगळा नाही. आपलं सगळं उत्पन्न गावी पाठवून, वडिलांनी मृत्यूपूर्वी घेतलेल्या घराचं कर्ज फेडत बसलेला, आणि आजी तसेच मित्रांच्या लग्न कधी करणार या प्रश्नानं वैतागलेला तोही तिच्यासारखाच आहे. गावी राहणाऱ्या आजीनं (फारुख जफ्फर) आपल्याला भावनिक पातळीवर ब्लॅकमेल करण्याचा प्रकार म्हणून औषधं बंद करण्याच्या बातमीला उत्तर म्हणून तो तिला आपल्या काल्पनिक प्रेयसीच्या नावाखाली मिलोनीचा फोटो पाठवून देतो.
आपल्यामागील पीडा टळेल अशी आशा असताना आजी मुंबईला येण्याची बातमी मिळते, आणि त्यांच्या एरवी मिलोनीनं न दिलेले फोटोचे तीस रुपये, आणि रफीकडे असणारा तिचा एकमेव फोटो इथवरच थांबली असती की काय अशी शंका येणाऱ्या कथेला गरजेचं उत्प्रेरक मिळतं. शब्दशः एका फोटोपासून सुरू झालेल्या (आणि अशीच टॅगलाइन असलेल्या) या कथेच्या निमित्तानं भावनांची देवाणघेवाण होते. आणि पारंपरिक भारतीय चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या श्रीमंत मुलगी-गरीब मुलगा (किंवा काही वेळा याच्या उलट असलेल्या) टेम्प्लेटच्या कथेत वर्गभेद दाखवणाऱ्या मूळ समस्येच्या आधी काय घडतं, हे अगदी अलवारपणे उलगडत जातं. अगदी चित्रपटाचा शेवटही अनपेक्षित किंवा खरं तर बत्रा आहे म्हटल्यावर काहीशा अपेक्षितपणेच होतो.
अगदीच मोजकी पात्रं आणि त्यातही पुन्हा मुख्य पात्रांच्या स्वभावाला जागणाऱ्या मोजक्याच संवादांच्या दरम्यान दिग्दर्शक बत्रा हे विश्व कसं फुलवत नेतो, हे पाहणं इथं महत्त्वाचं ठरतं. रफीच्या आजीपासून ते त्याच्या मित्रांपर्यंत आणि मिलोनीच्या घरातील सदस्यांपासून ते तिच्या घरातील मोलकरीण, रामप्यारीपर्यंत (गीतांजली कुलकर्णी) सगळीच पात्रं त्या त्या दृश्याला अधिक जिवंत, अधिक मानवी बनवतात. (त्यांच्या भूमिकांत दिसणारे जफ्फर, गीतांजली कुलकर्णी, आकाश सिन्हा, सहर्ष कुमार शुक्ला हे लोक उत्तम कामगिरी करतात हे वेगळं सांगणं न लगे.)
मुंबईतील गर्दी ते टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत सगळं काही प्रभावी आणि वास्तविक, बोलक्या स्वरूपात दिसतं. टिम गिलीस आणि बेन कचिन्सचं छायाचित्रण चित्रपटाचा महत्त्वाचा भाग ठरतं. गेटवे योग्य इंडियावरील गर्दी ते तुलनेनं शांत रस्ते, मिलोनीच्या विश्वात गजबजलेलं असूनही शांत भासणारं प्रशस्त घर, रफीसोबत प्यायला बसलेल्या मित्रांच्या मैफली अशी टोकाची दृश्यं ते तितक्याच नजाकतीनं समोर आणतात.
आपल्या भावनिक कोलाहलाला आंतरिक रूप बहाल करणाऱ्या अनुक्रमे मिलोनी आणि रफीच्या भूमिकेत दिसणारे सान्या आणि नवाजुद्दीन दोघंही अप्रतिम कामगिरी करतात. ही दोघंही मितभाषी आहेत. पण वेळोवेळी एखादा दुसऱ्याहून अधिक शांत भासतो. पण नंतरच्या एखाद्या दृश्यात ती कशी खुलतात, आणि नंतर पुन्हा ऑकवर्डपणाकडे कशी झुकतात, हे रेखाटन त्यांना अधिक परिपूर्ण बनवतं. त्यासाठी टॅक्सीमध्ये बसलेलं असताना दोघंही एकमेकांशी संवाद साधत असताना जाणवणाऱ्या ऑकवर्ड पॉजेसकडे पाहता येईल. सान्या आणि गीतांजली एकत्र असलेली दृश्यं चित्रपटातील काही उत्तमरीत्या मांडणी केलेल्या दृश्यांपैकी एक ठरतात. त्यांमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या भावना, त्या दोघींच्या संवादामध्ये हळूहळू जाणवणारे बदल बत्रा ज्या पद्धतीनं टिपतो ते महत्त्वाचं ठरतं. त्याच्या कथनात दृकश्राव्य मांडणीला असलेलं महत्त्व, आणि कथानकाला पुढे नेण्यामध्ये अमूर्त गोष्टींचा असलेला वाटा इथं दिसून येतो.
पायाच्या (आणि पैंजणांच्याही) फ्रेम्स दाखवणाऱ्या दृश्यांची सदर चित्रपटात केलेली रचना याचं महत्त्वाचं उदाहरण मानता येईल. असाच प्रकार रफी आणि मिलोनीच्या विश्वांमध्ये स्वैर वावर करू पाहणाऱ्या संकलनाच्या माध्यमातून दिसतो. एखाद्या पात्रावर कॅमेरा स्थिरावणाऱ्या दृश्यातही काही काळानं ज्या प्रकारे टाइट झूम केला जातो ते महत्त्वाचं ठरतं. साहजिकच त्यातून ते पात्र तिथं उपस्थित असूनही त्याचं भवतालाहून दूर, समोर घडणाऱ्या कृतींबाबत नीरस असणं दिसून येईल हे पाहिलं जातं. ज्याद्वारे निर्माण होणाऱ्या एकूण परिणामामुळे बत्राची या माध्यमाची जाण अधोरेखित होते.
दिग्दर्शक बत्राच्या चित्रपटात पार्श्वभूमीवर सुरू असणारी गाणी ही त्याच्या चित्रपटाला पूरक असलेल्या घटकांपैकी एक मानता येतील. ‘द लंचबॉक्स’प्रमाणेच इथं रफीच्या काल्पनिक प्रेयसीच्या कथेत मिलोनीला ‘नुरी’ हे नाव मिळवून देणारं ‘आजा रे मेरे ओ दिलबर’ किंवा जणू त्यांचं स्वतःचं (प्रेम)गीत बनणारं ‘तुमने मुझे देखा’ ही गाणी पार्श्वभूमीवर सुरू असतात. (हे गाणं गाणाऱ्या मोहम्मद रफीशी नायकाचं असलेलं नामसाधर्म्य हाही केवळ योगायोग नसावाच.) तर पात्रांच्या हळूहळू विरून जाणाऱ्या संवादांपुढे उंचावत जाणारं पीटर रेबर्नचं संगीत चित्रपटाच्या सौंदर्यात भर घालतं.
दिग्दर्शक बत्राच्या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव ‘पोएटिक लायसन्स’ असं आहे. त्याच्या कलाकृतींच्या निर्मितीमागील उद्देशाचं याहून समर्पक शब्दांत वर्णन करणं तसं अशक्य राहील. ‘फोटोग्राफ’मध्ये एका समर्पक फ्रेमवर जेव्हा हे शब्द उमटतात, आणि सदर चित्रपट ज्या ठिकाणी संपतो, त्यानंतर मनात जी भावना निर्माण होते ती त्याच्या याच अपारंपरिक, काव्यात्म अनुभूतीचाच तर परिणाम असते.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment