अजूनकाही
‘स्त्री’ हा सगळ्यात शोषित घटक. जगातील बहुतांश धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले असल्यानं त्यात त्यांच्या हितसंबंधाची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली गेली आहे. स्त्रियांना सर्वच क्षेत्रांत दुय्यम समजले गेले आहे. स्वतःला प्रगतीशील, पुरोगामी, विज्ञानवादी समजली जाणारी ‘अमेरिका’ही यास अपवाद नाही. राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्थामध्ये जेथे स्त्रियांना समतेचा अधिकार नाही, तेथे ‘लैंगिकते’सारख्या विषयात त्यांना न्याय मिळणे म्हणजे नवीन ग्रहावर वस्ती करण्यासारखे आहे. आजच्या काळातही (एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात) स्वतःला आधुनिक, प्रगत समजल्या जाणाऱ्या, समतेची भाषा करणाऱ्या पुरुषांना स्त्रियांना ‘लैंगिक’ न्याय म्हणजे काय, ही संकल्पनाच माहिती नाही. ‘स्त्रियांच्या लैंगिक सुखासाठी पुरुषांची गरज नाही. ती आपले कामसुख हस्तमैथुनाद्वारे उत्तमरीत्या प्राप्त करून घेऊ शकते’ ही कल्पना अद्याप पूर्णपणे अमेरिकेच्या गळी उतरलेली नाही, तेथे ‘भारता’चा विचार करणे हास्यास्पद आहे. पण, हे धाडस अमेरिकेतील एका ‘स्त्री’नेच आपल्या कृतिशील प्रयोगातून करून जगाला विचार करायला भाग पाडले. हा नवा विचार प्रथमच मराठी भाषेत ‘विरंगी मी । विमुक्त मी’ या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचं धाडस अंजली जोशी यांनी केलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
‘मी अल्बर्ट एलिस’ या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अंजली जोशी व्यवसायानं मानसोपचार तज्ज्ञ आहेत. वरील ग्रंथासोबतच त्यांच्या ‘विवेकी पालकत्व’ व ‘लक्षणीय ५१’ या ग्रंथाचंही वाचकांनी स्वागत केलं आहे.
‘विरंगी मी । विमुक्ती मी’ ही तीनशे छत्तीस पानांची कादंबरी तिच्या मुखपृष्ठापासूनच लक्ष वेधते. मराठी कादंबरीच्या परंपरागत अलिखित नियमांना दूर सारते. गडद काळ्या रंगावर अर्धनग्न चित्र दर्शवून मुखपृष्ठानं आपली वेगळी छाप पाडली आहे. ही चरित्रात्मक कादंबरी नाही किंवा यातील मुख्य नायिका बेटी डॉडसन काल्पनिक व्यक्तिरेखाही नाही. या नायिकेसोबत आपण फोनवर बोलू शकतो किंवा अमेरिकेत जाणं शक्य झाल्यास तिला भेटू शकतो. या कादंबरीत तिचं केलेलं चित्रण खोटं नाही, पण ते तिचं चरित्रही नाही. ही एक स्वतंत्र कलाकृती आहे. अमेरिकेतच नाही, तर संपूर्ण जगात खळबळ माजवणाऱ्या क्रांतिकारी बेटी डॉडसन या स्त्रीचा सखोल अभ्यास, चिंतन करून तिच्याशी साधर्म्य असणारी, पण ती तंतोतंत नसणारी नायिका उभी करण्यात लेखिकेला कमालीचं यश मिळालं आहे. हीच बाब या कादंबरीची वेगळेपण अधोरेखित करते.
बेटी डॉडसन ही अमेरिकेतील एक चित्रकार, लेखिका. तिचा जन्म अमेरिकेतील कॅन्सस शहरातल्या विचिटा या गावातील झाला. तिची कर्मभूमी मात्र न्यूयॉर्क आहे. बालपणापासून चित्रकलेची आवड असल्यानं व स्वभावातच बंडखोर असल्यानं वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही वर्षं तिनं स्त्रीवादी चळवळीतही काम केलं. त्याच काळात व्याख्यानं, परिषदा, चर्चासत्रांच्या माध्यमातून भरीव कामही केलं. पण काही वैचारिक मतभेद झाल्यानं या चळवळीपासून दूर झाली.
“स्त्रीची खरी मुक्ती तिच्या लैंगिक मुक्तीत असून, त्या मुक्तीचा केंद्रबिंदू हस्तमैथुनात आहे. त्यासाठी पुरुषाची साथ मिळाली तर उत्तम, पण नाही मिळाली तर तिचे कामसुख हस्तमैथुनाद्वारे उत्तमरीत्या करू शकते” हा तिचा विचार परंपरागत समाज मानसिकतेत जगणाऱ्या व्यवस्थेला तडा देऊन गेला. त्यावरून वादळ निर्माण झालं. या विचाराच्या पुष्टीसाठी व सिद्धतेसाठी तिने अनेक प्रात्यक्षिक, कार्यशाळा आयोजित केल्या. स्वतःच्या कामक्रीडेचं चित्र प्रदर्शन भरवून अनेकांचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे ‘पोर्न आर्टिस्ट’ असं तिचं टोपणनाव पडलं. स्त्रियांच्या हस्तमैथुनाचा विषय सर्वदूर जाण्यासाठी तिनं या विषयावर काही पुस्तकंही लिहिली. या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली. वयाच्या उत्तरार्धात आजही ती या विषयावर समुपदेश करते. हे या कादंबरीचं कथानक आहे.
कादंबरीचं कथानक व तिचा अवकाश फार व्यापक वाटत नसला, तरी ही कहाणी फक्त बेटी डॉडसनपुरती किंवा अमेरिकेपुरती मर्यादित राहत नाही. आजही केवळ अशिक्षितच नाही, तर सुशिक्षित कुटुंबांतही ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया लैंगिक बाबतीत सुखी नसतात ही वस्तुस्थिती आहे. धर्म, परंपरेच्या नावाखाली पुरुषप्रधान व्यवस्थेत त्यांच्या सुखाला तिलांजली दिली जाते. ‘स्त्री ही संयमी असते, तिला निसर्गतः तसा गुणधर्म असतो’ अशा गोंडस नावाखाली तिला गुलामीची वागणूक दिली जाते. या मानसिकतेला तडा देण्याचं काम ही कादंबरी करते आहे.
या कादंबरीतली पात्रं प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. कादंबरीच्या पहिल्या प्रकरणातच नात्यानं काका असलेले क्लार्क आपल्या मुलीच्या वयाच्या एरालिनचा विनयभंग करतात, तेव्हा बेटीची आई म्हणते, ‘तू वयात आली आहेस. एरिलिनसारखा अनुभव तुलाही येईल. पुरुषांच्या अशा नजरांना तुला तोंड द्यावं लागेल. लक्षात ठेव, काय वाटेल ते झालं तरी कुठल्याही पुरुषाला कमरेखाली हात लावायला द्यायचा नाही.’ ही तळमळ फक्त अमेरिकन आईलाच वाटते असं नाही, तर जगातील कोणत्याही आईला आपल्या मुलीची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. ‘गर्भपात’ करताना वेळप्रसंगी स्त्रियांना जीव धोक्यात घालावा लागतो. त्यासाठी अमेरिकाच लागते असं नाही.
कळत असो, नकळत असो किंवा अतिप्रसंग असो अथवा मुलगी नको म्हणून कुटुंबप्रमुखाचा धाक असो, या सगळ्या प्रकारात स्त्रियांनाच मरणयातना सहन कराव्या लागतात, हे वैश्विक सत्य ही कादंबरी समोर ठेवते. या कादंबरीतील नायिकेच्या आयुष्यात आलेले मार्टिन, फ्रेड स्टर्न किंवा ग्रँट टेलर हे पुरुष अमेरिकेतच सापडतात असं नाही. ते सर्वत्र दिसून येतात. उदा. शरीरसंबंध ठेवताना आनंदी राहणारा मार्टिन जेव्हा नायिका गरोदर आहे हे कळते, तेव्हा म्हणतो, ‘तुझ्या पोटात वाढणारं मूल नक्की माझं आहे, याची खात्री पटली तर घेईनही ती जबाबदारी.’ असं बेजबाबदार बोलणारा पुरुष जगात कुठेही सापडतो. थोडक्यात या कादंबरीचा काल अवकाश अमेरिका असला, तरी त्यातील पात्रांची वृत्ती-प्रवृत्ती, स्थायीभाव सगळीकडे दिसू शकतो.
वाचकांची उत्सुकता व गती वाढवण्याचं कसब निवेदनतंत्र आणि भाषाशैलीत दडलं आहे. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात धक्कातंत्रानं केली जाते. वाचक काही वेळा विचारात पडतो. उदा. प्रकरण पाचव्याच्या शेवटी नायिका खूप अस्वस्थ असल्यानं पुढे कोणतं दुःख उभं टाकेल या धास्तीत वाचक असताना लेखिका पुढील प्रकरणाची सुरुवात धक्कातंत्रानं करते. उदा. ‘आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता.’ यामुळे लग्न कधी, केव्हा, कोणासोबत असे अनेक प्रश्न उभे राहतात. या उत्सुकतेमुळे आपण आपोआपच पुढे-पुढे जातो.
यासोबतच कादंबरीत आलेलं पत्रलेखन, चर्चासत्रं, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, चित्रांचं प्रदर्शन, प्रायोगिक कार्यक्रम या विविधतेनं जशी कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते, तशी नायिकाच्या मार्मिक विधानानंही. उदा. नायिका म्हणते, ‘योनिशुचितेचं अवडंबर माजवून स्त्रियांना सतत बलात्काराच्या भीतीखाली डांबलं जातंय. स्त्रीचं चारित्र्य तिच्या जननेंद्रियात आहे, अशी समजूत उराशी बाळगून स्त्रिया संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेत असतात. जननेंद्रियांना शरीराच्या इतर भागापेक्षा वेगळं महत्त्व द्यायचं कारण काय? दुर्दैवाने जननेंद्रियांवर हल्ला झालाच तरी कोसळून जायचं कारण नाही. तो तेथे झालेला अपघात समजावा. शरीराच्या इतर अवयवांना अपघात झाला, तर आपण सावरतोच ना?’’
अर्थात हा विचार पचवण्यासाठी आपला दृष्टिकोनही निकोप असायला हवा. अन्यथा जिथं पुरुषाच्या हस्तमैथुनाकडे वाईट क्रिया म्हणून पाहिलं जातं, तिथं स्त्रीचं हस्तमैथून मान्य करायला अजून बराच काळ जावा लागेल.
‘स्त्रियांचं हस्तमैथून’ यासारख्या नाजूक विषयावर कादंबरीलेखन करताना लेखिकेनं ही कलाकृती बटबटीत होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेचा नवा शोध वाचकांसमोर अलगदपणे ठेवण्यात लेखिकेन कमालीची उंची गाठलेली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विरंगी मी! विमुक्त मी!' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/2458/Virangi-Me--Vimukt-Me-
.............................................................................................................................................
लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.
shankarnvibhute@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment