चित्रकलेचं निसर्गदत्त वरदान लाभलेल्या काही चित्रकारांना काही शापही वागवावे लागतात
ग्रंथनामा - आगामी
चंद्रमोहन कुलकर्णी
  • ‘तीन चित्रकार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 15 March 2019
  • ग्रंथनामा आगामी तीन चित्रकार Tin Chitrakar सतीश भावसार Satish Bhavsar

चित्रकार सतीश भावसार यांचं ‘तीन चित्रकार’ हे पुस्तक उद्या, १६ मार्च, मुंबईत ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकात व्हिन्सेंट व्हॅन गॉग, अमृता शेरगिल आणि प्रभाकर नाईक-साटम यांच्याविषयीच्या दीर्घ लेखांचा समावेश आहे. या पुस्तकाला चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

चित्रकार चित्रं काढतात.

हे तीन शब्दांचं वाक्य वाटतं तितकं साधं नाही. चित्रकलेचं निसर्गदत्त वरदान लाभलेल्या काही चित्रकारांना ह्या वरदानाबरोबर काही शापही वागवावे लागतात. जन्मभर!

काय असतात हे शाप?

नातेसंबंध? प्रेम, मैत्री?

शत्रुत्व, स्वत:ची प्रतिमा, की स्वत:बद्दलच्या वास्तव-अवास्तव कल्पना??

फ्रस्ट्रेशन; की आपल्याला न झेपणारी आपलीच ताकद?

मानसिक आजार?

जगातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या, तीन वेगवेगळ्या काळातल्या तीन चित्रकारांबद्दल सतीश भावसार लिहितायत : ‘तीन चित्रकार’.

हे चित्रकार मनस्वी आहेत. नातेसंबंधांच्या आणि प्रेमप्रकरणांच्या जंजाळात भंजाळलेले आहेत. तन, मन, प्रसंगी धनही झोकून काम करतायत. ह्या ‘तीन चित्रकारां’मधला व्हॅन गॉग केवळ सदतीसाव्या वर्षी मरणाला सामोरा जातोय. स्वत:ची चित्रं अत्युच्च स्थानावर पोहोचत असतानाच हा स्वत:वर गोळी झाडून घेतो. स्वत:च्या भावाच्या नात्याचं (आणि नावाचंसुद्धा) जन्मभर ओझं वाहणारा हा चित्रकार. किती स्त्रिया आल्या त्याच्या आयुष्यात; आणि त्या आल्यामुळे काय काय झालं त्याच्या चित्रकलेचं? विधवा झालेल्या, पदरी अपत्य असलेल्या चुलत बहिणीबद्दल काय भावना होत्या व्हिन्सेंटच्या? त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डेरेकचं काय म्हणणं होतं व्हिन्सेंटच्या मानसिक आजाराबद्दल? व्हिन्सेंटच्या मनातली काळ्या पोशाखातील बाई, युजेनची आई आणि व्हिन्सेंट ह्यांच्यातला प्रेमाचा दिखाऊपणा आणि युजेनवरचं त्याचं प्रेम, हॅनबिक कुटुंबातली कॅरोलिन, क्लासिना म्हणजे सीएन हुर्निक ह्या वेश्येबद्दल त्याला वाटलेल्या माणुसकीपेक्षा सहानुभूतीतनंच व्हिन्सेंट घडला का? ‘सॉरो’ हे चित्र व्हिन्सेंटनं तिच्यावरनंच काढलं. ‘सॉरो’मधून त्यानं स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष चित्रित केला आहे. समाजानं बहिष्कृत केलेल्या सिएनबद्दल बोलताना तिनं सोसलेले आघात, तिचं दु:खं, तिची अ‍ॅडव्हर्सिटी ह्यांनी तिच्यावर कोरलेल्या खुणांबद्दल उल्लेख करून व्हिन्सेंट म्हणतो, ‘सीएन ह्या कुरूप स्त्रीसारखी सुंदर सहचारिणी मला आजपर्यंत मिळाली नव्हती.’ सीएनबरोबरच मार्गोटसारखी लाजाळू स्त्री, अ‍ॅगोस्तिना सेगातोरी ही रेस्टॉरंट मालकीण, गार्डीना आणि इतर काही अशा स्त्रियांचाच फक्त त्याच्या कलात्मक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला होता का? खरं तर त्याचं वैयक्तिक आणि कलात्मक जीवन वेगळं वेगळं तरी होतं का? (...आणि कोणाचं तसं असतं तरी का?) थिओ ह्या त्याच्या मोठ्या भावाचा व्हिन्सेंटच्या संपूर्ण जीवनावर खोलवर परिणाम होता का? ह्या अशा काही उत्तरित आणि पुष्कळशा अनुत्तरित प्रश्नांमधनं व्हॅन गॉग ठेचकाळत, तडफडत जगतो आहे, मरतो आहे. व्हिन्सेंटच्या अवतीभवतीचं नातेवाईकांचं विश्व, ओळखीपाळखीचे, समकालीन चित्रकार, मित्र, शेजारीपाजारी, कुटुंबं, बायका, त्याला असलेला बुद्धिमान आजार आणि त्याच्या मृत्यूबद्दलचं गूढ या सगळ्यालाच लेखकानं त्याच्या लेखणीच्या टोकानं स्पर्श केलाय.

वयाच्या कोवळ्या वीस वर्षांच्या अमृता शेरगिल या मुलीनं केलेल्या सौंदर्य आणि सेक्स यांची रेलचेल असलेल्या न्यूड मॉडेलच्या चित्रांचं उघडंनागडं रूप आणि बघणाऱ्यांची परिपक्व आणि अपरिपक्व दृष्टी याबद्दल सुरुवात करून भावसारांनी अमृताच्याही जीवनाच्या गाठी उलगडण्याचा प्रयत्न केलाय. अमृताची आई, वडील, तिचं परदेशातलं जीवन, भारतातलं जीवन, अजिंठ्याच्या चित्रकलेचा तिच्यावर झालेला गडद परिणाम, तिचे मित्र, तिचा नवरा, तिचं गरोदरपण, लैंगिक आजार ह्या सगळ्या अवघड वाटावळणांमधनं भावसार पोहोचतात ‘अमृता शेरगिल’ या अदभुत रसायनापर्यंत.

‘लेटर्स टू थिओ’ ह्या व्हॅन गॉगच्या पुस्तकाचा उल्लेख करून ‘व्हीटफिल्ड विथ क्रोज’ ह्या त्याच्या चित्राला स्पर्श करून अमृताचं आणि व्हॅन गॉगचं नातं लेखक इथे विशद करतो. काय होता व्हॅन गॉगच्या चित्रांचा आणि अमृताच्या चित्रांचा संबंध? व्हॅन गॉगचं ‘पोटॅटो इटर्स’ पाहताना अमृताला नेमकं काय होत होतं? आणि दु:ख, वेदना, संघर्ष ह्या समानतेत अमृता आणि व्हॅन गॉग दोघेही कसे कलानिर्मिती करत होते, हे इथं वाचायला मिळेल. पं. नेहरू आणि अमृता यांच्यासंबंधातील चर्चा, त्यांची सत्ता, तिची चित्रं, आई-वडिलांनी जाळलेला त्यांचा पत्रव्यवहार आणि अमृताचं जीवन, तिची चित्रं, तिचा आणि तिच्या चित्रांचा स्वभाव, कार्ल खंडालवाला आणि अमृता ह्या सगळ्या जिवंत कॅनव्हासमधले रंग गडद गडद होत जातात आणि लेखक आपल्याला अमृताच्या रहस्यमय शेवटाकडे नेतो : शनिवार, ६ डिसेंबर १९४१.

ह्या काळानंतर कलासमीक्षकांना हे मान्य करावं लागलं की, भारतीय चित्रकलेमध्ये रवीन्द्रनाथ टागोर, जेमिनी रॉय यांसारख्या महत्त्वाच्या नावाबरोबरच अमृता शेरगिल हे नावसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

अमृता आणि व्हॅन गॉग ह्या दोन धाग्यांबरोबर तिसरा ‘दोऱ्या’चा धागा जोडताना लेखक आपल्याला भारतातल्या प्रभाकर नाईक-साटम ह्या महत्त्वाच्या कलावंताची ओळख करून देतो.

जपानमधल्या सर्वांत मोठ्या म्युझियममध्ये ‘लाईफ आफ्टर डार्क’ ह्या टेपेस्ट्रीच्या उद्घाटनाच्या प्रसंगापासून सुरुवात करून कणकवलीच्या बांदिवडे गावच्या ह्या प्रभाकरची ओळख करून देतो. त्याचं कुटुंब, समुद्र, आजूबाजूचा परिसर, म्हसकर मास्तर. त्याचे मित्र आणि इतरांनी सूर्योदयाचं चित्र काढलेलं असताना प्रभाकरनं काढलेल्या कोयत्याच्या चित्राबद्दल लेखक इथे बोलतो. कोयत्याचं चित्र गाजल्यानंतर प्रभाकरची चित्रकलेच्या प्रदेशातील सुरुवात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मातोंडकर मास्तर, दंडवती मठ सर आणि अचानक सापडलेलं वळण ‘लेदर वर्किंग स्कूल, खेरवाडी’. केनेडी पुलाच्या बोगद्याखाली भेटलेला दगडू चांभार आणि प्रभारकरचं पूर्ण झालेलं शिक्षण, कॅलिको डिझाईन एजन्सीतला त्याचा दबदबा, त्याची नवनवीन डिझाईन्स, लंडन स्कूल ऑफ आर्टस्मधील शिक्षण आणि पुढे पुन्हा अहमदाबाद हा सारा प्रवास भावसार मोठ्या रंजकतेनं वर्णन करतात.

...आणि दोरा.

दोरा हे तर प्रभाकरच्या आयुष्यातलं महत्त्वाचं माध्यम.

ह्या दोऱ्याचा धागा प्रभाकरनं पुढे आयुष्यभर जोडून घेतला. ह्या दोऱ्यानं प्रभाकरचं आयुष्य इतकं वेढलं की, पुढे टेपेस्ट्रीसाठी लागणारे रंगीत दोरे तर प्रभाकरनं स्वत: तयार केलेच; पण टेपेस्ट्रीसाठी लागणारा उभाच्या उभा मागही प्रभाकरनं तिथल्या लोकांच्या मदतीनं उभा केला. भारतातल्या छोट्या बांदिवडेसारख्या छोट्या खेड्यापासून एक छोटा मुलगा आपल्या आयुष्याची सुरुवात करतो आणि जपानसारख्या कर्तव्यकठोर देशाच्या सांस्कृतिक सन्मानाचा मानकरी ठरतो. हा मोठा विलक्षण प्रवास निरनिराळ्या देशांतल्या मानवीसंबंधांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. इतक्या शंभर-सव्वाशे पानांच्या छोट्या पुस्तकात तीन चित्रकारांच्या कलात्मक आणि वैयक्तिक आयुष्याला केलेला स्पर्श हे चित्रकार सतीश भावसारांच्या हातून पुढे निर्माण होणाऱ्या संपूर्ण मोठ्या कलाकृतीचं बीज आहे, असं मी मानतो.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

'तीन चित्रकार' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4793/Teen-Chitrakar

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......