अजूनकाही
प्रस्तुत कथा माझ्या एका जवळच्या मित्राने लिहिली. कारगिल युद्धानंतरच्या तणावपूर्ण वातावरणात ती अनेकांना भावली. वेब-लिस्ट व ई-मेल ग्रुप्सच्या माध्यमातून ती जगभर पोहोचली - पाकिस्तानात, फ्रान्स, अमेरिकेत. सर्वत्र शांतताप्रिय लोकांनी तिचे जोरदार स्वागत केले. लेखकाला भरभरून प्रतिसाद मिळाला. एका विख्यात संस्थेने विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट १०० रचनांमध्ये या कथेचा समावेश केला. परंतु प्रस्तुत लेखकाने या कथेच्या लेखनाचे श्रेय व कॉपीराईट सर्व नाकारले. त्याच्या मते “लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा तो फक्त अनुभवाला आकार देणारे एक माध्यम असतो. मुळात आपल्या जडणघडणीत, विचार करण्याच्या, अनुभवांना सामोरे जाण्याच्या पद्धतीत कितीतरी जणांचा वाटा असतो. आपण ‘आपलं, आपलं’ म्हणतो ते कितपत आपलं असतं? हजारो वर्षांच्या मानवी संचितापासून जवळच्या व्यक्तीपर्यंत सर्वांचं त्यात योगदान असतं. म्हणून लेखकाला वेगळं मानणं मला मान्य नाही. कलाकृती वाचल्यावर त्या अनुभवाशी तादात्म्य पावणारा रसिक हाही त्या कलाकृतीचाच होऊन जातो व कलाकृती त्याची होऊन जाते. तोही लेखकाइतकाच महत्त्वाचा असतो.”
प्रस्तुत लेखकाच्या भूमिकेचा मान राखण्यासाठी त्यांना आम्ही ‘अनामिक’च ठेवलं आहे.
मूळ इंग्रजीवरून मराठी अनुवाद : रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
.............................................................................................................................................
माझं दुपारचं जेवण माझ्या टेबलावर तयार आहे - काल रात्री मी पकवलेला ‘रोहू’ मासा आणि भात. मला राहून राहून आठवण येते आहे ती माझ्या चुलतभावाची. तो सैन्यात आहे, आणि खूप दिवसांत त्याची खबरबात मला कळलेली नाही.
तेव्हा तो अगदी लहान होता. नुकताच शाळेत जायला लागला होता. तो जेवत असला, की सगळेजण त्याच्याकडे टक लावून बघत. कारण तो खूप खायचा. त्याला सतत भूक लागलेली असायची. कोणीही काहीही खाताना दिसला, की हा डोळे मोठे करून आशाळभूत नजरेने त्याच्याकडे बघायचा. त्याच्या तोंडातून लाळ गळायची. त्याचा हा अवतार पाहिला, की त्याची आई - माझी काकू, येऊन त्याचा कान धरून म्हणायची, “बकासुरा, दुसऱ्यांना धड खाऊ देणार नाहीस तू. जा, तोंड काळं कर इथून. झाडांना पाणी घाल किंवा अभ्यास कर. पण जा इथून.” रडवेला होऊन तो निघून जायचा.
आमचं पंधरा जणांचं एकत्र कुटुंब होतं. आम्ही सगळे जण एका लहानशा खेड्यात राहत असू. माझे बाबा दूरवरच्या छोट्या शहरात नोकरीला होते. घरातली कमावती व्यक्ती म्हणजे फक्त तेच. बहुतेक वेळी घरात फारसं खायला नसायचं. अशा वेळी माझ्या ह्या धाकट्या चुलतभावासोबत - बादलसोबत - एका ताटात जेवायला कुणीच राजी होत नसे. वाढलेलं सारं तो एकटाच गट्ट करायचा!
आम्ही सारे सोबतच वाढलो. माझं माध्यमिक शिक्षण संपेपर्यंत गावातल्या त्या भल्यामोठ्या एकत्र कुटुंबात साऱ्यांसोबत आम्ही गरिबीचे दिवस काढले. त्यानंतर मला राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. माझ्या वडिलांना माझ्या उज्ज्वल भविष्याची चाहूल लागली आणि मी शहरात जाऊन शिकावं, हे त्यांच्या मनाने घेतलं. आमचं कुटुंब मग शहराकडे निघालं न् माझ्या काकांचं कुटुंब - सारे काका, काकू, चुलत भावंडं - गावीच राहिले. माझे सर्वांत मोठे काका शेती बघायचे. आमची छोटीशी भातशेती होती. त्यांच्या मोठ्या मुलाला शिक्षकाची नोकरी मिळाली. उरलेली सारी मंडळी शेतात राबत आणि परसात भाजीपाला पिकवत. पावसाच्या पाण्यावरची शेती आणि भाजीपाला. तो कसला वर्षभर पुरतोय? माझी भावंडं मग मासे पकडत आणि काका पावसाळ्यात सापळे लावून खेकडे पकडत. बाबांना आता शहरात राहून आमचं कुटुंब चालवायचं होतं. स्वाभाविकच पूर्वीइतके पैसे गावी पाठवणं त्यांना शक्य होत नसे. वर्षातून एकदा सगळ्यांसाठी कपडे मात्र ते पाठवीत.
आम्ही कधी गावी गेलो किंवा गावचं कुणी घरी आलं, की आम्ही कितीतरी गोष्टी बोलत असू – भाताची खाचरं, परसातला भाजीपाला, सहामाही परीक्षेतले मार्क, वार्षिक परीक्षा, हे न् ते. पण बादलचा विषय निघाला रे निघाला, की सारे जण पुन्हा पुन्हा तेच सांगत - “अरे, काय घोड्यासारखा जेवतो रे तो! तीन-चार जणांचा स्वयंपाक तो एकटाच फस्त करतो. त्याला खाऊ घालणं कठीण रे बाबा!” सगळेजण बादलला, त्याच्या खाण्याला हसत. तोही हसत असे.
मला आठवतं तो बारा वर्षांचा होता. चांगलाच तगडा दिसायचा. माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नसे, पण एवढासा पोरगा तळपत्या उन्हात तास न् तास न थकता काम करत असे. एवढं काम करूनही, अगदी लहान वयातही तो अन्नाबद्दल कधीही तक्रार करत नसे. त्याचा हा गुण मात्र सर्वांना आवडत होता.
अभ्यासात त्याची फारशी प्रगती नव्हती. कोणीच त्याच्या अभ्यासाकडे लक्ष पुरवलं नाही; त्यानेही मग ते फारसं मनावर घेतलं नाही. एकदा तो मॅट्रिकला नापास झाला, पुढच्या प्रयत्नात पास झाला. विकास व तंत्रज्ञानाच्या जमान्यात तीच त्याची सर्वोच्च पात्रता होती. तो अठरा वर्षांचा झाला होता. चांगला उंचापुरा व धिप्पाड. त्याला आता कोण जेवू-खाऊ घालणार? कपडेलत्ते पुरवणार? तो आता बाप्या गडी झालाय. स्वत:च्या खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची जबाबदारी त्याने आता स्वत:च उचलायला हवी होती.
दरम्यानच्या काळात उच्च शिक्षणासाठी माझी मुंबईच्या आयआयटीत निवड झाली. मुंबईला जाण्यापूर्वी मी गावी गेलो. मला कळलं, की बादल मुंबईला एका फॅक्टरीत नोकरी करायला गेलाय. वा! छानच की! मी मुंबईत, तोही मुंबईत! मला वाटलं, आता आम्हांला नियमित भेटता येईल. मी त्याचा पत्ता मागितला, पण आश्चर्य असं, की तो कुणाजवळच नव्हता.
“असं कसं?” मी विचारलं. तो फॅक्टरीत काम करायला गेला होता हे नक्की. पण त्या फॅक्टरीचं नाव-पत्ता कुणालाच माहीत नव्हतं. कॉन्ट्रॅक्टर म्हणाला होता, ‘की सुरुवातीला मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येईल. त्यांची राहायची नीट व्यवस्था झाल्यावरच तुम्हांला नक्की पत्ता कळवू,’ घरच्या मंडळींनी सांगितलं. मला हे सारं विचित्र वाटलं. माझ्या एका चुलतभावाने माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. “आम्ही त्याला सांगितलं, की मुंबईत पोहोचल्यावर लगेच आम्हांला पत्र पाठव. त्याच्याकडे आम्ही काही आंतरदेशीय पत्रंही देऊन ठेवली आहेत.”
माझं समाधान झालं नाही. मी आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. मग मला सांगण्यात आलं - “बादलला नोकरीची आत्यंतिक निकड होती. तो नोकरीच्या शोधात गावोगाव भटकला, पण त्याच्या पदरी निराशाच पडली. त्यात त्याला आशेचा एक किरण दिसला - कॉन्ट्रॅक्टर. तो शेजारच्या गावात मुंबईतल्या फॅक्टरीसाठी मुलांना भरती करत होता. बादल त्याला जाऊन भेटला. कॉन्ट्रॅक्टरने बारा-पंधरा मुलं जमवली व हजार रुपये महिना पगाराच्या बोलीवर त्यांना घेऊन तो मुंबईला गेला.”
मला जाणवलं - सततची उपासमार व अंतहीन काबाडकष्टाने गांजलेल्या बादलला परिस्थितीनेच अनिश्चित भविष्याच्या अंधारात ढकललं होतं. मी माझा पत्ता माझ्या कुटुंबीयांना दिला व तो लवकरात लवकर बादलला कळवा असंही सांगितलं. मला मुंबईत येऊन दोन-चार महिने झाले असतील- नसतील, घरून पत्र आलं - बादलबद्दल. पत्र वाचता वाचता माझं मन विषण्ण झालं. कसाबसा जीव वाचवून अर्धेल्या अवस्थेत बादल घरी परतला होता. सेमिस्टर परीक्षेनंतर मी गावी गेलो व उरलेली गोष्ट तिथे ऐकली –
बादल व त्याच्याबरोबरच्या साऱ्या मुलांना झोपडपट्टीतल्या एका छोट्याशा खोलीत डांबून ठेवलं होतं. ते सकाळपासून रात्रीपर्यंत एका कारखान्यात काम करत. जड लोखंडी सळ्या उचलून वाहून नेत. कधी त्यांना इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करावं लागे. असं काम त्यांनी अडीच महिने केलं. पहिला महिना संपल्यावर त्यांना फक्त निम्मा पगार देण्यात आला. कारण सांगितलं - “पूर्ण पगार दिला तर तुम्ही पळून जाल.” दुसऱ्या महिन्यात त्यांना कॉन्ट्रॅक्टरचं दर्शनच झालं नाही. महिना संपल्यावर ते कारखान्याच्या मॅनेजरकडे पगार मागायला गेले. त्यांना सांगण्यात आलं, की त्यांचा पगार कॉन्ट्रॅक्टरकडे आधीच जमा केला आहे. पोरांच्या पायाखालची जमीन सरकली. ते खेड्यातून आले होते. या शहरात नवखे होते. मुळात शहर काय असतं हेच त्यांना माहीत नव्हतं, अन् हे महानगर तर अतिप्रचंड, अस्ताव्यस्त पसरलेलं. आपली परिस्थिती कुणाला सांगणंही त्यांना शक्य नव्हतं. कारण त्यांना हिंदी येत नव्हती. परतीचं तिकीट काढायला पैसे नाहीत आणि घर - दोन हजार मैल दूर!
रिकाम्या खिशाने, विनातिकीट ते परतीच्या प्रवासाला निघाले. किडूकमिडूक होतं, तेही संपलं. रस्त्यात तिकीट चेकरने तीनदा पकडलं. भुसावळला दोन दिवस जेलमध्ये राहावं लागलं, सिकंदराबादला आठ दिवस. बादल घरी पोहोचला तेव्हा ओळखू न येण्याइतपत बदलला होता. अंगावर मांस नव्हतं, डोळे खोल गेलेले, वाचा हरपलेली. उरला होता फक्त वाकलेला अस्थिपंजर देह. खोल गेलेला आवाज. तो कसाबसा पुटपुटला, “तीन दिवस मी उपाशी आहे. मला काहीतरी खायला द्या.”
मी घरी गेलो. मला बादल कुठे दिसला नाही. सांगितलं गेलं, की त्याने जवळच्या गावात शिंफ्याचं दुकान टाकलंय. त्याला बरंच काम मिळतं. तो कामात इतका बुडालेला असतो, की घरी यायला त्याला फुरसतच होत नाही.
मी त्याला भेटायला गेलो. त्याचं दुकान म्हणजे कुडाच्या भिंतींची व शाकारलेल्या छपराची एक छोटीशी झोपडी. गायरानाच्या बाजूला, एका कच्च्या रस्त्याच्या कडेला होती ती. आजूबाजूला एकही माणूस नाही, कोणतीही वस्ती नाही. मी आत गेलो. बाहेरच्या रणरणत्या उन्हाची धग आतही जाणवत होती. बादल एका पायमशिनवर काम करत होता. त्याला पाहून मी आतून हललो. मोठ्या मुश्किलीने स्वत:ला सावरलं. तो माझ्या स्वागतासाठी उभा राहिला. तो अजूनही पुरेसा सावरलेला नव्हता. “कसा आहेस?” म्हणून विचारण्याची हिंमत मला झाली नाही. त्याच्या शरीरावर त्याची कहाणी गोंदलेली होती.
“किती वेळ काम करतोस?” मी त्याला विचारलं. “रात्री उशिरापर्यंत. काम खूप आहे.” तो उत्तरला.
“लोक पैसे देतात?” मी चौकशी केली. “खरं म्हणजे अजून देत नाहीत. पण मला वाटतं आज ना उद्या धंद्याचा जम बसेल. इकडे आसपास शिंप्याचं एकही दुकान नाही.” खालच्या आवाजात, पण बऱ्याच ठामपणे तो उत्तरला.
मग त्याने माझ्या अभ्यासाची चौकशी केली. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. मी गमतीच्या स्वरात विचारलं, “आताही ताव मारून जेवतोस का?” तो म्हणाला, “च्यक्.” मी त्याला माझ्याबरोबर घरी जेवायला चल असं म्हटलं. तो म्हणाला, “मी आता नाही, रात्री येईन.”
येताना संपूर्ण रस्ताभर माझ्या मनात त्या एकाट, उष्ण झोपडीत भरून राहिलेला जुन्या पायमशिनचा आवाज घुमत होता.
त्यानंतर सुमारे एक वर्षाने मी परत त्याला गावी भेटलो. त्याची तब्येत खूप चांगली नाही, तरी साधारण बरी वाटली. पण तो पूर्वीचा हसरा, खेळकर बादल नव्हता. त्याचा चेहरा शुष्क व मलूल वाटला. तो म्हणाला, “मला खूप कष्ट करावे लागतात. दुकान उघडल्यापासून मला विश्रांतीच मिळालेली नाही. लोक खूप कमी पैसे देतात. एवढे कष्ट करून मला थोडेसेही पैसे घरी पाठवता येत नाहीत. अशा परिस्थितीत टिकाव धरणं कठीण आहे.” - त्याने घातलेल्या पँटच्या बुडाला लावलेली ठिगळं मला अस्वस्थ करून गेली.
त्यानंतर मला कळलं – बादल सैन्यात गेला.
बादलच्या भेटीला आता तीन वर्षं होतील. माझा भाऊ रस्त्यावरील अपघातात वारला. बादलला बातमी कळताच तो धावत घरी आला होता. आपल्या नोकरीविषयी तो नाराज वाटला. लष्करी छावणीतलं जीवन त्याला आवडत नव्हतं. काबाडकष्ट व वरिष्ठांकडून सातत्याने केला जाणारा पाणउतारा यामुळे तो निराश झाला होता. पण युद्धात मरण्या-मारण्याचा विषय निघताच त्याचं रक्त उसळलं व तापल्या आवाजात तो म्हणाला, “पाकिस्तान्यांनी हल्ला केला ना, तर आम्ही त्यांना खतम करू.” मी त्याला विचारलं, “तुझ्यावर हल्ला करणारे पाकिस्तानी कोण आहेत? नोकरीच्या शोधात, पोट भरायला, घरी पैसे पाठवण्यासाठी सैन्यात सामील झालेली तुझ्यासारखीच माणसं आहेत ना ती? ते स्वत:हून तुझ्यावर हल्ला करतात का? किंवा तुही त्यांच्यावर आपणहून हल्ला करतोस का?”
तो गप्प राहिला. मी त्याला म्हटलं, “भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून तू उद्ध्वस्त झालास. धावपळ करत काश्मीरहून थेट कटकला आलास. पाकिस्तानी सैनिकांचं काळीज राहून वेगळं असेल का?” त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो महिनाभर घरी राहिला. काश्मीरला जाण्यापूर्वी तो मला म्हणाला, “मला पेन्शन लागू झाली, की मी ही नोकरी सोडेन. कोणाचा जीव घ्यायला मलाही आवडत नाही.”
तो माझ्यापासून दूर आहे. मला त्याची खूप आठवण येते.
एकदा तो अर्धेला अवस्थेत घरी परतला होता. ह्या वेळी? कोण जाणे काय होईल! मला प्रचंड भीती वाटते आहे. युद्ध सुरू आहे. शेकडो सैनिक मरताहेत. त्या प्रत्येकात मला बादल दिसतोय. ते मृत्यूमुखी पडत आहेत, कारण त्यांच्यातील बहुतेकांच्या घरी पोटभर खायला अन्न नाही. काय आयुष्य आहे! आणि तुम्ही माझ्याकडे कारगिलच्या नावावर देणगी मागत आहात?
आता हे खूप झालं! रोजच्या आयुष्यात तुम्ही त्यांना पायदळी तुडवणार आणि मेल्यावर त्यांना देशभक्त म्हणून गौरवणार. त्यांना मारणार आणि मेल्यावर हार घालून त्यांचा हुतात्मा म्हणून जयजयकार करणार. तुम्ही त्यांचा वापर केला आणि आताही करत आहात. कशासाठी? “ते देशासाठी जन्मले आणि देशासाठी हसत हसत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,” असं तुम्ही म्हणता ते खोटं आहे. हा खोटारडेपणा थांबवा. आता मी हे सहन करू शकत नाही. त्यांना घरी बोलवा. त्यांना जिवंत परत येऊ द्या. माझ्या टेबलावर भरपूर जेवायला आहे - काल रात्रीच मी रांधून ठेवलंय.
मुंबई, ८ जुलै १९९९
(‘अंतर्नाद’ मासिकाच्या फेब्रुवारी २००९च्या अंकातून)
.............................................................................................................................................
लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
ravindrarp@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 13 March 2019
ही कथा वाचून मला काय वाटलं ते लिहतो. माझं मत असं की भारतीय सैन्य ऐच्छिक भरतीचं आहे. सैन्यात सक्तीची भरती करण्यासाठी अमेरिकेत ड्राफ्ट निघंत असे, तसं काही भारतात होत नाही. कारण की सैन्यभरतीस इच्छुक उमेदवार नेहमीच उपलब्ध असतात. यावरून सैन्याची अवस्था लेखात रंगवली आहे तितकी काही वाईट नसावी. मात्र तिथे सुधारणेस भरपूर वाव आहे. एक सामान्य माणूस म्हणून मी काही करू शकंत नाही. मात्र मी सैन्याकडून रक्षण होण्यास लायक मनुष्य बनायला स्वत:हून जरूर प्रयत्न करू शकतो. तसे सर्वांनीच करायला पाहिजेत. म्हणजे मुंबईच्या कंत्राटदारासारख्या अपप्रवृत्ती आपोआप कमी होतील. आणि एका प्रकारे गरजवंतांवर अन्याय होणार नाही. -गामा पैलवान