अजूनकाही
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ८ मार्चपर्यंत ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांचं ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स’ हे सिंहावलोकनी प्रदर्शन मुंबईच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये तब्बल पाच मजल्यांवर भरलं होतं. या चित्रप्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देऊन लिहिलेला हा लेख...
.............................................................................................................................................
गेले दोनही रविवार मुंबईला ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये जात होतो. बोधना आर्ट अँड रिसर्च फाउंडेशनने प्रभाकर बरवे या विलक्षण प्रतिभेच्या चित्रकाराचं ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स’ हे सिंहावलोकनी प्रदर्शन आयोजित केलं होतं. उदघाटनाच्या कार्यक्रमात अमोल पालेकरांच्या वक्तव्यानं तो कार्यक्रम प्रसिद्ध झाला, पण चित्रकाराच्या कामाबद्दल त्यात फारसं काहीच बोललं गेलं नाही. नाहीतरी आपल्या कामाबद्दल कसलाही गाजावाजा बरव्यांनी आयुष्यात कधी केला नव्हता. ते नेहमी प्रसिद्धीच्या झोतापासून बाजूलाच होते.
माझी चित्रकलेची नुकतीच ओळख होण्याचे ते दिवस होते. मोठमोठ्या चित्रकारांची चित्रं (कुठं कुठं छापून आलेली) पाहण्याचा व कात्रणं ठेवण्याचा नाद होता. तेव्हाच्या १७ फेब्रुवारी ते २ मार्च १९७८च्या ‘युथ टाइम्स’च्या पुरवणीतील बरवे यांचं बाकी सगळ्यांपेक्षा वेगळं चित्र माझ्या मनावर ठसलं होतं. नंतर ज्येष्ठ चित्रकार स्नेही घोडके यांच्याकडून प्रभाकर बरवे यांचं नाव मोठ्या आदरानं ऐकायला मिळालं. घोडकेही विव्हर्स सोसायटीमध्येच होते. ज्येष्ठ वास्तूरचनाकार कोटा हेदेखील त्यांच्याशी संबंधित होते. त्यांच्याकडूनही बरवे यांच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. पुढे ८-१० वर्षानंतर त्यांची बरीचशी चित्रं पाहायला मिळू लागली.
‘इनसाइड द एम्टी बॉक्स’ या त्यांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शनात त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनचा संपूर्ण चित्रावकाशाचा पट उलगडून दाखवला आहे. ‘रिकाम्या पेटाऱ्या’मध्ये असे म्हणताना त्यामध्ये काहीतरी असण्याची शक्यता निर्माण होते. आणि जर पेटाऱ्यामध्ये काही असेलच तर तो रिकामा कसा? अशा वेगवेगळ्या शक्याशक्यतेच्या पातळीवर बरवे यांच्या चित्ररचना उलगडत जातात. त्या जेवढ्या उलगडत जातात, असं वाटतं तेवढे आपण त्यामध्ये गुरफटत जातो.
सुरुवातीच्या काळात तंत्र वा त्या काळात अनेक चित्रकारांवर असू शकणारा पॉल क्लीचा प्रभाव ओसरला आणि ते या साऱ्याच्या पलीकडे जाऊन स्वत:चा स्वतंत्रपणे शोध घ्यायला लागले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टची दमदार वाटचाल सुरू होती. हुसेन, रझा, सुझा, मोहन सामंत, गायतोंडे या कलावंतांनी त्यावेळच्या कलाजीवनाला वेगळं वळण लावलं होतं. यानंतर प्रभाकर बरवेंनी आपली स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण केली. त्यांच्या चित्रांचं स्वरूप व त्यामागचा विचार त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेला. ६०च्या दशकातील त्यांना मिळालेली जपानी शिष्यवृत्ती त्यांना झेन तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारी झाली. नंतरचा अमेरिकेच्या दौऱ्यामधून ते विस्तारत गेले. पुन:पुन्हा घडत गेले.
सपाट रंगलेपन, एनॅमल रंग आणि विलक्षण आकारांच्या रचनेतून ते जीवनाचा अर्थ शोधायला लागले. गायतोंडेंच्या कॅनव्हासवर वेगळ्याच शैलीतील आकारांची रचना होती. रोलरच्या साहाय्यानं केलेली रंगलेपनाची पद्धत वेगळीच होती. त्यातून निर्माण होणारी भावनाही वेगळ्याच पातळीवरची होती. बरवे यांच्या चित्रातील आकार तुमच्या ओळखीचे असतात, पण त्या आकाराच्या रचनेतून होणारी निर्मिती वेगळेच काही सांगते. दिसणं आणि पाहणं यामध्ये ते म्हणतात तसा खूप फरक असतो. ते म्हणतात, ‘वस्तू दिसते तशी ती असतेच असे नाही. तिचे बाह्यरूप व अंत:स्वरूप हे भिन्न असू शकते. चित्रकाराच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. तो एखादी गोष्ट, एखादी प्रतिमा उतरवतो, तेव्हा तो सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला वास्तवाची प्रतिकृती निर्माण करण्यात रस नसतो, तर तो त्याहीपलीकडे जाऊन असणाऱ्या वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.’
त्यांच्या साऱ्या चित्रामध्ये तुमच्या-आमच्या सभोवतालचेच आकार येतात. निसर्गाकार, रंगरेषा यामध्ये अमूर्त असं काहीच नसतं. पण या सर्व घटकांचा विलक्षण रचनेमध्ये वेगळाच आशय दिसतो. वरवर साध्या भासणाऱ्या आकार व अवकाशातून निर्माण होणारा आशय मात्र अनवट असतो. झेन तत्त्वज्ञानाचाही प्रभाव त्यांच्या काही चित्रावर दिसतो, तोही एक घटक आहे. आध्यात्मिक पातळीवरून ते अस्तित्वाचा विचार करतात. त्यामुळे हा रंगयोगी कोऽहम असा जेव्हा पुकारा करतो, तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचे प्रतिध्वनी त्यांच्या चित्रातून प्रकट होतात. ते म्हणतात, ‘चित्रकला समजून घेण्यातील एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे वाङमयीन मूल्यांची प्रमाणपट्टी लावूनच चित्रकलेचे मोजमाप होते. चित्र समजून घेताना शाब्दिक अर्थ हवा असतो… चित्रातील गोलाकर हा चेंडू आहे की चंद्र म्हणून लोक अस्वस्थ होतात…’
या प्रदर्शनातील सारीच चित्रं तुम्हाला विचार करायला लावणारी आहेत. सगळ्या चित्रांतून वेगवेगळ्या अभिव्यक्तीची जाणीव होते. कधी ताजे, लुसलुशीत विविधरंगी पान तर कधी वाळलेले पान, कधी शांत जलाशय तर कधी वेगळ्याच पातळीवर असणारी पोकळी… त्यामध्ये विटांच्या भिंतीचे बांधकाम, काही कमानीचे आकार, कधी सावलीसह तर कधी सावलीविना… जणू काही हवेत तरंगताहेत. त्यातील जडत्वाची जाणीवच ते नाहीशी करतात…
या आकाराबरोबर ते रंगाचा खेळही करतात. सुरुवातीच्या काळात शुद्ध आणि प्रखर तेजस्वी रंग वापरणारे बरवे पुढच्या काळात शांत, नीरवतेची जाणीव करून देणारे रंग वापरायला लागले. हे सारे त्यांच्या ‘गोगलगाय व पाव’ या चित्रात दिसते. एखादं पान पाण्यात प्रतिबिंबित होतंय. त्याच वेळी ते सावलीही देत आहे आणि या सावलीच्या आधारानं गोगलगायीची मार्गक्रमणा सुरू आहे. दूर क्षितिजावर पुन्हा काही उदध्वस्त भिंती आणि कमानी.
‘ग्रीन लेक’ या चित्रामधील पान, भिंत, सरोवराची रचना, एकापेक्षा एक वेगवेगळ्या पातळीवर असणाऱ्या छाया वेगळंच अर्थसूचन करतात. मनुष्य चेहऱ्याच्या मधून दिसणारं अवकाश, त्याची सावली हे सारे एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. ‘निसर्गाची मूळाक्षरे’ याचित्रामध्ये निसर्ग घटकातून निसर्गभाषेची संवादलिपी करू पाहतात. या मोठ्या पेंटिंगमधील छोटीशी मानवाकृती वेगळाच अर्थ सांगते.
प्रदर्शनामध्ये आणखी एक सुंदर पेंटिंग आहे, ‘स्वत्वाच्या अनेक ओळखी’. या चित्राबद्दलचं त्यांचं चिंतनही (डायरीमध्ये लिहिलेलं) शेजारी एनलार्ज करून लावलं आहे. ते म्हणतात – ‘एकाच वेळी मी अनेक असतो… मी पांढरा कागद होतो, कागदाचा तुकडा होतो. मी स्वत:च चित्र होतो, विचित्र होत जातो… माझी ओळख मलाच पटत नाही…’ हे वाचल्यानंतर ते चित्र मग तुमच्याशी संवाद करायला लागतं. त्यातले नेहमीचे आकार वेगळीच ओळख देऊ लागतात. रंग त्यांचं वेगळं व्यक्तिमत्त्व दाखवायला लागतात, तुम्ही विचार करायला लागता आणि या चित्रकाराची ओळख पटायला लागते. त्याच्या संवादाची भाषा समजायला लागते.
प्रभाकर बरवे स्वत: जरी म्हणतात की, ‘चित्र शब्दातून दाखवायलाच हवं का? ते तर त्याच्याच भाषेत समजून घ्यायला हवं.’ स्वत:साठी त्यांनी चित्र, चित्रप्रतिमा, चित्रप्रक्रिया, कला म्हणजे काय? कला जाणीव म्हणजे काय याविषयी खूप लिखाण केलं आहे. हे लिखाण शब्दबद्ध चिंतनच आहे. या प्रदर्शनात त्यांच्या अशा सुमारे ४०-४५ डायऱ्या प्रदर्शित केल्या आहेत. या डायऱ्यांत डोकावलं तर ‘अभ्यासोनी प्रगटावे’ याची प्रचिती येते. चित्रभाषा व शब्दभाषा या दोन्हीमधूनही ते सारख्याच ताकदीनं प्रकट होतात. शब्द व चित्र दोन्हीवरही त्यांची सारखीच पकड आहे. या डायऱ्यातील रेखाटनं आणि चिंतन दोन्हीही अभ्यासनीय.
त्यांचा चित्रकलेबद्दलचा दृष्टिकोन त्यांच्याच शब्दांत- ‘चित्रमयता ही एक प्रकारे केवळ वरवरचे रंजन करू शकते, परंतु ती अंतर्मुख होण्यास मदत करीत नाही. मोहक, आकर्षक रंग किंवा लालित्यपूर्ण आकार हे फार तर चित्राची रंजकता, आकर्षकता यामध्ये भर घालतील, परंतु ते संपूर्ण चित्रपरिणामापासून प्रेक्षकांना दूर नेतील. चित्राच्या गाभ्याकडे म्हणजेच आशयाकडे जाण्यास मदत करणार नाहीत, तर ते चित्रपृष्ठावरच दृष्टी खिळवून ठेवतील.’
या सर्व चित्राभ्यासातून त्यांची चित्रनिर्मिती होत राहिली. १९५९ ते १९९५ पर्यंत या प्रवासात २८ वर्षं चरितार्थासाठी त्यांनी नोकरीही केली. या नोकरीतही रूळलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा वेगळी चित्रवाट त्यांनी तयार केली. ज्येष्ठ चित्रसमीक्षक संभाजी कदम त्यांच्या चित्रवैशिष्ट्यांविषयी म्हणतात की, ‘केवल चित्राचे सत्त्वसार आत्मसात करून अभिव्यक्तीमध्ये झोकून घेण्याऐवजी बुद्धिगम्य एकाग्रता आणि स्वत:च्या भावास्थिहून बुद्धिपूर्वक स्वीकारलेली स्वदूरता हे त्यांच्या चित्राचे वैशिष्ट्य.’
बोधना आर्ट अँड रिसर्च फाउंडेशनने या प्रदर्शनासाठी घेतलेले कष्ट, प्रदर्शनाची मांडणी केवळ अप्रतिम! केवढ्या मोठ्या चित्रावकाशाचा आढावा घेण्याचं शिवधुनष्य त्यांनी पेललं आहे. त्यांच्या या कामाला सलाम!
संपूर्ण पाच मजले भरून असणारं हे प्रदर्शन पाहून तुम्ही बौद्धिकदृष्ट्या थकून जाता, पण या थकव्यातूनही एक नवी ऊर्जा तुम्हाला मिळत जाते.
पुन्हा एकवार बरवे यांच्याच शब्दांत – ‘A work of art for me is not a replica of reality, nor a study of it, but an independent entity.
माझ्या प्रेक्षकांकडून माझी अशी अपेक्षा आहे की, (माझ्या कामाची) जी बाजू त्यांना दिसली नाही, त्यापलीकडे जाऊन प्रत्येक पैलूचा पुनर्विचार करून त्याची निर्मिती व्हावी.’
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment