अजूनकाही
जगप्रसिद्ध ग्रीक वृत्तछायाचित्रकार यानिस बेहरकीस यांचं २ मार्च रोजी कॅन्सर या आजारानं निधन झालं. त्यांचा जन्म अथेन्समध्ये १९६० साली झाला. त्यांचं शिक्षण अथेन्स येथील अथेन्स स्कूल ऑफ आर्टस् अँड टेक्नॉलॉजीमध्ये झालं, तर पुढील शिक्षण मिडलसेक्स विद्यापीठात झालं. १९८३ मध्ये आलेला ‘अंडर फायटर’ हा सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी ‘प्रेस फोटोग्राफी’ करण्याचा निर्णय घेतला.
१९८५ –८६ मध्ये त्यांनी फोटोग्राफी सुरू केली. १९८७ मध्ये त्यांनी रॉयटर्ससोबत काम सुरू केलं. जेव्हा गद्दाफी हे एका हॉटेलमध्ये येणार हे त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी गद्दाफी यांचं वाईड अँगल व लेन्स झूम करून छायाचित्र काढलं. दुसऱ्या दिवशी ते छायाचित्र जगभरात पोहचलं. इथून खऱ्या अर्थानं त्यांची ‘प्रेस फोटोग्राफर’ म्हणून ओळख झाली.
एक छायाचित्र किमान हजार शब्दांची भाषा बोलतं असं म्हणतात. यानिस बेहरकीस यांनी तेच केलं. त्यांची अनेक छायाचित्रं खूप काही बोलून जायची.
१९८९ मध्ये त्यांची पहिल्यांदा लिबियात ‘परदेशी फोटोग्राफर’ म्हणून निवड झाली. त्यांनतर त्यांनी इराणमधील खोमिनीची अंतेष्टी, युरोप, बाल्कनमधील चेचन्या, बोस्निया येथे प्रेस फोटोग्राफी केली. याचबरोबर सोमालिया, अफगाणिस्तान, लेबेनॉन, इराणचं गल्फ वॉर, सीरियातली परिस्थिती, पॅलेस्टिनमधला संघर्ष, काश्मीर व तुर्की येथील अनेक प्रसंगांचे ते प्रत्यक्षदर्शी होते.
२००० मध्ये सिएरा लिओन येथील विद्रोही हल्ल्यात त्यांना मारहाण झाली. त्यात त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. २०१६मध्ये त्यांना मानाचा पुलित्झर हा पुरस्कार मिळाला.
त्यांचं एक उत्कृष्ट छायाचित्र आहे. ग्रीसच्या उत्तर सीमेवर एक सीरियन शरणार्थी बाप आपल्या मुलीचं चुंबन घेत चालला होता. त्या छायाचित्राबद्दल ते म्हणतात, “मला तो त्या दिवशी सुपरमॅन बाप वाटला. आणि त्याने लाल केप न घालता काळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा केप घातला होता. सीमेवर पाऊस पडत होता आणि तो आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन जात होता. खरंच तो सुपरमॅन होता.”
५ एप्रिल १९९१ रोजी इराकी–तुर्की सीमेवरील मानवीय मदत वितरणादरम्यान फ्रांटिक व कुर्दिश लोकांचा भाकरीसाठीचा संघर्ष त्यांनी आपल्या कॅमेरात टिपला.
१४ डिसेंबर १९९२ला सोमालिया येथील एका शरणार्थी छावणीजवळ एका भुकेलेल्या सोमाली मुलाला एक बाई पाणी पाजतानाचं त्यांचं छायाचित्र तत्कालीन सोमालियाच्या परिस्थितीवर भाष्य करतं.
१० सप्टेंबर २०१५चा आयडोनीजवळच्या पाऊस व वादळात स्थलांतरित व निर्वासित लोक ग्रीसच्या सीमा ओलांडण्यासाठी रशियाला रवाना होतानाचं त्यांचं छायाचित्रही खूप बोलकं होतं.
छायाचित्रण करताना त्यांच्याकडे कमालीचा समर्पितपणा होता. अनेकदा ते त्यासाठी आपला जीवही धोक्यात घालत. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना त्यांच्याबद्दल कमालीचा आदर होता.
त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. युरोपियन फुजी पुरस्कार, ओव्हरसीज प्रेस क्लब ऑफ अमेरिका फोटोग्राफी, २०१५मध्ये वर्षाचा उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांची निवड झाली.
जगभरातील अनेक ठिकाणचा संघर्ष त्यांनी आपल्या लेन्समधून दाखवला. शरणार्थीयांचा जीवनसंघर्ष टिपला. गल्फ वॉर दाखवलं. सीरियातली जाळपोळ दाखवली.
काश्मीरमधला भूकंप दाखवताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. २०१६मध्ये पुलित्झर पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले होते, “माय मिशन इज टू टेल यू द स्टोरी अँड देन यु डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू डु. माय मिशन इज टू मेक शुअर दॅट नोबडी कॅन से; आयडिडन्ट नो.”
जगभरातील अनेक विषय आपल्या कॅमेरानं टिपणाऱ्या यानिस बेहरकीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
............................................................................................................................................................
लेखक सागर शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.
sagararjunshinde6664@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment