अजूनकाही
नुकताच पुण्यात ६ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात ६४वा सवाई गंधर्व संगीत महोत्सव पार पडला. भारतीय पातळीवरील शास्त्रीय संगीताचा सर्वांत मोठा असा हा महोत्सव. त्याविषयीची काही निरीक्षणे मांडणारा हा लेख...
शुद्ध शास्त्रीय संगीत शिकायला लागून मला दोन वर्षं झाली असतील. माझं वय तेव्हा १२-१३ वर्षं असेल. मी पहिल्यांदा सवाई ऐकायला (सगळे असंच म्हणतात!) एकदा रात्रभर घराबाहेर राहणार होतो. अर्थात घरच्यांची परवानगी घेऊन. मी पहिला सवाई गंधर्व संगीत महोत्सव ऐकला असं म्हणण्यापेक्षा बघितला असं म्हणता येईल. आपण ऐकलेले कोणी कलाकार दिसताहेत का, असं मी शोधत होतो. विविध प्रकारचे श्रोते दिसत होते. काहींचं तल्लीन होणं, काहींच्या मोठमोठ्यांदा गप्पा, काहींचं झोपणं! प्रचंड उत्सूकता, थोडी भीती, थोडी गंमत असा माझा सवाईचा पहिला अनुभव! दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी मात्र यात लक्षणीय फरक होत गेला. जसं जसं माझं स्वत:चं गायन विकसित होत गेलं, तसं तसं माझ्या ऐकण्यातही फरक होत गेला.
अशा सवाईतील गायक, वादक कलावंत, त्यांचं सादरीकरण आणि त्यांच्या आठवणी शब्दांत मांडणं तसं कठीणच. मुळातच ही अमूर्त कला. चित्रकलेसारखं शास्त्रीय संगीताचं नाही. चित्र मूर्त स्वरूपात आपल्याला दिसतं. त्यामुळे त्याला आठवावं लागत नाही. ते पाहून आपण त्याच्यातून उलगडणाऱ्या अर्थांची उजळणी अथवा पुन:प्रत्ययाचा आनंद सहज घेऊ शकतो. तसं शास्त्रीय संगीताचं नाही. अर्थात आता रेकॉर्डिंगने ते थोडंबहुत शक्य झालं आहे, पण एका मर्यादेतच. कारण रेकॉर्डिंगमध्ये ती समरसता, तो संवाद आणि त्यातून येणारे अनुभव परत त्याच उत्कटतेने आपल्याला जाणवत नाहीत.
मी सवाई ऐकायला सुरुवात केली तेव्हा या महोत्सवाने आपल्या वयाची पंचविशी पार केलेली होती. माझ्यासारखे हजारो जण इथं वर्षानुवर्षं येत आहेत. काहीजण तर वर्षातून एकदाच, सवाईतच एकमेकांना भेटतात. संगीताचा एकत्र आस्वाद घेतात. ही परंपरा वर्षानुवर्षं चालू आहे.
मला नेहमी प्रश्न पडतो की, या सर्वांचं मूळ कशात आहे? माझ्यासारख्या हजारो माणसांना संगीत आवडतं म्हणजे नक्की काय? अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे हे सर्व बांधले गेले आहेत? मला असं वाटतं की, याचं सुरेख विवेचन डॉ. वसंतराव देशपांडे यांनी एके ठिकाणी केलं आहे. ते म्हणतात, ‘गाण्याची मैफल म्हणजे गायक-वादक आणि श्रोता यांच्या अपेक्षपूर्ती व अपेक्षाभंगाचा सुरेख लपंडाव!’ त्यात पुढे जाऊन मी असं म्हणेल की, मैफल म्हणजे उत्कंठा, उत्सूकता, ताण, आनंद, समरसता, समावेशकता, संवादकता आणि परिपूर्णता. थोडक्यात मैफल हा संवादाचाच सुरेख प्रकार आहे. अपेक्षांचं माप कुणाकडे कमी तर कधी कुणाकडे जास्त! ही संवादाची चक्रं विविध अंगांनी बांधली जातात. एखाद्याच्या मनातील सांगीतिक अपेक्षा एखादा कलाकार पूर्ण करतो, तर एखाद्याच्या नुसत्या सुरावटींनीदेखील एखादा गानकलेचा भोक्ता प्रेरित होतो. सवाईमध्ये केवळ चारच दिवसांत अनुभवायला मिळणाऱ्या सादरीकरणातल्या विविधतेमुळे असे अनेक आकृतीबंध, संवादाची सुरेख वीण तयार होत असते. आणि यामध्येच या महोत्सवाच्या यशाची आणि सातत्याची हमी निर्माण झाली आहे. हा महोत्सव करण्यामागची भूमिकाही या सातत्यतेला पूरकच आहे. पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूंच्या नावाने एका अपार श्रद्धेनं हा महोत्सव सुरू केला. त्याला त्यांच्या अनेक सुहृदांनी तितकीच मोलाची साथ दिली. कलाकार मंडळीही आपुलकीने, समरसतेने सहभागी झाली, होत आहेत. त्यामुळे हा महोत्सव रुजला, टिकला आणि बघता बघता भारताच्या सांगीतिक इतिहासात सर्वांत मोठा महोत्सव म्हणून नावारूपास आला आहे.
या महोत्सवातील अनेक मैफली कित्येक लोकांच्या स्मरणात आहेत. मालिनीताईंच्या टोकदार जवारीदार मालकंस असाच मनात रुंजी घालतो. त्यातील सहजता, सरगमची सुरेख मांडणी, परंतु पूर्णत: अभिनिवेशरहित गायन कित्येक रसिकांच्या मनात आजही तेवढंच तरुण आहे. तसंच पहाटेच्या वेळी पं. जसराजांचे खर्जातील भैरव रागाचे विविध प्रकार आजही मनाला वेगळ्या उंचीवर नेतात. माझ्यासारखे गाण्यातील अनेक विद्यार्थी या खर्जातील सुरांच्या लगावाचे चाहते आहेत. उस्ताद राशीद खाँ यांचे ललत, सरस्वती, पुरिया असेच मनात ठाण मांडून बसले आहेत. सुरांचा कसदारपणा, स्वरांची उपज, त्यातून तयार झालेले आकृतीबंध, तानेतील स्पष्टता व जोरकसपणा, पण रागातील मूळभाव जपत फुलवलेले हे राग माझ्यासारखेच अनेकांच्या स्मरणात राहतील.
सवाईचा कळस म्हणजे पं. भीमसेनजींचं गाणं. रात्रभर वेगवेगळ्या स्वरांच्या, घराण्यांच्या प्रतिभावान गायक-वादक कलाकारांनी आधीच भरून राहिलेला स्वरमंच आणि आपलं मन. अशात जेव्हा भर सकाळी पं. भीमसेनजी चार तानपुऱ्यात एकरूप झालेला षडज कानी पडायचा, तेव्हा खरोखरच अंगावर रोमांच उभे राहायचे. चार दिवसांतील विविध स्वरांच्या मनावर झालेल्या परिणामांना पुसून आपल्या मनाचा पूर्णपणे ताबा घेण्याच ताकद त्या धीरगंभीर षडजामध्ये नक्कीच होती. त्यानंतर त्यांनी गायलेल्या तोडीतील गाज असलेले स्वर, त्यातील घुमारे, स्वरातून स्पष्ट व थेट आपल्याकडे पोहोचणारे भाव हे खरोखरच शब्दांच्या पलीकडलं आहे. मी खात्रीनं सांगू शकतो की, माझ्यासारख्या असंख्य लोकांचे हेच भाव असतील. अनेक वर्षं हा असा विविध स्वरांच्या लगावांनी सवाईचा मंडप उजळलेला आहे.
इतकी वर्षं सवाई ऐकल्याने माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं सांगीतिक पोषण झालं आहे. वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशी, त्यातील वैविध्यता, पद्धती व स्वरांचे लगाव हे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं एक अभ्यासकेंद्रच आहे. या स्वरांचा मागोवा घेताना सांगीतिक विचारांची एक दिशा नक्की हो. गाणं कसं असावं, कसं असू नये, कुठला राग मनात आर्तता निर्माण करतो, तर कुठला वीररसाकडे नेतो, हे सर्व प्रत्यक्षरीत्या इथं अनुभवायला मिळतं. स्वरांचं सामर्थ्य काय?, त्यामध्ये सामान्यांना त्यांचं रोजचं दु:ख, काळज्या बाजूला ठेवून तल्लीन करण्याची कशी ताकद आहे, हे प्रत्यक्ष अनुभवता येतं. सृजनशीलतेचे दोन स्तर असतात. एक म्हणजे वैविध्यमुखी प्रतिभा, जी नवनवी संगती व नवनवी चमत्कृती निर्माण करते. दुसरी, रचनाधर्मी प्रतिभा, जी या सर्वांबरोबरच एक संरचना तयार करते व सुसंगती राखते. हे सर्व इथं अनुभवता येतं.
मात्र सध्याच्या सवाईमध्ये हे सर्व अनुभव, जाणीवा श्रोत्यापर्यंत पोहोचणं थोडं कठीण होत चाललंय. तुफान गर्दी होते, वलय तयार झालं आहे. लाखो टाळ्यांचे सतत गजर होतात. परंतु हे सर्व श्रवणीयतेकडून प्रेक्षणीयतेकडे होताना दिसतं. गाणं पाहायला येणाऱ्या, फेस्टिव्हल म्हणून एन्जॉय करणाऱ्यांची संख्या वारेमाप झाली आहे. त्यामुळे साहजिकच गाणाऱ्याची वेशभूषा, तबलजीची केशभूषा हे चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. काही अपवाद वगळता गायक-वादकही रचनात्मक सादरीकरण बाजूला ठेवून बाह्यभावांचा अंतर्भाव असलेलं चमत्कृतीपूर्ण गायन, वादन करण्यात आणि टाळ्या हशील करण्यात मग्न होत आहेत. एक मतप्रवाह असाही आहे की, या निमित्तानं का होईना शास्त्रीय संगीताला नवीन प्रेक्षकवर्ग मिळतो आहे. पण महोत्सवाची खरी उंची गाठण्यासाठी तो प्रेक्षणीयतेकडून संस्मरणीय होण्यासाठी आणि निखळ गायन-वादनाची अनुभूती मिळवण्यासाठी या सर्व नवीन प्रेक्षकांनी पुढची पायरी लवकरात लवकर गाठावी हीच इच्छा!
लेखक व्यवसायाने सीए आहेत आणि शास्त्रीय गायकही.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pallavi Walavalkar
Thu , 22 December 2016
Khup chan lekh aani surekh varnan!
sunita kashilkar
Mon , 19 December 2016
सुंदर, उत्कृष्ठ सरळ आणि स्पष्ट! सगळ्यांना समजेल आवडेल असा लेख. संगीताची जाणं आसणाराला आणि नसणाराला हि सहज समजलं असा लेख आहे. अप्रतिम ! सर्वानी आवश्यक हा लेख वाचावा.
Sandeep Rao
Mon , 19 December 2016
Very well wriitten covering important aspects of shastriya sangit with a very good message at the conclusion.
KULDEEP BIDARKAR
Mon , 19 December 2016
Apratim shabdamandani tolun mapun ( perfect audit ) . Pan tyathi peksha mahatvache mazyasarkhe anek ase astil je attashi suvat karat ahet shastriya Sangeeta aikayala tyanchasathi khup uttam lekh sarvaarthane . ABHINANDAN
Anand Nijampurkar
Mon , 19 December 2016
सुरेख वर्णन...आणि खरंच सवाई गंधर्व महेत्सव श्रवणीय रहावा...
yashal R
Sun , 18 December 2016
खूपचं छान !! उत्कृष्ठ
Radhika Jadhav
Sun , 18 December 2016
नेमकेपणाने विषय मांडला आहे. सवाई ला जाणे हा आता जणू काही status symbol झालाय! इतर अनेक क्षेत्रात आलेले glamour ह्या क्षेत्रात सुद्धा आले नसते, तरच नवल!
Bhagyashree Bhagwat
Sun , 18 December 2016
सोपा, सरळ आणि स्पष्ट! सगळ्यांना समजेल आणि आवडेल असा लेख.
Vivekanand Kapshikar
Sun , 18 December 2016
उत्तम लेखाजोखा. वाचनीय लेख
Shirish Deshatwar
Sun , 18 December 2016
शास्त्रीय संगीताच्या दिग्गजांची आठवण करून देणारा सुन्दर लेख
Mangesh Mane
Sun , 18 December 2016
अतिशय सुंदर वर्णन!!
Ambarish Vaidya
Sun , 18 December 2016
सुरेख हिशोब मांडला आहे !!
Shrikant Athavale
Sun , 18 December 2016
संगिताची आवड असलेल्यांना पण त्यातले बारकावे न कळणार्यांना आवडेल असा लेख.