चौकीदाराच्या घरी चोरी कशी करावी?
संकीर्ण - व्यंगनामा
टीम अक्षरनामा
  • दै. लोकमत, दै. लोकसत्ता आणि दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये आज पहिल्या पानावर प्रकाशित झालेल्या चोरीबाबतच्या बातम्या
  • Thu , 07 March 2019
  • संकीर्ण व्यंगनामा राफेल करार Rafale Deal मोदी सरकार Modi Government चोरी कशी करावी अच्युत बळवंत कोल्हटकर

राफेल कराराबाबत ‘करारी’ चर्चा होत असताना या कराराची कागदपत्रं चोरीला संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत, असा खुलासा मोदी सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात केला असं म्हणतात. तेव्हापासून सोशल मीडिया, ‌टीव्ही चॅनेल्स आणि वेगवेगळी ऑनलाईन पोर्टल्स या ‘चोरी’वर ‘हमरीतुमरी’वर येऊन चर्चा करत आहेत. आजच्या देशभरातल्या झाडून साऱ्या वर्तमानपत्रांनी याच ‘चोरी’च्या बातमीला पहिल्या पानावर ठळक स्थान दिलंय. माध्यमं व सोशल मीडिया कालपासूनच मोदी सरकारवर टीका करत आहे. काय तर म्हणे धक्कादायक खुलासा. खोटारडेपणा. असंच अजून काय काय! सर्वोच्च न्यायालयानंही ‘चोरी’ची अजून तक्रार का पोलिसांत दिली नाही? हे इतक्या उशिरा का सांगितलं? असे नस्ते प्रश्न उपस्थित केले आहेत.

आता साधी गोष्ट आहे, ज्याच्या घरी चोरी झाली, ते त्यानं केव्हाही सांगितलं तर काय बिघडतं? चोरी झाली, विषय संपला! पण आपल्याकडची माध्यमं आणि काही स्वयंघोषित न्यायाधीश कुठल्याही गोष्टीचा राईचा पर्वत करतात. सर्वोच्च न्यायालयही हल्ली अनेकदा आपल्या मर्यादांचा भंग करतं.

उलट मोदी सरकारच्या या कबुलीमुळे देशात ‘चोरी करणं’ आणि ‘चोरी झाल्याची कबुली देणं’ या दोन्ही गोष्टींना ‘सुगीचे दिवस’ येणार आहेत, याचा सिम्पल विचारच करत नाहीये कुणी, ही काही फारशी चांगली गोष्ट नाही. अहो, चोरी करण्याइतकंच चोरी झाली हे सांगणंही महत्त्वाचं असतं. त्यासाठी काही कमी गुणवत्ता लागत नाही! भरपूर लागते. सफाईदारपणा लागतो. धडाडी लागते. धाडस लागतं आणि ओढवलेल्या परिस्थितीतही तगून राहण्याचं धैर्यही लागतं.

म्हणून अशा प्रकारच्या चौर्यकर्माला चांगले दिवस यावेत म्हणून मराठीतले एक धुरंधर, धाडसी पत्रकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी कितीतरी कसोशीनं प्रयत्न केले होते, हे आज फारसं कुणाला माहीत नसावं. पण जे मायमराठीतच जिथं अनेकांना माहीत नाही, तिथं राष्ट्रीय पातळीवर किती जणांना माहीत असेल, याची शंकाच आहे. तर ते असो.

‘चोरी कशी करावी?’ हे पत्रकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं एक भन्नाट पुस्तक आहे. १९२५ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. तब्बल २० प्रकरणांच्या या पुस्तकात कोल्हटकर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या कशा कराव्यात याच्या साद्यंत हकिकत सांगितल्या आहेत. अजून सहा वर्षांनी या पुस्तकाला १०० वर्षं पूर्ण होतील. पण त्याआधीच या पुस्तकाची मागणी बाजारात वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ उठवत मराठी प्रकाशकांनी या पुस्तकाची नवी सुधारित आवृत्ती तातडीने बाजारात आणण्याची गरज आहे. नुसती गरज नाही, नितांत निकडीची गरज आहे.

ही नवी सुधारित आवृत्ती ‘चौकीदाराच्या घरी चोरी कशी करावी?’ या नावाने आणल्यास त्याचा फार व्यावहारिक पातळीवर म्हणजे पुस्तकाच्या विक्रीच्या दृष्टीने जबर फायदा होण्याची दाट शक्यता आहे. ही संधी मराठी प्रकाशकांनी न गमावता, न विलंब लावता, तात्काळ घेतली पाहिजे. कारण तसंही गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठी पुस्तकांचं मार्केट बरंचंसं डाऊन आहे. नोटबंदी, जीएसटी यांनी या मराठी प्रकाशन व्यवसायावर मोठा परिणाम केला आहे. त्यामुळे मराठीतले मोठे प्रकाशकही पुन्हा पुन्हाच नव्हे तर दहा-दहा वेळा विचार करून पुस्तकं प्रकाशित करत आहेत. तसा प्रकाशक नामवंत असो की नवखा, कुठलं पुस्तक बाजारात खपेल याचा एका मर्यादेपर्यंतच अंदाज बांधता येतो. कारण कुठल्याही नव्या पुस्तकाचं कुठल्याही नव्या सिनेमासारखं असतं. सिनेमा चालला तर चालतो, नाहीतर पडतो. पुस्तकाचंही तसंच असतं. त्यामुळे नवी पुस्तकं प्रकाशित करताना दहा वेळा विचार करणाऱ्या मराठी प्रकाशकांना या निमित्तानं आपला व्यवसाय मूळ पदावर आणण्याची एक नामी सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यांनी अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं ‘चोरी कशी करावी’ हे पुस्तक नव्यानं प्रकाशित करावं. फक्त त्याला नवी सुधारित आवृत्ती म्हणावं आणि त्याचं नाव बदलून ‘चौकीदाराच्या घरी चोरी कशी करावी?’ असं करावं. कारण त्यामुळे या पुस्तकाचा विषय एकदम आजच्या तमाम मराठी आणि इंग्रजी भाषेतल्या पहिल्या पानावरच्या बातमीसारखा ताजा फडफडीत होईल. आणि नुसतं तेवढंच नव्हे तर तो पुढचे बरेच दिवस फडफडत राहणार आहे. त्यामुळे हे पुस्तक जेवढ्या पटकन बाजारात आणता येईल तेवढ्या लवकर आणावं. कारण ‘चोरी’ला लवकरच या देशात ‘सुगीचे दिवस’ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं निधन १५ जून १९३१ रोजी झालं. म्हणजे या वर्षी येत्या जूनमध्ये त्यांना जाऊन ८८ वर्षं पूर्ण होतील. कॉपीराईट कायद्यानुसार लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी कुठल्याही पुस्तकावरील कॉपीराईट मुक्त होतो. म्हणजे ते कुणाही प्रकाशकाला प्रकाशित करता येतं. त्यामुळे कोल्हटकर यांचं ‘चोरी कशी करावी?’, सॉरी, चुकलं, नव्या स्वरूपातलं ‘चौकीदाराच्या घरी चोरी कशी करावी?’ हे पुस्तक मराठीतल्या कुठल्याही प्रकाशकाला प्रकाशित करता येईल. साने गुरुजी यांचं ‘श्यामची आई’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी कॉपीराईट मुक्त झाल्यापासून ते जसं अनेक प्रकाशकांनी प्रकाशित केलं आहे, तसंच हेही अनेक प्रकाशकांना करता येईल. किंबहुना या पुस्तकाची महाराष्ट्रातल्या यच्चयावत नागरिकांना नितांत निकडीची गरज लागणार आहे. त्यामुळे मराठीतल्या यच्चयावत प्रकाशकांनी हे पुस्तक प्रकाशित केलं तर ते साहजिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचेल. (खरं तर ते आसेतूहिमाचल हिंदुस्थानातल्या नागरिकांना लागणार आहे. त्यामुळे त्याचा इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्ये तातडीने अनुवादही उपलब्ध करून द्यायला हवा.) महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला ते सहजपणे विकत घेता येईल. सर्व प्रकाशकांनी मिळून एकत्रितपणे हे पुस्तक प्रकाशित केलं तर त्याची छपाई, विक्री, जाहिरात, वितरण यांवरचा बराचसा खर्च कमी होईल. परिणामी ‘चोरी कशी करावी?’, सॉरी, चुकलं, ‘चौकीदाराच्या घरी चोरी कशी करावी?’ या पुस्तकाची किंमतही सर्वसामान्यांना परवडेल अशी नाममात्र ठेवता येईल. परिणामी पुस्तकाचा खपही भरपूर होईल. म्हणजे प्रकाशकांनाही ‘सुगीचे दिवस’ आणि पुस्तक विकेत घेऊन वाचणाऱ्यांनाही ‘सुगीचे दिवस’!

कोल्हटकरांच्या ‘चोरी कशी करावी?’ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाची सुरुवातच त्यांनी अशी केली आहे – “चोरी कशी करावी हे शास्त्र जितकें नवें आहे तितकेंच जुनेंही आहे. हे शास्त्र नवें आहे हे वाचकांना सांगायला नकोच. कारण जी गोष्ट सत्य आहे ती सांगण्यांत चोरी कसची?”

त्याप्रमाणे हे कॉपीराईट मुक्त पुस्तक पुन्हा छापून त्याची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यातही काही ‘चोरी’ मानायचं कारण नाही. कारण ‘चोरी कशी करावी?’ याचंही एक वस्तुनिष्ठ, तर्कनिष्ठ आणि व्यवहारनिष्ठ शास्त्र आहे. ते नीट समजून घेतल्याशिवाय सफाईदारपणे चोरी तर करता येत नाहीच, पण ‘आपल्या घरात चोरी झालीय’ हेही सांगता येत नाही. म्हणजे जो चोरी करतो त्या ‘चोरा’ला आणि ज्याच्या घरी ही ‘चोरी’ होते, त्या ‘घरमालका’ला अशा दोन्हींना हे पुस्तक बहुमोल उपयोगाचं ठरू शकतं.

दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हटकरांनी ‘चोरी कशी करावी?’ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातच सांगितलं आहे की, “वाटेचा चोरही मान्य करील कीं ह्या शास्त्रावर अजून कोणताही प्रमाणभूत ग्रंथ झालेला नाही. निदान मराठीत तरी ह्या विषयावरील हा पहिला ग्रंथ आहे व आम्ही एवढेंच प्रामाणिकपणानें सांगूं शकूं कीं ह्या पुस्तकात आम्हीं कोणाच्याही मजकुराची चोरी केलेली नाही.” म्हणजे पहा, हे पुस्तक बाजारात खपणार याची खुद्द पुस्तकाच्या मूळ लेखकानंच हमी दिली आहे. शिवाय या पुस्तकातला मजकूर पूर्णपणे स्वतंत्र असून तो कुठूनही चोरलेला नाही, असा स्पष्ट निर्वाळाही दिलेला आहे. त्यामुळे तीही काळजी मिटली.

तिसरं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘आपल्या घरी चोरी झाली’ हे सफाईदारपणे सर्वोच्च न्यायालयात सांगण्याचं जे अतुलनीय धैर्य मोदी सरकारनं दाखवलं आहे, त्यामुळे ‘चोरी’ करणं हा फार गंभीर गुन्हा ठरत नाही. तर तो प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचाच ठरतो आहे. अर्थात चोरी करण्यासाठीही अतुलनीय धैर्य लागतं, तसंच आपल्या घरी चोरी झालीय, हे सांगायला तितकंच, किंबहुना त्याहून जास्त अतुलनीय धैर्य लागतं. या दोन्ही गोष्टी अंगी कशा बाणवाव्यात, हे कोल्हटकरांच्या ‘चोरी कशी करावी?’ या पुस्तकात खूप सफाईदारपणे सांगितल्या आहेत.

कोल्हटकर पुढे म्हणतात की - “कुणाकुणाला – ईश्वर राजाचें रक्षण करो -  असे वाटत असेल की, ह्या शास्त्राचें अध्ययन ते काय करायचें? हे शास्त्र मनुष्याला निसर्गत: येत असेल. प्रयत्न केला – ईश्वर राजाचें रक्षण करो -  तर चोरी करायला साधारणपणें कुणालाही अडचण पडायची नाही, पण ही समजूत चुकीची आहे. मनुष्याला अशा शेंकडो गोष्टी येत असतात, पण त्या सशास्त्र कशा करायच्या हें त्याला शिकावेंच लागतें. नौकानयन, आकाशयान, प्रकाशालेख्य, ध्वनिवाहन वगैरे मोठमोठ्या गोष्टी सोडून द्या. त्याचें सशास्त्र अध्ययन केल्याशिवाय त्या कुणालाच येत नाहींत. पण रोजच्या व्यवहारातल्या ज्या अनेक गोष्टी, त्याचींही आता शास्त्रें बनलेली आहेत व त्या सशास्त्र करण्याकडे लोकांची प्रवृत्ति होत चाललेली आहे. जेवावे कसे ह्याचेही शास्त्र बनलेलें आहे व उपाशी कसे रहावे ह्याचेही शास्त्र बनलेलें आहे.” तेव्हा चोरी करणं आणि चोरी झाल्याची कबुली देणं या दोन्ही गोष्टींसाठी चोरीचं शास्त्र समजून घेण्याची नितांत निकडीची गरज आहे, यात तीळमात्र खोट काढण्याची गरज नाही.

जगातील यच्चयावत माणसं ही मुळात चोर असतात. त्यामुळे इतरांच्या घरी चोरी करणं आणि आपल्या घरी चोरी झाली हे सांगणं, यात काहीही कमीपणा मानायचं कारण नाही. कोल्हटकरच पुराव्यानिशी हे सांगतात की - “ज्यास आपण EVOLUTION अथवा उत्क्रान्तिवाद म्हणतों त्यामुळेंही मनुष्य चोरच ठरतो. हिन्दु तत्त्वज्ञानानें मुलाला बापाची चोरी करणारा असें म्हटलें व ख्रिस्ती धर्माने मनुष्याला ईश्वराची चोरी करणारा ठरविलें. उत्क्रान्तिवादानें असा सिद्धान्त बांधला कीं ह्या जगात मूळचा माल फारच थोडा आहे व बाकी सर्व चोरीची “इस्टेट” आहे. ही चोरीची इस्टेट सर्व सृष्टीभर दिसून येते.”

त्यामुळे आपल्याच देशाचा किंवा विद्यमान मोदी सरकारचाच नाही तर एकंदर विश्वातच सारा मामला हा चोरीचाच आहे. त्यामुळे ‘चोरीचा मामला हळूहळू बोंबला’ ही म्हण मराठीमधून हद्दपार करण्यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसायला हरकत नाही. त्यांना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व असत् नागरिकांनी विनाशर्त पाठिंबा द्यायलाही हरकत नाही. कारण कोल्हटकर म्हणतात - “चौर्य हे विश्वाचा जणूं आधार आहे. चौर्यामुळेंच विश्वाचा प्रपंच थाटला, चौर्यामुळेच विश्वाचा विस्तार झाला. विश्वात मूळ असत्प्रवृत्ति कशी सुरू झाली हे तत्त्वज्ञानी लोकास मोठे कोडे पडत असते, पण विश्वाचा पायाच जर चौर्य हा आहे तर विश्वात असत्प्रवृत्ति पाहून आश्चर्य वाचायला कशाला पाहिजे?”

गेली काही हजार वर्षं चोर आणि साव यांनी इतक्यांदा खांदेपालट केली आहे की, विद्यमान जगात, भारतात साव कोण आणि चोर कोण याचा थांग लावणं हे अथांग काम होऊन बसलेलं आहे. याबाबतही कोल्हटकरांच्या पुराव्याची साक्ष देता येईल. ते म्हणतात - “चौर्यामुळे जगात मोठा अनर्थ उसळून गेलेला आहे. जगात चौर्यकर्माचा बुजबुजाट झाल्याकारणानें खरें व खोटें ह्याची नुसती खिचडी बनून गेलेलीं आहे. साव आणि चोर ह्यांची निवड करण्याइतकें आजकाल दुसरें कठिण कामच उरलेलें नाही. हें काम विशेष कठिण होण्याचें कारण इतकेंच कीं जगांतले चोर हुबेहुब सावासारखा पोशाख करतात आणि साधुपणात सर्वांपेक्षाही सम्भावित दिसतात.”

आता चोरच जर सावसारखा आव आणत असतील तर ज्याच्या घरी चोरी झाली, त्यानं ती जाहीरपणे आणि मुख्य म्हणजे सफाईदारपणे सांगणं यात कुठल्याही प्रकारचा कमीपणा मानायचं कारण नाही. उलट अशा सफाईदार आणि प्रांजळ कबुलीमुळे ते राजा हरिश्चंद्रांच्या पंक्तीला जाऊन बसू शकतात. त्याबाबत कोल्हटकरांनी म्हणून ठेवलेच आहे की - “हरिश्चंद्राच्या वेळेपर्यंत जे कोट्यवधि मनुष्यप्राणि जगांत होऊन गेले त्यांत हरिश्चंद्राचीच एवढी प्रख्याति कां झाली? त्याचें कारण एवढेंच कीं त्या सर्वांत हरिश्चंद्र हा एकटाच सत्यप्रिय मनुष्य होता व बाकीचीं सर्व मनुष्यें खोटें बोलणारीं उर्फ लबाड उर्फ चोर होतीं. हरिश्चंद्र जागृतींत तर कधीं खोटें बोलला नाहींच पण स्वप्नांतसुद्धां तो कधीं खोटें बोलला नाहीं.”

त्यामुळे मराठी प्रकाशकांनो आणि वाचकांनो, या संधीचा लाभ घ्या! फायदा घ्या!! आणि लयलूट करा!!!

.............................................................................................................................................

‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......