अजूनकाही
अलीकडच्या काळात मराठीत मानाचे पुरस्कार सातत्याने कुणाच्या वाट्याला येत असतील तर ते नाटककार महेश एलकुंचवार यांच्या. नुकतेच त्यांना मराठी भाषेतील बहुमोल योगदानासाठी राज्य सरकारच्या भाषा विभागाकडून दिला जाणारा २०१८चा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याआधी संगीत नाटक अकादमी, विष्णूदास भावे पुरस्कार, जनस्थान पुरस्कार यांचे ते मानकरी ठरले. पुरस्कारांचा हा सिलसिला साधारणपणे २०११ पासून सुरू झाला. २०१३मध्ये एलकुंचवार यांनी वयाच्या पंचाहत्तरीमध्ये प्रवेश केला. त्यावर्षी त्यांना संगीत नाटक अकादमी, विष्णूदास भावे पुरस्कार असे दोन पुरस्कार मिळाले. त्याआधी म्हणजे २०११मध्ये जनस्थान पुरस्कार त्यांना मिळाला. आणि नुकताच ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार.
एखाद्या व्यक्तीचा उचित पुरस्कार देऊन गौरव करणे हा समाजाने त्या व्यक्तीविषयी व्यक्त केलेला आदरभाव असतो, तसेच ती त्या व्यक्तीच्या योगदानाची पोचपावतीही असते. असे योग हल्ली महाराष्ट्रात फारसे येत नाहीत. पण ते एलकुंचवार यांच्याबाबतीत येत आहेत. २०१३ साली एलकुंचवार यांची एक मुलाखत दै. लोकसत्तामध्ये छापून आली होती. त्यात त्यांनी पुरस्कारांविषयी म्हटलं होतं की, “मुळात मी सुरुवात केली तेव्हा असं काही एवढंहोईल, असं वाटलंच नव्हतं. मजा आता है चलो लिखो, असं ते होतं. विजयाबाईंकडे जायचं तिथं दोन-तीन दिवस राहून गप्पा मारायच्या. आमचा जो प्रेक्षकवर्ग होता तो पाचशे लोकांचा… श्री. पु. भागवत, सरवटे, पु. शि. रेगे असली माणसं. त्यांनी नाटक पाहून झालं की संपलं. त्यानंतर आणखी काय? हे सर्व जे घडू लागलेलं आहे आणि आता तर सुकाळच झालाय बक्षिसांचा. संकोच वाटतो मला. ग्रेस, जीए केवढे मोठे होते! विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ मिळायला ब्याण्णवावं वर्ष यावं लागलं. हे जे चाललं आहे, त्यात माझ्याकडे जरा वेगानेच गोष्टी येत आहेत, त्याचा संकोच वाटतो.”
महेश एलकुंचवार यांच्यासारख्या मराठी नाट्यसृष्टीला नवीन वळण देणाऱ्या आणि नवे आयाम आजमावणाऱ्या नाटककाराला अशा प्रकारे सन्मानित करणे हे महाराष्ट्राच्या एकंदर सांस्कृतिक-साहित्यिक परंपरेला शोभणारे आहे.
एलकुंचवार अगदी योगायोगाने नाट्यलेखनाकडे वळले. आपल्या नाट्यप्रवासाविषयी त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की – “मी जेव्हा जेव्हा माझ्या नाट्यजीवनाचा विचार करतो तेव्हा तीन नावं ठळकपणे मला दिसतात. त्या तीन व्यक्तींचं ऋण माझ्यावर खूप आहे. त्यांतले पहिले अर्थातच तेंडुलकर. त्यांचं नाटक पाहिल्यानं मला काही साक्षात्कार, रिव्हिलेशन झालं, एवढंच त्यांचं माझ्यावर ऋण नाही, तर एका वेगळ्या पातळीवरही मीच काय पण माझी सगळीच पिढी त्यांची ऋणाईत आहे…त्यांची जीवनदृष्टी आम्हाला अधिक आधुनिक व उदार वाटत होती. त्यांची प्रायोगिकता प्रस्थापित मूल्यव्यवस्थेला अवघड प्रश्न विचारणाऱ्या जिवंत मनोवृत्तीतून आली होती. म्हणूनच तेंडुलकर आम्हाला आमचे वाटले… माझ्या नाट्यजीवनातील दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे श्री. पु. भागवत. ‘सुलतान’ ही माझी पहिलीच एकांकिका राम पटवर्धनांनी व त्यांनी ‘सत्यकथे’त छापली…‘सत्यकथे’त या एकांकिका आल्यानंच त्या योग्य वाचकांपर्यंत पोचल्या. अन्यथा पोचत्या ना. त्या वाचकांपैकी एक होत्या विजया मेहता. तेंडुलकर, भागवत, विजयाबाई अशी तीन मोठी माणसं माझं लेखन अलगद उचलून घेत होती. असा भाग्ययोग, मला वाटतं, फार थोड्या लोकांच्या नशिबी असेल.”
तेंडुलकरांशी एलकुंचवार यांचे आणखी एक साम्य आहे. सरस्वती सन्मान हा ज्ञानपीठाखालोखाल राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार मिळवणारे तेंडुलकरांनंतर फक्त एलकुंचवारच आहेत.
एकांकिकांपासून सुरू झालेला एलकुंचवार यांचा नाट्यप्रवास स्वतंत्र नाटकांकडे वळला. त्यातून गार्बो, वासनाकांड, पार्टी, प्रतिबिंब, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगान्त अशा सरस नाटकांची निर्मिती झाली. एलकुंचवारांनी आजवर एकाहून एक श्रेष्ठ अशा नाट्यकृती दिल्या आहेत. १९६७ मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली. म्हणजे गेली ५०-५२ वर्षे त्यांच्या एकांकिका, दीर्घाक आणि नाटके यांनी महाराष्ट्रातल्या जाणकार प्रेक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर मिळवलेली आहे. ‘पश्चिमप्रभा’, ‘मौनराग’, ही पुस्तके सोडली तर एलकुंचवार यांनी नाटकाव्यतिरिक्त इतर फारसे काही लिहिलेले नाही, ही गोष्ट त्यांच्या नाट्यधर्मीत्वाची निजखूण मानायला हरकत नाही. विजया मेहता, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रभावळीत शोभून दिसणारे आणि तिथेही स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ते नाटककार आहेत.
एलकुंचवार हे प्रायोगिक नाटककार आहेत असे म्हटले जाते. पण त्यांच्या नाट्यप्रतिभेने प्रायोगिक नाटकाच्या सर्व शक्यता ज्या ताकदीने वापरल्या आहेत, तशा क्वचितच इतर कुणी वापरल्या असतील. ‘वाडा चिरेबंदी-भग्न तळ्याकाठी-युगान्त’ ही त्रिनाट्यधारा हे याचे उत्तम उदाहरण.
विजय तेंडुलकर, सतीश आळेकर आणि महेश एलकुंचवार हे एका मांदियाळीतले नाटककार आहेत. या तिन्ही दिग्गजांमधला समान दुवा म्हणजे मानवी संबंधांचा नितांत शोध घेण्याची वृत्ती. एलकुंचवारांची नाटके ही मानवी जगण्याशी दोन हात करणारी आहेत. ती ‘व्यावसायिक’ कधीच नव्हती. तसा प्रयत्नही एलकुंचवारांनी केला नाही. आपली नाटके मध्यमवर्गीय आहेत, याची पुरेपूर जाणीव एलकुंचवारांनाही आहे.
विजय तेंडुलकर, विजया मेहता आणि श्री. पु. भागवत यांचे ऋण एलकुंचवारांनी स्वत:च मान्य केलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असा भाग्ययोग फार कमी लोकांच्या वाट्याला येतो हेही खरे. पण या भाग्यालाच एलकुंचवारांनी कधी सार्थकता मानली नाही.
एलकुंचवारांनी एकेकाळी ‘गार्बो’ हे नाटक ‘टाकतोच आता महाराष्ट्रावर बॉम्ब’ या अभिनिवेशाने लिहिले, ‘पण ते आता मलाच वाचवत नाही’, असे स्पष्ट आणि जाहीरपणे सांगण्याचे धाडस एलकुंचवारच करू जाणोत. ‘सुलतान’ हे एलकुंचवारांचे पहिले नाटक. तिथपासून ते ‘वासांसि जीर्णानि’पर्यंतचा एलकुंचवारांचा नाट्यप्रवास वेगवेगळ्या आव्हानांनी भरलेला आहे. त्यांची नाटके दिग्दर्शकांसाठी जशी आव्हाने निर्माण करतात, तशीच ती प्रेक्षक-रसिकांसाठीही करतात.
एलकुंचवार हा सतत अस्वस्थ असलेला, मानवी नातेसंबंधांचा नितांत शोध घेणारा नाटककार आहे. त्यांचा जगण्याशी सारखा झगडा चाललेला असतो. या झगड्यातून माणसांच्या चंगळवादाचे, भोगवादाचे आणि मूल्यांना सोडचिठ्ठी दिल्यामुळे टोचायला लागलेली सुखे यांची व्यामिश्रता त्यांच्या नाटकात दिसते. मूल्यांची पडझड, मध्यमवर्गीय लोकजीवनातल्या दांभिकपणावर प्रहार करणारे आणि जगण्याशी चाललेला सततचा झगडा हे एलकुंचवारांचे आवडीचे विषय.
तेंडुलकर, आळेकर आणि एलकुंचवार यांच्या नाटकांवर ‘तुच्छतावादी परंपरेचे जनक’ अशी टीका बऱ्याचदा झाली आहे. पण त्यांच्या नाटकातला मानवी संबंधांचा झगडा नीट बारकाईने पाहिला तर ती अतिशय सघन, आशयसंपन्न आणि वास्तवाला कवेत घेऊ पाहणारी नाटके आहेत हे लक्षात येते. प्रायोगिक नाटकातल्या सर्व शक्यता आजमावणारा, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारा आणि मानवी जगण्याशी थेट भिडणारा नाटककार म्हणून महेश एलकुंचवार यांचे नाव भारतीय पातळीवर आदराने घेतले जाते.
............................................................................................................................................................
‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha
...............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment