अजूनकाही
परवा एका काश्मिरी मित्राकडे गेलो होतो. त्याला हेडफोनवर गाणी ऐकायची सवय आहे. त्याने मला ‘एक गाणं ऐक’ म्हणून माझ्याकडे हेडफोन दिले. मी गाणं ऐकायला सुरुवात केली. हेडफोन खूप चांगल्या दर्जाचा होता. गाणं खूप चांगलं ऐकू येत होतं. एखाद्या थिएटरला बसल्याचा एकूण फील येत होता. त्यानंतर मी त्याला त्या हेडफोनची किंमत विचारली. त्याने त्याची किंमत २३०० रुपये सांगितली. आणि तो तितक्या किमतीचा होताही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझं इन्स्टाग्राम ओपन केलं. आणि समोर लगेच एक हेडफोनचं पेज असलेली पोस्ट आली. आणि त्यात किमतीही आल्या. ज्या हेडफोनवर मी गाणं ऐकलं होतं, त्याचीही जाहिरात आली.
मी कुणाजवळ काहीही याबद्दल बोललो नव्हतो. मग इन्स्टाग्रामला हे कळलं कसं?
‘बुक माय शो’वर एका सिनेमाची वेळ पाहिली असता. नंतर त्या सिनेमाबद्दल युट्यूबवर व्हिडिओ येऊ लागले.
गूगलवर एखाद्या देशाबद्दल जर सर्च केलं, तर त्या देशाबद्दल तिथल्या पर्यटनाबद्दल फेसबुकवर जाहिराती येऊ लागतात. कधी कधी तिथली पेजेस ‘लाईक करा’ म्हणून फेसबुक सांगते.
आपण कुणाला मित्र-विनंती पाठवली तर आपल्याला फेसबुक त्याच्याशी मिळतेजुळते प्रोफाइल असणारे लोक ‘पीपल यु मे नो’मध्ये दाखवतं.
इन्स्टाग्रामवरदेखील काही पेजेसची आपण माहिती घेतली, तर लगेच त्याबद्दल किंवा साधर्म्य असणाऱ्या पेजेसची माहिती दुसऱ्या दिवशी आपल्या समोर हजर असते.
असे काही अनुभव तुम्हालाही आले असतील.
असं का होतं याचा खरं तर आपण विचार करत नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा युट्यूब यासारखी अनेक सोशल मीडिया अॅप आपली माहिती नकळत जगजाहीर करत असतात. आणि आपण त्याबद्दल साधा विचारही करत नाही. मग फेसबुक, इन्स्टाग्राम मालकाला जाब विचारणं दूरच.
अनेकदा फेसबुक आपल्याला आपलं लोकेशन मागतं, आपण आपल्या फॅमिलीसोबत कुठंतरी जेवायला जातो, आपल्यासमोर आपण ऑर्डर केलेलं जेवण आलं की, आपण लगेच त्याचा फोटो घेतो. तो मोबाईलमध्येच ठेवतो. अजून तो फोटो आपण कुठेही अपलोड केलेला नसतो. पण आपण जर फेसबुक किंवा कोणतंही सोशल मीडिया अॅप ओपन केलं की, त्या परिसरातील हॉटेल्स, पर्यटनस्थळं जाहिरातीच्या स्वरूपात आपल्या पुढे आलेली असतात. आपण लगेच त्यावरची माहिती वाचू लागतो. आणि एका अर्थानं आपणच आपली माहिती देऊ लागतो. तोपर्यंत सोशल मीडिया अॅपनं आपण कुठे आहोत हे ओळखलेलं असतं. आपण लोकांपासून आपली प्रायव्हसी टिकून राहावी म्हणून दूर कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला जातो, पण आपली प्रायव्हसी खरंच राहते का, आपण याचा कधी विचार केला आहे का?
समजा तुम्हाला एखादं घर पुण्यात विकत घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही गुगलवर जाता, कोणत्या भागात घर घ्यायचं आहे ते पाहू लागता. असं तुमचं काही दिवस चालतं. आणि मग एक दिवस फेसबुकवर त्या भागातील एका घराची जाहिरात दिसते. तुम्ही त्या जाहिरातीकडे जाता. तिथं तुम्ही सर्च करता. त्यानंतर अशा अनेक जाहिराती किंवा पेजेज किंवा घराविषयी असणारे ग्रुप तुम्हाला फेसबुक दाखवू लागतं.
आणि मग तुमची इच्छा नसताना तुमच्यावर ते लादलं जातं.
काही दिवसांनी तुम्ही जर घर घेतलं किंवा घर घेण्याचा नाद सोडला तर तुम्हाला अशा जाहिराती येणं बंद होतं. असं का होतं, याचा आपण विचार करत नाही. आपली प्रायव्हसी एक प्रकारे भंग केली जाते, याचा आपण विचार करत नाही.
आपण दुकानात कपडे घ्यायला जातो, दुकानदार ‘कोणत्या रेंजपर्यंत दाखवू?’ हे विचारतो, तेव्हा आपण ‘अमुक तमुक रेंजपर्यंत दाखव’ म्हणून त्याला सांगतो. पण तुम्ही जर ऑनलाइन कपडे सर्च केले आणि अमुक तमुक किमतीचे कपडे कार्टमध्ये टाकले तर त्याच रेंजमधील कपडे तुमच्यासमोर येत राहतात. तेही तुम्ही न सांगता. म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज ते पेज किंवा ऑनलाइन शॉप घेऊ लागतं. त्याला पूर्ण अंदाज जरी नाही आला तरी त्याला समोरच्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कशी असेल या मतापर्यंत नक्की येता येतं.
सोशल मीडियानं जग जवळ आलं हे खरं आहे, पण आपल्या प्रायव्हसीचं काय? सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्याबद्दल अनेकदा चर्चाही झाली आहे. पण आपण आपल्या प्रायव्हसीबद्दल कधी सजग होणार आहोत? एरवी आपण आपली प्रायव्हसी टिकावी म्हणून किती प्रयत्नशील असतो! पण ही अॅप्लिकेशन आपली सगळी माहिती आपल्याकडून बिनदिक्कत काढून घेतात.
जर आपल्याला एखादा मोठा आजार झाला, तर आपण सहसा त्याबद्दल इतरांना लगेच सांगत नाही, किंवा त्याबद्दल आपल्याला कुणालाही काहीही माहीत होऊ द्यायचं नसतं. पण आपला आजार हा आपल्या नकळत जगजाहीर होऊ शकतो, याचा आपण कधी विचार केला आहे का?
समजा एखाद्याला अमूक आजार झाला, तो नातेवाईक, मित्रमंडळी यांना सांगायचा नाही आहे. त्याबद्दल पूर्ण प्रायव्हसी ठेवायची आहे. डॉक्टर किंवा घरातील व्यक्ती यांनाच या आजाराबद्दल माहिती आहे. लक्षात घ्या कुणालाही काहीही सांगायचं नाही. आणि मग ती व्यक्ती या आजाराबद्दल नेटवर सर्च करायला लागते. त्याबद्दलची माहिती वाचू लागते. ती बरीच माहिती गोळा करते. आणि एक दिवस तिला एक नोटिफिकेशन येतं. त्यात त्या आजाराबद्दल संपूर्ण माहिती असते, या आजारावर कुठे उपचार केला जाईल, त्याबद्दलही माहिती येते. (कधी कधी फोनही येतो.)
आपण आपल्या आजाराबद्दल माहिती फक्त सर्च केलेली असते, तो आपला अधिकार आहे. पण आपण कुठे, कोणत्या डॉक्टरकडे उपचार घ्यावा हे सोशल मीडियानं का ठरवावं? आणि मुळात पुन्हा तोच प्रश्न तुम्ही तुमचा आजार जगजाहीर करू इच्छित होता का? पण तो तुमच्या नकळत झाला की नाही?
अशा एक ना अनेक गोष्टी सोशल मीडिया अॅपला माहीत झाल्या आहेत.
फेसबुकवर येणारा बायोऑप्शन तर तुम्हाला आणखी अडचणीत पकडू इच्छित आहे, तुमच्या नकळत नको त्या गोष्टीबद्दल तुम्ही जगाला माहिती करून देत आहात. तेही तुमच्या परवानगीनं.
तुमचे मेल, तुमचे मॅसेज, तुमचं सोशल मीडियावर जे जे काही आहे, ते आता गुप्त राहिलेलं नाही. कधी नकळत, तर कधी तुम्हीच तुमच्या प्रायव्हसीचा भंग केलेला आहे.
मध्यंतरी मार्क झुकरबर्गला एका कमिटीपुढे हजर राहावं लागलं.
त्याला विचारण्यात आलं की, तुम्ही मागच्या आठवड्यात कुठे होता, हे आम्हाला सांगितलेलं आवडेल का? त्यावर मार्क गोंधळला. त्यानं त्याचं उत्तर ‘नाही’ म्हणून दिलं. जर त्याला त्याची प्रायव्हसी सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर मग आपल्याला का नाही तसं वाटत?
हल्ली निवडणुकांचं वारं चांगलंच वाहू लागलं आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाबद्दल फेसबुक किंवा ट्विटरवर जर तुमचं मत मांडत असाल किंवा त्वेषानं कमेंटसाठी तुटून पडत असाल, तर तुमचा कल कोणत्या पक्षाकडे असू शकतो, हे निदान फेसबुक किंवा ट्विटरनं ओळखलेलं आहे, असं समजा.
त्यावरून तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार हे जर त्यांच्या लक्षात आलं, तुमच्या मतदानाच्या प्रायव्हसीबद्दल जर त्यांना कळालं तर, तर भारताचा सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला हे पटेल का? तुमची मतदानाची प्रायव्हसी अशा प्रकारे कुणी भंग केली तर तुम्हाला चालेल का?
जरा विचार करा.
............................................................................................................................................................
लेखक अर्जून शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.
sagararjunshinde6664@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Avinash Ganvir
Wed , 06 March 2019
खरंय साहेब