कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा २०१९चा जनस्थान पुरस्कार कवी वसंत आबाजी डहाके यांनी २७ फेब्रुवारी रोजी देण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत...
.............................................................................................................................................
नमस्कार,
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अतिशय मानाच्या ‘जनस्थान पुरस्कारा’साठी आपण माझी निवड केलीत, याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी प्रवर्तित केलेला हा पुरस्कार, या वर्षी मला देण्यात आला याचा मला आनंद झाला. तो मुख्यत: या पुरस्काराशी कुसुमाग्रजांचे नाव जोडलेले आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या दिग्गज साहित्यकारांना हा पुरस्कार देण्यात आला, त्यांच्या पंक्तीत बसण्याचा सन्मान आपण मला दिलात, ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर मोठी गोष्ट आहे. गोदावरीकाठच्या, कुसुमाग्रजांच्या रहिवासाच्या या भूमीत तो मिळतो आहे, ही खरोखरच हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे. कुसुमाग्रजांची प्रेरणा आणि आपणा सगळ्यांचे प्रेम या पुरस्कारामागे आहे, याची मला जाणीव आहे.
या क्षणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची आठवण होणे स्वाभाविकच आहे. माझ्या घडणीच्या काळातले कुसुमाग्रजांच्या कवितांचे संस्कार मला आठवतात. पुढे माझी मी एक वेगळी वाट धरली, तरी अद्यापही एक वाचक म्हणून त्यांच्या कवितांनी मी थरारून जातो, आणि काही कवितांनी अस्वस्थही होऊन जातो-
‘बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार’
यांसारख्या ओळी अजूनही अंगावर काटा आणतात. देशाच्या मुक्तीसाठी अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकणाऱ्या त्या निर्भय राजबंद्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले की, आत एक आवेश संचारत असे, त्याच वेळी मन अतिशय व्याकूळ होऊन जात असे. जगात मुक्तीच्या अनेक कविता लिहिल्या गेल्या असतील, पण ‘क्रांतीचा जयजयकार’ ही कविता अजरामर आहे. या कवितेने आज आपण अधिकच अस्वस्थ होतो, याचे कारण स्वत:च्या आयुष्याचा होम करणारे आणि ‘लोहदण्ड तव पायांमधले खळाखळा तुटणार’ म्हणणारे हे वेडेपीर कुठे गेले? त्यांनी या देशाचा जो उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता, तो कुठे गेला? हे प्रश्न आपल्याला पडतात. त्या अत्यंत तेजस्वी, देशप्रेमाने भारलेल्या काळासमोर आपला आजचा वर्तमानकाळ ठेवला की, आपण अस्वस्थ होत जातो. कुसुमाग्रजांचीच ओळ आहे : ते होते जीवित-अन् हा जीवितभास! भव्योदात्त ध्येये असलेली आणि त्यासाठी जीवाची कुरवंडी करणारी माणसे लोप पावली आणि आज आपण खुज्या, सत्य-असत्याची चाड नसलेल्या माणसांच्या काळात जगतो आहोत असे आपल्याला वाटत राहते. कुसुमाग्रजांच्या भाषेत महावृक्ष कोसळले आहेत आणि त्यांचे ओंडके फक्त शिल्लक राहिलेले आहेत.
आज सत्त्योत्तर युग, पोस्ट-ट्रूथ एज, आहे असे म्हटले जाते. सत्य काय आणि असत्य काय, काही फरकच राहिलेला नाही. असत्य वारंवार बोलले गेले की तेच सत्य आहे असे सामान्य लोकांना वाटत असते. राजकीय आणि आर्थिक सत्ता असा सत्यासत्याचा भ्रम निर्माण करतात. त्यांचे असत्यांचे घोडे चौखूर उधळत असतात. कुणी सत्य सांगायचा प्रयत्न कला तर त्यांचे तोंड बंद करण्यात येते. पण आपण बोलले पाहिजे हे आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितांनी सांगितलेले आहे. सत्य असतेच. ते निर्माण करावे लागत नाही. असत्य निर्माण करावे लागते. असत्य हेच सत्य आहे, असे प्रस्थापित करावे लागते.
कवी अनुभव घेत असतो. आपल्या भोवतीच्या समाजाचे निरीक्षण करतो. विश्लेषण करतो. व्यक्ती म्हणून होणाऱ्या संवेदना, भावना, विचार असतात. त्यांचे रूपांतर कवितेत होत असते. मग त्या भावना व्यक्तिगत भावना राहत नाहीत. कवीच्या भोवतीचे जग त्याच्या मनात आंदोलित होत राहते. त्यांत सामाजिक-राजकीय प्रश्नही आलेच. हे प्रश्न साहित्यापासून दूर राहू शकत नाहीत. ते व्यक्तीच्या जगण्याचे भाग असतात. देशातच नव्हे तर जगात घडणाऱ्या घटनांचे परिणाम व्यक्तींवर, समूहांवर होत असतात. कवीला, लेखकाला याचे भान असते.
कुसुमाग्रजांच्या कवितेत आपल्या भोवतीच्या समाजाविषयीचे भान सतत असलेले आढळते. आपल्या कवितेचे ध्रुवपद कोणते आहे हे सांगताना ते म्हणतात-
‘माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे,
माणसाच्या माथ्यावर
दारिद्रयासारखा शाप नाही
पृथ्वीच्या पाठीवर
इतके अमंगल, इतके दु:खदायक, इतके भेसूर
दुसरे पाप नाही!’
सर्वसामान्यांच्या पोटात, मेंदूत शिरणारा, काळीज चिरणारा भुकेचा सुरा त्यांच्या कवितेत आहे, रस्त्यावर फिरणारे, उकिरड्यावर चरणारे, थंडीवाऱ्यात मरणारे मूल्य ते पाहतात आणि दुसरीकडचे सफरचंदी मूल्य यांतला विरोध त्यांना जाणवतो, मुलाचा आक्रोश ऐकून, चोळीतून अनिवार आवेगाने, ओघळणारे स्तन, पुन्हा चोळीमध्ये खुपसून, पहाडी शिळांची रास फोडणारी, रोजगार हमीवर तीन रुपयांत काम करणारी स्त्री त्यांना दिसते, मुलाचे कलेवर खाली टाकून, उकिरड्यावर ओतलेले कुजलेले धान्य गोळा करण्यासाठी धावणारी आई त्यांना दिसते, एका आदिवासी म्हातारीमध्ये त्यांना दिसते- तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून, लोंबत होतं आपलं पार्लमेंट, आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं, आमचं साहित्यसंमेलन. आमच्या लोकशाहीच्या आणि साहित्यसंस्कृतीच्या गोष्टी किती निरर्थक आहेत हेच ते सांगत आहेत. अशी उद्विग्न करणारी स्थिती त्यांच्या कवितेतून आलेली आहे. तरी सामान्य माणसांवर त्यांची विलक्षण श्रद्धा आहे.
हुकूमशहांचे सत्तेच्या आणि संपत्तीच्या उन्मादाने ओथंबलेले काचमहाल कुठपर्यंत शिल्लक राहतात? कुसुमाग्रज सांगतात -
‘तोपर्यंतच, जोपर्यंत सामान्य माणूस
रस्त्यातला
जंगलातला
शेतातला कारखान्यातला
उठत नाही जाळ होऊन’
संस्कृतीच्या व्यवहारात एक दिलासा आहे असे त्यांना वाटते, तो हा की सामान्य माणूस, कधीही मरत नाही, कितीही मारला तरी. दुसऱ्या एका कवितेत त्यांनी म्हटलेले आहे, तथाकथित असामान्यांसाठी राजवाड्यांच्या इमारती, चिरेबंदी भिंती या सामान्य माणसांनीच बांधलेल्या असतात. पण एक दिवस असा येतो की, ही सामान्य माणसेच त्या भिंती उद्ध्वस्त करून टाकतात. सामान्य माणसांवरची त्यांची ही श्रद्धा अपार आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीय बुद्धिजीवींविषयी त्यांना तेवढा आदर नाही.
‘महावृक्ष’ या संग्रहात ‘प्रा. मुल्हेरकर’ नावाची एक कविता आहे. मुल्हेरकर सकाळी वृत्तपत्रात वाचतात : तीन मवाल्यांनी गुराखी तरुणीवर बलात्कार केला. तिचं प्रेत सापडलं. रात्री झोपण्यापूर्वी ते त्या तीन मवाल्यांची तीन चित्रे रेखाटतात, नंतर ते टेबलावरचा चाकू उचलून त्या चित्रांवर सपासप वार करतात. प्रा. महिपतराव मुल्हेरकरांसारखी माणसे, बलात्कार आणि हत्या करणाऱ्या मवाल्यांची कागदावर चित्रे काढून, त्यांच्यावर चाकूचे वार करून आपल्या मनातल्या संतापाला वाट करून देतात. प्रा. मुल्हेरकरांसारख्यांना शक्य असते तर त्यांनी, आम्हाला नेभळट बनवले असा आरोप करून, शांतिअहिंसेचे पाठ देणाऱ्या महात्म्यांचे पुतळे करून त्यावर गोळ्या झाडल्या असत्या आणि खाली रक्ताचे थारोळे साचलेले पाहून उद्दाम आनंद व्यक्त केला असता.
कुसुमाग्रजांनी कवितेत कल्पिलेले ऊर्जस्वल जग त्यांच्या हयातीतच हळूहळू नष्ट होत गेले. धर्माचा ध्वज, जेव्हा अडाण्यांच्या हाती जातो, तेव्हा त्या ध्वजावरून, रक्ताचे थेंब गळायला लागतात, हे त्यांनी पाहिले होते. आणि त्यांनी, केल्याने देशाटन, मिळतिल मानव असंख्य माराया, हेही पाहिले होते. सुऱ्यांनी काबीज केलेली गावे त्यांना दिसतात. समूह म्हणजे हिंस्त्र जनावर हे पूर्वीच त्यांना उमगले होते. आजच्या काळात त्यांना झुंडी दिसल्या असत्या आणि त्यांच्याकडून होणाऱ्या हत्याही दिसल्या असत्या. एका कवितेत त्यांनी म्हटले आहे : रस्त्यारस्त्यांवर, रक्ताची थारोळी, इतकी साचली आहेत की, भविष्यकाळाकडे, जाणारी पावलेही आता, रक्तात माखल्याशिवाय, राहणार नाहीत. कवी द्रष्टा असतो. आजचा काळ त्यांना कालच दिसला होता.
जगात चाललेल्या हिंसाचाराविषयीची त्यांची अस्वस्थ प्रतिक्रिया ‘संतश्रेष्ठा’ या ज्ञानदेवांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत आलेली आहे. ते ज्ञानदेवांना उद्देशून म्हणतात, तुमचं आकाशच वेगळं होतं. ते हळुवार मायेनं साऱ्या धरतीला जोजवत होतं. त्यातील मेघ घुणघुणा वाजत होते. वारा रुणुझुणू वाहत होता. ते मातृहृदयी आकाश आज भयानक हिंस्त्र झालं आहे. साखळदंड तोडून पिसाट धावणारी व्याघ्रमुखी वादळं तुमचं विश्वात्मक पसायदानच रक्तबंबाळ करीत आहेत. त्यांना प्रकाशशिखराच्या पायवाटेवर माणसांचीच नव्हे तर मूल्यांचीही प्रेतं पडलेली दिसलेली आहेत. प्रकाशाची शिखरेच उरलेली नाहीत. काळोखाच्या गुहा आहेत आणि त्यांनी आपले जबडे उघडलेले आहेत. सारे काही गिळून टाकले जात आहे. सत्य, अहिंसा, शांती, बंधुभाव...
आगामी काळाची चाहूल लागल्यासारखी त्यांची एक कविता आहे. त्या कवितेत त्यांनी म्हटले आहे -
चहूकडून हे प्रश्नचिन्हांचे कळप, लांडग्यांसारखे, माझ्यावर चालून येत आहेत, माझ्या आहेपणात, त्यांचे हिंस्त्र सुळे घुसत आहेत आणि तेथील आशयाचे मूलाधार विच्छिन्न करीत आहेत.
आमच्या पिढीतल्या, आमच्या पुढच्या आताच्या पिढीतल्या कवींना, लेखकांना, कलावंतांना, पत्रकारांना, विचारवंतांना अशाच प्रश्नचिन्हांच्या लांडग्यांच्या कळपांना सामोरे जावे लागते आहे. कुसुमाग्रजांनी ज्या आहेपणाचा उल्लेख केलेला आहे तो, अथवा आपले अस्तित्व ज्या मूल्यांवर अधिष्ठित असते, ती मूल्ये, तो मूलाधारच विच्छिन्न होत आहे. तरीदेखील त्या महाकवीने पाहिलेले महास्वप्न आम्ही आमच्याही उरात बाळगलेले आहे. या कवीने म्हटलेले आहे - पलीकडच्या जंगलामध्ये, हिमलाटेत कुडकुडणाऱ्या, त्या नागड्या पोरांकडे, मला जायचं आहे, त्यांच्या अंगणात जाळ पेटविण्यासाठी.
द्वेषातून आणि हिंसेतून येणारा घरेदारे पेटवणारा हा जाळ नव्हे, तर माणसांना मायेची ऊब देणारा जाळ.
पूर्वी किल्ला बांधण्यापूर्वी खंदकात जिवंत माणसांचा बळी देण्याची पद्धती होती असे ऐकिवात आहे. आता विकासाचा, समृद्धीचा जो किल्ला बांधला जातो आहे, त्याच्या पायात आर्थिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने जे लोक मागे पडलेले आहेत त्यांचा बळी दिला जातो आहे. या विचित्र अवस्थेविषयी जे बोलतात त्यांना जनतेचे, देशाचे शत्रू ठरवले जात आहेत. लेखक, कवी, कलावंत, पत्रकार, विचारवंत यांचे डोळे उघडे असतात, कान उघडे असतात. मात्र त्यांनी आपले तोंड बंद ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा केली जात असते.
सध्या प्रागतिक भांडवलशाहीचा काळ आहे. ही नुसती आर्थिक अवस्था नसते, तर आर्थिक अवस्थेबरोबरच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अवस्थाही असते. सत्तासंपादनासाठी वेळोवेळी वंश, धर्म, भाषा या प्रभावी घटकांचा उपयोग केला जात असतो. दुसऱ्या वंशाच्या, धर्माच्या, भाषेच्या घटकांविषयी द्वेष निर्माण केला जातो. एकोणिसाव्या शतकापासून महाराष्ट्रात जे प्रबोधनपर्व सुरू झाले होते, ते पुसून टाकले जात आहे की काय, अशीही शंका आपल्याला येते आहे.
दुसरीकडे बाह्यत: जी निर्बुद्धपणाची वक्तव्ये ठरतील, पण आतून हेतुपुरस्सर खुनशीपणाने केलेली असतात त्यांना अटकाव केला जात नाही, नंतर, असं म्हणायचं नव्हतं, तसं म्हणायचं होतं असला सारवासारवीचा खेळ केला जातो. महात्मा फुले, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेल्या पिढ्या होऊन गेल्या हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांची भाषा, त्यांचे शब्द विचारांनी समृद्ध आहेत. तो आपला वारसा आहे. त्याचा विसर पडावा असे प्रयत्न सुरू असतात. पण याच महाकवीने आम्हाला हेही सांगून ठेवलेले आहे -
‘दानवीकरण घडते वारंवारतेने,
देवदूतीकरणासाठी मात्र
करावी लागते प्रतीक्षा दीर्घकाल.’
विसाव्या शतकातील एक थोर नाटककार सॅम्युएल बेकेट यांच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाची येथे आठवण होते. गांजलेल्या, त्रस्त, दु:खी, खिन्न, निराशेचा कडेलोट झालेल्या, पण निरंतर वाट पाहणाऱ्या माणसांविषयीचे हे नाटक आहे. माणसांचे वाट पाहणे किती चिवट असते, हे या नाटकातून सतत जाणवत राहते. ‘या नाटकात काहीही घडत नाही, दोनदा’ असे एका समीक्षकाचे मत आहे. ते बरोबर नाही. या नाटकात सतत वाट पाहणे घडत असते. या नाटकातूनच जाणवते की, हे वाट पाहणे या नाटकात दाखवलेल्या भागाच्या आधीही होते, आणि नंतरही असणार आहे. माणसाची जिद्द आणि आशा. दीर्घकाल प्रतीक्षा.
आज, केवळ भारतातलीच नव्हेत, तर साऱ्या जगातली सामान्य माणसे वाट पाहात आहेत. अशी दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याचे आत्मबळ कुसुमाग्रज या कवीने आम्हाला पुरवलेले आहे, आणि त्यासाठी आम्ही मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. एखादा लेखक, एखादा कवी आपल्या काळात कसा जागता पहारा देत असतो हे आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितेतून समजते. कवितेच्या रूढ समजुतीची त्यांनी पर्वा केली नाही, कुणाचे सरकार आहे, कुणाची राजवट सुरू आहे याचीही त्यांनी पर्वा केली नाही. लेखकाचा धर्म काय, त्याचे कर्तव्य काय याची निरंतर आठवण करून देणारी त्यांची कविता आहे. राजवटी किंवा सरकारे कशी असतात याची त्यांना कल्पना होती.
कशी असतात सरकारे? आपल्या विरोधातला आवाज दडपून टाकायचा असेल तर त्या सरकारला दडपशाहीचा मार्ग अवलंबावा लागतो, निर्बंध लादावे लागतात, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करावी लागते, त्या देशातले सारे लोक भयाच्या छायेत जगत राहतील अशी स्थिती निर्माण करावी लागते. ही वाक्ये हॅरी एस ट्रुमन यांची आहेत. स्वातंत्र्य काढून घेतले तर माणसांचे रूपांतर कत्तलखान्याकडे चाललेल्या शेळ्यामेंढ्यांमध्ये होईल, असे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी म्हटले होते.
सर्वांत प्रक्षोभक आणि उद्विग्न करणारी कविता सरकारे लिहीत असतात. ती भाषा कवीच्या भाषेहून वेगळी असते. त्या कवितेच्या वाचनाने सामान्य लोक विद्ध होतात, विचलित होतात, आणि विदीर्ण होतात. जेम्स टेट या कवीची एक कविता आहे : गव्हर्नमेंट लेक. एक माणूस फिरत फिरत सरोवराजवळ येतो. ते सरकारी आहे हे त्याला ठाऊक नसते. सरोवराचा रक्षक येतो. तो म्हणतो, हे सरकारी सरोवर आहे, सामान्य माणसांना येथे प्रवेश नाही. तुम्हाला जावे लागेल. त्या सरोवरात एक माणूस गटांगळ्या खात असतो. त्या रक्षकाला हा विचारतो, त्याचे काय? रक्षक म्हणतो, तो मेला आहे. हा म्हणतो, तो मेलेला नाही. रक्षक पिस्तूल काढतो, तिकडे गोळी झाडतो, म्हणतो, आता तो मेलेला आहे. सरकारे प्रश्नांची सोडवणूक कशी करत असतात यावरचे हे विदारक भाष्य आहे.
कवीने, लेखकाने आपला धर्म विसरायचा नसतो. स्तब्ध करण्याचा काळ येतो तेव्हा लेखकाने, कवीने बोलले पाहिजे. नाहीतर पुढची पिढी म्हणेल, आमच्या मागच्या लेखकांनी बोलायला हवे होते, तेव्हा ते बोलले नाहीत. चहूकडून काळोख दाटून येतो तेव्हा लेखकच लोकांची सोबत करतात, त्यांच्या अंत:करणातल्या दिव्याची ज्योत विझू देत नाहीत. विपरीत स्थितीत सापडलेल्या सामान्यांच्या सोबत असले पाहिजे, त्यांच्या बाजूने बोलले पाहिजे. त्यांच्या काळजात प्रचंड ऊर्जा असते, हे कुसुमाग्रजांनी आपल्याला सांगितलेलेच आहे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment