न्यूऑनच्या चांदण्यात…
कला-संस्कृती - सतार ते रॉक
डॉ. आशुतोष जावडेकर
  • आशा भोसले यांची गातानाची एक तल्लीन भावमुद्रा
  • Sat , 17 December 2016
  • सतार ते रॉक आशा भोसले Asha Bhosle लता मंगेशकर Lata Mangeshkar आर.डी. बर्मन R. D. Burman

आम्ही सारे उत्सुकतेनं प्रेक्षागृहात बसलो आहोत. पाच मिनिटांत कार्यक्रम सुरू होणार आहे. आशा भोसले आताच खुर्च्यांमधल्या वाटेतून हसत, चालत नाही का गेलेल्या व्यासपीठावर! दीनानाथ मंगेशकरांची ही चिरतरुण कन्या त्यांच्याच नावे कार्यरत असलेल्या रुग्णालयात तिथल्या डॉक्टर मंडळींसाठी खाजगी मैफल सादर करणार आहेत. पडदा वर जाईल तेव्हा आधी भाषण, स्वागत इत्यादी असेल असं अनेकांना वाटतं, पण तसं होत नाही. थेट आवाज कानी येतो, ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश…’ अरे, हे जुनं रॅकॉर्डिंग लावलंय की काय? हा आवाज किती तरुण आहे. पण तोवर पडदा वर जातो, साक्षात आशाबाई या वयात – ८४ फक्त – ते गाणं स्वत: जिगरीनं गात आहेत. टाळ्यांचा कडकडाट होतो. मागे मोजकी वाद्यसंगती. पेटी, तबला, काही तालवाद्यं आणि सिंथेसायझर, बस्स, बाकी काही नाही. इतक्यात माईकचा क्षणभर लुज कॉन्टॅक्ट होतोय, तरीही आशाबाईंच्या आवाज आम्हा १००-१५० लोकांपर्यंत इतका अप्रतिम तऱ्हेनं पोहतोय, सगळे आपसूक व्वा म्हणताहेत. असं वाटतंय, माईकविनाच गावं बाईंनी! मी शेजारी बसलेल्या डॉक्टर मित्राला म्हणतोय, ‘अरे, काय आवाज! अंगावर काटा आला!!’

तसाच आलेला खूप खूप पूर्वी एकदा. आशा-लता वगैरे गाणी कानावर पडत असत. पण मी खूपदा वेगळंच, अनवट ऐकत असे. असेन तेव्हा सातवी-आठवीत. अपर्णा कुलकर्णी म्हणून माझी मावशी मला तेव्हा ‘नक्षत्रांचे देणे’ या नव्या कॅसेटविषयी सांगत होती. मग ऐकल्याच मी त्या दोन कॅसेट. आशाबाईंच्या एका मैफलीचं ते रॅकार्डिंग होतं. मी ती सारी गाणी तेव्हा पहिल्यांदाच ऐकत होतो. ‘तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे?’...पहिली ठसली ती त्यातली विलक्षण तान. उन्मादक आव्हान त्या गळ्यात तेव्हा दिसतं, पण ते फारसं तेव्हा कळलं नसावं. तीच गत ‘चांदण्यात फिरताना’ची. मग ‘गेले द्यायचे राहून’ गाण्याआधी आशाबाई अनेक गायकांच्या नकला करतात. ते मला जाम आवडलेलं. पुन्हा पुन्हा कॅसेट मागे फिरवत मी ते ऐकत असे. पण मागाहून कळलं त्या केवळ नकला नव्हत्या. ते निरनिराळे सांगीतिक बाज होते. मग नंतर ऐकली आशाबाईंची नाट्यगीतं. तीही मी कितीतरी वेळा ऐकली. मग ‘चुरा लिया है दिल’ वगैरे हिंदी गाणी…

आता कळतंय आशाबाईंच्या आवाजाच्या प्रेमात पडून ती सारी गाणी ऐकल्याने सांगीतिक संस्कार तर झालेच, पण पहिल्यांदा अभिजात कविताही भेटली (‘ये रे घना’). किंवा मग जरा मोठ्या वयात त्या गाण्याच्या रोमँटिक पदरामुळे एक छान, हवीहवीशी मस्तीची लय तारुण्यापाशी सापडत गेली. पुढे मी पुष्कळ काही ऐकलं. वेगळ्या बाजाचं संगीत ऐकलं, भारतीय शास्त्रीय संगीतही अर्थातच ऐकलं. नवनवे गायक आवडत गेले. आशा भोसले या लिजंडपाशी माझा कान अडकला नाही, पण तो सूर आत कुठेतरी राहिलाच.

मी चाली देताना वाटून जायचं ही चाल आशाबाईंनी गायली पाहिजे. असं बहुतेक संगीतकारांना वाटत असावंच. पुढे माझी पावलं झपाट्यानं, जोमानं आणि निश्चयानं संगीताऐवजी साहित्याकडे वळली, तसं ते स्वप्नही अलगद मागे पडलं. मुख्य म्हणजे पुष्कळ चांगलं ऐकल्यावर वाचल्यावर मला माझ्या मर्यादा कळल्या. आणि मग तर ते स्वप्न मी स्वच्छेनं पुसलं. पण त्या आशा भोसले नावाच्या तरल आणि बुद्धिमान आवाजाचा ठसा आत राहिलाच. म्हणूनच पुढे ‘मुळारंभ’ या माझ्या कादंबरीत ओम घरी एकटा असतो, तेव्हा सिलिन डियान, नुसरत फतेह अली खान यांची गाणी ऐकत शेवटी ‘ही वाट दूर जाते’ या आशाबाईंच्या गाण्याशी रेंगाळतो. पुढे आशाबाईंचे चिरंजीव हेमंत भोसले माझ्या पुढ्यात दंतरुग्ण म्हणून पहुडले असताना मी त्यांना म्हटलं, ‘बाकी काही असो, पण अस्ताचलास रविबिंब टेकत असताना मनातला रावा भेटणं अवघड असतं नाही?’ आणि हेमंत नेहमीसारखे उदास, सुजाण हसले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले.

“आता जे मी गाणार आहे. ते माझं फार लाडकं गाणं आहे. घरातले सारे मला चिडवतात की, आशा तुला दुसरं कुठलं गाणं येत नाही का?” आशाबाई हसत बोलताहेत. सगळे हसतात. कुणी शेजारून माझ्या कानात सांगतं, ‘आशाबाईंनी आज दुपारी इथं येऊन अख्खी रिहर्सल केली आहे.” मी थक्क होतो. केवढी मेहनत! माझे अनेक गायक मित्र-मैत्रिणी कधीच रिहर्सल वगैरे न करता स्टेजवर, वाहिन्यांवर जात असतात. आशाबाई गायला लागतात ‘चांदण्यात फिरताना, माझा धरलास हात- सखया रे, आवर ही, सावर ही चांदरात’.

मला सारखं वाटतं यांना त्यांच्या आयुष्यातलं प्रेम आठवतंय का आज? फार आतून गात आहेत. कोण आठवत असेल आता त्यांना? कुणी मागून म्हणतं, ‘आर.डी.’ मी ऐकत नाही. त्यात काही अर्थ नाही. प्रेमाला नाव नसतं. आणि व्यक्ती सरली तरी ते प्रेम राहतंच. तेवढ्यात आवाज जरा कापतोय का? अरे, हे काय, आशाबाईंना हुंदका येतो. त्या गाणं थांबवतात क्षणभरच. मग डोळे पुसतात. गाणं थांबतं. वाद्यं थांबतात. सभागृहात सन्नाटा पसरतो. अनेकांचे डोळे पाणावतात…पण पहिल्या सावध होतात त्या आशाबाईच. क्षणात त्या समोर माईक घेऊन सांगताहेत की, ‘असं कधी होत नाही. मी पुन्हा गाते.’ आणि ते गाणं त्या हिकमतीनं पुन्हा अख्खं गातात. टाळ्यांचा कडकडाट होतो. मी बघतोय फक्त अवाक होऊन.

कलाकार म्हणून प्रेरित होऊन इथं व्यक्तिगत आणि व्यावसायिक मूल्यांची गल्लत नाही. भावनांमध्ये वाहून जाण्याइतका ढिसाळपणा नाही. मागून म्हणतंय कुणी, दबक्या आवाजात, ‘आर.डी.च आठवला असणार.’ मी हसतोय. मला आधीच माहितंय हे त्यांच्या दिवंगत कन्येचं सगळ्यात लाडकं गाणं होतं. मला त्या कौटुंबिक नाट्याचीही माहिती अंदाजानं आहे. पण ते असतंच ना, घराघरात असतं. कलाकाराचे सगळेच भोग तीव्र जातकुळीचे असतात. कलाकाराच्या हातूनही चुका होतात. अपराध भावनेचं भूतही अनेकदा असतंच बसलेलं मानगुटीवर. खरा कलाकार त्या साऱ्याला ओवून घेतो निर्मितीत. निर्मिती हेच त्याचं भागधेय असतं. आणि हे काहीसं निष्ठुर असतंच. जवळच्या चार माणसांलेखी तर नक्कीच. पण खूपदा त्याला कुणाचा इलाज नसतो.

पब्लिकला कशाचंही कौतुक वाटतं. मघाशी आशाबाई ‘ले गई ले गई’वर थिरकल्या. ते या वयात अवघड खरंच, पण त्याहून अवघड असा डोंगर पार करून एखादा गायक व्यासपीठावर या क्षमतेसह गातो हे! याचा तलास लागणं म्हणजे रसिकता असते.

आशाबाई आता खेळकर मूडमध्ये आहेत. मध्ये कधी आवाज वयोपरत्वे थोडा हलतो. (पण अगssदी थोडा). त्या बिनधास्त गातात. सभागृहात लतादीदींचा सुंदर फोटो आहे. त्याकडे बघून त्या म्हणतात, “काय काय लोक बोलतात आमच्या दोघींविषयी. आम्हीही चुका केल्या. पण आम्ही पाच मंगेशकर तरीही एका हाताच्या बोटांसारखे आहोत. आमची मूठ वळली की काही खरं नसतं.’’ लोक हसताहेत. मी त्या ‘तरीही’ या शब्दापाशी थांबलोय. त्यात नाट्य आहे. त्यात सुजाणपण आहे. त्यात क्षमाशील असं काही आहे. मग आशाबाई दीदींचं ‘लग जा गले’ हे गाणं गातात. मनात तुलना चालू आहे माझ्या. दोघींच्या गायकीतला नक्की फरक काय? सुधीर मोघे एकदा म्हणाले होते की, ‘आशा म्हणजे मेहनतीचं उच्च टोक. लता म्हणजे मेहनत आणि अजून दैवी असं काही.’ काय माहिती! मला कळत नाही, मी सोडतो विश्लेषकाची भूमिका आणि ऐकत राहतो आत्ताचं हे गाणं. ‘मुलाकात हो ना हो’ म्हणतानाची कळ तर तशीच, तितकीच गहिरी आहे बाबा!

मी मग ते गाणं झाल्यावर निघतो. काही कामं खरीच असतात. पण मला घरीही जायला हवं. माझी छोटी मुलगी वाट बघतेय. आमची नित्य चुकामूक होते आहे सध्या. पेशंटस, लेख डेडलाइन्स, सदरं, नवं गाणं… कामं संपणार नाहीत. मुलगी न कळत मोठीही होऊन जाईल. माझंच मन मला म्हणतंय, ‘बस ना इथं ऐकत.’ मग फिरून उत्तरतंय,‘ना, निघ. एकतर जे ऐकलं आहेस, अनुभवलं आहेस, त्यानंही एकाच वेळी आनंदला  आणि शिणला आहेस. दोन – तुझं जगणं, हे आहे. तुझा संघर्ष हा आहे. प्रेरित हो आशाबाईंच्या अवघड जगण्यापासून अन कष्ट कर.’ मस्त मोकळा वारा अंगाला भिडतोय. नेहमी अक्टिव्हा चालवताना गाणारा मी आज कसा शांत झालोय आणि मग हेमंत भोसले आठवताहेत. आशाबाईंची मध्ये झालेली भेट स्मरते आहे, ‘नक्षत्रांचे देणे’ची कॅसेट-कॅव्हर्स डोळ्यांसमोर येत आहेत. आणि मग सिग्लन सुटल्यावर का कुणास ठाऊक एकदम वाटतंय की, इथं न्यूऑनचं चांदणं आहे, पण इथल्याही ‘तरुछाया’ सारं काही जाणत आहेत.

 

लेखक दात काढतो, गातो आणि लिहितो

ashudentist@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख