धवलशुभ्र संगमरवरी महालातील एका भव्य दालनात आज विशेष लगबग दिसत होती. दालनात उदबत्त्यांचा मंद गंध दरवळत होता. वाऱ्याच्या झुळकीसरशी बाहेरील लताकुंजावर उमललेल्या फुलांचा सुगंध त्यात मिसळत होता. रेशमी गोंडे लावलेले तलम पडदे वाऱ्यावर हेलकावे घेत होते. महालांतील विविध दालनांमध्ये नाना वर्णांची रंगसंगती साधलेले मृदु-मुलायम गालीचे अंथरले होते. गवाक्षांमध्ये बोलणाऱ्या पक्ष्यांचे सुवर्ण पिंजरे टांगले होते. दासींची धावपळ तर विचारू नका. कुणी गुलाबपाण्याची सुरई आणत होती, तर दुसरी कुणी पूजेचे तबक सजवत होती. रत्नजडीत फुलदाण्यांमध्ये सुवासिक फुलांच्या रचना करण्यात दोघी-तिघी मग्न झाल्या होत्या. एकीकडे गजरे माळा गुंफण्याचे काम चालू होते. आणि या फुलांनाही लाजवेल अशी कांती असलेली सत्यभामा दासीवर्गाची धावपळ निरखत आरामात हस्तीदंती मंचकावर पहुडली होती.
तो मंचकसुद्धा कलात्मकरीतीने सजवला होता. मंचकावर गुलाबी रंगाची मृदु-मुलायम शय्या अंथरली होती. मखमली उशांवर नाजूक जर-तारी नक्षी चितारली होती. पायगती गुलाबी दुलई व गुलाबी रंगांत हरवलेली गौरगुलाबी सत्यभामा. खरोखरच दृष्ट लागावी अशी सुंदर व मोहक दिसत होती ती. तिने गडद गुलाबी वाणाचा भरजरी शालू आणि हिरव्या रंगाची चोळी परिधान केली होती. गळ्यांत व हातांत लालबुंद माणकांचे सुवर्णालंकार ल्यायले होते. पोवळ्यांनी मढवलेला कमरपट्टा व त्यावर मेखला रुळत होती. दासी सारिकेने मेहनतीने केलेली केशभूषा एका गुलाबकळीने सुशोभीत दिसत होती.
सत्यभामा जात्याच कल्पक होती. सौंदर्याची भोक्ती व नावीन्याची चाहती. विविध रंगात हरवणारी जणू रंगशलाकाच. कधी हिरव्याकंच रंगाची उधळण करणारी देवता, कधी शुभ्रतेत लपेटलेली श्वेतांबरा, तर कधी नीलपरी. जसा वेष तसा सारा सरंजाम. हिरे-मोती, पाचू-माणिक यांच्या अलंकाराची निवडही तिच्या वेषभूषेला खुलून दिसेल अशीच ती करत असे. त्यांत तिचा चोखंदळपणाही दिसून येत असे. श्रीराम अवतारांत सत्यभामा चंद्रसेना नामक नागकन्या होती. पेशाने ती गणिका होती. श्रीरामाचा युद्धांतील पराक्रम व अनुपम पौरुष पाहून ती त्याच्यावर अनुरक्त झाली आणि तिने एक रात्र रामाच्या सहवासांत घालण्याच्या अटीवर मारुतीला अहीमही रावणांसह राक्षसांना मारण्याचा उपाय सांगितला, पण रामाचे एकपत्नीव्रत असल्याने त्याने कृष्णावतारांत पट्टराणीपद देण्याचे वचन दिले. भामा तिसरी राणी असली तरी ती पट्टराणी होती. ती जात्याच गुणग्राहक असल्याने सौंदर्यप्रसाधनांतही राणीवशांत तीच अग्रेसर होती. तिच्या शृंगारातही भडकपणा नसे. आजही गुलाबी रंगांत एकरूप झालेली भामा सावळ्या श्रीहरीची आतुरतेने प्रतीक्षा करत होती. प्रेमाचा रंगही गुलाबीच असतो ना? कुठल्याही रंग वा वस्त्रप्रावरणाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया अवतरला की, त्याच्या मनोहर कांतीपुढे सर्व रंग फिके पडत ही गोष्ट अलाहिदा. त्याची नजरही फक्त दोनच रंगांचा वेध घेत असे. रंगाच्या मैफलीत फक्त दोनच रंग त्याच्या मनात भरत. भामेचे गुलाबी गाल व ओठांच्या लालबुंद पाकळ्या. कारण ते रंग निसर्गदत्त असत.
आज घनःशाम हस्तिनापुराहून यायचा होता. मधून मधून तो पांडवांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थासही जात असे. यावेळेस तो खूप दिवस पांडवांघरी राहिला होता. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी भामा आतुर झाली होती. आपल्या स्त्रीसुलभ भावना सख्यांपासून लपवण्यासाठी आपल्या लाडक्या काकाकुव्याशी ती संभाषण करत होती. श्रीकृष्णाच्या आगमनाप्रीत्यर्थ नगरीत वाजलेले नगारे तिच्या कानी केव्हाच पडले होते, पण अजून त्याची सावळी मूर्ती दृष्टीस पडली नव्हती.
भामेच्या समोरच्या गिरदीवर पांढराशुभ्र काकाकुवा मोठ्या ऐटीत बसून तिच्या तळहातावरील डाळिंबाचे दाणे आपल्या तीक्ष्ण चोचीने अलगद टिपत होता. मधूनच तिच्या बोटांची नखेही चोचीत धरत होता.
‘‘खुळाच आहे अगदी. चांगले अनार दाणे भरवते आहे, तर नखेच खायला बघतो आहे.’’ भामेचे बोलणे ऐकून गवाक्षांत उभी राहून राजमार्ग न्याहाळणारी दासी सारिका गर्रकन वळून हसत म्हणाली, ‘‘महाराणी, खुळा नाही बरं का तो. आपल्या निसर्गसुंदर नखांवर आपण ल्यायलेल्या माणकांची प्रभा विखुरल्यामुळे बिचाऱ्याची सारखी फसगत होते आहे. खरं ना रे?’’
‘‘खरंच ग सारिके. पण स्वारी कधी येणार? किती ग वाट पहावी? दुपार टळून गेली. की अन्य राणीकडे प्रथम....!” हा विचार मनांत येताच भामा हिरमुष्टी झाली व तिने हातातील अनारदाणे विमनस्कपणे चांदीच्या वाटीत टाकले. काकाकुव्याने तिच्या उद्गारांची हुबेहूब नक्कल केली व मध्येच ओरडला, ‘‘महाराज आले. सारिके ऊठ ऊठ.’’ भामेने चमकून दाराकडे पाहिले व श्रीकृष्ण आला या समजुतीने ती लगबगीने मंचकावरून खाली उतरली. तिची तारांबळ बघून तर सारिका हंसू आवरत म्हणाली, ‘‘काही लक्ष देऊ नका त्याच्याकडे, मधून मधून तो असाच ओरडत असतो.’’ उत्तरादाखल काकाकुवा गिरदी वरून उडून मंचकाच्या दांडीवर बसला. भामेकडे तिरकी मान करुन पाहू लागला. तरीही भामा उंबऱ्यापर्यंत गेलीच.
श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी भामेने जातीने तयारी केली होती. सुवर्णतबकांत सुबक घाटाची चांदीची निरांजने, सुवासिक पुष्पमाला, सुपारी, अक्षता, रत्नजडीत मुद्रीका. दुसऱ्या तबकांत मधुर फळे, चारोळी, बदाम घातलेले केशरी आटीव दूध. सगळी तयारी कशी मनाजोगती झाली होती फक्त प्राणसखा येण्याचीच खोटी होती व तो केव्हाही येण्याची शक्यता होती. श्रीकृष्ण द्वारकेत नसला की सर्व राण्या मलूल व निस्तेज दिसायच्या. विशेषतः रुक्मिणी. कारण ती प्रथम पत्नी व सर्वांत लाडकी होती. आणि भामेचा अट्टाहास होता की, पतिराजाने प्रथम तिच्याकडेच यावे.
श्रीकृष्णाच्या सर्व पत्नी सौंदर्याच्या व गुणांच्या खाणी होत्या. रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, मित्रविंदा, सत्या तथा नाग्नजिती, लक्ष्मणा भद्रा व कालिंदी तथा यमुना. कशा एकीपेक्षा एक सरस होत्या. फुलाच्या उपमासुद्धा त्यांच्या मुलायम कांतीला कमीच पडतील. रत्नांचे तेज, मोत्यांचे पाणी, दवबिंदूचा तजेला, सरितेची अवखळता, सागराची गंभिरता, गगनाची विशालता, पृथ्वीची उदारता व विद्युलतेची चपलता यांचा सुरेख मिलाफ म्हणजे श्रीकृष्णाच्या सुवर्ण किरीटांत चपखल बसलेली अष्टपैलू स्त्रीरत्नेच होती. या सर्वांत लाडकी रुक्मिणी, द्वारकेची शोभा, विदर्भाची आभा व यदुवंशाची प्रभा, श्रीकृष्णाचा श्वास. कारण ती तर स्वर्गातील साक्षात लक्ष्मीच होती. कृष्ण विष्णू व रुक्मिणी लक्ष्मी.
सत्यभामाही काही कमी देखणी नव्हती. आरसपानी सौंदर्याचा ती अफलातून आविष्कार होती. पण जरा हट्टी, अहंमन्य व तापट होती. सर्व राण्यांमध्ये सत्यभामेला कृष्ण घाबरून असतो, हा कौतुकाचा विषय होता. बिचारा श्रीकृष्ण! सुदर्शन चक्रापेक्षा हे आठ आऱ्यांचे नाजूक चक्र कृष्णाला घायाळ करणारे होते.
या आठही राण्यांचे प्रासाद एकमेकीच्या सदनात जाणाऱ्या-येणाऱ्याचे सहज दर्शन होईल असे होते. शिवाय प्रत्येकीच्या खास दासी त्या मार्गावर घारीसारख्या नजर ठेवत. आपल्या स्वामीनीला खबर देण्याचे काम त्या इमानेइतबारे व अगदी मनापासून करत. त्यामुळे कृष्णाचीच जास्त पंचाईत होत असे. गुपचूपपणे कुणाच्या प्रासादात जावे तर दुसरीचा राग ओढवला जाई. ‘मजवर आपली प्रीतीच नाही’ असे लाडिक पालुपद सर्व राण्या सतत आळवत असत. आणि कृष्ण? ‘नारी मज बहु असती | परि प्रीति तुजवरती |’ हे प्रत्येकीला पटवण्याचा खटाटोप करत असे. रागावलेल्या राणीची मनधरणी करता करता बिचाऱ्याच्या नाकी नऊ येत. गोकुळांत एक ठीक होतं. यशोदा, नंद, गोपगोपी यांना त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावामुळे फसवता येई, पण या आठ जणी फारच जागरूक राहात असत. एकीशी जरा जास्त सलगी केली की, दुसरीच्या नितळ भालप्रदेशावर नाखुषीची आठी पडलीच म्हणून समजा. मग सर्व राग पदराच्या शेवावर किंवा दृष्टीस पडणाऱ्या दासीवर.
‘‘काय ग वेंधळे, हा चौरंग इथं कशाला ठेवला आहेस? अन् ही फुलदाणीत फुलं आहेत की झुडुप? गुलाबपाण्याची झारी आण. दे तो वाळ्याच्या पंखा इकडे, वारा घालतेस की नाटक करतेस? जा. बघतेस काय खुळ्यासारखी? मेंदीचं साहित्य आण. आणि बकुळीला बोलावणं धाड. पळ. नुसत्या सांगकाम्या आहेत झालं. आणि इकडच्या स्वारीचा अजून पत्ता नाही. तरी बजावल होतं...!’’
याचा राग त्याच्यावर. वास्तविक दासींच्या कामांत काही कसूर नसे. आपली स्वामिनी चिडण्याचे कारण ठाऊक असल्याने सर्वजणी तोंडाला पदर लाऊन एकमेकीकडे बघत सांकेतिक हसायच्या. सर्व राण्यांच्या महाली थोड्याफार फरकाने हाच प्रकार असायचा.
एकदा कृष्णाने एकांतात रुक्मिणीला विचारले, ‘‘प्रिये रुक्मिणी, माझ्या स्वागतासाठी इतर राण्या किती सुरेख तयारी करतात. खास आसन, गंध पुष्पमाला, गोरसाचे प्याले, पंचारती, विंझण वारा. सारं बघूनच मन प्रसन्न होतं. पण तुझ्याकडे असला काही प्रकार दिसत नाही. मी तुला प्रिय नाही की काय? ‘‘सांगते. पण चेष्टा करणार नसाल तरच. सांगू? ऐका. माझ्या मानस मंदिरातील आसनावर आपली राजस-लोभस मूर्ती कायम बसलेली असते. माझ्या नेत्रांच्या निरांजनानं मी आपली आरती करते. हे सुकुमार बाहू पुष्पमालेचं कार्य करतात. अन्... अन्... हे अधरामृत असताना गोरसाचं प्याले कशाला?” रुक्मिणीने लाजतच खुलासा केला.
‘‘बरीच चतुर आहेस रुक्मिणी तू. आपल्या पतीला कसं खूश करावं याच बाळकडू तुम्हा स्त्रियांना मिळालेलं असत. हो-एक सांगायचं विसरलो. आज तुमच्या गुप्तहेरांची सभा त्या आम्रवृक्षाच्याखाली भरलेली पाहिली. कसलं एवढं खलबत चाललं होतं कुणास ठाऊक. मला पाहिल्यावर सर्व सभासद मला प्रणाम न करताच चक्क पळून गेले.’’
‘‘गुप्तहेर? अन् पळून गेले? आमच्या महाली गुप्तहेर कशाला? काहीतरीच बाई स्वामीचं म्हणणं.’’ गुप्तहेरांबद्दल रुक्मिणी साशंक झाली. ‘‘अग, तुमच्या त्या लाडक्या खास दासी म्हणजेच गुप्तहेर’’ श्रीकृष्ण खुलासा करीत पुढे म्हणाला, ‘‘मी कुठे जातो कोणत्या राणीकडे किती वेळ असतो. कुणाला कसला उपहार दिला याविषयीच्या बातम्या आपल्या स्वामीनीला जी देते, त्या प्राण्याला गुप्तहेर म्हणतात. काय, सेवाचाकरी हे फक्त निमित्त. खरं काम द्वारकाधीश श्रीकृष्णावर पाळत ठेवून बातम्या पोहोचवणं. तुझी ती मदनमुद्रा, जांबुवंतीची दिपिका, भामेची मुकूलिका, मित्रविंदेची लतिका, सत्याची नंदिनी, कालिंदीची गौरी, भद्रेची जास्वंदा, लक्ष्मणेची पद्मा, सुमती, हंसा, केशिनी....!’’
‘‘पुरे पुरे. गुप्तहेरपुराण. जमल्या असतील मोकळा वेळ मिळाला म्हणून. त्यात काय एवढं. थोडा विरंगुळा.’’
‘‘अग रुक्मिणी. त्यातच खरी गोम आहे. जाऊ दे झालं. गुप्तहेरांना मी थोडाच घाबरतो. जिथं जायचं तिथं जातोच. लपतछपत किंवा राजरोस. खरं की नाही रुक्मिणी देवी? नव्हे प्रिये रुक्मिणी.’’
आपली चोरी पकडली गेली म्हणून रुक्मिणी लाजून चूर झाली.
श्रीकृष्णाच्या अष्ट नायिका आपापल्या परीने देखण्या, बुद्धिमान, चतुर व स्वाभिमानी होत्या, पण त्याची मर्जी सांभाळण्यासाठी व त्याला आपलेसे करण्यात त्यांच्यात चढाओढ लागे. यावर काय तोडगा काढावा याचा त्याने खूप विचार केला. बाब तशी खाजगी व नाजूक. त्याला नारदमुनींची आठवण झाली. मुनी स्वतः ब्रह्मचारी पण संसारी माणसांना भवसागरांत कसे हात मारून काठावर याव याची हुकमी शिक्षण देणारे होते. जितके कळ लावणारे तितकेच बुद्धिमान, विनोदी व पेचप्रसंगातून अलगद सोडवणारे म्हणून त्याची ख्याती. कृष्णाने मनात त्यांचे स्मरण करताच हरीनामाच गजर करतच ते अवतीर्ण झाले. कृष्णाने त्यांना आपली अडचण सांगितली.
‘‘मुकुंदा, अरे प्रपंच करणे म्हणजे मुकुटांत मोरपीस खोचण्याइतकं सोप नसतं, हे तरी आता तुला कळून चुकल ना? माझ्याकडे पाहा. मी या मोहरूपी मायाजालांत कधी गुंतलो नाही. स्त्री म्हणजे गुंतागुंत. तो गुंता जितका सोडवावा तितका माणूस त्यात न कळत गुरफटतो. सर्वांत ब्रह्मचर्य उत्तम. नारायण नारायण....!’’
‘‘मुनीवर्य. यातून मार्ग काढायचा आहे. एकही पत्नी दुखवली जाणार नाही. सर्वजणी माझा जीव की प्राण आहेत. पण त्या मजसाठी मनातून एकमेकीचा द्वेष करतात. सर्वांनाच मी हवा आहे, पण एकाच वेळी. बघा आपल्यासारख्या ब्रह्मचाऱ्याला काही मार्ग सुचतो का. नव्हे सुचवाच.’’ कृष्ण अगदी काकुळतीला आला.
‘‘हे बघ गोविंदा, असा धीर सोडू नकोस. अरे नंदकुमारा, सर्व त्रिभुवनाचा अजातशत्रु स्वामी तू. अन् या बायकांना घाबरतोस? मला स्त्रियांचा अनुभव नसला तरी एक सांगतो केशवा, बायका कितीही बुद्धिमान वाटल्या ना तरी त्या तशा नसतात. म्हणजे असं बघ. पूर्वी तू गोकुळात असताना राधा, यशोदा, गोपी यांना आपल्या मोहमायेनं भुलवून मातेच्या कुशीत मायेच्या रूपांत राहून दूध-लोणी खायला जायचास की नाही? स्त्रियांना फसवणं फार सोपं.’’
‘‘वा महर्षी, तेव्हा मी बालक होतो. तशा खोड्या काढण जमत होतं व शोभत पण होतं. आता मी गृहस्थाश्रमी असून आठ जणींचा जबाबदार पती आहे. आणि हे गोकुळ नव्हे द्वारका आहे बरं.’’
‘‘बघ बुवा मुरारी, मार्ग सुचवलाय. बाकी तू अन् तुझ्या त्या अष्टनायिका. बघून घ्या काय ते. मी चाललो. नारायण नारायण...”
नारद कृष्णाची प्रतिक्रिया जाणून न घेता गुप्त झाले. अखेरीस त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागायचे त्याने ठरवले. हस्तीनापुरात पुष्कळ दिवस राहून तो नुकताच द्वारकेत आला होता. पांडवांच्या सहवासांत दिवस कसे झरझर गेले ते कळलेच नाही. द्वारकेत आल्यावरसुद्धा तो मुद्दामच एकाही राणीच्या प्रासादात गेला नाही. तसा संदेशही दिला नाही. सर्वजणी आपल्या दर्शनासाठी आतुर झाल्या असतील, हे जाणूनसुद्धा तो दिवसभर राजकारणांत गुंतून राहिला. दुपारी त्याने उद्धव व बलराम यांच्यासह भोजन केले.
हळूहळू संध्या समय झाला. पक्षीगण घरट्यांकडे परतू लागले. गाईंनीसुद्धा वासरांच्या ओढीने रानांवनातील मुक्काम हलवला. त्यांच्या गळ्यांतील घंटिका व गुराख्यांचे शब्द यांनी वातावरण नादमय झाले. त्यांच्या पावलांच्या उडणाऱ्या धुळीमुळे परिसर कुंद झाला. संध्याराणीच्या महालांत विश्रांतीसाठी जाणाऱ्या रविने आपला सुवर्णकिरणांचा पसारा गोळा करून सारथी अरुण यास पश्चिमेकडे दिव्यरथ घेण्याची आज्ञा केली. दिवसभर उन्हाने तप्त झालेल्या वसुंधरेवर भास्कराने अलगदपणे तिमिराचे क्षणोक्षणी गडद होणारे काळे वस्त्र पांघरले. दुरून प्रियकर सहस्त्ररश्मीच्या रथाची चाहूल लागताच संध्याराणीने आपल्या मुखकमलावर गडद केशरी घुंघट ओढून घेतला. आता सूर्योदयापर्यंत तीच सूर्य देवाची अनभिषिक्त राज्ञी होती.
दिनमणी संध्येच्या महाली गेल्याची खात्री करून रजनीनाथ आकाशीच्या बिनखांबी मंडपांत आपल्या सत्तावीस स्वरूपसुंदर पत्नीसह दाखल झाला. पत्नीबरोबर त्यांच्या सख्या म्हणजे अवखळ तारकांही आल्या व ढगांच्या झिरझिरीत पडद्याआडून पाठशिवणीचा खेळ खेळू लागल्या. पत्नींच्या खेळाचा फायदा घेत चंद्रा-पानाफुलांचा साजशृंगार केलेल्या वसुंधरेवर आपले मोहिनी अस्त्र चांदण्याच्या रूपाने फेकू लागला. त्या अमृतमय स्पर्शाने तिची अवघी काया मोहरून उठली. तिचे लावण्य द्विगुणित झाले.
द्वारकेच्या तमाम परिसरांतील सरोवरेही चंद्रविकासी कमळांनी फुलून गेली. दिवसभर कोमल सुगंधी कोषांत गुरफटलेल्या भ्रमरांची आत्ता कुठे सुटका झाली खरी, पण सूर्यविकासी कमळांनी काही भ्रमरांना आपल्या गंधमय मुलायम पाशात बद्ध केले. भ्रमरांच्या त्या गुंजारवाने कमळीनी भान विसरून डोलू लागल्या. दिवसभर कमल पत्रांवरून धावणारे कमलपक्षीही आता विसाव्यासाठी घरट्याच्या आश्रयाला गेले. राजहंस, कलहंस व विविध प्रकारचे पाणपक्षी जोडीजोडीने जलाशयात वा काठावर स्थिर झाले. दिवसाचे सौंदर्य काही काळापुरते लुप्त झाले. सृष्टीदेवीने रात्रीचा खास नयनरम्य साजशृंगार केला तसे मानवसृष्टीचे व्यवहार त्यानुसार होऊ लागले.
द्वारकेभोवतालचा सागरही शांत भासू लागला. सागराच्या पाण्यात द्वारकेला जडवलेल्या रत्नांचे तेज मिसळले. नगरीच्या चारी दिशांनी सैनिकांचे आलबेलचे इशारे उमटू लागले. अंधार पडला तशी नगरीतील प्रासाद, सभा, मंदिरे, देवळे-राऊळे, वाडे-वास्तू दिव्यांच्या प्रकाशाने खुलू लागल्या. सत्यभामेच्या शुभ्र पताकांनी झळाळणार्या भोगमंदिरात, रुक्मिणी व भद्रा यांच्या जांबुनद सुवर्णाचा वापर करून बांधलेल्या व अग्नीप्रमाणे जाज्वल्य दिसणाऱ्या कांचनप्रासादांत, जांबुवंतीच्या पद्मपत्रांनी युक्त असलेल्या पद्मकूल वाड्यांत, लक्ष्मणेच्या वैडुर्य मण्यांमुळे हिरवी प्रभा परावर्तीत होणाऱ्या भवनांत, मित्रविंदेच्या केतूमान नामक गंधमय वास्तूत; सर्व सुखसोयींनी सुसज्ज व मोजक्याच रत्नांचा कलापूर्ण वापर केलेल्या सत्याच्या महालांत व कालिंदीच्या संगमरवरी रत्नजडीत सदनांत दास-दासी दीप प्रज्वलीत करू लागल्या. मंदिरातून सांजारतीचे मंजुळ स्वर येऊ लागले. दीपमाळा, समया, निरांजने व नंदादीप-पणत्या मोगऱ्याच्या कळीगत भासणाऱ्या वातींनी तेवू लागले. प्रकाशामुळे महालांच्या भिंती, स्तंभ, छत आदींना जडवलेली मोती-रत्ने स्वतःचे तेज परावर्तीत करु लागले. सर्वत्र अत्तराचे, सुगंधी तेलाचे व करंज तेलाचे दिवे प्रज्वलित झाल्यामुळे त्याचा मिश्र गंध भोवतालच्या रम्य वातावरणांत मिसळू लागला. त्यातच रात्रीच्या स्पर्शामुळे उत्तेजीत झालेल्या रातराणीने आपले गंधभांडार सृष्टीच्या ओटीत रिते केले. रात्रीच्या अंधारात नयनरम्य द्वारकेचे सागरांत पडलेले प्रतिबिंबीत अवलोकण्यास स्वर्गलोकीचे द्वार खुले झाले व समस्त देवता, यक्ष, अप्सरा भान विसरून विश्वकर्म्याच्या अलौकिक कलेचा आविष्कार कौतुकाने न्याहाळू लागले. सुवर्णनगरी बांधली तेव्हापासूनचा त्यांचा हा नित्यक्रमच होता.
त्या प्रणयोत्सुक वातावरणात श्रीकृष्णाच्या अष्टनायिका त्याची प्रतीक्षा करू लागल्या. अर्धी रात्र सरत आली. अन् काही वेळातच कृष्णकमळालाही लाजवील अशी कांती असलेला वसुदेवदेवकीनंदन वासुदेव आपल्या राण्यांच्या महालाच्या प्रवेशद्वाराशी उभा ठाकला. एकाच वेळी प्रत्येक राणीची प्रतिक्रिया अशी ‘‘किती विलंब हा. प्रतीक्षा करून नेत्र शिणले.’’ भामा लाडिकपणे कुरकुरली. ‘‘अगबाई, स्वामी लौकर पंचारती आण. दिपिके पळ.’’ जांबुवंतीची नुसती धांदल. ‘‘आज प्रथमच इकडे येणं झालं. लतिके किती नशिबवान मी.’’ मित्रविंदा गहिवरली. ‘‘गौरी, अग आहेस कुठे? स्वामी आले ना.’’ कालिंदी सावध झाली. ‘‘पद्मे, किती गोड स्वप्न पाहिले. स्वामी आलेले दिसले,’’ लक्ष्मणा अजून स्वप्नातच. ‘‘हा तर स्वामींचाच पायरव. नंदिनी, तू गेलीस तरी चालेल.’’ सत्याने फर्मावले. ‘‘स्वामी, क्षणभर दारातच थांबा. स्वागताला मी आले ना’’ भद्रा दाराकडे धावली.
इकडे रुक्मिणीची अवस्था काही वेगळी नव्हती. निद्रेला तिने पापण्यांच्या तोरणाआड थोपवलं होतं. लाडकी व थोरली पत्नी ती असली तरी प्रथम सत्यभामेची वर्णी लागत असे. ‘‘माझं काही खरं नाही मदनमुद्रे. स्वामी कधीही आले तरी सर्व प्रथम भामेकडे जातात. हे ठाऊक असूनही मी खुळ्यासारखी इकडची प्रतीक्षा करत असते.’’ ‘‘मदनमुद्रे, तुझ्या स्वामिनीला म्हणावं, ‘तो मान आज तुला प्राप्त झाला आहे.’ कृष्ण महालात येत म्हणाला. रुक्मिणी त्याच्या बलदंड बाहुपाशांत बद्ध झाली. मदनमुद्रेने संतोषाने हलकेच काढता पाय घेतला. इतक्यांत गवाक्षांतून चिपळ्यांचा ध्वनी आला. रुक्मिणीसह तो गवाक्षाजवळ येऊन आकाशांत स्थिर असलेल्या नारदमुनींना प्रणाम करून म्हणाला, ‘‘देवर्षी, धन्यवाद’’ मुनी स्वतःभोवती गिरकी घेत गुप्त झाले.
“धन्यवाद? अन् ते कशासाठी?” रुक्मिणीने नवलाने विचारले.
“काही नाही. आमचं ते गुपित आहे. चला किती रात्र झाली.’’
कृष्णाने नेहमीप्रमाणे विषयाला कलाटणी दिली. मंचकाजवळची पुरुषभर उंचीच्या असंख्य ज्योती सुवर्णशलाकाने शांत केल्या.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment