अजूनकाही
‘सोनचिड़िया’मधील एक पात्र म्हणतं, “बाग़ी का काम हैं अपना धरम निभाना, बाकी सब मैय्या देख लेगी.” पुढे कधीतरी दुसरं पात्र त्वेषानं विचारतं, “तो क्या हैं बाग़ी का धरम?” या दोनच वाक्यांमध्ये या चित्रपटाचं संपूर्ण सार आणि त्याचा आशय एकवटला आहे. ‘विद्रोही’ असं ‘बाग़ी’चं थेट भाषांतर करता येईल. खरोखर सहसा डाकू म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या या विद्रोह्यांचा खरा धर्म काय आहे? चित्रपटातील एक पात्र म्हणतं तसं सन्मानानं जगणं, तसं सन्मानानं मरणं योग्य असेल की, आपल्या ‘धर्मा’चं पालन करत, पठारांवर जीव मुठीत धरणं योग्य असेल? कशा ना कशापासून धावणं हे त्यांच्या पाचवीला पुजलेलं असतं. एक पात्र बोलून दाखवतं की, ‘पूर्वी बाग़ी असणं मानाचं लक्षण होतं. आता फक्त नुसता अपमान बाकी उरला आहे.’ आणि आता धावण्यासोबत निरनिराळी मानसिक द्वंद्वंदेखील त्यांचा पिच्छा पुरवत आहेत. त्यांच्यातील बरेच जण लूटमार करा, पळा, साथीदार मरताना पहा, पुन्हा पळा, पळा आणि नुसतं पळा या चक्राला वैतागले आहेत.
चंबळमधील बाग़ी सरदार मान सिंग ठाकुरची (मनोज बाजपेयी) गॅंग साधारण आणीबाणीत सुरू असलेल्या धरपकडीमुळे किंबहुना बहुतेकदा होणाऱ्या एन्काऊंटरमुळे त्रस्त असते. खासकरून विरेंदर सिंग गुज्जर (आशुतोष राणा) हात धुवून त्यांच्या मागे लागलेला असतो. त्याचं ठाकुरांशी वैयक्तिक वैर असतं. (काय ते थेट चित्रपटात पाहावं.)
बदला आणि न्याय या ‘सोनचिड़िया’मधील आणखी दोन महत्त्वाच्या संज्ञा आहेत. या संज्ञा मान सिंगचा वारसा चालवू शकणाऱ्या अनुक्रमे वकील सिंग (रणवीर शौरी) आणि लखनाशी (सुशांत सिंग राजपूत) घट्ट नातं टिकवून आहेत. वकील सिंग बहुतांशी प्रकरणात कुठल्याही इतर बाग़ीप्रमाणे बदला या पारंपरिक रूढीबाबत आस्था बाळगून असतो. वर उल्लेखलेल्या चंबळच्या खोऱ्यातच आपला आयुष्य गेलं आणि तिथंच आपल्याला मरण यावं यावरही तो ठाम असतो. टोळीतील बहुतांशी सदस्यांसाठी तो मान सिंगनंतर बाग़ी असण्याच्या परिमाणांवर खरा उतरेल असा आदर्श असतो. याउलट लखना मात्र या जीवनाला कंटाळलेला असतो. त्याच्या आयुष्य जगण्यापासून ते न्यायाविषयीच्या संकल्पना वकील सिंगहून नेमक्या उलट असतात. विचारसरणीत तफावत असणारं हे द्वंद्व मात्र बाह्य शक्ती टोळीचा घात करू पाहत असतानाच्या या क्लिष्ट काळात उपायकारक नक्कीच नाही.
जेव्हा इंदुमती ठाकुर (भूमी पेडणेकर) या टोळीला येऊन धडकते, तेव्हा जीवन-मरणात विभागलेल्या या प्रकरणाला अधिक क्लिष्ट बनवणारे पैलू प्राप्त होतात. मानसिक द्वंद्व टोकाला जाऊन पोचतं. ठाकुर विरुद्ध गुज्जर अशा संघर्षाला आणखी निराळं स्वरूप लाभतं. जातीवाद उफाळून येतो. त्याहून अधिक खोलवर पाळंमुळं असलेल्या पुरुषसत्ताक संस्कृतीचंही दर्शन घडतं. एक सरप्राइज म्हणून येणारं पात्र इंदुमतीच्या - ‘मी तर ठाकुर आहे, तुझ्या जातीच्या टोळीत मी कशी येऊ शकेल?’ला प्रत्युत्तरादाखल म्हणतं, ‘या जाती-पाती फक्त पुरुषांपुरत्या मर्यादित असतात. आपण स्त्रिया त्यांच्याहून वेगळ्याच, त्यांच्याहून खालच्या स्तरावर आहोत’.
अर्थात या सगळ्या संकल्पना दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या ‘सोनचिड़िया’च्या मूलभूत सूत्रांपैकी एक असल्या तरी त्यांचं एकत्रित उपयोजन केल्यावर निर्माण होणारा परिणाम शब्दातीत आहे. विरोधाभासी संकल्पना मनात घेऊन वावरणाऱ्या पात्रांनी समृद्ध असलेला हा कॅनव्हास लिखाणातील क्लिष्ट, केऑटिक परिपूर्णतेचा उत्तम आणि दर्जेदार नमुना आहे.
इथला संघर्ष अनेक पातळ्यांवर सुरू आहे. पुरुषा-पुरुषांचा संघर्ष, जाती-जातीचा संघर्ष, पोलीस-डाकूंचा संघर्ष, डाकूंमधील अंतर्गत संघर्ष, पुरुष-स्त्रियांमधील अदृश्य स्वरूपातील संघर्ष अशी त्याची एक अन् अनेक रूपं आहेत. नैतिक-अनैतिकता वगैरे संज्ञा इथं एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे भासणाऱ्या आहेत. या सर्व बाबी फक्त एकाच गोष्टीजवळ येऊन पोचतात, ती म्हणजे मनःशांती. आता प्रत्येक जण हाती न लागणाऱ्या शांती, मुक्ती नामक या ‘सोनचिड़िया’च्या शोधात आहे. पण सहजासहजी हाती लागेल ती ‘सोनचिड़िया’ कसली?
‘सोनचिड़िया’ हा रूपकांपासून ते ‘दृकश्राव्य’ या संज्ञेवर खरी उतरणारी दृश्यं आणि संगीत-पार्श्वसंगीत अशा अनेक पातळ्यांवर निव्वळ हाँटिंग आहे. अनुज राकेश धवनचा कॅमेरा चंबळ म्हणून रंगपटलाच्या ज्या काही छटा आणि फ्रेम्स टिपतो, त्या चित्रपटाच्या एकूण आशय-विषयाला पूरक ठरत, त्यातील दृश्यांना अधिक तीव्र छटा प्राप्त करून देणारा आहे. बेनेडिक्ट टेलर आणि नरेन चंदावरकर यांचं पार्श्वसंगीत चित्रपटाच्या एकूण परिणामात भर घालणारं ठरतं. तर वरुण ग्रोवर आणि विशाल भारद्वाज हे दोघं एकत्र येऊन जी काही मोजकी गाणी समोर आणतात, ती निव्वळ थक्क करणारी आहेत.
सदर चित्रपटात प्रत्येक पात्रातील कलाकाराचं अचूक कास्टिंग आणि त्यांची तितकीच दमदार कामगिरी हे महत्त्वाचं अंग आहे. रणवीर शौरी, मनोज बाजपेयी आणि आशुतोष राणा तिघंही ज्या तीव्रतेनं आपला परफॉर्मन्स देतात, त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. भूमी पेडणेकर तिच्या दर चित्रपटानंतर अधिकाधिक कमाल करत जाते आहे. सुशांत सिंग राजपूतही अपेक्षित ती कामगिरी नक्कीच करतो. अर्थात ‘सोनचिड़िया’मधील इतर अज्ञात कलाकारांचंही तितकंच महत्त्वाचं बलस्थान आहे. कारण लहान-मोठ्या भूमिकांतील अफाट कलाकारांची फौज जी कामगिरी करते, ती निव्वळ पडद्यावर अनुभवावी अशी आहे.
‘सोनचिड़िया’ हा मांडणीच्या पातळीवर नक्कीच दिग्दर्शक चौबेच्या उत्तम कलाकृतींमध्ये गणला जाईल. तो ज्या तऱ्हेनं आणि सफाईनं आपल्याला चंबळच्या खोऱ्यातील या तिरस्करणीय लोकांच्या आयुष्यात घेऊन जात, त्यांना अधिकाधिक वास्तववादी आणि गडद छटा प्राप्त करून देतो, ते सहजासहजी साध्य करणं शक्य नाहीच. खासकरून त्यांना जीवनाचं सार शोधू पाहणारी बैठक प्राप्त करून देणं अधिकच कौतुकास्पद आहे. तो आणि सहलेखक सुदीप शर्मा हे प्रकरण अगदी उत्तमरीत्या हाताळतात.
अभिषेक चौबेच्या चित्रपटातील डार्क ह्युमर हा एक रंजक विषय आहे. जो हिंसा, शोकांतिका अशा वैचित्र्यपूर्ण जागांतून निर्माण होणारा आहे. इथंही अगदीच अचूक अशा संवादांमधून तो कायम डोकावत राहतो. जो केवळ प्रेक्षकाला खुश करावं म्हणून किंवा समोरील गोंधळातून उसंत मिळवून द्यायला न येता तसा प्रत्येक संवाद त्या त्या पात्राला अधिक क्लिष्ट, गडद छटा प्राप्त करून देण्यात सहाय्यक ठरतो. ज्यामुळे हे प्रकरण अधिकच रंजक बनतं.
बाकी चौबेजी विशाल भारद्वाज यांचा वारसा चांगला चालवत आहेत. त्यांचं हे गडद सिनेमॅटिक विश्व असंच बहरत रहायला हवं. त्यानिमित्तानं का होईना अधूनमधून जटिल पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा, सायकीचा आढावा घेणारे चित्रपट आपल्याला पहायला मिळतील.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment