अजूनकाही
अगदी विद्यार्थिदशेपासून गेली तब्बल पाच तपे शेतकऱ्यांचा निर्भीड वाली आणि खंबीर वकील म्हणून सातत्याने संघर्षरत असलेल्या भाई संपतराव पवारांचे ‘मी लोकांचा सांगाती’ हे लक्षवेधी आत्मकथन आहे. या आत्मकथनात व्यक्तीपेक्षा समष्टीचा पैस नि परीघच अधिक प्रभावी आहे. एकूण सहा प्रकरणांत विभागलेले हे लेखन खरे तर एकाच अंत:सूत्रात बांधलेले आहे. शेतीचे अर्थशास्त्र, चारा-पाण्याचे न्याय्य नियोजन, गावगावकीचे तिढे-तिपडे, प्रस्थापित राजकारण्यांचे दांभिक मुखवटे, धनदांडग्यांची सत्तालोलुपता, पुढाऱ्यांची दाखवेगिरी, सरकारी अधिकाऱ्यांची ढिम्म वृत्ती, तत्त्वनिष्ठा गुंडाळून रंग बदलणारे पक्षश्रेष्ठी, दुष्काळामुळे होणारी गुराढोरांची परवड नि अशा गावाशिवाराला तळागाळात लोटणाऱ्या विविध समस्यांचा हा कोलाज आहे.
संपतरावांची मूळ पिंड-प्रकृती ही अथक लढवय्याची. एकीकडे समंजस, संयमी आणि समर्पणभाव, पारदर्शक परखडपणा, घट्ट मूल्यनिष्ठा; तर दुसरीकडे सळसळती अशी, ‘शेंडी तुटो पारंटी तुटो’ या पंथातील सर्वमंगलकारी दृढनिश्चयी भूमिका. युवाशक्तीची बळ-बांधणूक करण्यातील असोशी व त्याकरिता रात्रंदिवस पायाला भिंगरी, अन्याय-अत्याचार व जातिभेदाची जळमटे यांविषयीची तर्कशुद्ध चीड, सहकार्य, समन्वय, श्रमदान, स्वयंसूचन सामोपचार यांवर मन:पूत विश्वास, आंदोलन-मार्चे वगैरेचे काटेकोर नियोजन आणि विशेष म्हणजे समग्र प्रयोजनातील सुस्पष्टता, ही अशी एकूण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समृद्ध खतावणी.
एन.डी. पाटील, अप्पासाहेब शिंदे, मुकुंदराव किर्लोस्करांदीसह आपले आई-वडील तसेच अनेक सहकाऱ्यांची विशेषत: भारत पाटणकर, बाबराव गुरव यांची संपतरावांनी चितारलेली कृष्णधवल चित्रेच-चरित्रे एकरंगी किंवा एकांगी वाटत नाहीत. शासन-प्रशासनातील भल्याबुऱ्या घटना-प्रसंगांचे रोखठोक वर्णन, विश्लेषण मोठे मार्मिक व समतोल आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात आलेल्या दोन परस्परविरोधी वर्तन-व्यवहाराच्या प्राचार्यांविषयी संपतरावांनी कथन केलेले अनुभव ताठ कण्याचा आणि कणखर बाण्याचा विद्यार्थी काय असतो, याची प्रचीती देतात. भारतीय व जागतिक राजकारणातील संपतरावांनी दिलेले संदर्भ त्यांच्या चौफेर व अभ्यासू वृत्तीची साक्ष म्हणता येईल.
या लेखनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपतरावांनी ‘बिटविन द लाइन्स’मध्ये जी सूचक स्पेस सोडली आहे ती बरेच काही सांगून जाते. संपतराव मातीच्या पायांची फारशी दखल घेत नाहीत. जो स्वत:शी नेक-नामदार किंवा प्रामाणिक असत नाही, तो कुणाशीही कधीच प्रामाणिक असू शकत नाही, हे जीवनमूल्य उराशी जपत संपतरावांनी केलेली काटेरी वाटचाल ‘सारेच दीप मंदावले…’ अशी खंत बाळगणाऱ्यांना मोठी उभारी देणारी आहे.
हा जागल्या पाठीवर गावाशिवारातील जटिल समस्यांचे गाठोडे घेऊन, आपल्या उरा-शिरावर परिस्थितीचे प्रहार झेलत सुसाट निघालेला प्रभंजन आहे. आणि या साऱ्या पार्श्वभूमीला सातत्याने मंद-मृदू तरीही तारसप्तकात निनादणारी संपतरावांची कृतकृत्य नम्रता, परमत सहिष्णुता, भक्ती-विभक्ती तसेच विरक्तीही कशी भोवंडून टाकते, यासाठी मुळातून हे पुस्तक वाचावे लागते.
मातीच्या पायांनी त्यांना लाख खोडे घातले, जिवाभावाच्या साथीदारांनी अकारण-सकारण फारकत घेतली, पण हा रापलेला गडी पुढे नि पुढेच धावत राहिला. धपापत राहिला. उसासत राहिला. जगाच्या लेखी हीच त्याची चिमूटभर कहाणी. त्याने स्वत:तच प्रस्तावनेत म्हटले आहे – ‘राबणाऱ्यांचं गर्वगीत मी गात राहिलो आणि महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात जगाकडे पाठ करून काम करत राहिलो.’
सुहास पळशीकरांचे श्रीकाराचे दोन शब्द या आत्मकथनाचे जणू ‘प्रीअॅम्बल’च म्हणावे. सुहास कुलकर्णींचे प्रकाशकीयही सामाजिक गतिस्थितीचे नेमके विश्लेषण करणारे आहे. संपतराव म्हणजे शेतकरी-कामगार पक्षाचा एकलव्य. तरीसुद्धा त्याने पक्षाची शोकांतिका आणि तिची कारणमीमांसा हातचे न राखता केली आहे. संघर्ष करणारा कधीच मोडून पडत नाही आणि पडला-झडला-तंटला तरीही पायांखालची पुण्यगंधा मृतिका घेऊन तो पुन्हा झेपावतो, वादळाला ललकारतो. वाकत किंवा रांगत नाही, हेच या आत्मकथनाचे सार म्हणावे लागते.
खरे तर बळिराजा धरणाचा प्रवर्तक व शिल्पकार ही संपतरावांची सर्वदूर पोहोचलेली ओळख, पण इथे या पानापानावर प्रगटलेला संपतराव हा न संपणारा आणि न विकणारा असा दीपस्तंभ आहे.
.............................................................................................................................................
भाई संपतरावांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4512/Mi-Lokancha-Sangati
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sandesh pawar
Sat , 02 March 2019
धन्यवाद सर