सातवे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष कथाकार जी. के. ऐनापुरे यांच्या भाषणाची बरीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यांच्या प्रदीर्घ भाषणाचा हा संपादित अंश...
............................................................................................................................................................
विद्वान शुद्रांनों जागे का रे व्हाना ।। तपासोनी पहाना ।। ब्राहृघोळ ।।३०।।
- महात्मा जोतीराव फुले
१.
सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून तुमच्याबरोबर संवाद साधताना, माझ्यासारख्यातल्या सतर्कता आणि भूमिकेच्या संदर्भातील अचूकता, या भूमिकेबरोबर आतापर्यंत केलेला प्रवास या गोष्टीचे भान ठेवावे लागणार आहे. हे संमेलन या सांस्कृतिक नगरीत कोणत्या कारणासाठी आयोजित केले जाते, या लोकांच्या राजकीय-सांस्कृतिक भूमिका काय आहेत; ही पार्श्वभूमी माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे मांडणी करताना एक प्रकारचा खुलेपणा, सार्वत्रिकीकरणाच्या शक्यता वाढतील, अशा विवेचनाला तुमच्या समोर ठेवणार आहे. या संमेलनाने एकल संस्कृती आणि तिच्या वर्चस्वाला कायमच बाजूला केले आहे. संमेलनासाठी निवडलेल्या विजातीय अध्यक्षांची नावे पाहिल्यावर ते तुमच्या ध्यानातसुद्धा येईल. या यादीत मला गुरुस्थानी असलेले सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, पद्मश्री नामदेव ढसाळ, कादंबरीकार आणि डाव्या चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते दिनानाथ मनोहर, तरुण आणि परखड स्तंभलेखक, नाटककार, संजय पवार असे जानेमाने लोक आहेत. या विचाराने माझ्या भावना वयस्कर आणि दडपणाखाली जाणाऱ्या बनल्या आहेत. हा सलगपणे केलेल्या छोट्यामोठ्या कामाचा मोबदलाच आहे, असेच या क्षणी मला वाटते आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधी-समांतर-पर्यायी अशा ज्या जुळण्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या जुळण्या म्हणून सुरुवातीचे विद्रोही आणि दआग्रा (कॉ. शरद पाटील) यांच्या जुळण्या अधिक मोलाच्या आणि विचाराला चालना देणाऱ्या होत्या. याच्याबरोबर दरवर्षी भरणारे अस्मितादर्श मेळावे, अभामुमसासं, सकल (अध्यक्ष कमल देसाई) इ. उल्लेख करायला हवा. सुरुवातीची काही वर्षे वगळता हे अस्मितादर्श मेळावे अव्याहतपणे चालू आहेत.
दआग्रा विरोधी (ठाम) अशा अर्थाने सांस्कृतिक अवकाशात अस्तित्वात आले. त्यांच्याकडे पर्यायी भूमिकेचा नवेपणा होता. तो अधिकच स्फुर्तीदायक आणि विश्वास प्राप्त होता. पण त्यातून काही टिकाऊ बळ आणि पृष्ठभागावर राहील, अशी समांतर व्यवस्था निर्माण झाली नाही. सत्यशोधक मार्क्सवादी असे आकर्षक, एकांगी सत्य समोर आले. ते पुढे माफुआ आणि सौत्रांतीक मार्क्सवाद अशा नव्या संकल्पना, शक्यतापर्यंत विस्तारले. कॉ. शरद पाटील यांच्या निर्वाणानंतर त्याला कुठे कुठे तरी छोटे-मोठे बळ मिळत असल्याचे कानावर येते, तेव्हा बरे वाटते आणि हे तुमच्या समोर सांगायला मला कोणतीच अडचण वाटत नाही. कॉ. शरद पाटील यांचा हा प्रयत्न अधिक सैद्धांतिक आणि पारिभाषिक असल्या कारणाने, उपयुक्ततेच्या पातळीवर, वर्तमानकाळात अधिक अडचणी आणि संदिग्धता निर्माण होत गेली. पण त्याचे भविष्यकालीन महत्त्व वाढत जाईल, असे आज तरी वाटते आहे.
सकल पहिल्या प्रयत्नात बाद झाले. कारण त्याच्या पाठीमागे साठोत्तरी अनियतकालिकवाल्यांचा सजातीय मेंदू होता. खरं तर ही अभामसासंवाल्यांची अधिक वरचढ समजणारी, कळती उपशाखा होती. वेळोवेळी बौद्धिकासाठी सेक्युलर, समाजवादी, डावा म्हणून एकत्र येणारा समूह विभाजित (Split) करण्याचा तो आणि त्याच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आकर्षक प्रयत्न होता. पण तो फसल्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. अजूनही आपले बरेच लोक या सकलच्या प्रभावाखाली आहेत. त्यांना हे सगळे लोक विद्रोहीपेक्षा अधिक बंडखोर आणि प्रामाणिक वाटतात हे विशेष.
२.
मित्रांनो, विद्रोहीबद्दल अधिक आस्था असल्याने त्यांच्याबद्दल थोडं विस्ताराने, पण आपल्या वेळेच्या मर्यादेतच बोलणार आहे. १९९९, २०००, २००१ अशी जी या अंगाने जाणारी तीन संमेलने झाली त्याचे परिणाम व्यापक असे दिसायला लागले होते. डाव्या, क्रांतिकारक भूमिकेचा ओघ त्यातून विस्तारल्यासारखा दिसत होता. मुख्य म्हणजे लिहिणारे लोक या संमेलनाच्या अग्रभागी होते. त्यांच्या लिहिण्याचे वळण हिच त्यांची भूमिका होती. धारावीला झालेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष कॉ. बाबुराव बागल आणि तिसऱ्या संमेलनाचे उद्घाटक कॉ. एजाज अहमद ही या संमेलनाची महत्त्वाची उपलब्धी. या संमेलनाला मिळणारा प्रतिसाद आणि पार्टीने त्यातनं काढून घेतलेले समर्थन या कोड्यात टाकणाऱ्या गोष्टी आहेत. व्होट बँकेबद्दलची अनास्था, जातीय वळण आणि वर्चस्वाला धक्का असा संशय वाटल्याने हे झाले असावे. या तीन मुद्यांभोवती ही चर्चा फिरू शकते.
पुढे कॉ. शरद पाटील यांच्या विचाराचा प्रभाव आणि शेकाप, आंबेडकरी-फुले विचारधारेच्या आसपास असलेले पुढारी, डाव्या विचाराला मानणारे पण ब्राह्मणी म्हणून पार्टीला विरोध करणारे कॉम्रेड, छुपे समाजवादी, पँथर समजणारे, धरणग्रस्ताच्या चळवळीतनं आलेले, पँथरचा कित्ता गिरवणारे, महासंघवाले अशा अनेक दिशेला तोंड असलेल्या शहाण्या, विचारी लोकांनी या सांस्कृतिक-साहित्यिक चळवळीचा कारभार आपल्या ताब्यात घेतला आणि अपेक्षित असल्याप्रमाणे त्यात फाटाफूट सुरू झाली.
३.
डॉ. आंबेडकरांनी आम्हाला एका विशिष्ट पॉइंटला आणून दिलेलं आहे की, तुमच्या हातामध्ये वेसण दिलेली आहे व तुम्हाला पद्धती दाखवली आहे की, ही तुमचे शोषण करणारी सिस्टीम आहे. तेव्हा ती ब्रेक केली पाहिजे ना. ती ब्रेक न करता, ब्रेक करण्याकरिता तिची जी जुळणी होत आहे, तिला आम्ही कापतो.
या सगळ्याचा खोलवर अर्थ नचिकेत कुलकर्णी या युवकाने सांगितलेला आहे. तोसुद्धा अलीकडच्या काळात. JNU Impact म्हणून त्याच्याकडे पहायला हवे. त्याच्यात आलेले धाडस हा या विद्यापीठात जाऊन आल्याचा परिणाम आहे. त्याचे आकलनसुद्धा त्याच प्रतीचे आहे. धर्मनिरपेक्षतेचे अस्तित्व आणि ९२ वर्षाच्या अभामसासंचे मजबूत होत गेलेले सांस्कृतिक वळण आणि त्यातून प्राप्त होणारी राजकीय शक्ती, जी आज बहुमतात बदलली आहे या यशाची अचूक कारणमीमांसा त्यांनी आपल्या ‘समाजवादी साथी खाती फॅसिझमची माती’ या लेखात केली आहे. हा संशय अनेकांनी अनेक वेळा खाजगीमध्ये उघड केला असेल. पण इतक्या उघडपणे तो पहिल्यांदाच समोर आला आहे.
समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे. कारण प्रश्न केवळ फॅसिझम विरोधी लढाईत दगा देण्याचाच नाही. संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचं योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष/आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा देणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॅसिस्ट रूप कितपत कळले होते आणि कळलेच तर त्याचा धोका कळला होता का, असा प्रश्नच पडण्यासारखा त्यांचा इतिहास राहिला आहे. ‘संघ फॅसिस्ट असेल तर, मीही फॅसिस्ट आहे’, असे उद्गार काढून संघ फॅसिस्ट नसल्याचे सगळ्यात मोठे सर्टिफिकेट देणारे जयप्रकाश नारायण होते, हे विसरता येणार नाही. आणीबाणीच्या विरोधात काहीही कृती न केलेल्या, तुरुंगातून इंदिरा गांधींना माफीनामे लिहून पाठवणाऱ्या संघ-जनसंघीयांना जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सत्तेपर्यंत घेऊन जाणारे समाजवादीच होते. संघ बदलतोय-संघ बदलतोय असा घोशा लावणाऱ्यांमध्ये खुद्द एसेम जोशी होते आणि राम बापटांसारखे समाजवाद्यांचे ‘मार्गदर्शक विचारवंत’ राष्ट्रकार्यात संघाची भूमिका काय असावी, यावर विस्तृत लेखही लिहीत होते.
नचिकेत कुलकर्णी याचे आपण आभारच मानले पाहिजे, ते अशासाठी की त्याने ही सीमारेषा फक्त समाजवाद्यापर्यंतच मर्यादित ठेवली. ती ओलांडली असती तर अनेक क्रांतिकारक, आयकॉन म्हणून समोर असलेले लोक अडचणीत आले असते. आपली शक्ती खंडीत करणारी, स्वत: कोणत्याही परिस्थितीत खंडीत न होणारी, आपल्या प्रारूपानुसार वर्षानुवर्षे जादुई पद्धतीने काम करणारी दुसरी एक शक्ती आहे. याची प्रखर जाणीव आपल्याला आहे. पण या शक्तीची पूर्ण ओळख आपल्याला नाही. मिरवण्याच्या आपल्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे ती आपल्याला होईल याची शक्यता धुसर होत चालली आहे. या शक्तीची ओळख पूर्णपणे ज्यांना झाली अशांमध्ये इन-मीन-तीन माणसे सापडतात. त्यामध्ये इंदिरा गांधी, साथी जॉर्ज फर्नांडिस आणि लालूप्रसाद यादव यांची नावे सांगता येतील. इंदिरा गांधी यांनी पुकारलेली आणीबाणी ही या शक्तीची पूर्ण ओळख झाल्यानंतरची विचारवर्धक कृती होती. तर आणीबाणीच्या विरोधात आलेली आणि टिकून राहिलेली प्रतिक्रिया आजही तितकीच संदिग्ध आणि नचिकेत कुलकर्णी यांच्या आकलनाला जुळणारी आहे.
इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीचा धागा पकडून आपल्याला ९२ व्या अभामसासंच्या निमित्ताने तयार झालेल्या वातावरणाला जोडून घेता येईल. त्याचे कारण या संमेलनाच्या उद्घाटक इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल. आणीबाणीला केंद्रस्थानी ठेवून नयनतारा सहगल, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी असा त्रिकोण पडताळून पाहिल्यास सहगल यांच्या क्रांतिकारकत्वाचा खासा अंदाज लागतो. पर्याय म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत, त्यांचे भाषण वाचून दाखवण्याला ‘पराक्रम’ समजणाऱ्या मराठी माणसांचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदनच करायला हवे.
व्यवस्थेला सातत्याने विरोध करणे आणि ‘तात्पुरती असहमती’ दाखवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गुजरात दंगल आणि बाबरी मशीद प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी ‘तात्पुरती असहमती’ दाखवली होती. प्रत्यक्षात त्यांना तेच अभिप्रेत होतं. ‘काँग्रेसमुक्त भारत’ यात सुद्धा हीच चलाखी चालवली आहे. त्यातूनच सॉफ्ट हिंदुत्व अशी फसगत अस्तित्वात आली. आणीबाणीला विरोध करणे आणि सनातनी शक्तींना विरोध करणे या दोन पर्यायांवर क्रांतिकारकत्वाचे मोजमाप करता येईल. या मोजमापात नयनतारा सहगल बसत नाहीत.
४.
अभामसासंच्या दुसऱ्या बाजूला ज्या जुळण्या अस्तित्वात आल्या. मिटल्या. गायब झाल्या. त्यात अस्तित्वात असलेली अभाससासं ही जुळणी अधिक महत्त्वाची आहे. त्याची बाकीची कारणे आणि आयोजनाबद्दल येथे बोलायचं टाळतो. पण मला वाटलेलं महत्त्वाचं आणि मुख्य कारण सांगतो. ते म्हणजे, या संमेलनाला असलेली विजातीय, नव्या-जुन्या, नुकत्याच लिहायला लागलेल्या लेखकांची, कवी-कार्यकर्ता-विचारवंतांची असलेली तुफान गर्दी. हे सगळे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले असतात. या अनुभवातनं दोनदा गेलो आहे, म्हणूनच हे निरीक्षण नोंदवावे वाटले. आपण सुद्धा येत्या तीन-चार दिवसांत या अनुभवानं मार्गस्थ व्हाल!
सांस्कृतिक व्यवहारातील समांतर सूत्रांचा शोध, हा माझ्या या बोलण्याचा मुख्य धागा आहे. समांतरचा अर्थ विरोधी, पर्यायी याच्याही पुढे जाणारा, जबाबदारीचे भान असा घ्यायला हवा. अर्थात हे भान संस्कृती आणि इतिहास यांना थेटपणे सामोरे जाणारे आहे. शब्दप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्याइतक्या पुरते सिमित नाही, किंवा तुमचा हा म्हणून आमचा हा अशा प्रकारचे तात्कालिक नाही. समांतर ही गोष्ट किंवा कृती अव्याहतपणे (Prolong) चालणारी आहे. आधुनिकता ही या कृतीद्वाराच अधिक सुस्पष्ट होते. नव्याचा शोध, काळाचे भान यातूनच ठळक होते.
या मुख्य मुद्याचा भाग म्हणून विज्ञान आणि शास्त्र ह्रा संदर्भात बोलावे असा विचार आहे. विज्ञान आणि शास्त्र हे दोन्ही शब्द सायन्स असे व्यवहारात प्रचलित आहेत. कदाचित शिक्षणव्यवस्थेपुरते. पण ही वस्तुस्थिती नाही. अलीकडच्या चार-पाच वर्षात विज्ञान आणि शास्त्र यातील फट वाढवत वाढवत दुसऱ्या टोकाला म्हणजे धर्म आणि अध्यात्म याकडे नेण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत. संशोधन (Research) आणि विज्ञान (Science) शुन्यवत करण्याचा हा डाव असावा. हातात सत्यसाईबाबांची राख घेऊन फिरणारा, हळदीचं पेटंट जिंकणारा ही शास्त्रज्ञाची ओळख बनली आहे. भारतातील विज्ञान शिक्षणाची अवस्था इतकी शास्त्राकडे झुकत चालली आहे की, विज्ञान म्हणजे दैवी चमत्कार असा मोठा समज होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. याचे मूळ अनुभव (Experience) की कल्पनाशक्ती (Imaginary power) या द्वंद्वांतही शोधता येईल.
अलीकडच्या काळात संसदीय राजकारणाला बहुमती आधार असल्यामुळे विज्ञानावर कुरघोडी करणाऱ्या शास्त्राची आणि शोधाची महत्ती सांगण्याची स्पर्धाच सुरू आहे. प्रत्यक्षात हा अजेंडाच आहे. यातून आलेल्या शास्त्राच्या कल्पना पाहण्यासारख्या आहेत. शंभर कौरवांना जन्म देणारे टेस्ट ट्युब तंत्रज्ञान, पाऱ्याचा इंधनाप्रमाणे वापर करून उडणारे पुष्पक विमान, डोके धडावर लावणारी प्लास्टिक सर्जरी ते आम्ही माकडाचे वंशज नाही. लांडोरी मोराच्या अश्रूपासून गर्भवती होते... अशा विज्ञानाच्या भयंकर वल्गना ऐकायला मिळत आहेत.
या सगळ्याचे ऐतिहासिक आधार रामायण-महाभारताच्या अलीकडे पलीकडे शोधणे म्हणजे बाकी सगळं खोटं, ‘राम नाम सत्य है’ असं म्हणण्यासारखं आहे. विज्ञानाला शास्त्राच्या पातळीवर, धर्मशास्त्राच्या अखत्यारित, समूहाच्या वर्चस्वासाठी नाकारणे धक्कादायक आहे.
५.
अभिजन होण्यास नकार देणे, त्यांच्याकडून अस्तित्वात असलेल्या मान्यतेला नकार देणे या गोष्टी कोणत्याही बंडखोर साहित्याला जन्म देत असतात. अशा वेळी समीक्षेचं स्थान आणि तिची उपयुक्तता अधिक महत्त्वाची ठरते. समांतर सांस्कृतिक व्यवहाराचा प्रवास अखंडीत करण्यासाठी, आरंभबिंदू शोधण्यासाठी, कालमापन पक्क करण्यासाठी, साहित्याचे अधोरेखन करण्यासाठी समीक्षकाला सत्याचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आक्रमकपणाचा पाया द्यावा लागतो. याचे भान समृद्ध आणि सतर्क नसल्यामुळे आपल्या म्हणण्याचा विस्तार सांस्कृतिक व्यवहाराच्या पृष्ठभागावर क्वचितच राहिला. त्यातून राजकीय फायदे मिळण्याची शक्यता अधिकच दुरापास्त होत गेली. ज्या दोन समीक्षा प्रवाहाच्याजवळ आपण होतो, ते उपयोजनाच्या पातळीवर अधिक व्यापक नसल्याने जातिव्यवस्थेच्या घडीमध्ये बंदिस्त झाले.
यातून जो परिणाम अपेक्षित होता, तो तर दिसलाच नाही. उलट विभाजनाच्या शक्यता वाढीस लागून आपले सांस्कृतिक धोरण अधिकच तुटपुंजे आणि धुसर झाले. आता हे सगळं क्रिया-प्रतिक्रिया असं आहे. प्रत्येक वेळेला योग्य क्रिया किंवा प्रतिक्रिया न झाल्यास अल्पसंख्याक होण्याचा किंवा अनुल्लेखाच्या यादीत जाण्याची शक्यता अधिक असते. या यादीत जाण्याचा धोका पत्करल्याशिवाय तुमच्या म्हणण्याला, सांगण्याला अर्थ प्राप्त होणार नाही, हेही तितकेच सत्य.
आपल्यातले अनेक लोक हा धोका स्वीकारायला तयार नाहीत. विरोधी भूमिकेला लागून राहणे आणि त्यांच्या म्हणण्याला होकार देणे, यातून तुमचा अग्रक्रम पक्का होत असला तरी तो तात्पुरताच असतो. इतिहासात तुम्ही नावापुरतेच शिल्लक राहता, कार्यासाठी नाही, हे निरीक्षण आपला शहाणपणा टिकवण्यासाठी पुरेसे आहे.
आंबेडकरी समीक्षा, मार्क्सवादी समीक्षा हे आपल्या जवळचे दोन समीक्षा प्रवाह. आंबेडकरी समीक्षा उपयोजनाच्या पातळीवर समूहाच्या बाहेर गेली नाही. ती बाहेर जाण्याचा रस्ता चळवळीनेच बंद करून टाकला, असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीयांसाठी नेहमीच विचार केला. कृती-भाषिक कृती करताना त्याचे सतर्क भान ठेवले. याचे अनुकरण करताना आपल्याला मर्यादा आल्या. त्यामुळेच हस्तक्षेप, आंबेडकरी हस्तक्षेप म्हणताना आपण आपोआपच भानावर येतो. हे भानावर येणं म्हणजे जातीच्या आधाराने स्वीकारलेल्या फुटपट्ट्या (टीकेच्या) मोडून धर्मनिरपेक्षता, मानवता याचा स्वीकार करणे असं काही एक आपल्याकडून झालेलं नाही. म्हणूनच आंबेडकरी समीक्षा सक्षम सैध्दांतिक चौकट असून सुद्धा उपयोजनाच्या पातळीवर विस्तारली नाही.
अर्थात ही चौकट म्हणजे ‘The Buddha and his Dhamma’ (१९५७) हा डॉ. आंबेडकरांचा ग्रंथ नव्हे. कारण बरेच लोक यातील सम्यकसूत्रे त्यालाच आंबेडकरी समीक्षा म्हणताना दिसतात. मात्र या सम्यक सूत्रांचे उपयोजनएखाद्या कालाकृतीला लावून दाखवताना दिसत नाहीत. डॉ. अशोक बाबर यांनी ‘आंबेडकरवाद’ (२०१६) या पुस्तकात समीक्षेच्या विस्ताराच्या शक्यता आणि तिची उपयुक्तता याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातला ठामपणा नजरेत भरतो.
मराठी समीक्षेचं वळण हे अदृश्य आरक्षणासारखे आहे. एका बाजूला हे अदृश्य आरक्षण टिकवण्याचे आणि दुसऱ्या बाजूला समीक्षा लिहिण्याच्या आणि त्या संदर्भात विचार करणाऱ्या लोकांच्यात भय निर्माण करण्याचे काम आजच्या अॅकॅडमिक समीक्षेनं चालूच ठेवलं आहे.
६.
सातव्या अभाससासंच्या अध्यक्षपदी माझी निवड होण्यापाठीमागचं कदाचित, कदाचित म्हणतोय मी, ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ (डॉ. रावसाहेब कसबे, २०१६) आणि ‘देशीवादाचे दुश्मन’ (डॉ. अशोक बाबर, २०१८) ही दोन पुस्तके कारणीभूत असावीत, असा माझा दाट संशय आहे. अनेक समानधर्मी मित्रांना माझ्याबद्दल वाटणारी कुतूहल मिश्रित भावना या दोन्ही पुस्तकांनी गैरसमजाच्या पातळीवर नेली. आजकाल कोण कुणाचा समर्थक आहे ही भावना, चांगल्या सहित्याच्या चर्चेपेक्षा गैरसमाजाच्या पातळीवर जाणारी अधिक आहे. यामध्ये समर्थक म्हणजे लाभार्थी असे समीकरण रूढ झाले आहे. ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आहे. अशी वस्तुस्थिती भारतात कोठेही सापडण्यासारखी आहे. या वस्तुस्थितीच्या संदर्भात जागा करून, आपल्या लेखनकामाठीला कमजोर करण्यात कोणताही अर्थ नाही. लिहिण्याच्या संदर्भात असा विचार करत, त्यालाच अग्रक्रम देण्याच्या मानसिकतेमुळे या वस्तुस्थितीला अपवाद ठरलो आहे. पण या दोन्ही पुस्तकाच्या आमने-सामने येण्याने या अपवादावर, फुल्ली पडली आणि हे पुसून टाकण्यासाठी मला देशीवादावर बोलायला हवे.
देशीवादाचा समर्थक आणि विरोधक अशा विभाजनाच्या लाटेवर कधीच स्वार झालो नाही. विभाजन हा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रकारचा मानसिक रोग बनला आहे. आपले विभाजन इतक्या तुकड्या-तुकड्यात झाले आहे की, ‘सामुदायिक’ हा शब्द ‘बहुमत’ अशा अर्थाने फक्त आपल्यासाठीच अस्तित्वात नाही. त्यामुळे या नव्या विभाजनाला टाकण्याचाच प्रयत्न माझ्याकडून झाला. आता याला मध्यमवर्गीय मानसिकता म्हणून हेटाळणी होण्याची शक्यता आहे. पण त्याला अर्थ नाही.
७.
माझ्यासाठी जास्त चिंतेचा विषय आहे तो आपल्या सततच्या होणाऱ्या विभाजनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आड्यातेड्या राजकीय कृतीचा. या कृतीपाठीमागे समूहभान नसते. कार्यकर्त्यांचा रेटा नसतो. त्या पाठीमागे कोणता विचार असतो? हा संशोधनाचा किंवा त्याच्याही पलीकडे जाणारा विषय आहे. आता हे एक लेखक म्हणून सांगतो आहे. लेखकाचा समाजावरील हक्क मर्यादित स्वरूपाचाच असतो. लेखकाला, त्याच्या विचाराला यश मिळाल्यानंतरच हा हक्क वाढीस लागतो. या पार्श्वभूमीवर मला प्लॅनेरिया (Planaria) या चपट्याकृमीची आठवण होत आहे. या चपट्याकृमीमध्ये अद्भुत अशी प्रजननाची क्षमता असते. तिला शब्दकोषात नवचैतन्य प्राप्ती (Regeneration) असे म्हटले आहे. काय आहे ही नवचैतन्य प्राप्ती? तर या चपट्याकृमीचे डोके कापले तर थोड्याच अवधीत तेथे डोके तयार होते. शेपूट कापले तर शेपूट तयार होते. डोके आणि शेपूट एकाच वेळेला कापले तर त्या त्या जागेवर थोड्याच काळात हे अवयव जन्माला येतात. आपल्या फाटाफुटीला आणि विभाजनाला असे नवचैतन्यप्राप्तीचे बळ लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून पद्मश्री नामदेव ढसाळांच्या कवितेच्या तुकड्याने या लांबलेल्या, कदाचित त्रासदायक ठरलेल्या भाषणाचा समारोप करतो.
माझ्या जगण्याच्या वाटेवर तू उभा केलेला
तथागताचा दगडी ध्यानस्थ पुतळा
समाधीत हरवलेला
काम क्रोध द्वेष मत्सर वासना
जाळून टाकणारा-
मी आताशा कुठे डोकावून पहातो आहे
स्वत:त स्वत:च्या आत
बऱ्याच गोष्टी माझ्यातल्या जाळून टाकायच्याहेत मला
आधी टाकायची आहे तृष्णा,
नंतर सर्व काम, क्रोध, द्वेष, मत्सर, वासना वगैरे-नंतर अहंकार वगैरे.
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment