अजूनकाही
आपल्यापैकी बहुतांश जण भारत-पाकिस्तान सद्यस्थितीसंबंधी एव्हाना सोशल मीडियावर काही प्रमाणात का होईना व्यक्त झाले असतील. कुणी पुलवामा हल्याचा निषेध नोंदवला असेल, बालाकोट एअरस्ट्राईकनंतर सैन्यदलाचं अभिनंदन केलं असेल, कुणी सैन्याला सॅल्यूट ठोकला असेल तर कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना. आपल्यापैकी कुणी पाकिस्तानला शिव्या घातल्या असतील, तर कुणी एअरस्ट्राईकचं राजकारण करणाऱ्यांना.
तसंही सोशल मीडिया आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. आलं मनात की करा पोस्ट. मग त्यातलं आपल्याला कळत असेल वा नसेल, काही फरक पडत नाही. एक वेळ सरकारची अधिकृत भूमिका नंतर जाहीर होईल, फॅक्ट्स उशिरा समोर येतील, पण आपल्या फेसबुकी विश्लेषणाला अजिबात वेळ लागत नाही. आपल्या या अशा व्यक्त होण्यानं भलेही आपल्याला समाधान मिळत असेल, पण असं व्यक्त होणं सामाजिक वातावरण दूषित करण्यात अधिक हातभार लावत असतं, याचा आपण कधी फारसा गांभीर्यानं विचार करत नाही.
हा लेख लिहीत असताना दोन-तीन महत्त्वाच्या घटना एकाच वेळी आजूबाजूला घडताना दिसत आहेत. अमेरिकेत बसून डोनाल्ड ट्रम्प म्हणताहेत, ‘भारत आणि पाकिस्तानकडून आपल्याला लवकरच एक चांगली बातमी ऐकायला मिळेल’. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी क्षणभरापूर्वी एक ट्विट केलंय की, ‘भारतीय वैमानिकास आम्ही मिलिटरी इथिक्सला धरून वागणूक देत आहोत’. भारतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल एका मीटिंगला चालल्याचंही वृत्तवाहिन्यांवरून दिसत आहे.
याच वेळी डीडी न्यूज वर पंतप्रधान मोदी लाइव्ह आहेत. ते विविध राज्यांतील बुथ कार्यकर्त्यांशी प्रचार कसा करावा, सरकारच्या कामाला घराघरात कसं पोचवावं याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. याच वेळी भारतीय जवान डोळ्यांत तेल घालून सीमेवर पहारा देत आहेत.
या एकाच वेळी घडणाऱ्या तीन-चार घटना एवढ्यासाठी सांगितल्या की, हे सगळं घडत असताना आपण भारतीय नागरिक नेमके कशात मश्गुल आहोत, याचं उत्तर शोधणं अधिक सोपं जाईल. आपल्या व्यक्त होण्याचा अर्थ आपल्याला या पार्श्वभूमीवर लावायचा आहे. प्रत्येक नागरिकाचं आपल्या देशावर प्रेम असतं. ते कमी की जास्त असं मोजता येत नसतं. शत्रू राष्ट्राशी भांडण करू म्हणणारा, ‘कठोर पावलं उचला’ म्हणणारा नि त्यांच्याशी संवाद साधा म्हणणाराही देशभक्तच असतो. या दोन्ही प्रकारच्या लोकांतील मतभेद पूर्वीपासून आपणास ठाऊक आहेत. हे मतभेद असणं आणि या दोहोंनी परस्परांवर टीका करणं यात काही गैर नाही. या दोन गटांपैकी पहिला आक्रमक गट संख्येनं निश्चितच मोठा आहे. राजकीय मंडळी फार हुषार असतात. या मोठ्या गटाच्या मानसिकतेला त्यांनी गोंजारलं.
याच विषयाशी संबंधित उदाहरण द्यायचं झालं तर राज्यघटनेतील कलम ३७०, कलम ३५ अ रद्द करणं, काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणं, पाकिस्तानला धडा शिकवणं, राम मंदिर बांधणं, अखंड हिंदुस्थान निर्माण करणं वगैरे मुद्यांना अशा तऱ्हेनं हाताळलं की, हे सगळं करणं म्हणजेच देशभक्ती होय, अशी लोकमानसिकता बनवली. वारंवार तिला खतपाणी घातलं. धर्म आणि देशभक्तीचीही अफलातून मांडणी केली. हिंदूंना श्रेष्ठ म्हणताना मुस्लीम, ख्रिश्चनांना परकं मानलं. सोशल मीडियाच्या उगमानंतर या मंडळींनी आपला सारा प्रपोगंडा याच्या आधारे मांडायला सुरुवात केली. याला छान विकासाचीही जोड दिली. आपलीच बाजू कशी ग्रेट व दुसऱ्याची ती फालतू अशा सांगणाऱ्या भक्त मंडळींच्या फौजा सोशल मीडियावर निर्माण झाल्या. याच भक्तांनी वर्तमान सामाजिक-राजकीयदृष्ट्या प्रदूषित करून टाकलाय. काहीही घडो, प्रतिक्रिया ठरलेल्या असतात.
वाईट याचं वाटतं, की आपल्या आजुबाजूला असणारी कित्येक मुलं-मुली या भक्तांच्या पंक्तीत समूहात सामील झाली आहेत. आपल्याकडून जे व्यक्त केलं जातंय, ते दूषित आहे नि ज्यांच्यासाठी आपण व्यक्त होतोय ते फक्त आपला वापर करून घेत आहेत, याचं भान अजिबात राहिलेलं नाही. आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या तर असं लक्षात येईल की, आपण बसलोय पाकड्यांना धडा शिकवायला हवा, दगाबाजांना जशास तसं उत्तर द्यायला हवं, आता पाकडे राहणार नाहीत वगैरे कॉमेंट करत. आणि ते बसलेत पुढची पाच वर्षं सत्ता कशी ताब्यात ठेवायचीय याचे डाव टाकत. आपल्या हातातल्या स्क्रीनवर त्यांनी आपल्याला बीझी ठेवलंय. त्यांचं नेमकं काय चाललंय याची कल्पनासुद्धा आपल्याला येत नाही. हे आपण ओळखायला हवं.
गेल्या दोन दिवसांतल्या जर आपल्या कॉमेंट पाहिल्या तर आपण सामाजिक वातावरण किती दूषित केलंय हे ध्यानात येईल. काही उदाहरणं पाहा-
हा नवा भारत?
भक्तांच्या लेखी पाकिस्तानला धडा शिकवणारा, सर्जिकल स्ट्राईक करणारा हा नवा भारत. ते असंही म्हणताहेत की, ‘हुकूमशाही परवडली, घराणेशाही नको.’ म्हणजे लोकशाही नष्ट झाली तरी त्यांची हरकत नाही. पण पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. घटनाकारांनी किती कष्टानं या देशाची घटना लिहिली, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या देशाला किती प्रयत्न करावे लागले, याची काडीचीही कल्पना नाही.
हे तर अत्यंत भयानक आहे. हीच मानसिकता असणारा तरुण या राज्यकर्त्यांना हवाय. याच्या आधारेच त्यांना देशाचं चित्र बदलायचंय.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
काश्मीरचा इतिहास काय आहे, राज्यघटनेतील कलम ३७० चा नेमका अर्थ काय, कलम ३५ अ काय आहे, याबद्दल काडीचीही माहिती नसणारे या विषयावर व्यक्त होताहेत. ही दोन्ही कलमं काढून टाकणं शक्य नाही, या कलमांमुळेच काश्मीर भारताशी जोडलेला आहे, याची जरासुद्धा माहिती नसताना यावर लोक व्यक्त होत आहेत. या व्यक्त होण्यातूनच काश्मीरबद्दल लोकांच्या मनात अधिक द्वेष निर्माण व्हायला मदत होते. अशी द्वेषाची भावना जनमानसात निर्माण झाली की, काश्मिरी अन भारतीय यांच्यातली दरी अधिक रूंद होते. पुलवामानंतर या द्वेषभावनेतूनच काश्मिरी तरूणांवर हल्ले झाले.
जेतेपणाचा उन्माद
भारतीय हवाई दलाच्या सैनिकांनी शौर्य दाखवलं, ही सगळ्या भारतीयांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. पण आपला अभिमान हा इतरांना इतकाही डिवचणारा नसेल की समोरचा चवताळून उठेल. मंगळवारच्या हल्यानंतर इतकं उन्मादी वातावरण पाहायला मिळालं की, जणू काही हा भल्यामोठ्या युद्धातला विजयच आहे. त्यात आपल्या मुख्य प्रवाहातल्या मीडियाचा उतावळेपणा. सोबत पंतप्रधानांचं प्रचारी भाषण. यामुळे वातावरण ढवळून गेलं. आपली लढाई ही दहशतवादाच्या विरोधात आहे, पाकिस्तान या सार्वभौम राष्ट्राच्या विरोधात नाही, याचा विसरच पडला. पाकिस्तानी लष्कर दहशतवादाला खतपाणी घालतेय, त्यांचा खोटारडेपणा दिसून येतोय, असा भारताचा आरोप आहे. तो सत्यही मानू यात. पण याचा अर्थ सागळा पाकिस्तान आपला दुष्मन नव्हे.
संधीसाधू राजकारणी
एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान ज्या पद्धतीनं भाषण देतात, येदियुरप्पा या परिस्थितीचा फायदा घेऊन राजकारणाची गणितं मांडतात याकडे पाहिल्यावर तापत्या तव्यावर पोळी भाजणं काय प्रकार असतो ते ध्यानात येईल. पुलवामानंतर आणि एअरस्ट्राईकनंतर देशातील सर्व पक्षीयांत ऐक्य होतं. पंतप्रधानांच्या त्या भाषणामुळे हे ऐक्य विकोपास गेलं. याचा फायदा अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला झाला. राजस्थानमधल्या त्या सभेत पंतप्रधानांनी विकासाचा मुद्दा तोंडी लावायला घेतला आणि देशभक्ती हाच मुख्य मुद्दा बनवलाय. सोशल मीडियावरही हाच ट्रेंड सुरूय. ‘युद्ध नको बुद्ध हवाय’ म्हणणाऱ्यांना निर्बुद्ध ठरवण्यापर्यंत सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सची मजल गेलीय.
या उन्मादी वातावरणाचा परिणाम लहानग्यांच्या मनावर होतेय. उदारमतवादी विचारांचा मोठा समुदाय देशभक्तीच्या नावाखाली कडवट उजव्या छावणीकडे सरकतोय. कदाचित या छावणीतले लोक याच संधीची वाट पाहत असावेत, ज्या आधारे त्यांना स्वतची पाळंमुळं आणखी घट्ट करायचीत. युद्धात मारला जाणार जवान, नाडला जाणार सामान्य माणूस, उखळ पांढरं होणारं शस्त्रास्त्र बनवणाऱ्या भांडवलदारांचं, पोळी भाजणार सत्ताधाऱ्यांची…
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या अभिव्यक्तीला आता वाट मोकळी करून द्यायचीय. आपल्यातल्या विवेकाला साद घालण्याची हीच वेळ आली आहे. ही वेळ आपण गमावली तर येणारा काळ आपल्यासाठी मोठा कठीण होऊन बसणार आहे.
.............................................................................................................................................
लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.
sdeshpande02@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 02 March 2019
अहो सतीश देशपांडे, सत्ताधाऱ्यांची ( म्हणजे मोदींची) पोळी भाजली जावी म्हणून तर सगळा अट्टाहास चाललाय. मोदी एक नंबरचा लुच्चा व हलकट इसम आहे. तो स्वत:ची पोळी भाजतांना पाकिस्तानचं नुकसान करतो. तुमच्या लक्षांत आलेलं दिसंत नाही म्हंटलं. बाय द वे(य), दहशतवादी गझवा-ए-हिंद बनवायचं खुल्लेआम आवाहन करतात तेव्हा तुमचा विवेक कुठल्या बिळांत दडी मारून बसलेला असतो हो? आपला नम्र, -गामा पैलवान
Ashwini Funde
Fri , 01 March 2019
अतिशय वास्तव लिहिले आहे... लेखात मध्ये-मध्ये (comments) दिलेल्या प्रतिक्रिया नि त्यावरील लेखकाची संयमीत मते यामुळे लेख अजून सजीव झालाय... देशभक्तीच्या उन्मादी स्थितीत सर्वसामान्यांची मतेही विवेकी असायला हवीत, याची लेखकाने करून दिलेली जाणीव जास्त महत्वाची आहे ....