अजूनकाही
माझ्या एका संवेदनशील, विवेकी आणि बुद्धिमान मित्राने एक प्रश्न अगदी प्रामाणिकपणे विचारला – “हे गायक, ख्याल गायन सुरू करण्यापूर्वी पाच मिनिटं ते काय गाणार आहेत, हे का सांगत नाहीत?” त्याला हा प्रश्न त्याच्या लहानपणापासून पडलेला आहे. त्याने भिंतीवर टपालवलेला (Wall Post) हा प्रश्न मी वाचलाच नाही अशी मी स्वत:ची समजूत करून घेतली. तरी पुन्हा संधी मिळताच त्याने तोच प्रश्न पुन्हा तसाच विचारला. शिवाय हा प्रश्न त्याने आधी विचारला आहे याचं स्मरण द्यायलाही तो विसरला नाही. तो मित्र आणि त्याचा प्रश्न यांविषयी वर जी विशेषणं वापरली आहेत ती ज्यांच्यासाठी यथार्थ आहेत, अशाच माझ्या ज्ञात-अज्ञात मित्रांसाठी मी हे लिहितो आहे म्हटल्यावर उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. मी त्याला उत्तर दिलं – “आपल्या संस्कृतीत असं काही सांगणं बसत नाही!” काही वेळाने त्याला मी थोडं मोठं उत्तर दिलं – “हरकत काहीच नाही; पण गाणाऱ्या बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं. माहिती असणाऱ्यांना ते देण्याचा धीर होत नाही आणि कधी कधी जे असं काही बोलतात त्यांनी बोलू नये. खरं तर गाऊ नये, अशी परिस्थिती असते!”
इथं याच प्रश्नाचं मी थोड्या विस्तारानं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपली संगीत विद्या गुरुमुखी आहे. गुरू-शिष्य परंपरेनेच ती संक्रांत झाली आहे. गुरू-शिष्य परंपरेचे बरेच देव्हारे माजवले गेले आहेत. अनेक सुरस आणि चमत्कारिक कथांनी गुरू-शिष्य परंपरेभोवती एक गूढ वलय उत्पन्न केलं गेलं आहे. या शिक्षण पद्धतीवर सपाटून टीकाही झाली आहे. या पद्धतीचे गुण-दोष काहीही असोत, या पद्धतीला विसाव्या शतकापर्यंत पर्याय नव्हता. आणि आधुनिक काळातही समर्थ पर्याय उभा राहिलेला नाही. पारंपरिक गुरू-शिष्य पद्धतीची मूलतत्त्वे आधुनिक शिक्षणपद्धतीत समाविष्ट करून काही पर्याय शोधले गेले आहेत आणि ते माफक प्रमाणात यशस्वीही होताहेत. तर गुरू-शिष्य शिक्षण पद्धतीचा विषय का आला तर “बोलणं आपल्या (संगीत) संस्कृतीत बसत नाही!”
आजचे बुजुर्ग कलाकार एकमुखाने सांगतात की, “आमच्या विद्यार्थीदशेत गुरूंना प्रश्न किंवा शंका विचारणं म्हणजे शांतं पापं! केवढा उद्धटपणा! मी म्हणतो तसं म्हण, बस्स!” रागाचं नावसुद्धा गुरू सांगत नसत म्हणे! बंदिशीचे शब्द गुरू जसे म्हणतील किंवा खरं तर शिष्याला जसे ऐकू येतील तसे शिष्याने गायचे. गुरूगृही राहून विद्याध्ययन होत असे. त्यामुळे गुरूंच्या घरची कामं करणं क्रमप्राप्तच. ठराविक वेळी नियिमतपणे तालीम मिळेल असा भरवसा मुळीच नाही. जे पदरात पडेल ते साठवत जायचं हाच शिष्याचा धर्म. शिष्यपण सोसता सोसता कलाकाराची बोलती बंद होत असावी! पण खरंच का बरं असावी अशी परिस्थिती? का ही मुखबंदी? तिचा आणि संस्कृतीचा संबंध काय? विचार करताना काही गोष्टी व्यवहाराच्या पातळीवरच सहज लक्षात येतात. गुरूगृही काम काय करणार? एक प्रकारचं स्वयंसेवक शिबीरच असणार ते! गुरू प्रश्न विचारू देत नाहीत. गुरूंना त्यांच्या गुरूंनी जर काही शब्दांत समजावून दिलं नसेल आणि गुरूंनी ग्रंथांचं वाचन, मनन केलं नसेल तर त्यांच्याकडे शिष्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं असणार? शिष्याच्या ठिकाणी आज्ञाधारकपणा, शरणभाव ही गुरूची मानसिक गरज असणार. पण या पलीकडेही काही कारणमीमांसा आहे.
संगीत ही क्रियात्मक विद्या आहे. पढीक शहाणपणाचा तिथं काही उपयोग नाही. “रागाचं नाव माहिती होऊन काय कळणार आहे, राग गाता आला पाहिजे. गाऊन दाखव-” अशी भूमिका यामागे आहे. साहजिकच प्रश्न पडतो की, रागाचं नाव कळलं तर राग गाता येत नाही असं वगैरे काही घडतं का? ‘अर्थातच असं काही नाही’ असं या प्रश्नाचं उत्तर असणार. खरं उत्तर – ‘असंच काही नाही’ हे आहे. काय फरक आहे, दोन्ही उत्तरांमध्ये? सूक्ष्म फरक आहे. अमूर्त अशा संगीत कलेचा नेमका वेध शिष्याने घ्यायचा तर त्याचं लक्ष पूर्णत्वाने स्वर-लयीवर केंद्रित व्हायला पाहिजे. रागाकडे पाहण्याचे, राग समजून घेण्याचे बाकी सर्व दरवाजे बंद व्हायला हवेत, अशी ती भूमिका आहे.
या भूमिकेचा प्रतिपक्ष जरूर करता येईल, पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी. की मुखबंदी मागे काही धोरण आहे, काही भूमिका आहे. सर्वच कला-विद्या-शास्त्रांकडे आपली परंपरा ‘इति गुह्यतमं शास्त्रम’ अशा भूमिकेनं बघते. प्रश्न विचारत राहणारा शिष्य कदाचित अ-शिष्य असावा. का बरं? कारण त्याला आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं तयार उत्तर हवंय म्हणून! ‘उरी फुटल्याविण सुटती न कोडी’ हे त्याला अजून आकळलेलं नाही म्हणून! माहिती नको, अनुभव हवा, हे आपल्या ज्ञानसंस्कृतीचं ब्रीद आहे. या ब्रीदाचंच भलं-बुरं प्रतिबिंब आपल्या संगीत शिक्षण परंपरेत पडलेलं आहे.
जे कलाकारांसाठी ते श्रोत्यासाठी! विचारू नका, ऐका, मनन करा, तुमचं तुम्हाला समजू दे. जरा उशिरा समजेल, चालेल पण आकलन शाब्दिक माहितीच्या स्वरूपात नको, अनुभवाधिष्ठित असू दे. गायकाने रागाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना काय मोठा लाभ होणार आहे? अन्य कलाकारांनी गायलेला\वाजवलेला हा राग आपण ऐकला आहे हे कदाचित श्रवणवासरीतली (Listening Diary) नोंद पाहून श्रोत्याला समजेल. चार जणांत रागांची नावं घ्यायला मदत होईल. जर संगीताची मुळाक्षरं आणि बाराखडी श्रोत्याला अवगत असेल तर तो ओळखीची अक्षरं शोधत बसेल. अक्षरं सापडतील आणि श्रवणानंद ओघळून जाईल. व्याकरणाचे बारकावे कळतात आणि त्याच वेळी रसास्वादही समरसून घेता येतो, ही श्रोतृत्वाची खूप वरची पायरी आहे.
बंदिशीचे शब्द म्हणाल तर त्यावर एक वेगळा संपूर्ण लेखच लिहावा लागेल. तोपर्यंत एक करून ठेवा. पूरिया धनश्री रागात पं. भीमसेनजी आदींनी गाइलेली एक बंदिश यू ट्यूबवर उपलब्ध आहे- ‘अब तो ऋतु’. ही बंदिश ऐकून शब्दांचा मागोवा घेता येतो का ते पहा. शब्दांमागून शब्दार्थ लक्षात येतो का ते पहा. आधी शब्दांकडे फारसं लक्ष न देताच ऐका. तुमच्या मनावर त्या रागाचा काही एक असर होईल, तो नेमका काय आहे? कोणता भाव आहे, कोणता रस आहे हे निश्चित करण्यामागे लागू नका. शब्दांत सांगता आला नाही तरी ‘असर’ असतो, तो आपल्याला जाणवतो. त्याचं नेमकं वेगळेपणही आपल्याला कळतं. शब्दांत तो जर त्याच्याशी जराही प्रतारणा न करता, आपल्याला मांडता आला असता तर आपण कवी-महाकवीच असतो! शब्दांत पकडायला जाताना शब्दांच्या सोयीसाठी आपण त्याच्यापासून फारकत घेतो. सूक्ष्मशी का होईना आपण आपली फसवणूक करतो. तसं काही करू नका. तर शब्दांकडे फारसं लक्ष न देता ऐकून झालं की, शब्दांकडे जरा अधिक लक्ष द्या. शब्दार्थ म्हणजे त्यातून बंदिशीच्या काव्याचा भावार्थ समजून घ्या आणि मग बसा समीकरण जुळवत, ‘असर’ आणि काव्यभावार्थ यांचं!
रागाचं नाव, रागाचं व्याकरण, बंदिशीचे शब्द गायक हे सर्व सांगायला एकवेळ तयार होतील. पण रागाचा भाव? दृष्ट काढून देणारे खास कसबी लोक असतात. मीठ, मोहरी, तुरटी वगैरे घेऊन ते दृष्ट काढतात आणि पेटत्या निखाऱ्यावर ती ओवाळून काढलेली सामग्री टाकतात. ज्या कोणाची दृष्ट पडली असेल त्याची प्रतिमा त्या निखाऱ्यांवर तयार होते. तो म्हणतो, ‘बघा, मांजराची पडली होती दृष्ट…’ आणि खरंच मांजरासारखी आकृती दिसते की हो त्या निखाऱ्यांवर! आता मला हा प्रकार का आठवला कोण जाणे!
आणखी एक गोष्ट आठवली. सांगू का? चौथी-पाचवीत असताना शाळेच्या सहलीला गेलो होतो. संध्याकाळी आकाशात उंचावर ढग होते आणि त्या आडून संध्याकाळचा सूर्य दिसत होता, अगदी सौम्य आणि पांढरा. मी म्हटलं, “आज सूर्य बघा कसा चंद्रासारखा दिसतोय!” आमच्या बाईंनी मला हटकलं – “अरे वेड्या, सूर्य चंद्रासारखा कसा दिसेल? सूर्य लाल-केसी दिसतो. शिकला आहेस ना तू ती बालकवींची कविता- ‘कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा!’ ” मी मनात म्हटलं, ‘अच्छा, म्हणजे बालकवींच्या कवितेत सूर्य सोन्याचा गोळा आहे, तर मलाही आज तो सोन्याचा गोळाच दिसला पाहिजे!’
तिरकं बोलून झालं, आता सरळ बोलूया. राग आणि विवक्षित भाव असं साहचर्य अमान्य करता येत नाही. पण राग-भाव साहचर्याविषयी काटेकोर नियम करता येत नाहीत. मोकळ्या मनाने रागश्रवणानुभवाला सामोरं जाणं हाच श्रोत्याचा धर्म असू शकतो. प्रत्येक कलाकृतीचा प्रत्येक रसिकाला प्रत्येक वेळी सारखाच प्रत्यय येऊ शकत नाही. आपल्याला स्वत:ला जो आणि जेवढा प्रत्यय आला तो आणि तेवढाच आपल्यापुरता खरा आणि पुरेसा असायला हवा. एक राग अनेक वेळा अनेक कलाकारांकडून ऐकल्यावर त्याची एक सर्वसाधारण प्रतिमा आपल्या मनात तयार होते, ही अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि अशी प्रतिमा तयार होण्यात आपल्या मनाचाही महत्त्वाचा वाटा असतो. ऐकावं जनाचं, जरूर ऐकावं; पण ऐकावं मनाचं, हेच खरं. नाही का?
छोटेखानी मैफलींमध्ये गायकाने\निवेदकाने रागाविषयी वस्तुनिष्ठ निवेदन करण्यामुळे नवा श्रोता त्या सादरीकरणाशी अधिक आणि लवकर जोडला जाईल. न कळण्याच्या उद्विग्नतेतून श्रोता थोडा बाहेर येईल, या करता थोडी प्रस्तावना जरूर करावी. पण ही प्रस्तावना जबरदस्त होऊ नये. कलाकारांच्या मुलाखती, प्रश्नोत्तरे, सप्रयोग व्याख्याने यांतून श्रोत्याने आपली जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण या सर्व वाक्पांडित्याचा थेट प्रत्यय श्रवणामध्ये मिळावा असा अट्टाहास नसावा. मोठमोठे गायक सांगतात की, रागच ‘चालविशी हाती धरुनिया’ अशा वात्सल्यभावाने आपल्याला वाट दाखवतो, तर रसिक राजा तोच राग ‘तुज मोकळीक ऐसे नाही’!
लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.
kdparanjape@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Pashte
Sat , 17 December 2016
नेहमीप्रमाणे खूपच छान !!