अजूनकाही
अपेक्षेप्रमाणे पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दोन आठवड्यात याचे वारंवार संकेत दिले होते. आपण लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे असं ते जाहीर सभांतून म्हणाले होते. पण त्यात पूर्ण तथ्य अशासाठी नाही की, असं स्वातंत्र्य लष्कराला कधीच नसतं. हल्ला करण्याचा निर्णय तर पंतप्रधानांच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. सेनाप्रमुख हल्ल्याची रणनीती ठरवतात, पंतप्रधान त्यांना अनुमती देतात आणि त्यावर लष्कराचे सुप्रीम कमांडर म्हणून राष्ट्रपती शिक्कामोर्तब करतात. बालाकोटवर झालेला हवाई हल्ला अशाच विचारमंथनातून झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमतेबद्दल कधीच शंका नव्हती. १९६५, १९७१ आणि कारगिलच्या युद्धातही लष्करानं आपली भूमिका चोख बजावली होती. त्यामुळे भारताची मिराज लढाऊ विमानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसली आणि बालाकोटला त्यांनी आपली कामगिरी फत्ते केली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. राजकीय इच्छाशक्ती आणि लष्करी कौशल्य जेव्हा हातात हात घालून पुढे जातात, तेव्हाच असा यशस्वी हल्ला होऊ शकतो. त्याबद्दल भारतीय हवाई दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दहशतवादाला पडद्याआडून पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला असा धडा देण्याची गरज होती.
मात्र वाद सुरू झाला तो परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या पत्रकार परिषदेनंतर. बालाकोट हल्ल्यानंतर झालेली ही सरकारची एकमेव पत्रकार परिषद. आजवर भारतीय लष्कर किंवा हवाई दलानं कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच गोखले यांनी, आपण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही, हे सांगितलं. वास्तविक भारत सरकारनं सगळं सत्य जगासमोर ठेवायला हवं होतं. पत्रकारांनी कितीही अडचणीचा प्रश्न विचारला तरीही सत्य जर तुमच्या बाजूला असेल तर, तुमची कोंडी होण्याची गरज नाही. मात्र, पारदर्शकतेच्या अभावी अफवांना जन्म मिळतो आणि मग सुरू होते अफवा आणि खोट्या बातम्या पसरवण्याची स्पर्धा.
हा हवाई हल्ला पहाटे साडेतीन वाजता झाला आणि पत्रकार परिषद झाली सकाळी साडेअकरा वाजता. या मधल्या आठ तासांत या हल्ल्याविषयी चित्रविचित्र बातम्या यायला सुरुवातच झाली होती. हल्ली माध्यमांची स्पर्धा एवढी वाढली आहे की सरकारच्या अधिकृत निवेदनापर्यंत कुणीही थांबत नाही. हे अमेरिकेतल्या ९/११च्या आणि मुंबईवरच्या हल्ल्याच्या वेळीसुद्धा स्पष्ट झालं होतं. परराष्ट्र सचिवांनी नेहमीप्रमाणे नोकरशहा करतात तसा शब्दांचा खेळ केला. हा हल्ला नसून ‘प्रतिबंधक बिगर लष्करी कारवाई’ (नॉन मिलिटरी प्रीएम्पटिव्ह स्ट्राईक) आहे असं त्यांचं म्हणणं होतं. असा हुशार शाब्दिक खेळ कुटनीतीमध्ये नेहमी केला जातो. पण जसा तो आपण करू शकतो, तसाच पाकिस्तानही करू शकतो. त्यामुळे त्यांच्या लष्करी प्रवक्त्यानं आपल्या आधी पत्रकार परिषद घेतली आणि भारतावर आरोप केले. परराष्ट्र सचिव स्पष्टपणे म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या लष्करी तळावर किंवा नागरी वस्तीवर हल्ला केला नसून, जैश- ए- मोहम्मदची दहशतवादी छावणी जमीनदोस्त केली आहे. यामध्ये अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत. पण प्रश्नांना उत्तरं न दिल्यामुळे त्यांनी तपशील सांगितला नाही आणि भारत सरकार तिथंच अडचणीत आलं.
मृतांची संख्या किती हा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला. ‘हिंदुस्तान टाइम्स’नं आधी २००० दहशतवादी दगावल्याची बातमी दिली. आणि मग ही संख्या २५०- ३००वर आली. भारत सरकारचे अधिकारी पत्रकारांना अनधिकृतपणे माहिती देत होते, पण हवाई हल्ल्यात झालेल्या विध्वंसाचा कोणताही पुरावा आजपर्यंत सरकारनं समोर ठेवला नाही. आधी हे बालाकोट कोणतं यावर वाद सुरू झाला. कारण एक बालाकोट सीमेजवळ आहे आणि दुसरं खैबर पख्तुनवा या पाकिस्तानच्या प्रांतात. बऱ्याच वेळानं हा हल्ला खैबर पख्तुनवामधल्या बालाकोटवर झाल्याचं स्पष्ट झालं.
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार हा हल्ला जंगलात किंवा मोठ्या पठारावर करण्यात आला. त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देण्याचं निमंत्रणही दिलं. याचा प्रतिवाद भारत सरकारनं केला नाही. मग रॉयटर्स, अल झजीरा, सीएनएन, बीबीसी ही आंतरराष्ट्रीय माध्यमं बालकोटमध्ये जाऊन पोचली आणि त्यांनी झालेल्या विध्वंसाचे फोटो दाखवायला सुरुवात केली. यामध्ये बॉम्बहल्ल्यामुळे पडलेले मोठमोठे खड्डे, पडलेली झाडं यांचे फोटो होते, पण मृतदेह मात्र दिसत नव्हते. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार इथं काहीजण जखमी झाले, पण एकच व्यक्ती दगावली आहे. मोदी सरकारच्या समर्थकांनी मग वेगळाच सूर काढला. दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तान सरकारनं गायब केले असं त्यांचं म्हणणं होतं. पण भारत सरकारनं याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचं पारडं जड झालं. भारत सरकारनं या हल्ल्याचे सॅटेलाईट फोटो किंवा काही लष्करी फूटेज तरी जगापुढे आणायला हवं होतं. पण ते न झाल्यामुळे व्हिडिओ गेम्सचा वापर करून फेक न्यूज पसरवण्यात आल्या.
या हल्ल्याला पाकिस्तान उत्तर देणार हे सांगायला काही तज्ज्ञांची गरज नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीनं हा हवाई हल्ला ही जशी राजकीय गरज होती, तशीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या दृष्टीनं त्याला उत्तर देणं हीसुद्धा राजकीय गरज होती. एका दृष्टीनं नरेंद्र मोदी आणि इम्रान खान एकमेकाला मदतच करत होते. अशा हल्ल्यांमुळे मोदींना निवडणुकीत फायदा होणार आणि इम्रान खान यांची प्रतिमा पाकिस्तानात उंचावणार हे उघड आहे. दोन्ही पंतप्रधानांचं बारीक लक्ष आपल्या मतदारांवर आहे.
पाकिस्ताननं हवाई हल्ला केला त्यात त्यांची दोन लढाऊ विमानं भारतानं पाडली. पण ती पाकिस्तानच्याच हद्दीत जाऊन कोसळल्यानं दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर पडू शकले. या उलट, भारताचं जे विमान पाकिस्ताननं पाडलं ते त्यांच्या हद्दीत पडलं आणि अभिनंदन वर्धमान हा आपला पायलट त्यांच्या तावडीत सापडला. स्थानिक गावकऱ्यांनी पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला, मग पाक सैन्यानं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ‘पाकिस्ताननं मला चांगली वागणूक दिली आहे,’ असं सांगणारा व्हिडिओही त्याच्याकडून बनवून घेण्यात आला. या विमानपतनाचं फूटेज पाकिस्ताननं सर्व मीडियाला दिलं. खरं तर जिनिव्हा कराराच्या कलम १३नुसार युद्धकैद्याचा असा वापर करायला मनाई आहे. पण अजून युद्ध जाहीर झालेलं नसल्यानं जिनिव्हा करार लागू होत नाही असा बचाव पाकिस्तान करणार आणि आपण अभिनंदनला चांगली वागणूक देत आहोत याची जगभर जाहिरात करणार. हल्लीच्या युद्धामध्ये हा ‘पर्सेप्शन’चा खेळ महत्त्वाचा ठरतो. पायलट अभिनंदनला अटक झाल्याबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचं आवाहन केलं आणि युद्ध केल्यास आमच्याकडे तुमच्यासारखीच शस्त्रात्रं आहेत, असा इशाराही दिला.
दबावाचं हे राजकारण कुठे जाणार हा आता प्रश्न आहे. लष्करी तज्ज्ञांमध्ये याबाबत मतभेद आहेत. युद्ध करण्यात दोन्ही देशांचं हित नाही, युद्धामुळे दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकुल परिणाम होईल असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही म्हणाले आहेत. एक हल्ला भारतानं केला, दुसरा पाकिस्ताननं केला, आता हे युद्धसदृष्य वातावरण आणखी भडकू नये अशी अपेक्षा लष्करी तज्ज्ञांचा एक गट व्यक्त करतो आहे, तर दुसरा गट पाकला धडा शिकवण्याची भाषा करतो आहे. मोदी समर्थकांमध्ये ही खुमखुमी जबरदस्त आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे आज कुणीही सांगू शकत नाही. हा निर्णय फक्त पंतप्रधान मोदी आणि इम्रान खानच घेऊ शकतात. मोदींना राष्ट्रीय हितापेक्षा जर स्वत:चं राजकीय हित महत्त्वाचं वाटत असेल तर ते हा संघर्ष आणखी रेटतील. पण युद्ध करणं, न करणं हे काही फक्त भारत आणि पाकिस्तानवर अवलंबून नाही. अमेरिका आणि चीन यातले मोठे ‘खिलाडी’ आहेत. ते भारत- पाकला कितपत पुढे जाऊ देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. आज तरी दोन्ही देशांनी युद्धज्वर कमी करण्याचा सल्ला मोदी आणि इम्रानना दिला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतरच्या पंतप्रधान मोदींच्या वर्तनाबद्दल मी गेल्या लेखातही लिहिलं होतं. आता बालाकोटचा हवाई हल्ला झाल्यावरही त्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही. ते आपल्या सरकारी आणि बिनसरकारी कार्यक्रमात व्यग्र आहेत. या हल्ल्यानंतर लगेच भारतानं अनेक विमानतळ काही तासांसाठी बंद केले, पण मोदींचे बिनमहत्त्वाचे कार्यक्रम किंवा जाहीर सभा रद्द झाल्या नाहीत. राजनाथ सिंग तर भाजपच्या कार्यक्रमात गुंतले होते. ही संवेदनहीनता तर आहेच, पण हा लढणाऱ्या सैनिकांचासुद्धा अपमान आहे. हवाई हल्ल्यानंतर सीमेवरच्या नागरिकांत घबराटीचं वातावरण होतं, जवानांचे कुटुंबीय तणावाखाली होते. त्यांना दिलासा द्यावा असंही मोदींना वाटलं नाही. तथाकथित ‘स्ट्राँग लीडर’नं माणूस असू नये का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो.
मीडियाच्या नंगानाचाचा आढावा मी पुलवामा हल्ल्यानंतर घेतला होता. आता बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर बहुसंख्य टीव्ही चॅनेल्सच्या अँकर्सनी प्रत्यक्ष युद्धच सुरू केलं आहे. एका चॅनेलचा अँकर तर जवानाचा गणवेष घालून स्टुडिओत उभा होता. हा मूर्खपणा तर आहेच, पण विकृतीही आहे. या असल्या दळभद्री पत्रकारांना थेट सीमेवर पाठवून दिलं पाहिजे. अशा मीडियावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकण्याची गरज आहे. एडिटर्स गिल्डसारख्या संस्थांनी टीआरपीसाठी सैनिकांचा अपमान करणाऱ्या अशा मीडियाचे कान टोचले पाहिजेत. आधीच सरकारच्या लांगुलचालनामुळे पत्रकारांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. अशा प्रकारांमुळे ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. राजकारण्यांना हेच हवं आहे.
पुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत. पण कारगिलच्या लढाईनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. १८४ जागांपर्यंतच त्यांची मजल गेल्यामुळे त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली होती हा इतिहास विसरून चालणार नाही. युद्धजन्य वातावरणाचा मोदींना फायदा होईल हे निश्चित, पण तो किती होतो हे आजच सांगता येणार नाही. पाकिस्ताननं प्रतिहल्ला करून अडचणीत आणलं तर मोदी आणि भाजपचा हा निवडणुका जिंकण्याचा डाव त्यांच्याच अंगावर उलटू शकतो.
शेवटी एकच, युद्धात कुणीच जिंकत नसतं. युद्धामध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक आणि नागरिक मृत्युमुखी पडतात हे विसरता येणार नाही. इतर विध्वंस वेगळा. जे सीमेवर जाऊन लढत नाहीत, तेच युद्धोन्माद करून आपली मानसिक गरज पूर्ण करत असतात. म्हणूनच साहीर लुधियानवी म्हणतात,
जंग तो खुदही एक मसला है,
जंग क्या मसलाओंका हल देगी
खून और आग आज बरसेगी
भूख और एतिहाज कल देगी
इसलिए ए शरीफ इन्सानों
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभी के आंगन में
शम्मा जलती रहे तो बेहतर है.
............................................................................................................................................
लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.
nikhil.wagle23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sarvesh Sawakhande
Fri , 01 March 2019
Awesome article निखिल सर!
Sarvesh Sawakhande
Fri , 01 March 2019
आनंद हे चुकीचेच आहे.
Sarvesh Sawakhande
Fri , 01 March 2019
या मुद्द्यावर राजकारण करणं चुकीचंच. तुम्ही याचं समर्थन करताय हे पाहून वाईट वाटतं. याचा विरोधचं व्हायला हवा.
anand deshpande
Thu , 28 February 2019
खरं तर काँग्रेसला जर स्वातंत्र लढ्याचा फायदा जर ५० वर्ष सत्ता उपभोगून मिळत असेल तर भाजप ला एखादी निवडणूक जिंकल्यामुळे मिळालं तर काय बिघडलं . आणि काँग्रेस नि पण हेच केले इंदिरा गांधी , राजीव गांधी ह्यांना हुतात्मा म्हणून वर्षनुवर्षे सत्ता उपभोगली . शेवटी भारतीय मानसिकतेचा आता तो फायदा भाजप घेत आहे. काँग्रेस ने पण विचार करावा कि लोकांना (तुम्ही म्हण्टल्याप्रमाणे फक्त ३०% ) तुमच्यावर पराकोटीचा राग का आहे?