स्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 27 February 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis अ.भा. मराठी नाट्य संमेलन प्रेमानंद गज्वी

९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी हे केवळ नाटककार नव्हेत, तर वेळोवेळी विविध विषयांवर आपली मतं मांडणारे गृहस्थ आहेत. मतं प्रक्षोभक असली तरीही गज्वींचा लिखाणात व बोलण्यातला सूर हा मध्यमपट्टीतला असतो. त्यामुळे ते कंठाळी, कर्कश्श, प्रचारकी झाले नाहीत, नाटकात (लेखक म्हणून) किंवा इतरत्र आपली मतं मांडताना.

मराठी नाट्यसृष्टीनं कधी काळी त्यांना ‘दलित नाटककार’ म्हणून जे लेबल चिकटवलं, ते त्यांनी स्वत:च फेकून दिलं. दलित पँथर, दलित साहित्य, दलित नाटक यांनी ७०च्या दशकापासून एक दशकभर मोठा प्रभाव व ठसा राजकारण, समाजकारण, साहित्य व नाटक या क्षेत्रांवर उमटवला होता.

प्रेमानंद गज्वी या काळाचंच अपत्य. ‘घोटभर पाणी’ या त्यांच्या एकांकिकेनं इतिहास घडवला आणि गज्वी नाटककार म्हणून महाराष्ट्र देशी नोंदले गेले. दलित नाट्य संमेलनाध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला. पण पुढे त्यांनी भूमिका म्हणून ‘दलित’ या लेबलचा त्याग करत, ‘बोधी नाट्यविचार’ जन्माला घातला. आजघडीला ते त्याचे सक्रिय प्रचारक म्हणजे संस्थापक प्रचारक आहेत.

आपल्या आध्यक्षीय भाषणात त्यांनी ते मुद्देसूद मांडलंय. जिज्ञासूंनी ते मुळातून वाचावं. ‘दलित’ हा शब्द त्यागून ‘बोधी’कडे प्रवास करताना त्यांना दलित, आंबेडकरी बौद्ध तसंच सर्वसाधारण रंगकर्मीकडूनही टिकेचं धनी व्हावं लागलं. पण न डगमगता बोधीविचार चालू ठेवलाय त्यांनी. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सर्व प्रकारच्या इझमवरही टीका केलीय. सोशॅलिझम, कम्युनिझम, फॅसिझम, फेमिनिझम, नक्षलिझम इ.इ. या सर्व इझमवरची नाराजी किंवा प्रतिक्रिया म्हणून त्यांनी फेसबुकवर स्वत:चाच एक ‘गज्वीइझम’ जन्माला घातलाय!

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

नाट्यसंमेलनातही छोटंसं पगडी नाट्य रंगलं, पण ते पुढे कुणीच ताणलं नाही. मात्र त्यातून गज्वी किती दक्ष व संकेतांची वेळ वाया घालवत नाहीत हे कळलं.

संमेलनाचे उदघाटक होते ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार. त्यांनी वाढत्या असहिष्णूतेवर, धर्माच्या आजच्या व्याख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सद्यस्थितीवर विस्तारानं भाष्य केलं. आविष्कार स्वातंत्र्यावर सरकार, राजकीय पक्ष ते विविध अस्मितावादी गट यांची समांतर चालणारी सेन्सॉरशिप यावर त्यांनी नाराजी तसंच उद्वेग व्यक्त केला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ‘देशात सर्वत्र भयग्रस्त वातावरण आहे. सर्वत्र मोकाट झुंडी फिरत आहेत. आणि मनोमन भीती पेरली जात आहे. सतत भय दाखवलं की, त्या भीतीनं माणसं गोठून जातात. मी शहरात राहतो आणि माझ्याजवळ जर नक्षली विचारांचं साधं पत्रक सापडलं तर मलाही शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का?’ असा सवाल गज्वी यांनी विचारला.

आजघडीला जो तटस्थ, विवेकी माणूस आहे, त्याला गज्वींच्या या विधानात आक्षेपार्ह काही वाटणार नाही. ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षांत ‘देशभक्त’, ‘देशद्रोही’ याविषयीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. आणि त्यातून जो उन्माद आणि बीभत्स असा झुंडीचा दहशतवाद पसरवला जातोय, त्यानं सर्वसामान्य माणूसही चक्रावलाय. अगदी ताजं उदाहरण म्हणजे पुलवामा इथं ४० जवान शहिद झाल्यावर नालासोपारा स्थानकात पाच ते सहा तास देशभक्तांच्या झुंडीनं सर्वांना वेठीस धरलं. त्याला काय म्हणायचं?

ज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर! काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.

ज्यांना गज्वींचं म्हणणं अतिशयोक्त वाटतंय, ते कुठल्या जगात वावरताहेत त्यांनाच माहीत! त्यांचं म्हणणं देशात मुळातच भयग्रस्त असं काही वातावरण नाही. लेखकांना लिहिण्याचं आज तरी मुक्त स्वातंत्र्य आहे. लेखकांची सरसकट धरपकड होतंय असं भारतात दिसलेलं नाही त्यांना!

हे कुठल्या भारतात राहतात माहीत नाही. लेखकांना लिहिण्याचं मुक्त स्वातंत्र्य आहे, तर मग पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची धरपकड न होता त्यांना ठार मारलं गेलं,  ते कुठे युगांडात?

मुरुगन नावाच्या लेखकानं स्वत:तल्या लेखकाची आत्महत्या केली, ती काय पेरू देशात?

आणि महिन्याभरापूर्वीच मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं, ते कराचीत का रावळपिंडीत?

हे असे स्वयंप्रज्ञेनं ‘धृतराष्ट्र’ झालेले रंगकर्मी असतील तर मग गज्वी सर तुम्ही म्हणताय ते त्यांना कसं दिसेल? बाकी गोरक्षक, दिनकर मनवरची कविता, अमोल पालेकरांचं भाषण अशी भलीमोठी यादी करता येईल. पण ज्यांचा पिंडच शुभ्रवस्त्रांकित, मुकुटधारी, मोकळ्या केसाच्या भारतमातेच्या पूजनात गेलाय, त्यांना सध्याचं उन्मादी वातावरण देशप्रेमाचा झंझावातच वाटणार. आणि हे म्हणे कलाकार, रंगकर्मी, रंगधर्मी वगैरे! वरचा मजला रिकामा असणाऱ्या सुमारांची सध्या सद्दी असल्यानं अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या तरच नवल.

महाराष्ट्रातले शंभरावर लेखक, कवी, कार्यकर्ते, जीवाला धोका म्हणून पोलिस संरक्षणात सक्तीनं डांबलेत. हे संरक्षण नव्हे तर सरळ सरळ त्यांच्या आयुष्यावरची पाळत आहे, याची माहिती अतिशयोक्त, बाष्कळ बडबड करणाऱ्यांनी आधी घ्यावी, मगच व्यक्त व्हावं.

दुसरा एक गट सावध आहे. तो गज्वींना उत्तम मार्कांनी उत्तीर्ण करत, गज्वींचा अनुभव हा त्यांचा (प्रामाणिक) अनुभव आणि आमचा अनुभव आमचा (प्रामाणिक) अनुभव. कलाकार आणि भूमिका यात आमच्यासाठी भूमिका म्हणजे कुठला विचार, इझम वगैरे नाही तर भूमिका म्हणजे कॅरेक्टर, व्यक्तिरेखा! ती कुठलीही असू शकते आणि ती रंगमंचीय अवकाशात असते आणि तिथंच संपते!

गज्वींविषयी आदर व्यक्त करत सद्यस्थितीवर कोणतंही थेट भाष्य न करता हा वर्ग ‘पतली गली’तून सटकतो.

मात्र अशा पार्श्वभूमीवर काही एक वर्ग असाही आहे, जो गज्वींच्या मताशी पूर्ण सहमत आहे. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाइंडर’च्या आठवणींसह सद्यस्थितीतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण किती प्रदूषित केलं जातंय, यावर ते गज्वींइतकंच ठामपणे बोट ठेवतात. आणि एवढ्यावरच न थांबता या वातावरणात जे गोठलेपण आलंय ते दामटवून जे आचार, विचार, लिखाण, पेहराव, खाणंपिणं यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय ते पुन्हा मिळवल्याशिवाय गोठलेपण जाणार नाही, असंही हा वर्ग बजावतो.

एकुणात बाहेरची एक झुंड या संमेलनातही होती. आणि तिनं गज्वींना अतिशयोक्त ठरवून, त्यांच्या प्रतिपादनाला उडवून लावण्याचा प्रयत्न केला खरा. पण झुंडीत सगळेच सामील नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं असेलच.

सर्वांत कमाल केली ती मुख्यमंत्र्यांनी. ते म्हणाले- ‘आविष्कार स्वातंत्र्याची तुम्ही काळजीच करू नका!’ (का त्यांना हे सुचवायचं होतं, कसलं आविष्कार स्वातंत्र्य वगैरे घेऊन बसता. ‘भारतमाता की जय’ म्हणा आणि लिहीत रहा?) पुढे ते असं म्हणाले, ‘नक्षली साहित्य मीही वाचलंय! म्हणून काही कुणी कुणाला पकडणार नाही. पण ते देशद्रोही इराद्यानं काही करत असेल तर घटनेच्या चौकटीत जरूर कारवाई होईल!’

आता कुणाचा काय इरादा आहे, हे जेव्हा सरकार आणि त्यांच्या आदेशानं पोलीस तपासतात, तेव्हा त्याचे अर्थ कसे काढले जातात, हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आणीबाणीत अनुभवलं आहेच. त्यामुळेच की काय एका बाजूला त्यांचं सरकार भिडे गुरुजींना क्लीन चीट देतं, तर दुसऱ्या बाजूनं प्रा. आनंद तेलतुंबडेंना पहाटे विमानतळावरून उचलतं! अशा सरकारच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं, ते कसं पटवून घ्यायचं? अतिशयोक्त विधानं करणारे जसे नयनतारा सहगल प्रकरण सोयीस्कर विसरले, तसे मुख्यमंत्रीही विसरले काय?

नागपूर शहरातच महिनाभराच्या अंतरानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित व्हावा, तोही साहित्य व नाटक या माध्यमातून, यावरून तरी गज्वींना अतिशयोक्त ठरवणाऱ्यांनी जरा आरसा स्वत:समोर धरावा!

ता. क. – प्रेमानंद गज्वींच्या विधानावर भाष्य करतानाच काल भारतानं पाकिस्तानात शिरून दहशतवादी अड्डा उदध्वस्त करून ३०० दहशतवाद्यांना ठार केलं. आता पुढचा आठवडा तरी पुन्हा ‘हाऊ जोश’ ऐकावं लागणार! त्या कंठाळी जयघोषात हा मुद्दा विरून जाऊ नये म्हणून मुद्दाम नोंदवलाय.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......