सहज वाचताना खूप टोकाचे वाटते, पण विचारांती पटते. भारतात जितके आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न आहेत, त्यांच्या मुळाशी जातीव्यवस्था आणि जातीयता आहे. जातीयता ही मानसिक विकृती बहुतेक सर्वच भारतीयांना जन्मजात मिळते आणि बहुसंख्य भारतीय मरेपर्यंत या विकृतीने ग्रासलेले असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयता हा विकार आहे, हे सर्वप्रथम दाखवून दिले. ‘जातीव्यवस्था विध्वंस’ या ग्रंथाच्या रूपाने एक ठोस विधान करत, काही अंशी कृती आराखडा दिला. त्यावर नीट अंमलबजावणी झाली नाही. जातीव्यवस्था आणि जातीयता यात नेमका फरक करून या प्रश्नाला पाहणे आणि त्यावर तोडगा काढणे आवश्यक होते. जातीव्यवस्था नष्ट झाली म्हणजे जातीयता नष्ट होईल, हे गृहितक अपूर्ण होते. ज्या गावगाड्यावर जातीव्यवस्था आधारित होती, तो गावगाडा नष्ट होऊन त्याचे उरलेसुरले अवशेष सरपण म्हणून वापरून राख झालेत. अलुतेदार-बलुतेदार आता फक्त ‘नॉस्टॅलजिक’ कढ काढण्यापुरता शिल्लक आहेत आणि जाती कागदावर ठामपणे मांड ठोकून बसल्या आहेत.
जातीव्यवस्थेला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अंगे होती. निवडणुकीच्या राजकारणाने जातीला राजकीय मूल्यसुद्धा प्राप्त झाले. या राजकीय मूल्याने ‘जाती’ला जबरदस्त ‘बार्गेनिंग पॉवर’ मिळवून दिली आहे. जोवर जातीला कोणत्याही स्वरूपाचे मूल्य शिल्लक आहे, तोवर जातीव्यवस्था अंत शक्य नाही. जातीव्यवस्था अंत करायचा म्हणजे नेमके काय करायचे? मला वाटत नाही याची निश्चित स्पष्टता नेमक्या पद्धतीने मांडली आहे. जातीव्यवस्थेच्या प्रश्नापेक्षा जातीयतेचा सर्वांत मोठा प्रश्न होता आणि आहे. जातीयता कोणतीही व्यवस्था नाही तर मानसिकता आहे, म्हणजे मानसिक विकृती आहे.
‘सर्टिफिकेट’ रूपात प्रमाणित झाल्यानंतर जातीला अस्तित्व प्राप्त झाले. भारतीय नागरिकांची जातीयवादी मानसिकता लहानपणापासून घरातले वातावरण, धार्मिक आणि सामाजिक जडणघडणीचा परिणाम असते. थोडक्यात जातीयता ही विकृती संस्कारांचाच एक भाग असतो. हे संस्कार इतक्या नकळतपणे केले जात असतात की, पालकांनाच समजत नाही. जे जात मानत नाहीत, त्यांच्या जात न मानण्याला मिळणारे महत्त्वसुद्धा जातीआधारीतच ठरते. वंचित/शोषितांची आर्थिक स्थिती कितीही सुधारली, वर्ग व्यवस्थेत ते कितीही वर गेले तरी सामाजिक आणि सांस्कृतिक मान्यता अपवादानेच मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या नकळत अत्यंत सूक्ष्मपणे आणि सूक्ष्म स्तरावर जातीयतेचे कार्य अगदी नकळत सुरू असते.
दोन उदाहरणे देतो. एक. वाईला एकवीस दिवसांची व्याख्यानमाला भरते. एका व्याख्यानासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना बोलावले होते. त्याधीच्या आणि नंतरच्याही व्याख्यानांना विचारमंचावर असणाऱ्या टेबलांना व्यवस्थित झालरी वगैरे टाकून सुशोभित केलेले होते, मात्र ज्या दिवशी आंबेडकरांचे भाषण होते, नेमके त्याच दिवशी मंचावरचे सगळे टेबल असेच बोडके राहून गेले होते. बाकी सुशोभित करणे वगैरे तर दूरच. हे कशामुळे होते?
आता दुसरे उदाहरण. एका उच्च पदस्थ अधिकारी मित्राला भेटायला त्याच्या ऑफिसात गेलो होतो. तिथेच त्याचा एक मित्र आलेला होता. देशीवाद, मेलुहा सभ्यता अशा विषयांवर चर्चा सुरू होती. बोलता बोलता मी म्हणालो, ‘मी विचारांनी ‘नेहरुव्हीयन आंबेडकराइट’ (दुसऱ्या शब्दात ‘संविधानवादी’) आहे. हे सांगताच मित्राच्या मित्राला चांगलाच धक्का बसला. नंतर ते गृहस्थ माझ्याशी काही बोललेच नाहीत. अर्थात अशा प्रसंगांचा मला सराव असल्याने मी नेहमीप्रमाणे ते एन्जॉयच केले.
‘मेरा बाप चोर है’ सारखेच दलितांच्या माथ्यावर अदृश्यपणे दलितत्व कोरलेले असते. जातीयतेची एक भेग, एक तडा कायमच शिल्लक असतो. दलितत्व कोणत्याही स्वरूपात उजागर झाले की, जातीय मानसिकता आपोआपच ‘ट्रिगर’ होते. नुकताच पुलवामा इथे झालेल्या आतंकी हल्ल्यात अनेक सैनिक मारले गेले. त्यातील एका दलित सैनिकाचा अंत्यसंस्कार गावाच्या स्मशानभूमीत करायला काही लोकांनी मनाई केली. या घटना कशाच्या आणि कोणत्या मानसिकतेच्या द्योतक आहेत? तर त्या विकृतीची लक्षणे आहेत. जातीय मानसिकता ही मूळ विकृती आहे. ती कशी नष्ट करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे.
भारतीयांची मानसिक जातीयता सामाजिक किंवा राजकीय धोरणांनी नष्ट होणार नाही. जर जातीयता नष्ट करायची असेल तर भारतीय समाजातील काही अत्यंत संवेदनशील धारणा बदलाव्या लागतील. कारण जातीयतेचा उद्गम ज्या धार्मिक आणि दैवी संकल्पनांशी जोडला गेला आहे, त्याची चिकित्सा तारेवरची कसरत आहे. जातींचा संबंध धर्माशी जोडलेला आहे, धर्माचा देव-देवतांशी आणि म्हणूनच अपरिहार्यपणे लोकांच्या श्रद्धेशी, त्यांच्या भावनेशी जोडलेला आहे.
जातीयतेवर, जातीव्यवस्थेवर धार्मिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली तर थेट असा समज होतो की, देव-देवतांवर टीका, निंदा-नालस्ती केली जातेय. परिणामी तार्किक किंवा विवेकी विचार मोठ्या समूहात निरुपयोगी ठरतात. उलट चिकित्सा करणारे शत्रू ठरून जीवानिशी जातात. माणसाच्या श्रद्धा व्यक्तीच्या धारणा, मान्यता आणि अहंकाराशी सुप्तपणे जोडलेल्या असतात आणि या आलटून-पालटून कार्यरत असतात. या श्रद्धा आणि अहंकार सामूहिकरित्या आविष्कारीत होतात, तेव्हा अस्मितांचे स्वरूप धारण करतात आणि सत्य मांडण्याचे, परिवर्तनाचे सर्व रस्ते बंद होतात.
जातीयता नष्ट करायची असेल तर ती ‘मानवनिर्मित’ आहे असे कथन निर्माण करून प्रस्थापित करावे लागेल. जातीयता मानवनिर्मित आहे हे सांगत असताना तिच्या भोवती असणारे दैवी अधिष्ठाने, धार्मिक आवरणे दूर करावी लागतील. म्हणजे परत सगळ्या गोष्टी फिरून तिथेच येतात. कारण देवाधर्मावर टीका करूच शकत नाही. आता या गुंताड्यातून मार्ग काढायचा म्हणजे लोकांच्या भावना, अस्मिता जपतच काढावा लागेल. कारण इथे लोकांवर लादलेल्या मानसिक विकाराचा इलाज करायचा आहे. मनोरुग्णांचा इलाज करताना त्यांना कधीही सांगितले जात नाही की, ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांना इलाजाची गरज आहे. ते नॉर्मल आहेत हे सांगतच त्यांना बरे केले जाते. जेव्हा सगळा समाजच मेंटल ‘असायलम’सारखा असेल तर जातीयतेसारखा एखादा मनोविकारसुद्धा समाजस्वभाव बनून, प्रतिष्ठा पाऊन प्रस्थापित झालेला असतो. जातीयता समाजाचा स्वभाव नसून मनोविकार आहे, हे सांगत पटवून देण्यातच हजारभर वर्षं खपली आहेत.
धर्म आणि देव यांसंबंधींच्या धारणा, श्रद्धा यांना धक्का न लावता जर जातीयता अंताचे प्रारूप निर्माण करायचे असेल तर ते फक्त आणि फक्त विज्ञानाचा वापर करूनच शक्य आहे. युरोपात धार्मिक वर्चस्वाला विज्ञानाने दिलेल्या आव्हानांना बघितले तर मला काय म्हणायचे ते सहज लक्षात येईल. ‘बायबल’ किंवा ग्रंथप्रमाणित ज्या धारणा आहेत, त्या असत्य किंवा खोट्या आहेत, हे सांगत न बसता जे काही निसर्ग नियम आहेत ते फक्त तिथल्या सुधारकांनी विज्ञानाचा अभ्यास करत, आधार घेत तिथल्या जनतेच्या लक्षात आणून दिले. आपले म्हणणे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले. त्यायोगे ज्या काही कुप्रथा होत्या, त्या बंद झाल्या, काहींना पायबंद बसला.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिगत जीवनावरील धर्माचे आक्रमण नाहीसे झाले. माणूस आपला धर्म आणि श्रद्धा वैयक्तिक भाग मानतो. त्यामुळे आपला धर्मच खरा असे म्हणत इतरांवर जबरदस्ती तो लादत नाही. धार्मिक पातळीवर सामाजिक समानता त्यामुळेच निर्माण झालेली दिसते.
अशा प्रकारे धार्मिक सामाजिक समता प्रस्थापित झाल्यानंतरही लोकांनी आपल्या श्रद्धा सोडून दिल्या का? तर नाही, व्यक्तिगत श्रद्धा सांभाळूनही समता स्थापित करण्याचे काम विज्ञानाने केलेले आहे. भारतात धार्मिकतेचा, देवा-देवतांचा, अवतार संकल्पनांचा, पुराणांचा, ग्रंथांचा वापर करून विश्वोत्पत्ती, जातीयतेच्या, उच्चनीचतेच्या ज्या धारणा प्रस्थापित केल्या आहेत, इतिहासात जो घोळ निर्माण केलाय त्याला विरोध न करता किंवा त्याचा खोटेपणा सांगत न बसता त्याला पर्याय म्हणून केवळ समांतर संकल्पना व धारणा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. कारण शेवटी लोक हेच विचारतात, ‘जर हे नाही तर याला पर्याय काय?’ त्यासाठी लोकांना पर्याय द्यावा लागतो.
भारतात, महाराष्ट्रात जातीयता अंताची चळवळ फक्त सामाजिक-राजकीय धारणा-धोरणांनी चालवली गेली. त्याबाबत जे काही कृती-कार्यक्रम होते, ते सामाजिक व राजकीय या दोन संदर्भातच होते. त्यांना इतिहासाच्या सम्यक आकलनाची किंवा विज्ञानाच्या तर्ककठोर, प्रमाणित डोळस अभ्यासाची जोड दिली गेली नाही.
सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे या चळवळी कायम क्रियावादी न राहता प्रतिक्रियावादी राहिल्या आहेत. व्यवस्थेला प्रतिक्रिया देण्यातच समांतर व्यवस्था उभी करता येऊ शकते हे विसरले गेले. प्रतिक्रियावादात व्यवस्था बदण्यासोबतच नवनिर्मिती आवश्यक असते याचे भान बहुतांशी बाळगले गेले नाही. त्यामुळे चळवळी नष्ट झाल्या किंवा कमालीच्या शिथिल झाल्या. डाव्या काय किंवा आंबेडकरी काय किंवा कोणत्याही कोणत्याही समांतर चळवळी काय या जरी परिवर्तनासाठी लढत असल्या तरी प्रत्यक्षात स्वत: चळवळी मात्र परिवर्तनशील नव्हत्या, परिणामी - भाकरी करपली, घोडा अडला. विज्ञान आणि इतिहासात होणाऱ्या संशोधनांचा आपल्या परिवर्तनाच्या लढ्यात वापर करून घेणे तर दूर तसा विचारही कोणी केलेला आढळत नाही.
मेलुहा सभ्यतेचा (हडप्पा सभ्यतेचा) शोध लागल्यानंतर त्याचा किती विचार डाव्या, आंबेडकरवादी चळवळीत केला गेला? त्या शोधाचे सामजिक महत्त्व किती लोकांना समजले? मेलुहा सभ्यतेचा शोध एक स्वतंत्र विधान आहे, हे शंभर वर्षांत पण समजू शकले नाहीत लोक? त्या सभ्यतेचा समांतर शोध घ्यायला हवा असे वाटलेले दिसत नाही. वैदिक सभ्यतेने गेल्या पंधराशे वर्षांत वर्णवर्चस्वासाठी जो स्वत:चा डिस्कोर्स निर्माण केला आहे, त्याच्या समोरचे आजवरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे मेलुहा सभ्यतेचा शोध होता/आहे.
जितक्या धार्मिक, दैवी, सांस्कृतिक, सामाजिक संरचनेच्या धारणा वैदिकांनी प्रस्थापित केल्या होत्या, त्या सगळ्यांना एका झटक्यात मेलुहा सभ्यतेने नष्ट करून टाकले आहेत, हे कुणाच्या ध्यानात आले का? आजवर वैदिकांनी सांगितलेला रामायण, महाभारत, पुराणातील सगळा इतिहास संशयाच्या भोवऱ्यात आला. या सगळ्या ग्रंथांना कल्पित महाकाव्याचे रूप प्राप्त झाले. त्यामुळे जर हा सगळा कल्पित इतिहास होता तर मग वास्तवातला इतिहास नेमका कोणता? तो शोधून काढण्यासाठी एक अभ्यासशाखा निर्माण झाली. रामायण- महाभारतादी ग्रंथ काळाच्या ज्या अशक्य आणि असंभाव्य मांडण्या करून ठेवल्या होत्या, त्या भाषाशास्त्रातल्या संशोधनाने संपवून टाकल्या. मानवी सभ्यतेचा काळ उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामुळे, लाखो वर्षांवरून केवळ काही हजार वर्षांवर येऊन ठेवला. प्रमाणांआधारित पुराव्यांनी भारतीय इतिहासातील एक एक गोष्ट निश्चित करत आणली. ‘आमच्याकडे हे सगळं होतं’ या दाव्याला काहीही पुरावे नाहीत, हे वारंवार सिद्ध होत राहिले.
मेलुहा सभ्यता उजागर झाल्यानंतर जातीव्यवस्था/ जातीयता संदर्भात विश्लेषणाचा संदर्भबिंदू ‘मेलुहा सभ्यता’च असायला हवा होता, तसे काही झाले नाही. किंबहुना दलित चळवळींनी दुर्लक्षच केले. मेलुहा सभ्यता वैदिक व्यवस्थेने रचलेल्या धार्मिक व्यवस्थेसमोर उभे राहिलेले प्रचंड आव्हान आहे हे लक्षात आल्यानंतर ते मोडून टाकण्यासाठी, ती सभ्यताच ताब्यात घेण्याचा प्रयत्न वर्चस्ववादी वैदिकांनी गेली किमान पन्नास वर्षं चालवला आहे. असा प्रयत्न का केला जातोय, ते करण्यामागची कारणे, अजेंडा जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा आंबेडकरवाद्यांनी केला नाही.
मेलुहा सभ्यतेचे रहस्य संपूर्ण भारतीय जातीय संरचना मोडून टाकण्याचे सामर्थ्य राखून आहे. देवाधर्माची ठेकेदारी स्वत:कडे घेऊन ज्यांनी कल्पनातीत जांगडगुत्ते निर्माण करून आपल्या विरोधकांचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतला होता, त्यांच्या अधिकारांना आव्हान देण्याची सर्वांत मोठी संधी प्राचीन जगासंदर्भात केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक शोधांनी उपलब्ध करून दिली आहे. धार्मिकतेच्या, देवांच्या आड लपवलेल्या स्वार्थी, वर्चस्ववादी धारणांना लोकांच्या भावना किंवा अस्मितांना धक्का न लावता विज्ञानाधारित पुरातत्त्वीय शोध आता थेट आव्हान करू शकतात. यावरून या वैज्ञानिक शोधांचे सामाजिक महत्त्व समजून घेतले पाहिजे.
ज्या ग्रंथांच्या दैवी प्रामाण्याच्या आधारावर सामजिक संरचना उभारल्या आहेत, त्या ग्रंथांच्या मर्यादा आधीच स्पष्ट झालेल्या आहेत. ‘ऋग्वेदा’सारख्या अपौरुषेय दैवी ग्रंथाचे प्राचीनत्व, त्यातील अद्भुतता दूर करण्याचे काम मेलुहा सभ्यतेने केले आहे. ऋग्वेद लाखो वर्षं जुना आहे वगैरे समज एका फटक्यात नष्ट करून तो फक्त साडेतीन हजार वर्षं वयाचा आहे, हे भाषाशास्त्राने सिद्ध केले आणि त्याचे दैवी प्रामाण्य नष्ट केले आहे. त्यामुळे पुराणे आणि त्यातील कथा आपोआपच काळाच्या मर्यादेत आले. कारण ऋग्वेद हा सर्व प्रथम निर्माण झालेला ग्रंथ हा समाज दृढ आहेच. पुराअनुवांशिकी, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्राचा इतिहास आणि उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताने चमत्कृतीप्रधान, अतींद्रिय कल्पनाविलास उघडा पाडला.
ज्या कथांच्या आधारे हिंदू समाजाचा सांगाडा उभा केला आहे, त्या कथाच सत्य नाहीत तर समाजरचनेची उभी, जात्याधारित मांडणी कोणी केली? या थेट प्रश्नाला भिडून उत्तरे मागण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. ज्या दैववाद आणि कर्मवादावर समाजाच्या मान्यता उभ्या आहेत, त्यांना ग्रंथांमध्येही प्रमाण नाही, हे सांगण्यासाठी वैज्ञानिक प्रमाण हाती आले आहेत.
ऋग्वेदातील ‘पुरुषसूक्त’ प्रमाणित ज्या विराट ब्रह्मपुरुषाच्या अवयवातून सगळ्या वर्णांची निर्मिती झाली आहे, त्या विराट पुरुषाची निर्मितीच फक्त दोन हजार वर्षापूर्वी झाली आहे. ज्या सूक्ताच्या आधारे जन्माधारित वर्ण निश्चित केले होते ते सूक्तच प्रतिक्षिप्त निघाले. हे पुरातत्त्वीय संशोधन आणि अभ्यास वापरून डिस्कोर्स करून त्याच्या उपयोजनाने कितीतरी लोकांमध्ये मानसिक बदल घडवून आणता येऊ शकतात. या पुराभाषाशास्त्रीय संशोधनाने वैदिक वर्णव्यवस्थेचा संपूर्ण आधारच नष्ट होतो. नंतरचे सगळे स्मृती, श्रुती ग्रंथ जाती उद्गमाच्या संदर्भात आपोआपच निकामी होतात.
एक उदाहरण मुद्दाम देतो. भारतीय ज्योतिषशास्त्र, त्यात्तील राशी फलसिद्धांत वैदिक व्यवस्थेचे एक मोठे हत्यार आहे. भारतीय हिंदू लोकांना या राशी म्हणजे अगदी पार सभ्यतेच्या सुरुवातीपासूनच हिंदूंच्या आहेत असे ठामपणे वाटते. राशींचा शोध भारतीयांनी लावलेला नाही, त्यांना राशींची ओळख फक्त तेवीसशे वर्षांपूर्वी ग्रीकांनी करून दिली. त्याआधी भारतीयांना राशी माहीत नव्हत्या. तरीदेखील या राशींच्या आधारे सगळ्यात जास्त धंदा भारतातच चालतो.
भारतीयांच्या जगण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका ज्या ‘कुंडली किंवा राशींसारख्या’ संकल्पना बजावतात, त्या मुळात भारतीयच नाहीत. त्यांचे उपयोजन भविष्य सांगणे कधीही नव्हते, केवळ ऋतू, काळ दिशा समजणे एवढ्यापुरताच मर्यादित होते, त्यावरून भविष्य वगैरे सांगणे ही निव्वळ स्वार्थी वैदिक करामत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे सविस्तर संशोधन झालेले आहे, मात्र ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. हा सगळा अभ्यास सोप्या भाषेत मांडून सातत्याने आणि निगुतीने लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. सगळ्या वैदिक संहितांच्या अर्वाचिनतेबद्दल बोलले पाहिजे, त्यांचा साहित्यिक मूल्य म्हणून चिकित्सा, अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून त्यावरचे धार्मिक आवरण काढता येईल.
शूद्रांचे शूद्र होणे, अस्पृश्यांचे अस्पृश्य होणे कोण्या एखाद्या ग्रंथाने किंवा दैवाने ठरवले नाही तर एका स्वार्थी, लोभी समूहाच्या कारस्थानाचा, सूडाचा भाग म्हणून त्यांच्यावर ते लादले गेले होते. हे फक्त या वैदिक संहितांच्या अर्वाचीन असल्याचे दाखवूनच सिद्ध करता येईल. कोणत्याही धर्मग्रंथाला नावे न ठेवता, शिव्या न देता त्यांचे सामान्यीकरण करता यायला हवे. साहित्य, भाषा, विज्ञान, इतिहास असा व्यापक डिस्कोर्स निर्माण करून जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात लगेच नाही पण दोन पिढ्यांत खूप बदल होतील आणि जातीयतेचा परिप्रेक्ष्य बदलेल. आज ज्या वेगाने देशातील सामाजिक स्थित्यंतरे होतायत त्याचा अंदाज घेऊन बांधणी केली तर काहीतरी कथन निर्माण होईल. अन्यथा पुढे काही बोलताही येणार नाही किंवा भांडताही येणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते.
फक्त राजकीय किंवा सामाजिक धोरणांनी खूप जास्त बदल घडणार नाही. व्यवस्था परिवर्तनापेक्षा व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे. शालेय शिक्षणात मुलांचा अधिकाधिक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल अशा तऱ्हेचा अभ्यासक्रम राबवला जाईल याची काळजी घेतली पाहिजे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत, शाळांमध्ये संस्कारांच्या नावाने जातीभेदाला, वर्णवर्चस्वाला पूरक ठरतील अशाच गोष्टी (उदा., प्रार्थना, सरस्वतीपूजन वगैरे) शिकवल्या जातात. परिणामी मुलांवर सखोल परिणाम होतात. लहानपणापासूनच विज्ञानाधारित अभ्यासक्रम निश्चित केला तर तसा दृष्टिकोन त्यांच्यात निर्माण होईल. कोणी जन्माला आल्यावर सहज देवाने पाठवलेय किंवा मेल्यावर देवाघरी गेले, असे मुलांना सांगणे किती घातक असते ते लोकांना कळत नाही. अगदी तर्कवादी किंवा नास्तिकांच्या घरातही अशी उत्तरे दिली जातात. तेव्हा लहान मुलांना पडणाऱ्या अशा प्रश्नांना सोपी आणि सुटसुटीत उत्तरे आजही आपण निर्माण करू शकलो नाही. त्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल.
ज्या दुर्दम्य कल्पनाविलासावर भारतातील धार्मिक-सामाजिक व्यवस्था उभी राहिली आहे, त्या धारणांना आव्हान म्हणून पुरातत्त्व, पुराभाषाशास्त्र आणि अनुवांशिकीच्या संशोधनाला प्रस्थापित करायला हवे. ज्या धार्मिक संकल्पनांच्या आधारे जात्युत्पत्तीला, जन्माधारित वर्णव्यवस्थेला प्रस्थापित केले आहे, त्याला ग्रंथांचे प्रामाण्य दिले आहे, ते भाषाशास्त्राने संपवून टाकल्यानंतर, त्याच्या निष्कर्षांना उपयोजित स्वरूप देऊन त्याचा वापर कोणीच केला नाही, तो करायला हवा.
पुराततत्व, भाषाशास्त्र, अनुवांशिकी, उत्क्रांतीवाद, मानववंशशास्त्र या आणि अशा विज्ञानशाखांनी धार्मिकतेवर आधारित समाजशास्त्राला तगडे आव्हान दिले आहे. मेलुहा सभ्यतेच्या पुरातत्त्वीय शोधांनी वैदिक वर्चस्वाची जी समाजशास्त्रीय मांडणी आहे, ती पूर्णपणे खोटी, हेत्वाधारीत ठरवली आहे, मेलुहा सभ्यतेच्या पुरातत्त्वीय शोधांना ठोस आधारभूत पुरावे अनुवांशिकीच्या शोधांनी देऊन त्यांना प्रमाणित केले आहे. या सगळ्या शोधांचा विचार समाजरचनेची पुनर्मांडणी करण्यासाठी करायला हवा. पुरातत्त्वीय विज्ञानासंदर्भात अभ्यास, संशोधन वाढवण्यासाठी बहुजनांतून मायकल वित्झेल, स्टीव्ह फार्मर यांच्यासारखे अभ्यासक निर्माण करायला हवेत, त्यासाठी स्वतंत्र स्वायत्त संस्था उभ्या करायला हव्यात.
‘जिनोम’ हा एक मोठा प्रकल्प अनुवांशिकीविज्ञांनी पूर्ण केला. मानवी डीएनएची संपूर्ण संरचना त्यामुळे निश्चित केली गेली, त्यासोबत मानववंशशास्त्रसंबंधी प्रचंड माहिती उपलब्ध झाली. त्या अभ्यासाआधारे प्राचीन जनुकांचा अभ्यास ही संशोधन शाखा विकसित झाली. या अभ्यासामुळे मानवी जनुकांचा प्रवाह कसा कसा जगभर पसरत गेला त्याचे निष्कर्ष प्राप्त झाले. भारतीय मानववंशशास्त्र आणि मेलुहा सभ्यतेपासूनच्या समांतर इतिहासात या संशोधनाला अतोनात महत्त्व आहे.
२०१४-१५मध्ये राखीगढी येथील उत्खननात प्राप्त झालेल्या सांगाड्यातून डीएनए विलग करून संशोधन केलं गेलं. त्याचे निष्कर्ष ऑगस्ट-सप्टेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध होणार होते ते अजूनही प्रसिद्ध झालेले नाहीत. या सगळ्या घडामोडीवर ‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाने एक कव्हर स्टोरी प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली होती. एका संशोधकाच्या संदर्भाने राखीगढीचे डीएनए हे आर्यांचे नाहीत असा निष्कर्ष प्राप्त झाला आहे. अर्थातच यावर हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड टीका, आगपाखड केली. या गदारोळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुटून गेला. ‘जर राखीगढीतील डीएनए आर्यांचे नाहीत तर मग कुणाचे आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी मोठे संकट आहे. या प्रश्नाच्या उत्तराची अजून थोडी वाट पहावी लागेल. वैदिकांसाठी आर्य बाहेरून आलेत हा वादाचा वा चिंतेचा मुद्दा नाही, तर ज्या ‘कुणाचे’ ते डीएनए आहेत तो मुद्दा मात्र धोक्याचा इशारा आहे.
या संशोधनाने केवळ मानववंशशास्त्रीयच नाही तर भारतातील सगळ्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक धारणा, मान्यतांचा पुनर्विचार करण्याची सक्ती निर्माण केली आहे. राखीगढीतील डीएनए आर्यांचे नसले तरी फार फरक पडत नाही, पण जर ते डीएनए पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचे किंवा आदिवासींचे असतील तर? तर मात्र खूप फरक पडतो, सगळ्या गोष्टी उलटपालट होतात. म्हणून काही उजव्या लोकांनी या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करायचे नाहीत आणि परदेशी संशोधकांनाही करू द्यायचे नाहीत असा प्रयत्न चालवला आहे.
या घडामोडींवर अत्यंत काटेकोरपणे लक्ष ठेवले पाहिजे, कारण आम्हाला निष्कर्ष बदलून किंवा फेरफार करून प्रसिद्ध करायचे आहेत, अशी मागणी पाश्चात्य संशोधकांकडे केली गेली आहे. निष्कर्ष बदलण्यासाठी कारण देताना सांगितले आहे की या निष्कर्षांनी देशात धार्मिक-सामाजिक अराजक माजेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की, डीएनए अस्पृश्य किंवा आदिवासी या दोन समूहांपैकीच आहेत. अस्पृश्य किंवा आदिवासी मेलुहा सभ्यतेचे वारस होते एव्हढ्या एका सत्याने सगळा वैदिक डोलारा कोसळतो. मेलुहा सभ्यता आणि तिचे लोक अत्यंत आधुनिक, विकसित अशा नागर सभ्यतेचे रचयिते होते. इतिहास शिकवताना मोहेंजोदारो आणि हडप्पा या दोन शहरांव्यतिरिक्त काहीही सांगितले जात नाही. मात्र मेलुहा लोक किती पुढे गेले होते याचे उदाहरण द्यायचे झाले तर, साडेचार हजार वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियात नौकायन करून गेले होते, हे सिद्ध झाले आहे. यावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज येतो. यावरून या संशोधनाचे महत्त्व लक्षात येईल आणि का वैदिक वर्चस्ववादी करोडो रुपये मेलुहा सभ्यतेवर दावा सांगण्यासाठी खर्च करतायत हे सुद्धा समजेल.
धार्मिक-सामाजिक मागासलेपणावरून ज्या अस्पृश्य, आदिवासींना कायम हिणवले जाते, ते एका महानतम सभ्यतेचे रचयिते होते, फक्त इतकेच सिद्ध करायचे आहे. जातीय मानसिकता आपोआप बदलेल, सगळ्यांना बदलावीच लागेल.
(‘बिफोर अम्नेशिया : चाप्टर १. राखीगढचे भूत’ या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश.)
.............................................................................................................................................
लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.
waghnakhe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 27 February 2019
नितीन भरत वाघ, लेख अतिशय विस्कळीत आहे. वैदिकांना दोष देण्याव्यतिरिक्त दुसरं काही निपजंत नाही. कुडमुड्या ज्योतिषाने कुडमुडे भविष्य सांगितलं तर त्याचा दोष वैदिक परंपरेकडे कसाकाय येतो बुवा? लेखात अशी अनेक विवादास्पद विधानं आहेत. तूर्तास फक्त विज्ञानासंबंधी बघूया. तुम्ही म्हणता की प्रार्थनेमुळे वैज्ञानिक दृष्टीकोनाची हानी होते. मग आयझ्याक न्यूटन हा पार भोंदू वैज्ञानिक ठरतो. कारण की त्याचे वडील चर्चचे पाद्री होते. खुद्द न्यूटनने कितीतरी धार्मिक प्रबंध (= research papers) लिहिले आहेत. वैज्ञानिक व धार्मिक प्रबंधा यांची संख्या साधारणत: सारखीच आहे. ज्याच्यापासनं आधुनिक विज्ञान सुरू झालं तो न्यूटन मुळी ईश्वरावर विश्वास ठेवणारा असेल तर तुम्ही कोण मोठे लागून गेलात? कशाच्या जोरावर भंपक दावे करता की म्हणे सरस्वतीवंदनेने वैज्ञानिक दृष्टीकोन बिघडतो? तुमची वैचारिक बैठक अत्यंत डळमळीत आहे. ती अगोदर सुधरा. आपला नम्र, -गामा पैलवान