अजूनकाही
मा. राहुल गांधी,
सप्रेम नमस्कार.
आज तुम्हाला हे अनावृत पत्र लिहिण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाहता पाहता पाच वर्षं संपत आली आहेत. २०१४ची निवडणूक झाल्यापासून मी २०१९ची वाट बघत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत भाजप सरकारनं चालवलेले सामान्य जनतेचे हाल, बुद्धिजीवी लोकांची चालवलेली गळचेपी, कोणी काही बोललं की, लगेच त्याला ‘देशद्रोही’ ठरवण्याची पद्धत, यामुळे मी बराचसा डिस्टर्ब झालो आहे.
२०१४च्या सुरुवातीलाच पुण्यात मोहसीन शेखची विनाकारण हत्या झाली. तेव्हाच मला याचा थोडासा अंदाज आला होता की, आता पुढे काय वाढून ठेवलं आहे. आणि नेमकं तसंच काहीसं घडत गेलं. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये सामाजिक, आर्थिक वातावरण दूषित झालं आहे.
अर्थात हे सगळं होत जरी असलं तरी ‘निवडणूक जिंकणे’ ही पूर्णपणे ‘स्ट्रॅटेजी’ची बाब आहे. एव्हाना २०१९च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातही रणधुमाळी सुरू झाली आहे. गेली पाच वर्षं ‘टॉम अँड जेरी’चा खेळल्यानंतर नुकतेच भाजप-शिवसेना हे पक्ष एकत्र आले आहेत.
आपण जाणताच की, महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी जागावाटप केलं आहे आणि प्रचारालाही सुरुवात केली आहे, पण जनतेचा प्रतिसाद त्यांना निवडून देण्यासारखा दिसत नाही, निदान अजून तरी त्याचा स्पष्ट कल दिसून येत नाही. याचं कारण आहे महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांनी स्थापन केलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’कडे गेला आहे.
...............................................................................................................................................................
या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
...............................................................................................................................................................
अॅड. प्रकाश आंबेडकर बराच काळापासून महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. तुमच्या पक्षातून मला फक्त तुम्हीच दिसता आहात पायाला भिंगरी लावून फिरताना. बाकी काँग्रेस मंडळी या भोळ्या आशेवर आहेत की, लोक भाजपला कंटाळल्यामुळे परत काँग्रेसला निवडून देतील. परंतु त्यांचं हे आकलन पूर्णपणे चुकीचं आहे असं वाटतं. तुम्हाला क्रॉसचेक करून घ्यायचं असल्यास जरूर करून घ्या. पण याची तुम्हाला कल्पना असेल की, विविध गावांतल्या कितीतरी काँग्रेस समर्थकांनी वैतागून दुसऱ्या पक्षांची साथ धरली आहे.
त्यापैकी एकच उदाहरण सांगतो. सातारा जिल्ह्यात कोरेगाव म्हणून तालुका आहे. त्या तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती आधी काँग्रेसप्रणीत पॅनेलकडे होत्या, पण आता त्यांनी भाजप किंवा दुसऱ्या पक्षांची वाट धरली आहे. असो.
मला महाराष्ट्र राज्य काँग्रेसकडून फारशा काही अपेक्षा नाहीत. त्यांना वाऱ्याच्या दिशेचा अंदाज आलेला नाही किंवा ते त्यांची मनसबदारी सांभाळण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्याकडे मला कुठलीही व्हिजन दिसत नाही. त्यामुळेच ते ‘वंचित बहुजन आघाडी’ला ‘किरकोळ’मध्ये धरत आहेत.
सध्याचा काळ कठीण आहे, महाराष्ट्रातले भाजपविरोधी पक्ष जर वेगवेगळे लढले तर पुरोगामी विचारांची हार होणार हे नक्की. तुम्ही राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते आहात, काँग्रेसचे सर्वेसर्वो आहात. २०१९ला भाजपविरोधी पक्षांची मोट बांधल्याशिवाय गत्यंतर नाही. यापेक्षा दुसरा सक्षम पर्याय निदान सध्या तरी दृष्टिपथात दिसत नाही.
‘वंचित बहुजन आघाडी’चे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यामागे महाराष्ट्रात मोठा जनाधार उभा राहिला आहे. त्याला ‘इन कॅश’ करायची तुम्हाला आणि तुमच्या काँग्रेस पक्षाला नामी संधी आहे आणि सम्यक राजकारण करून ते यशस्वी करण्याचीही.
महाराष्ट्र राज्य काँग्रेसला असदुद्दीन ओवैसींची एमआयएम नको आहे, पण त्यांना बहुतेक इतिहासाचा विसर पडला असावा किंवा आहे. हीच एमआयएम त्यांच्याबरोबर सत्तेत होती. आपल्या आजी आणि कणखर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही १९७८ साली हैदराबादमध्ये एमआयएमला भेट दिली होती. १९६९मध्ये ३६९ विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेस इंदिराजी आणि सलादुद्दीन ओवैसी यांची भेट झाली होती.
सध्याच्या परिस्थितीविषयी बोलायचं झालं तर तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षासोबत एमआयएमची युती आहे. राजकारणात कुणीच कायमचा अस्पृश्य नसतो, हे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात येत नाही की, ते जाणीवपूर्वक ते लक्षात घ्यायला तयार नाहीत, हे कळायला मार्ग नाही. पण ही एक नामी संधी आहे आणि ती आपण घ्यावी असं मला वाटतं.
तुम्हाला मी रोहित वेमुलाच्या आंदोलनाच्या वेळेस हैदराबादमध्ये पहिल्यांदा बघितलं होतं आणि त्यावेळेसच समजलं होतं कि, तुमच्यात एक ‘जेन्युईन माणूस’ आहे. तुमच्यातली लोकांविषयीची आत्मीयता खोटी नाही. नाही तर सध्याचे पंतप्रधान सफाई कामगारांचे पाय धुण्याचं नाटक करतात, पण त्यांच्यासाठी सोयीसुविधा मात्र देत नाहीत.
अनेक पुरोगामी लोक तुमच्याकडे आशा लावून बसले आहेत. राजकारण हे कायमच बेरजेवर चालत असतं. नाहीतर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली नसती. महाराष्ट्रात सध्या बहुजन वंचित आघाडीच्या रूपानं तिसरा पर्याय उभा राहत आहे. अर्थात त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही, पण त्यांची शक्ती मोठी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः वाटाघाटी करून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती घडवून आणावी असं वाटतं.
कोण किती जागा लढणार, कुठून लढणार यावर चर्चेतून मार्ग निघू शकतो. आज तुम्ही छोटेपणा दाखवला तर उद्या तुम्हाला मोठेपणा मिळेल हे निश्चितच. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसवर विसंबून राहू नका. तुमचे विरोधी पक्षनेते भाजपबरोबर सलगी ठेवून आहेत. कदाचित त्यांच्या मुला\नातेवाईकांना उमेदवारी नाही मिळाली तर ते ‘जय श्रीराम’ करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. संजय निरुपमांना मुंबईबाहेर कुणी ओळखत नाही. महाराष्ट्र्र काँग्रेसमध्ये सध्या जर कुणी प्रॉमिसिंग असेल तर ते म्हणजे खासदार राजीव सातव. ते काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकू शकतात.
कुठे काँग्रेस नमतं घेईल, कुठे वंचित आघाडी नमतं घेईल आणि योग्य अशी आघाडी उभी राहील.
आजच्या काळातील सुजाण, सजग तरुण म्हणून माझी इच्छा आहे की, तुम्ही भाजपविरोधी पक्षांची योग्य मोट बांधून २०१९ला विद्यमान सरकार सत्तेवरून खाली खेचावं. त्याशिवाय मोकळा श्वास घेता येणार नाही.
बाकी जे लोक तुम्हाला कालपर्यंत ‘पप्पू’ म्हणत होते, ते आता घाबरले आहेत, कारण तुम्ही आता ‘पप्पा’ झाला आहात. तुमच्या देहबोलीतला वाढलेला आत्मविश्वास मला सुखावून गेला आहे. क्रिकेटमध्ये राहुल द्रविड जसा ‘दि वॉल’ होता, तशी ‘दि वॉल’ तुम्ही व्हा!
कळावे.
आपला नम्र
राजीव गांधींच्या व्हिजनमधून निर्माण झालेल्या नवोदय विद्यालयात शिकून आज स्वतःच्या पायावर उभा राहिलेला एक युवक!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dilip Chirmuley
Wed , 27 February 2019
मला पत्रलेखकाला सांगावेसे वाटते कि राहुल गांधीनी त्यांच्या पुरोगामित्वाचे असे काय दिवे लावले आहेत कि ज्यासाठी त्यांनी निवडणूक जिंकावी असे वाटते. आज भारतात पुरोगामित्व म्हणजे जे लोक भारताचे तुकडे व्हावेत किंवा अफझल गुरु व याकुब मेमन याना का फाशी दिले याबाबत आवाज उठवले त्याना महत्व द्यावे असे म्हणणे हे झाले आहे. पत्रलेखकाला पुरोगामित्व या शब्दाचा अर्थच समजलेला नाही असे पत्रावरून उघड झाले आहे.
Gamma Pailvan
Tue , 26 February 2019
एक युवका, तू स्वत:च्या पायावर उभा राहिलास त्याचं आम्हांस कौतुक आहे. पण त्याचा राजीव गांधीशी काय संबंध? बरं ते जाउदे. पप्पू पार बथ्थड ठोंब्या आहे. अगदी दगडच जणू. पण म्हणून त्याचा उपयोग भिंत बांधण्यासाठी कसा करता येईल? चुना व वाळू कोण देईल? सतत जनतेला लावूनलावून काँग्रेसींचा चुना संपला आहे. तशीच लोकांच्या डोळ्यांत फेकूनफेकून वाळूही फारशी उरली नाही. एकंदरीत घोड्यासारखं सजवलं तरी गाढव शर्यतीत नाही धावू शकंत. तुझा नम्र, -गामा पैलवान