अजूनकाही
२२ फेब्रुवारी म्हणजे कालपासून नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरू झाले. या संमेलनाची सांगता सोमवारी म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी होईल. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी आहेत. काल त्यांनी नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यानंतर केलेल्या घणाघाती अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
कलेसाठी कला की जीवनासाठी कला, या वादातून आपल्याला मुक्त व्हावं लागेल आणि नवा विचार स्वीकारावा लागेल; पण असा विचार आहे? होय आहे. आणि त्या विचाराचं नाव आहे, ‘बोधी विचार’.
‘बोधी’ म्हणजे ज्ञान... knowledge. ‘बोधी’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. जाणीव, समजूत, बुद्धी, ग्रह, सर्वज्ञता, स्पष्टीकरण, विषदीकरण, उपदेश, सूचना, जागृती, प्रज्ञा, करुणा.
‘कलेसाठी कला’ किंवा ‘जीवनासाठी कला’ या कलामूल्यातून काय हाती आलं ते आपण समजून घेतलं आहे. कलावादी म्हणतात, घराला आग लागली असेल ते सांगा, उपाय सुचवू नका; तर जीवनवादी म्हणतात, कलेनं उपाय सुचवला पाहिजे. घराला आग लागली असेल ते सांगाच, पण पाणी मारा नि विझवा हेही सांगा; पण बोधी विचार याही पुढे जातो. घराला आग लागली आहे, हे कलेनं सांगितलं पाहिजेच; पण ‘पाणी मारा नि विझवा’ हे सांगून ती कशी विझवावी हेही सांगितलं पाहिजे. घराला आग लागली आहे, पाणीही आहे; पण ती आग कशी विझवावी, याचं ज्ञानच नसेल तर उपयोग काय? कला सर्वार्थाने ज्ञानपूर्ण असली पाहिजे. झोपडीला लागलेली आग आणि उंच इमारतीला लागलेली आग एकाच पद्धतीने कशी विझवता येईल? दोन्हीचं तंत्र ways and means वेगळं असतं. कला सर्वार्थानं ज्ञानदर्शी असली पाहिजे.
जीवन प्रवाही आहे. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं! पारदर्शी! कला कुणाचीही बटिक नसते आणि बटिक असते ती कला नसते. आणि म्हणून कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अर्थ नसतो. कारण कला कलेसाठीही नसते आणि जीवनासाठीही, तर ती असते ज्ञानासाठी. ज्ञानात्मक कलाच कलेची नि जीवनाची वृद्धी करत असतात.
नाटक प्रथम वाङ्मय आहे आणि रंगमंचावर सादर होत असताना ते संहितेत बदलते, असं आम्ही आधीच म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही वाङ्मय असो वा रंगभूमी तीनच रूपांत बघतो. रंगभूमीचे तीन प्रकार येणेप्रमाणे-
१. रंजनात्मक रंगभूमी (Entertaining theatre)
२. प्रयोगशील रंगभूमी (Experimental theatre)
३. बोधी- ज्ञानदर्शी रंगभूमी (Theatre of knowledge)
नाटक हा गंभीर कलाप्रकार आहे, असं आम्ही म्हणत असलो तरी रंजनात्मक भूमिका असलेले नाट्यकर्मी आमचं थोडंच ऐकणार? जगभर रंजनात्मक गोष्टींचीच चलती आहे. कविता हा गंभीर कला प्रकारही जिथं रंजनाच्या पातळीवर प्रकटताना दिसतो, तिथं नाटक... आणि विनोदी नाटकांबद्दल तर बोलायलाच नको. मागणी तसा पुरवठा.
लेखनातील प्रयोग हे या नाटकांचं वैशिष्ट्य. म्हणजे कधी भाषेचा प्रयोग, कधी रचनेचा प्रयोग... वाचकाला/ प्रेक्षकाला कळो न कळो फारसं देणंघेणं नसतं. Abstract वा Absurd विसंगतीत सुसंगती शोधणं... असे प्रयोग वाङ्मयाच्या वाढीसाठी आवश्यक असतात; पण असे प्रयोग आशयाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे असतील तर अशा नाटकांचं महत्त्व. उदा. ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘एक शून्य बाजीराव’.
म्हणजे रंजनात्मक नाटकं मासेससाठी तर प्रायोगिक नाटकं क्लासेससाठी असं म्हणता येईल. एक लोकांचं मुबलक मनोरंजन करतं तर दुसरं प्रयोगशीलतेच्या नावाखाली वेगळं काही करू बघते. अशा वेळी ‘बोधी नाटक’ (Plays of knowledge), ज्ञानदर्शी नाटक महत्त्वाचं ठरते. ज्ञानदर्शी नाटकानं मानवी जगणं सुखकर करण्याचे सर्व मार्ग उलगडून दाखवले पाहिजेत. माणूस दु:खमुक्त करणे आणि तो दु:खमुक्त व्हायचा तर सर्व प्रकारचं ज्ञान; ज्ञानदर्शी नाटकानं सांगितलं पाहिजे.
जगात अनेक राष्ट्र, भाषा, संस्कृती, वाद, तत्त्वज्ञानं आहेत. गरीब-श्रीमंत आहेत. मागास-पुढारलेले आहेत. अनागर-नागर समाज आहेत. विविध धर्म-पंथ, मत-मतांतरे आहेत आणि हे सगळं रंजनात्मक, प्रयोगशील आणि बोधी रूपातच सिद्ध होत असते; पण आजवरच्या आपल्या साहित्याचं रूप कसं आहे, हेही एकदा नजरेखालून घातलं पाहिजे.
मराठीच केवळ नव्हे तर एकूण भारतीय साहित्यही तिथंच गोलगोल फिरताना दिसते. ज्या तऱ्हेनं शेक्सपिअर जगभर गेला. आपल्याकडे आला. इब्सेन किंवा ब्रेख्त; पण आपल्याकडचा एकही नाटककार जगभर का गेला नाही? काही नाटककारांची काही नाटकं गेली; पण काहीच का? एकही नाटककार समग्र का गेला नाही? दोन हजार वर्षांचा आपला नाट्यवारसा. पहिल्या शतकातील भारतीय रंगभूमीचा पाया घालणारा नाटककार अश्वघोष, तिसऱ्या शतकातील भास, पाचव्या शतकातील कालिदास, सातव्या शतकातील राजा हर्षवर्धन, आठव्या शतकातील भवभूती. यातील अनेकांची नाटकं तर रामायण-महाभारतातील कथातुकड्यांवर आधारलेली. रामायण वा महाभारत यातील संघर्ष व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, असा एकारलेल्या सूत्रात दिसतो. व्यक्ती विरुद्ध समाज या सूत्राचा तर मागमूसही नाही. परिणामी कलेतील समग्रतेचं वैश्विक भान हरवलेलं दिसतं. आजही अनेक नाट्यलेखक रामायण-महाभारत यातील कथातुकड्यांवर आपली गुजराण करताना दिसतात. भारतीय रंगभूमीवरील मान्यवर धर्मवीर भारती (अंधायुग), रतन थिय्याम (चक्रव्यूह), पंडित वसंत देव (अरण्य किरण), विनय मडगावकर (अश्वत्थामा हत:), रत्नाकर मतकरी (आरण्यक), गंगाराम गवाणकर (वस्त्रहरण), चेतन दातार (माता हिडिंबा) असे काही जुने-नवे नाटककार एकारलेलंच सूत्र वापरताना दिसतात. आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची निर्मिती करतात. यातून बाहेर पडायचं तर एकारलेपण घालवून समग्रतेचं भान देणारं नाटक सिद्ध करावं लागेल आणि यासाठी आपली भूमी, आपल्या भूमीचा इतिहास, आपली संस्कृती, आपली जीवनमूल्ये नीट समजून घेऊन समग्रतेचं जागतिक भान देणारं नवं स्वतंत्र नाटक लिहावं लागेल; पण त्यासाठी नवी बोधी-ज्ञानदर्शी वाङ्मयमूल्ये आपल्या मेंदूत साठवावी लागतील.
१. वेदना : वेदनेशिवाय कला नाही.
२. जाणीव : जाणीवेशिवाय वेदनेला अर्थ प्राप्त होत नाही. वेदना झाली पण जाणीवच झाली नाही कलावंताला, तर कला जन्मणारच नाही.
३. नकार : वेदनेच्या जाणिवेशिवाय वेदना देणाऱ्या घटकाला नकार देता येणार नाही. म्हणजे वेदना देणारा घटक नाकारला पाहिजे.
४. विद्रोह : वेदना देणारी गोष्ट जाणीवपूर्वक केवळ नाकारून उपयोग नाही तर त्याविरुद्ध विद्रोह (बंड, क्रांती) करावा लागेल.
५. करुणा : विद्रोहानंतर जो विध्वंस होईल आणि विध्वंसानंतर जे उरेल, खरं म्हणजे विध्वंसानंतर काय उरेल? पण, जे काही उरेल त्यावर करुणेची फुंकर घालावी लागेल. तरच मानवी जीवन पुन्हा उभं राहील आणि त्या वेदनेला विराम देईल.
वेदना केवळ मानव प्राण्यातच नसते तर ती इतर किडे-मुंग्यांतही असते आणि तरी आपण मानवी वेदनेचीच चिंता वाहत असतो. वेदना व्यक्तीची असते तसेच ती समाजाची आणि राष्ट्राचीसुद्धा असते. व्यक्तीमुळे समाज बनतो, समाजामुळं राष्ट्र, राष्ट्रांमुळे जग... त्याची काही एक उकल अशी...
१. व्यक्ती विरुद्ध व्यक्ती
व्यक्ती, व्यक्तीमधील संघर्ष : राग, लोभ, मद, मत्सर आदी समग्र जाणीव.
२. व्यक्ती विरुद्ध समाज
व्यक्ती समाजात राहते. व्यक्तीचा समाजाशी संबंध येतो. कधी प्रेमाचा, कधी रागाचा. व्यक्ती कधीकधी समाजाविरुद्ध काम करते. त्यामुळे समाजही व्यक्तीच्या विरुद्ध जातो. त्यातील ताण-तणाव व्यक्ती विरुद्ध समाज या घटकामध्ये येतात.
३. समाज विरुद्ध समाज
व्यक्तींचा मिळून समाज होतो; पण असा एकच समाज नसतो. अनेक समाज असतात. वैदिक समाज, बौद्ध समाज, जैन समाज, हिंदू समाज, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज. कधीकधी श्रद्धास्थानावरून कोणी काहीतरी बोलतो आणि त्या दोन समाजांत विशिष्ट ताण तयार होतो. त्या ताणांचं सर्वांगीण दर्शन इथं होतं.
४. समाज विरुद्ध राष्ट्र
अनेक समाजघटक मिळून राष्ट्र बनते. त्या राष्ट्रातील लोकं, त्यांची भाषा, त्यांची दैवतं, त्यांचा धर्म, त्यांची श्रद्धास्थानं असे अनेक घटक राष्ट्र या संकल्पनेत येतात. आपल्या राष्ट्रातील सर्व समाजघटक सुखी आहेत वा दु:खी; हे पाहणं राष्ट्राची जबाबदारी असते. राष्ट्र ही एक मौलिक संकल्पना आहे. जीवनातून राष्ट्र वजा केल्यास व्यक्ती वा समाज यांना काहीच अर्थ नसतो. त्याचप्रमाणे व्यक्ती वा समाज राष्ट्रातून वजा केल्यास राष्ट्रालाही काही किंमत उरत नाही. याचे समग्र दर्शन इथं अभिप्रेत आहे.
५. राष्ट्र विरुद्ध राष्ट्र
हे जग अनेक राष्ट्रांचं मिळून बनलेलं आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या सीमांचं रक्षण करीत असते. ती त्या राष्ट्राची जबाबदारीच असते. त्या राष्ट्राचं स्वत:चं आंतरराष्ट्रीय धोरणही असते. म्हणजे आपल्या राष्ट्राचे शेजारील इतर राष्ट्रांशी असणारे संबंध कसे असावेत हे तेते राष्ट्र बघत असते. तरीही एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी लढताना आपण पाहत असतो. कधीकधी त्या राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय धोरणही कारणीभूत असू शकतं. कधीकधी हे संबंध एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या उद्गारावरूनही बिघडू शकतात. अशावेळी राष्ट्रा-राष्ट्रातील संबंध बिघडून सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीतून मुक्त होणं किंवा न होणं याची काळजी घेणं वा न घेणं याचं दर्शन इथं अभिप्रेत आहे.
६. राष्ट्र विरुद्ध जग
आपण आपल्या राष्ट्रात राहतो आणि त्यावेळी आपल्या राष्ट्राच्या बाहेर उर्वरित राष्ट्रं म्हणजेच जग राहत असते. शेजारील राष्ट्रा-राष्ट्रांचे जसे संबंध असतात तसेच एका राष्ट्राचे इतर अनेक राष्ट्रांशीही संबंध असतात. एका राष्ट्राचे अनेक मित्रराष्ट्र तसेच शत्रूराष्ट्र असू शकतात. त्यातून राष्ट्रा-राष्ट्रांचे गटही तयार होतात. उदा. भांडवलदारविरोधी राष्ट्र किंवा भांडवलदारप्रेमी राष्ट्र. यामुळेच कदाचित आजवर दोन महायुद्ध या भूमीवर घडली. अशावेळी एखाद्या राष्ट्राची विशिष्ट कोंडी होऊ शकते. कुठल्या राष्ट्रगटात सामील व्हावं, युद्धप्रेमी की युद्धविरोधी, हे ठरवणं ती त्या राष्ट्राची जबाबदारी असते. याचं वस्तुनिष्ठ दर्शन आपलं आंतरराष्ट्रीय धोरण अधोरेखित करत घडवणं इथं अपेक्षित आहे.
कलाकृती मराठी असो वा भारतीय तिच्यातील एकारलेपणा जाऊन समग्रतेचं भान येणं महत्त्वाचं आणि त्यासाठी आम्ही अकरा बोधीसूत्रे-ज्ञानसूत्रे-Theory of knowledge समोर ठेवली आहेत. त्यातील गुण-दोषावर चर्चा होऊ शकते. त्रुटी दूर करून नवी भर टाकता येऊ शकते. यातूनच समग्रतेचं भान असलेल्या कलाकृती जन्म घेतील नि जगभर जातील. आधीच्या पिढ्यांना हे जमलं नसेल; पण नव्या पिढीला हे जमेल; कारण समग्रतेचं भान देणारी बोधीसूत्रे आता आपल्याला गवसली आहेत.
या संमेलनाच्या निमित्तानं मी जे काही सांगू इच्छित होतो, ते सांगून झालंय. अनेकांना असं वाटतं की संमेलनाध्यक्षानं सर्वच प्रश्नांवर बोललं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे; पण मी प्रत्येकच गोष्टींवर बोललं पाहिजे असं नाही. संमेलन संपलं की संपलं असं नाही. वर्षभर, पुढच्या शंभराव्या संमेलनापर्यंत मी आपल्यासोबत असणार आहे. पथनाट्य, बालरंगभूमी, दशावतार, तमाशा किंवा झाडीपट्टी रंगभूमीचा माझा व्यासंग नाही म्हणून मी सविस्तर बोललो नाही; पण अगदीच मला काहीच माहीत नाही असंही नाही. आदिवासींच्या कला, भटक्या-विमुक्तांच्या कला आणि एकूण कला आणि कलावंत यांचे अनंत प्रश्न आहेत नि शासनाचं सांस्कृतिक धोरणही आहे; पण कलावंतांना स्वत:चं कलावंतपण निरलसपणे जगता येत नाही. पोट भरण्यासाठी कुठंतरी नोकरी, कामधंदा करावा लागतो. जे खरंच कलावंत आहेत, वेगळं काही करू पाहतात, अशा प्रतिभासंपन्न कलावंतांसाठी सरकारनं (आणि समाजानंही) स्वतंत्रपणे अर्थसंकल्पातच तरतूद करणं काळाची गरज आहे. पुरस्कार, मानसन्मान वगैरेपेक्षाही हे महत्त्वाचं आहे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment