२२ फेब्रुवारी म्हणजे कालपासून नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरू झाले. या संमेलनाची सांगता सोमवारी म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी होईल. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी आहेत. काल त्यांनी नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यानंतर केलेल्या घणाघाती अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
हे ९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन शंभरीच्या वळणावर उभे आहे, एक वळणदार वळण घेण्यासाठी. अशा या वळणदार नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवताना मला मनस्वी आनंद होतो आहे. आणि या क्षणी, माझ्या नजरेसमोर ते पहिलंवहिलं नाट्यसंमेलन उभं राहिलं आहे, जे मुंबईत इ.स. १९०५ साली संपन्न झालं होतं. ज्याचे अध्यक्ष होते मा. ग. श्री. खापर्डे. आणि स्वाभाविकच आठवतात नंतरचे अध्यक्ष न. चिं. केळकर, गिरिजाबाई केळकर. आठवतात बालगंधर्व, आठवतात अत्रे, आळतेकर, पु. ल. देशपांडे, शिरवाडकर, कानेटकर, विजयाबाई… आणि लक्षात येतं, अरे असं कसं झालं? महत्त्वाची नावं या संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर कशी राहिली? विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गो. पु. देशपांडे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर... हा प्रायोगिक रंगभूमी विरुद्ध व्यावसायिक रंगभूमी असा सुप्त संघर्ष म्हणायचा की, आपल्या एकूणच खुज्या आकलनाचा परिणाम! संमेलनाचा अध्यक्ष तोच होऊ शकतो जो परिषदेचा सदस्य आहे, पण असे नामवंत परिषदेचे सदस्य का बरे होत नाहीत?
१.
माझे गुरू दोन. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे तथागत बुद्ध. दोघंही ज्ञानदर्शी. या दोघांचं बोट धरून माझं बालपण विकसित झालं. बहरत आलं. परिणामी घराबाहेर मला धर्माची गरज लागत नाही. कारण, माझ्या देशाचं संविधान धर्मनिरपेक्षता हे तत्त्व घेऊन उभं आहे आणि हे तत्त्व मी मानतो. पण...
भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
बालभारतीच्या पानापानात
आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत
जातीयतेच्या रक्तपितीने सडलेल्या भारतात
खरं सांगू
तुझी संस्कृतीचं किडलेली आहे मुळापासून
या अशा ओळी गरगरत समोर येतात... ‘घोटभर पाणी’मधील या ओळी माझ्या मेंदूचा ताबा घेतात. मेंदू सैरभैर होतो. मी लेखक कलावंत आहेच; पण सोबतच मी या देशाचा एक नागरिकही आहे. देशात घडणाऱ्या आणि घडलेल्या सर्व घटनांचे तीव्र आघात माझ्या मेंदूवर होत असतात आणि मेंदू भूतकाळाचाही धांडोळा घेऊ लागतो. जगाच्या इतिहासात सिंधू नदीच्या परिसरात बसवलेली सिंधू संस्कृती जी, जगश्रेष्ठ होती, ती अचानक कशी नष्ट होते? चाळीस फूट जाड भिंतीच्या आत वसवलेली सुविहित नगरं कशी नष्ट होतात? वैदिक काळ येतो. वेदाची रचना होते. पुरुषसुक्त रचलं जातं आणि माणूस चार वर्णात विभाजित केला जातो आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू लागतो. बुद्ध येतो. आणि मग शांततेचं गाणं गात समता येते. महावीर येतो. अहिंसेला साद घालतो. शक, हुण, मोंगल, इंग्रज येतात. आक्रमणं करतात. आणि या भूमीला गुलाम करतात. आणि गुलामीची जाणीव होताच मग १८८५ साली स्वातंत्र्याची चळवळ उभी राहते. देश स्वतंत्र होतो. आणि वाटत राहतं देश,देशातील जनता विवेकाची कास धरील पण देशाला वेगळाच अनुभव येतो.
नथुराम गोडसे या हिंदूराष्ट्रवादी व्यक्तीनं महात्मा म्हणून गौरवलेल्या गांधींच्या छातीत पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या आणि गांधींचा खून केला. त्याचा सूड, गोडसे हा खुनी ब्राह्मण जातीचा असल्यामुळे ब्राह्मणांची घरे जाळून घेतला गेला. देश स्वतंत्र झाला आणि अवघ्या पाच महिने पंधरा दिवसांत सामूहिक विवेकाचा बळी गेला.
इंदिरा गांधी यांचा खून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी बियांतसिंग आणि सतवंतसिंग यांनी स्टेनगनमधून गोळ्यांचा वर्षाव करून केला. हे दोघंही इंदिराजींचे बॉडीगार्ड. धर्मानं शीख म्हणताच असंख्य शिखांचं शिरकाण करण्यात आलं. इथंही विवेकाचाच बळी गेला. इ.स. २००२ साली गोध्रा येथे मुस्लिमांचं शिरकाण करणाऱ्या दंगली आणि भीमा कोरेगावला १ जानेवारी २०१८ रोजी पूर्वजांच्या पराक्रमाला अभिवादन करायला जाणाऱ्या बौद्ध समाजावर होणारे प्राणघातक हल्ले किंवा घरात मांस सापडले नि ते गाईचेच आहे हे ठरवून झुंडीनं घेतलेला ‘तो’ दादरीतला बळी. सतत भय! भय दाखवलं की भीतीनं माणसं गोठून जातात. जिवंत माणसं जिवंत मढी होऊन जातात. आणीबाणीच्या काळात हाच अनुभव आला आणि बाबरी मशीद पाडली तेव्हाही. सर्वत्र झुंडी फिरताहेत मोकाट. आता तर नवंच भय पेरलं जातंय मनामनांत! शहरी नक्षलवाद! मी शहरात राहतो नि माझ्याजवळ नक्षली विचारांचं साधं पत्रक सापडलं तरी मला केव्हाही शहरी नक्षलवादी ठरवला जाईल. असे हे आमचे राज्यकर्ते, ज्यांना आम्हीच निवडून दिलं. ही आमचीच माणसं पण कळत नाही प्रजेशी अशी का वागतात ते! बिचारी गरीब प्रजा...
हं, ते एक बरं झालं गरीब प्रजेवरून आठवलं. आमची प्रजा मुळीच गरीब असू नये असं मध्यंतरी राजाला वाटलं. राजानं फर्मान काढलं. दिवसाला बत्तीस रुपये कमावणारा माणूस गरीब असणार नाही. गरिबाला मोठा आनंद झाला. नेहमीप्रमाणे तो कामावर गेला. दिवसभर काम केलं. संध्याकाळी तो गरीब घराकडे निघाला. थकला होता दिवसभर काम करून. रस्त्यानं चालत असताना त्याला एक हॉटेल दिसलं. चहा प्यायची इच्छा झाली. तो हॉटेलात शिरला. चहा प्यायला. वेटरनं बिल दिलं आणि मग ते त्या गरिबानं काऊंटरवर दिलं. चहा घेतल्यामुळे त्याला तरतरी आलीच होती. तो तडक घरी आला. त्याची बायको घरी त्याचीच वाट पाहत होती. नवरा घरी येईल, पैसे देईल मग मी स्वयंपाकाची तयारी करीन. तिनं नवऱ्याला पैसे मागितले. नवऱ्यानं खिशात हात घातला. जीएसटीसकट चहाचं ३१ रुपये झालेलं बिल देऊन, उरलेला एक रुपया त्यानं बायकोसमोर धरला. त्याची ती बायको आणि तिच्या पदराला धरून उभी असलेली ती दोन चिमुकली पोरं त्या गरिबाच्या हातातील रुपयाकडे नुसती पाहत राहिली. ती बाई म्हणत राहिली, ‘‘राजा भिकारी...’’
२.
आमचं सरकार वृद्धापकाळामुळं थकलेल्या साहित्यिक/कलावंतांना मानधन देते. ‘क’ श्रेणी १५०० रुपये, ‘ब’ श्रेणी १८०० रुपये आणि ‘अ’ श्रेणी २१०० रुपये. या पैशात कलावंताचं महिन्याला लागणारं रेशन तरी येतं का? थकलेल्या कलावंतांचा असा अपमान कशासाठी? कलावंतांचा असा अपमान करून राज्यकर्त्यांना काय समाधान मिळतं बरं? पण, हा दोष राज्यकर्त्यांचा नाही. कलावंतही अनेक कारणांनी लाचार होतात. मान-सन्मान, प्रसिद्धी हवी असते. आसरा हवा असतो. आसरा हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही. आपण राजाश्रय म्हणूया! आसरा-आश्रित-राजाश्रय या शब्दांचा आशय एकच असला तरी मनाला कसं बरं वाटतं!
३.
जोतीराव फुले हे खरे क्रांतीविचारक, समाजधुरीण. त्यांनी नाटक लिहावं हेच आश्चर्यकारक आहे. तेही स्वतंत्र. शेतकरी कुटुंबाला लुबाडणाऱ्या भटजीची काळी कृत्ये. सत्याची महती सांगणारं हे पहिलं प्रायोगिक नाटक. विदूषक या पात्राची यथोचित मांडणी. एकच नाटक लिहिलं तेही नाट्यतंत्रबद्ध; पण या नाटकाचा प्रयोगच झाला नाही. इ. स. १८५५ साली लिहिलेलं, ‘तृतीय रत्न’ हे नाटक १९७८ साली ‘सत्यशोधक’मध्ये प्रसिद्ध झालं तेव्हा कळलं महाराष्ट्राला. अशी लपलेली माणकं आपण शोधली पाहिजेत. या क्षणी आम्हाला सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांनी ‘नाटककार’ म्हणजे काय याची व्याख्या केलीय, ती आठवते. ते म्हणतात, ‘‘जो या अवघड कलेच्या साधनेसाठी आयुष्याची उमेद वेचायला तयार असतो. आणि या कलेद्वारे जो मानवी मनाची आणि जिण्याची लहानमोठी कोडी सोडवून दाखवण्याची जिद्द दाखवतो, तो नाटककार.’’ ‘तृतीय रत्न’ या व्याख्येत अलगद बसते. जोतीराव फुल्यांनी अधिक नाटकं लिहिली असती तर मराठी नाटक १९व्या शतकातच मोठं झालं असतं.
४.
नाटक ही एक स्वतंत्र वाङ्मयकृती आहे, अगदी कविता, कथा, कादंबरीप्रमाणेच. नाटक इतर कलांच्या आश्रयानं जगणारी कला आहे, असं म्हटलं जातं आणि वरवर पाहता ते खरंही वाटावं अशी स्थिती आहे. पण आम्ही तसं मानत नाही. खरं तर नाट्यकला ही जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. कविता, कथा, कादंबरी या साऱ्या वाङ्मय प्रकारांना नाटक स्वत:त असं काही बेमालूमपणे समाविष्ट करून घेते की... नाटकात ‘कथा’ असते, कादंबरीचा आवाका असतो आणि संवादलयीतून प्रकटत राहते काव्यात्मकता. आणि हे त्यांनाच शक्य होतं ज्यांना सर्वच वाङ्मय प्रकारांची नेमकी जाण असते; पण नाटककाराचं काम एवढ्यानं भागत नाही. त्याला स्थापत्यकला (नेपथ्य) माहीत असावी लागते. प्रकाश, रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, दिग्दर्शन तर खरेच; पण दोन शब्द वा दोन वाक्य यामधील ‘पॉज’चंही भान ठेवावं लागतं. आणि जोडीला शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीतकला म्हणजे जगातील सर्व कलांचं भान नाटककाराला ठेवावं लागतं.
आणि म्हणूनच नाटककार कोणाला म्हणावं, वा मानावं असा प्रश्न (नाटककार कोणाला म्हणावं, अशी तेंडुलकरांची व्याख्या दिली असली तरी) आम्हाला पडतो. नाटक हे प्रथम वाङ्मय म्हणूनच लिहिलं जातं आणि ते जेव्हा दिग्दर्शकाकडे जातं आणि मंचीय आविष्करणासाठी सिद्ध होऊ लागतं तेव्हा ते संहितेत बदलतं; पण याचं भान मराठी रंगभूमीवर उत्तरोत्तर हरवत गेलं. आणि म्हणून प्रश्न उभा राहिला, नाटककार कोणाला म्हणावं? नाट्यसंहितेत पात्रांची नावं लिहून कंसात दिग्दर्शकानं काय करावं हे सांगणाऱ्याला की चमकदार, चटकदार संवादाची फोडणी देणाऱ्याला की, मनसोक्त मनोरंजनी मन रिझवणाऱ्याला की बोजड, अनाकलनीय मेंदू शिणवणाऱ्याला? गंभीरपणे विचार न केल्यामुळेच नाटक लिहितो तो नाटककार असं मानण्याचा प्रघात पडला आणि नाटककार होणंच मारलं गेलं.
५.
संगीत रंगभूमीचे प्रणेते अण्णासाहेब किर्लोस्कर ते वसंत कानेटकर व्हाया बालगंधर्व ते आधुनिक रंगभूमीचे प्रणेते विजय तेंडुलकर असा विचार शांतपणे करून पाहा आणि मग रंगमंचावर भेंड्या खेळण्याची पाळी मराठी नाटकांवर का आली, याचं उत्तर सापडेल. प्रेक्षकांचं वाट्टेल तसं मनोरंजन करण्याच्या नादात बुद्धिवादी प्रेक्षक आपणच तयार करायचा असतो, हे विसरून गेलो; पण म्हणून बुद्धिवादी विवेकशील प्रेक्षक घडवण्याचे प्रयत्न झालेच नाही का? झाले. तेंडुलकरांची नाटकं किंवा महेश एलकुंचवार, गो.पु. देशपांडे, सतीश आळेकर, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, संजय पवार, जयंत पवार, चं. प्र. देशपांडे, राजीव नाईक, प्रशांत दळवी, मकरंद साठे असे लेखक मराठी रंगभूमी रसातळाला जाण्यापासून वाचवू पाहत होते; पण व्यावसायिक रंगभूमीनं या प्रयोगिक प्रयत्नांना गिळून टाकलं. काहींनी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीतील सीमारेषा पुसट झाल्या असा कांगावा करायला सुरुवात केली. आणि प्रायेगिक नाटक व्यावसायिक रंगमंचावर करायला सुरुवात केली. प्रायोगिक नाटक व्यावसायिक रंगमंचावर केल्याने ते व्यावसायिक होते, हा अजबच जावईशोध होता की, प्रायोगिक म्हणजे काय हेच कळत नव्हतं? असो. पण याचा परिणाम एकदम भलताच झाला. सत्यदेव दुबेंसारखी अव्वल प्रायोगिक व्यक्तिमत्त्वही आपल्या नाटकांची नावं चोख धंदेवाईक ठेवू लागली, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते.’ पण, याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण ‘कलेसाठी कला’ हे मूल्य काहीच करू शकत नाही. ते मूल्य काय घडलं एवढंच सांगा म्हणतं. उपाय सुचवू नका. ते लेखकाचं काम नाही, ते देवाचं काम. देव अवतार घेईल नि काय करायचं ते करील. म्हणजे कलावादी अवतारवादी आहेत तर! एकूण लेखकानं आपली अक्कल चालवू नये. फार तर कलाकृतीचं शीर्षक आकर्षक करावं, म्हणजे ‘थांब लक्ष्मी कुंकू पुसते’ वगैरे.
६.
‘कलेसाठी कला’मध्ये हे घडत असताना ‘जीवनासाठी कला’ इथं काय घडत होतं, हे पाहणंही आवश्यक आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक सर्वत्र विद्रोहाचे पंख फुटत होते. पहिली मुसंडी मारली ती दलित साहित्यिकांनी. हे स्वत: या साहित्याला आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य म्हणतात; पण डॉ. आंबेडकरांनी, ‘दलित साहित्य’ लिहा असं केलेलं भाष्य आम्हाला कुठंच सापडलं नाही. असो. ते आमचं वाचन तोकडं असल्याचा परिणाम असेल; पण बघता-बघता ग्रामीण साहित्य, कामगार साहित्य, आगरी साहित्य, सत्यशोधक, फुले-आंबेडकरी, आदिवासी, भटके-विमुक्त, मराठा साहित्य... आम्हाला धाप लागेल इतके साहित्य प्रकार उदयास आले. ब्राह्मणी साहित्य आधीच अस्तित्वात होते, सदाशिवपेठी साहित्य म्हणून. आणि एवढ्यानं भागणार नाही म्हणून अनेक वाद... आंबेडकरवाद, गांधीवाद, मार्क्सवाद, डावा-उजवा मार्क्सवाद, सत्यशोधकी मार्क्सवाद, विद्रोही मार्क्सवाद, साठेवाद, सावरकरवाद, मनुवाद, देशीवाद... काठावर बसलेल्यांचाही एक वाद आहे. आम्ही त्याला ‘न’वाद म्हणतो. आणि बघता-बघता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यांना विविध साहित्य/नाट्य संमेलनाचे पर्याय उभे राहू लागले. ही सारी जातनिहाय टोळीबाजांची संमेलनं होती/ आहेत.
७.
कला आणि कलावंत ही राष्ट्रीय संपत्ती आहे, हे मान्य केलं तरच नवं काही घडू शकेल. आणि तसं वातावरण निर्माण करावं लागेल; पण हे होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय शहाणपण सिद्ध करीत सर्वप्रथम धर्म घरात उंबरठ्याआत घ्यावा लागेल. कारण देशात सर्वांत अधिक आहे तो धार्मिक उन्माद आणि मग जात उन्माद. निसर्गानं माणूस जन्मास घातला; पण देव-धर्म जन्मास घातला नाही. कारण जगण्यासाठी त्याची गरज नव्हती. तो माणसानं जन्मास घातला आणि दादागिरी सुरू केली. देव-धर्माचं भय दाखवून माणूस गुलाम केला आणि मरणोत्तर स्वर्गाचं आमिष दाखवल्यामुळं माणूसही स्वत: गुलाम झाला. मी ‘किरवंत’चा शोध घेत होतो, तेव्हा स्मशानात अंत्येष्टी संस्कार करणारे अशोक जोशी स्वच्छ शब्दांत म्हणाले होते, ‘‘गज्वी, देव नाही, धर्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, स्वर्ग नाही, नरक नाही.’’ मी म्हटलं होतं, ‘‘तर मग तुम्ही हे लोकांना का सांगत नाही?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘कसं सांगणार? यावरच तर माझं पोट अवलंबून आहे.’’ लेखकानं कायकाय विचार करावा? देव-धर्म केवळ पोट भरण्याची सोय असावा? मेंदू सैरभैर होतो.
आरक्षण हाही असाच एक मानसिक रोग झाला आहे. वेळीच काळजी घेतली गेली असती तर या रोगाची लागणच झाली नसती. या रोगाची लागण-लक्षण आहे जात. जातीवर आधारित आरक्षण... आणि लाभार्थी आहेत हिंदू जातधर्मी... पण, जातच नसती तर..?
पण तसं झालं नाही आणि हिंदू जाती तशाच जिवंत राहिल्या आणि राखीव मतदारसंघाची पेरणी झाली. शिक्षण आणि सरकारी नोकरीतही राखीव जागांनी प्रवेश केला; पण तेव्हाच जात नष्ट केली असती तर जातनिहाय राखीव जागांचा प्रश्नच निर्माण झाला नसता आणि आता एकविसावे शतक... प्रत्येक जात झुंडीनं आरक्षण मागत सुटली आहे. अख्खा देशच जातस्फोटकांवर उभा आहे. तरीही एक तिसरी संधी आहे, हिंदू जाती नष्ट करण्याची. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, देशातील सर्व राज्यपाल, मुख्यमंत्री, कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्र येऊन ही जात नष्ट करावी. जात नष्ट झाली की आपसूकच जातधारित आरक्षण नष्ट होईल. देश जातस्फोटकांपासून वाचेल आणि समतेच्या दिशेनं आनंदाचं गाणं गायिल.
भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
बालभारतीच्या पानापानात
नव्हे...
या मातीच्या कणाकणांत!
८.
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणजे मी श्वास घेत तुमच्यासमोर उभा असणं असा नाही. जगण्याच्या प्रत्येक प्रश्नप्रसंगी मी ठामपणे व्यक्त होणं हे मी जिवंतपणाचं लक्षण मानतो. सत्य बोलण्याचं स्वातंत्र्य हवं आणि लोभानं वा भयानं माझ्या मनातल्या स्वातंत्र्यानं कच खाता कामा नये, असं मी मलाच बजावून ठेवलेलं आहे. आणि मी मला गवसलेलं सत्य समोर ठेवत आलेलो आहे. देशानं संविधान स्वीकारताना कबूल केलं होतं, या देशातील माणूस सुखी करू. सामाजिक व आर्थिक समता आणू; पण ते घडलं नाही म्हणून २०१५ साली मी ‘छावणी’ या नाटकामधून देशाला प्रश्न केला. तर ते नाटक ‘घटनाविरोधी’ ठरवलं गेलं. महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ नाटक ‘घटनाविरोधी’ ठरवते म्हणजे लेखक देशद्रोही? लेखकानं/कलावंतानं आपलं मत देशासमोर ठेवणं म्हणजे देशद्रोह? काय चाललंय या देशात? ही तर विचारांची गळचेपी. लेखकांनी सत्य सांगूच नये? ‘‘प्रयोगाची परवानगी आम्ही देणार नाही. लेखकानं ती न्यायालयाकडून घ्यावी.’’ असं मला सेन्सॉर बोर्डाच्या मिटिंगमध्ये सांगण्यात आलं होतं. हा मानसिक छळ कशासाठी? सेन्सॉरच्या या अरेरावीला वृत्तपत्रातून वाचा फुटली, तेव्हा पंधरा महिने अडवून ठेवलेल्या ‘छावणी’ला प्रयोगाची परवानगी दिली; पण तोवर लेखकाविषयी समाजात नकारात्मक संदेश पोचला होता. नाटक ‘घटनाविरोधी’ होतं, तर परवानगी दिलीच कशी?
सरकार तर खरेच; पण हल्ली कुणीही उठतो आणि लेखकाला/कलावंतांना वेठीस धरतो. धमकी देतो. तोंडाला काळं फासलं जातं. मारण्याची धमकी दिली जाते. ठारही केलं जातं. नाट्यगृहात बॉम्बस्फोट घडवले जातात; पण शिक्षा कुणालाच होत नाही. उलट हे गुंड मोकाट फिरत असतात. या गुंडांच्या भीतीनं कविता, कथा, कादंबरी, नाटक, स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीतकलांचा उत्तमोत्तम आविष्कार करायचं सोडून आता स्वत:च्या संरक्षणासाठी लेखक-कलावंतांनी विचारस्वातंत्र्य सेना काढावी काय, असा माझा थेट सवाल आहे. जिथं विचारांची निर्मिती मरते तो समाज मरतो नि ते राष्ट्रही मरते. विरोधी विचार म्हणजे आपल्या प्रजेच्या सुखासाठीचं मार्गदर्शन असतं. हे मार्गदर्शन सतत होत राहिलं पाहिजे. तरच प्रजेच्या सुखासाठी योग्य काम करता येईल. माझी सर्वांना विनंती आहे. एकमेकांच्या सुखासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची कास धरू. मानवी मनात दडून बसलेली कुरूपता नष्ट करू आणि हे जग भयरहित करू. सुंदर करू!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 26 February 2019
लेखकाने इतिहासाचा कपोलकल्पित अर्थ लावला आहे. म्हणे पुरुषसूक्तामुळे वर्णविभाजन झालं. पुरुषसूक्त अगोदरपासनं असलेल्या विभाजनाचं फक्त विवरण करतं. अमेरिकेत वर्णव्यवस्था नसतांनाही तिथली बहुतांश संपत्ती काही विशिष्ट घराण्यांच्या हातात एकवटली आहे (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/America%27s_60_Families ) एकंदरीत संपत्तीचं एकीकरण होण्याचा वर्णव्यवस्थेशी थेट संबंध नाही. आणि वैदिक संस्कृतीशी तर नाहीच नाही. ती एक स्वतंत्र सामाजिक प्रक्रिया आहे. असो. लेखक कादंबरीकार आहेत. त्यामुळे कल्पनेच्या भराऱ्या घ्यायची त्यांना सूट आहे. मात्र कल्पनेस वास्तवाचा आधार लागतो. तो नसेल तर लोकं त्यास बेवडा ढोसून घातलेला धिंगाणा म्हणतात. तशी वेळ लोकांवर येऊ नये ही इच्छा व्यक्त करून थांबतो. -गामा पैलवान