‘माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥’
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • संत तुकाराम यांचं एक पेंटिंग आणि ‘तुकारामगाथा’चं एक मुखपृष्ठ
  • Sat , 23 February 2019
  • पडघम सांस्कृतिक संत तुकाराम Sant Tukaram तुकारामगाथा Tukaram Gatha डॉ. श्रीराम लागू Shriram Lagoo परमेश्वराला रिटायर करा

डॉ. श्रीराम लागू यांचा ‘परमेश्वराला रिटायर करा’ हा लेख २४ नोव्हेंबर १९९१च्या दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला होता. त्यांच्या त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून वाचकांकडून आलेल्या निवडक १५१ प्रतिक्रिया ९ फेब्रुवारी १९९२ रोजी ‘महाराष्ट्र टाईम्स’ने प्रकाशित केल्या होत्या. त्यांत माझीही प्रतिक्रिया होती. या लेखाच्या आशयाशी संबंधित असा तिच्यातील भाग असा आहे - “आत्मानुभूती वा आत्मज्ञान नसलेला कुणीही आस्तिक वा नास्तिक माणूस संत तुकारामांच्या ‘माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥’ या अभंगाचा परम अर्थ समजूच शकत नाही... तुकारामांनी आधी देव जाणला (प्रवृत्तीयुक्त ज्ञान) आणि नंतर त्याला ‘निवृत्त’ केला. निवृत्त म्हणजे वृत्तीरहित आत्मस्थिती, म्हणजे परमेश्वरच! विशेष लक्षात घ्यावयाचे म्हणजे (डॉ. लागूंचे याकडे लक्ष गेलेले नाही.)....”     

ही प्रतिक्रिया लिहीत असताना व तेव्हापासून संत स्वत:बरोबरच देवालाही कसे निवृत्त करतात, याबाबत जे विचाररूपी बीजमन्मनरूपी भूमीत पडून होते, त्याचे झालेले एक छोटेसे झुडूप म्हणजे हा लेख होय.

आपला जीव सुखी व्हावा म्हणून ज्या देवाला आपुला करून घ्यावा, ज्या देवाची भेट घेण्याच्या आड आई, वडील, बायको, मुलगावा इतर कुणी येत असेल तर तेही विजातीचे म्हणून संग्रही धरू नये, साता दिवसांचा उपाशी असलात तरी ज्या देवाचे नाव घ्यायला विसरू नये, असा उपदेश जे करतात, तसेच जो देव भेटावा म्हणून जे १५ दिवस अखंड ध्यान करतात, ज्या देवाच्या भेटीपुढे ब्रह्मादिक देवांचेही पद ज्यांना नको आहे, ज्या देवाची भक्ती घडावी म्हणून जे मुक्तीही नाकारतात, ज्या देवाशिवाय इतर कुणाचीही थोरवी जर माझी वाणी गायली तर माझी जीभ झडो आणि ज्या देवाचे मुख पाहणे हेच माझ्यासाठी सर्वसुख असल्याने त्याची मूर्ती माझे हे डोळे सदा पहात राहो, असे म्हणणारे श्रीतुकारामच जेव्हा तो ‘देव माझे लेखीं मेला’ असे विधान करतात, तेव्हा ते अतिशय अर्थपूर्णच असणार. म्हणूनच ते समजून घेणे आवश्यक ठरते.

मानव, पशु, पक्षी, जीवजंतु कीटकादी एक ना एक दिवस मरतात; देवमात्र कधीही मरत नाही. या आपल्या समजुतीला शंभर टक्के आस्तिक असलेल्या श्रीतुकारामांच्या ‘माझे लेखीं देव मेला’ या अभंगवाणीमुळे चांगलाच धक्का बसतो; पण, लगेचच तिच्यातील अनुभवदर्शक शब्दरूपी वाऱ्याच्या स्पर्शाने ‘ज्ञानानंदाचे डोहीं ज्ञानानंद तरंग’ निर्माण होत राहतात आणि देवाचे स्वरूप समजून घेण्यात आपण दंग होऊन जातो.

श्रीतुकारामांप्रमाणे अन्य काही संतांनीही देवाबाबत विधाने केली आहेत. त्यांचाही अर्थ समजून घेत संत देवाचाही अंत जाणून असतात, हे समजून घेण्याचा व देण्याचा प्रयत्न मी इथे करीत आहे.

‘माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥’, हे श्रीतुकारामांच्या त्या अभंगाचे पहिले चरण आहे. यातून दोन गोष्टी सूचित होतात : १) त्यांच्या दृष्टीने देव आता देव राहिलेला नाही; पण, २) त्यांच्यासाठीही पूर्वी होता तसा तो इतरांसाठी मात्र अजून आहे. या दोन्ही गोष्टी श्रीजनाबाईंच्या दोन अभंगात स्पष्ट होतात. 

देव मरणे म्हणजे विठोबाची रांड रंडकी होणे         

श्रीतुकारामांप्रमाणे श्रीजनाबाईदेखील श्रीविठ्ठलाच्या परमभक्त होत्या. त्यांनीही आपल्या आराध्य देवाचा अंत होत असल्याचे म्हणजे त्या अर्थाचा अनुभव आपण वारंवार घेत असल्याचे उल्लेखिले आहे. श्रीतुकारामांप्रमाणे सामान्य भाषेतल्याच पण वेगळ्या शब्दांत त्या श्रीविठ्ठलास म्हणतात -

अरे विठ्या विठ्या । मूळ मायेच्या कारट्या ॥१॥ तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥ तुझे गेले मढे । तुला पाहून काळ रडे ॥३॥ उभी राहूनी अंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥

परब्रह्मज्ञानी संतांनी वैकुंठादि सृष्टीनिर्मितीपूर्वीची स्थिती अनुभवलेली असते. अर्थात, श्रीजनाबाईही त्या स्थितीचा अनुभव घेत होत्या. देवाच्या निर्गुण-निराकार रूपापासून मूळमायेच्या पोटी त्याच्या विठ्ठलनामक निर्गुण-सगुण-रूपाची निर्मिती होत असते. देवाचे हे रूप चर्मदृष्टीला दिसत नसते, म्हणून ते निर्गुण-निराकार होय; याउलट, ते दिव्य ज्ञानदृष्टीला दिसते म्हणून ते निराकारातील आकारी वा निर्गुणातील सगुण रूप होय. देवाचे ‘ते’ सगुण रूप संतांपुढे सदैव उभे असते. ‘या’ सगुण रूपातील देवाला संबोधूनच ते अभंग लिहीत असतात. अर्थात, या सगुण रूपालाच श्रीजनाबाई ‘विठ्या’ व ‘मूळ मायेच्या कारट्या’ असे म्हणत आहेत. यावरून सृष्टीनिर्मितीचा संकल्प म्हणजे त्या निर्गुण-निराकाराची आदिशक्ती किंवा मूळमाया होय व विठ्ठल हे त्या मूळमायेचे अपत्य होय.

देवाचे सर्वव्यापी मूळ स्वरूप जाणून घेतल्यानंतर त्याच्या विठ्ठलनामक विशेष अंशरूपाला उद्देशून ‘तुझी रांड रंडकी झाली’ असे त्या म्हणतात. रांड म्हणजे बायको. ती रंडकी होणे म्हणजे तिचा नवरा मरणे. समोर असलेल्या देवाला त्या ‘तुझी बायको रंडकी झाली’ असे म्हणतात. जीव देवाशी एकरूप होतो तेव्हा त्याचे जीवपण म्हणजे वेगळे अस्तित्व  संपते. त्याला देवाठायींच्या अचिंत्य शक्तीचा म्हणजे मूळमायेचा प्रत्यय येणे तत्त्वत: संपते. बायको म्हणून मूळमायेचे जे वेगळेपण होते ते देवाशी एकरूप झाल्याने लोप पावते. पर्यायाने म्हणजे सापेक्षतेने तिच्या नवऱ्याचे नवरेपणही संपुष्टात येते. या अर्थाने ते दोघेही जणू मेलेले असतात. असे अनुभवणे म्हणजे ‘देवाची रांड रंडकी होणे’ होय.

योगशास्त्रीय भाषेत सांगायचे तर जीवरूपी पत्नी व शिवरूपी पती यांचे ऐक्य झाल्यानंतर ती दोन्हीही सर्वव्यापी परमात्मस्वरूपात, परमेश्‍वरात  लय पावतात. परमेश्वराचे ते स्वरूप परब्रह्मज्ञानी संत अनुभवत असतात.

‘तुझे गेले मढे । तुला पाहून काळ रडे ॥’ असे देवाला उद्देशून श्रीजनाबाई म्हणतात. या त्यांच्या विधानाचा अर्थ श्रीकबिरांनी आपले वय सांगताना जे विधान केले आहे ते समजून घेताना स्पष्ट होतो. “करोडो विष्णु, करोडो कन्हैया आणि अगणित शंभुही होऊन गेल्याचे मी पाहिले आहे. (परमात्मवस्वरूप असा) मी सदैव आहे व कायम राहणार आहे”, असे त्यांनी म्हटले आहे. आपले हे रूप म्हणजेच ‘गीतेत’ श्रीकृष्णाने उल्लेखिलेली ‘काळ’नामक देवाची विभूती व/वा रामकृष्णादि अवतार ज्या ठिकाणाहून येतात व परत जिथे जातात ती परमोच्च स्थिती होय. काळ जसा मर्त्य प्राण्यांना गिळून टाकतो तसाच तो ब्रह्मा, विष्णु, महेश यांना व देवावतारांनाही गिळून टाकीत असतो. हा विचार श्रीकबीरकृत एका दोह्यात स्पष्ट होतो. त्याचा भावानुवाद असा : ‘धरती पाऊलीं पार करी, समुद्र एका उडीत । तोलीतसे पर्वत तयाहीं काळ असे गिळीत ॥’ वामनवातार, श्रीहनुमान यांच्याप्रमाणे गोवर्धन पर्वत तोलणारा श्रीकृष्णरूप देवावतारही काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. अर्थात, त्याचे मढे म्हणजे त्याचे विठ्ठलरूपही एक ना एक दिवस जाणारच म्हणून त्यावर प्रेम करणाऱ्या परमात्मस्वरूप म्हणजे काळाचाही काळ असलेल्या श्रीजनाबाई यांना वाईट वाटत होते; विश्वनिर्मात्याशी एकरूपता अनुभवणाऱ्या अशा त्यांच्या त्या दृष्टीने त्यांचे ते अपत्यही मरणार आहे म्हणून त्यांना जणू रडू येत होते. 

श्रीजनाबाई अंगणात उभ्या राहून देवाला शिव्या देत होत्या. अंगण म्हणजे वर उल्लेखिलेली सृष्टीनिर्मितीपूर्वीचा संकल्प होण्यापूर्वीची धुमधुमाकार, केवळ अचल अशी स्थिती होय. जगद्गुरू श्रीहंबीरबाबा यांच्यासारखे संत व योगी या स्थितीचा अनुभव घेऊन पुन्हा आपल्या निर्गुणातील सगुण-साकार रूपाने देवाची अंतरंग भक्ती करीत राहतात. श्रीज्ञानेश्वरांच्या भाषेत, स्वसंवेद्य देव सन्मुखपहात ते त्याची अविभक्तपणे म्हणजे अद्वैतातील द्वैत कल्पून अखंड सोऽहंभावाने भक्ती करीत असतात. संतांची ही सर्वोच्च पारमार्थिक भूमिका होय. देवाचा भास होणे, त्याचे आकाराला येणे व पुन्हा अंतर्धान पावणे ही संतभक्ताच्या संकल्पानुसार घडणारी विलक्षण बाब होय. अर्थात, निर्गुणी लपलेला देव संतभक्तांसाठी वेळोवेळी आकाराला येऊन पुन: मूळ स्वरूपगत होत असतो, असे श्रीतुकारामांनी, श्रीजनाबाईंनी व अन्य संतांनीही आपल्या अनेक अभंगातून उल्लेखिले आहे. उदा. ब्रह्मदेवाला उपदेश करून देव स्वरूपीच म्हणजे आहे त्याच ठिकाणी अंतर्धान पावला, असे श्रीएकनाथांनी म्हटले आहे.

देवाचाही आदि, अंत । होत्या श्रीजनाबाई जाणत ॥

देवाला शिव्या देणाऱ्या श्रीजनाबाईंनाही संतभक्तांसाठी रूपे धारण करणारा देव कोठून येतो व कुठे परत जातो ते ठाऊक झाले होते. म्हणून, आता मी निर्भय झाले असून देवा तुझा आदि व अंत मी जाणत आहे, नामामुळे बळकट झालेल्या मला वैकुंठाची पायवाट परिचित झाली आहे, ज्ञान, विवेक व वैराग्याच्या बळामुळे ते वैकुंठ (म्हणजे देवाचे ते रूप) आम्हां संतांबरोबर खेळत असते, असे त्या म्हणतात.

देवाचे तेआदि, अंत । होते श्रीतुकोबाही जाणत ॥

परब्रह्मरूपाने आपणच सर्वत्र भरून आहोत, या अनुभवास कैवल्य म्हणतात. कैवल्यावस्थेत आपल्याहून वेगळा असा देव राहिलेला नसतो. हा अनुभव श्रीतुकारामांनी ‘माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥’, अशा अगदी सामान्य भाषेत व्यक्त केला आहे.याच अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांनी देवाबरोबर आपलेही स्वतंत्र वा वेगळा कुणी एक म्हणून पूर्वी होते ते अस्तित्व खंडित होऊन गेले, असे म्हटले आहे. ‘गेलो दोघेही खंडोनी’ असे ते त्यांचे शब्द आहेत. म्हणून ‘कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा ॥’ अशा शब्दात जसा श्रीएकनाथांनी श्रीज्ञानदेवांचा महिमा वर्णिला आहे तसाच ‘कैवल्याचा पुतळा । श्रीतुकोबा सर्वांचा ॥’ अशा शब्दात श्रीतुकोबांचाही महिमा गाणे उचित होय. 

सृष्टी निर्माण होण्यापूर्वीची स्थिती म्हणजे देवाने निर्गुण-सगुण रूप धारण करण्यापूर्वीची स्थिती होय. श्रीतुकारामांनीही ती अनुभवली होती. आपले ते मूळरूप पुन्हा मागण्याची आपल्याकडे सत्ता आहे; देवाला ठावच राहणार नाही, असेही आपण करू शकतो; परंतु, केवळ भक्त म्हणून देवाचे कार्र करीत राहणे हा लौकिक जतन करून ठेवावयाचा म्हणून आपण तसे बोलतही नाही वा करीतही नाही, असेही त्यांनी अन्य एका अभंगात म्हटले आहे. 

थोडक्यात, कैवल्यावस्था म्हणजे देव व भक्त हे दोघेही तत्त्वत: उरत नाहीत, त्या दोघांच्या निर्गुण-सगुण रूपांचाही भास होणे संपते, अशी केवळ निराभास अद्वयावस्था होय.

हरपोनि जाय भगवंतता । ऐसी ती अद्वयावस्था ॥ - श्रीएकनाथ

त्या अद्वयावस्थेबाबत भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केला होता. त्याचा भावार्थ श्रीएकनाथांनी सांगितला आहे. तो असा - आत्मतत्त्वज्ञानी भक्ताला स्वरूपाची प्राप्ती होते, त्याचा देहाभिमान पूर्णत: विरून जातो, तो चैतन्यघन होतो, सत्चित्सुखात समरस होतो, निमग्न होतो. मी, तू हे कोण ही आठवण व ती करणारा मी कोणी एक आहे हे तो विसरून जातो. त्या ठिकाणी किंवा त्यावेळी स्वर्ग वा नरक, शुद्ध वा अशुद्ध, चौदा लोक हेदेखील असत नाहीत. तेव्हा उत्पत्ती वा विनाशही नसतो, वैकुंठ वा कैलासही नसतो; तर, केवळ एकले एक अद्वय ब्रह्मच असते. त्या स्थितीत, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की माझी भगवंतताही (भगवंतरूपही) तत्त्वत: हरपून जाते, अशी ती अद्वयावस्था किंवा सायुज्यता होय.

देवाधिदेवाच्या त्या रूपात विठ्ठलरूप विलीन होते! - श्रीज्ञानदेव

देव मेला, विठ्ठला तुझी रांड रंडकी झाली आणि भगवंतपणही हरपून जाते अशा भाषेत अनुक्रमे श्रीतुकाराम, श्रीजनाबाई आणि श्रीएकनाथ या तीन संतांनी जो विचार मांडला आहे तोच विचार श्रीज्ञानेश्वर यांनी देवाधिदेवाचे ते रूप म्हणजे विठ्ठलही नव्हे आणि त्या अद्वयावस्थेत देवरूपाचाही भास होत नाही, अशा वेगळ्या शब्दात मांडला आहे. त्यांच्या त्या दोन अभंगांचा भावार्थ असा -

१) ते रूप म्हणजे विठ्ठलही नव्हे! -‘मेरुपर्वतापलीकडे एक आकाश असून तेथे एक तेज:पुंज आहे. (पणनीट पाहू गेले तर) ते तेजही नव्हे आणि तेज:पुंजही नव्हे; शीतलही नव्हे आणि शांतही नव्हे; ते म्हणजे बापरखुमादेवीवरही म्हणजे विठ्ठलही नव्हे.’ अर्थात, देवाधिदेवाच्या त्या मूळ स्वरूपात त्याचे श्रीविठ्ठलरूपही विलीन होऊन जात असते.

२) अद्वयावस्थेत देवरूपाचाही भास रहात नाही. - ‘देवाधिदेवाशी एकरूप होणे म्हणजे सायुज्यता होय. सायुज्यता प्राप्त झाली की सादृश्यपण म्हणजे देवासारखे प्राप्त झालेले रूपही लोप पावते; देवाचे अवयव व त्यावरील अलंकारही मुरतात वा लोप पावतात. त्यावेळी ज्याला सर्वोच्च परमार्थ म्हणतात असे ते देवाचे अंतिम रूप दृष्टीस पडते. ते रेखारहित (अभंग) चिदाकाश म्हणजे बापरखुमादेविवराचे मूळ स्वरूप होय.’ त्या देवरूपाशी वा तत्त्वाशी समरस होणे म्हणजे अद्वयावस्था होय. अर्थात, त्यावेळी श्रीविठ्ठलाचाही भास रहात नाही.

सारांश - ‘माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥’ या अभंगातून श्रीतुकारामांना देवाबाबतचे पुढील सत्य सांगावयाचे आहे - काही जीव देवाचे स्वरूप तत्त्वत: जाणून घेतात. ‘पुन्हा जन्म नको’ म्हणून जे परमात्मस्वरूपात लीन होऊन जातात त्यांच्यासाठी देवाच्या निर्गुण-सगुण रूपाचा ‘भास’ होणे संपलेले असते. म्हणजे श्रीतुकारामांच्या लेखी देव मेलेला म्हणजे त्यांच्यासाठी तो पूर्णत: निवृत्त झालेला वा केलेला असतो. श्रीतुकारामांसारखे सदैव मुक्त असलेले भक्तजीव देवाच्या अवतारांबरोबर किंवा नंतरही परमार्थ करण्यासाठी वैकुंठाहून वरचेवर येत असतात. त्यांच्या ज्ञानदृष्टीला देवाधिदेवाच्या निर्गुण-सगुण रूपाचा भास पूर्वीप्रमाणे होत राहतो.

थोडक्यात, सृष्टीनिर्मितीपूर्वी होती त्या धुमधुमाकार, केवळ अचल स्थिती अनुभवणे म्हणजे सगुण-साकार देवाबरोबर स्वत:लाही रिटायर वा निवृत्त करणे होय.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 26 February 2019

नमस्कार श्री. विजय बाणकर, अप्रतिम लेख आहे. देव मेल्याचा भावार्थ उलगडून सांगितल्याबद्दल शतश: आभार. देव मेला म्हणजे देवाचं देवपण त्याच्याहून विलग झालं. विलग होऊन ते नेमकं कुठं गेलं? तर ते भक्तास चिपकलं. हे जाणून घेण्यासाठी भक्तीच पाहिजे. डॉ. लागूंची घोषणा आता पोकळ पोपटपंची वाटते. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......