अजूनकाही
हिंदीतील प्रसिद्ध कवी, निबंधकार, संपादक डॉ. नामवरसिंह यांचं नुकतंच वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. त्यांची एक आठवण सांगणारा हा लेख...
.............................................................................................................................................
हिंदी भाषा, साहित्य आणि समीक्षेला विलक्षण उंचीवर नेणारे प्रतिभावंत संपादक, कवी, निबंधकार डॉ. नामवरसिंह (२८ जुलै १९२६-१९ फेब्रुवारी २०१९) हे एक अत्यंत प्रभावी व भारदस्त व्यक्तिमत्त्व. ते भेटतील, त्यांचा स्नेहशील हात पाठीवरून फिरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण माझं भाग्य मोठं. शिवाजी विद्यापीठात एका उदबोधक वर्गाच्या उदघाटनाला ते येणार होते. त्याआधी काही दिवस दिल्लीतील एका सभेत त्यांनी वि. स. खांडेकरांवर धारदार टीका केल्याच्या बातम्या येऊन धडकल्या होत्या. अशा वातावरणात प्राध्यापकांच्या संयोजन समितीच्या बैठकीतही निषेधाचा सूर आळवला गेला.
गुरुवर्य डॉ. गो. रा. कुलकर्णी म्हणाले, ‘व्ही. के. तुमचं मत काय?’ मी म्हणालो, ‘सर, ते तिकडं काय बोलले, ते वर्तमानपत्रातनं आलंय, हे खरं, पण त्यात तथ्य किती? एक तर आपण त्यांना निमंत्रित केलंय. तेव्हा निषेधाची भाषा योग्य नाही. दुसरं म्हणजे नामवरजी कधीच काही तर्कविसंगत व सैलसर बोलणं शक्य नाही. तो त्यांचा पिंड नाही. तेव्हा…”
माझ्या म्हणण्याला डॉ. सुनीलकुमार लवटे यांनीही दुजोरा दिला.
नामवरजी आले. ताडमाड अशी शिडशिडीत नि शेलाटी अंगकाठी. ताम्रवर्ण, डोक्यावर विरळ रुपेरी केस, चष्म्याआड भेदक असे बारीक डोळे, अभिजात बुद्धिमत्तेची साक्ष देणारं भव्य कपाळ. ते बोलायला उठले, “देवियों आणि सज्जनों… मी उदघाटक म्हणून आलो आहे, हे तेवढं खरं नाही. ते एक तात्कालिक प्रयोजन. कारण मी आलो आहे ते दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे सम्राट शिवाजीच्या मुलखातील तांबडी माती कपाळावर ल्यावी म्हणून. दुसरं असं की, मनोमन मी ज्यांना गुरू मानलं आहे, त्या विभूतीच्या दर्शनासाठी. त्यांना मी कधी पाहिलं नाही. ते कुठे राहतात माहीत नाही. ते म्हणजे प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित डॉ. ग. वा. तगारे…”
झाले! दुसऱ्या दिवशीच्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांमध्ये ही वार्ता चौकटीत झळकली. योगायोगानं डॉ. तगारे तेव्हा आपल्या डॉक्टर मुलाकडे कोल्हापुरातच होते. ते काठी टेकत टेकत, वय वर्षं नव्वद – सभागृहात आले. नामवरजी तत्काळ व्यासपीठावरून खाली आले. एखाद्या बालकाप्रमाणे वाकून त्यांनी डॉ. तगारेंना नमन केलं आणि ते त्यांना अगत्यपूर्वक बरोबर घेऊन परत व्यासपीठावर गेले. संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध होऊन उभं राहिलेलं. मग नामवरजींच्या वाणीला वेगळंच तेज आलं. तास-दीडतास त्यांची रसवंती एका धीरगंभीर लयीत बरसत होती.
प्राध्यापकांच्या बैठकीत घडलेली घटना त्यांच्या कानावर गेली होती. परंतु ती त्यांनी कानाआड टाकली असावी बहुतेक. भाषणाच्या अखेरीस तर त्यांचा स्वर एकदम सदगदीत झाला.
डॉ. तगारे आमच्या सांगलीचे. त्यांनी माझ्याकडून नामवरजींची पुस्तकं आवर्जुन नेऊन वाचलेली. भाषण संपल्यावर मी डॉ. तगारेंकडे गेलो. त्यांना चरणस्पर्श कला. नामवरजींना त्यांनी माझी ओळख करून दिली. एवढ्यात एक छायाचित्रकार सरसावत पुढे आला. तसा मी तिथून बाजूला झालो. तेव्हा नामवरजी म्हणाले, “अरे बसंतजी, कहाँ भागे जा रहो हो? आओ ना… गुरु-शिष्य की भेंट का कोई तो गवाह होना चाहिए!” ते ऐतिहासिक छायाचित्र आजही माझ्याकडे आहे.
पुष्कळांना माहीत नसेल, डॉ. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ मिळालं, तेव्हा त्या निवड समितीचे अध्यक्ष नामवरजी होते. गंमत म्हणजे त्यावेळी पत्रकार परिषदेत काही तयारीच्या पत्रकारांनी त्यांना खोचक प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना त्यांनी दिलेली मार्मिक उत्तरं जाणकरांना नक्कीच आठवत असतील.
एक योगायोग सांगायलाच हवा. तो म्हणजे डॉ. तगारे आणि नामवरजी यांची जन्मतारीख एकच – २८ जुलै. डॉ. तगारे यांचं साल १९११ व नामवरजी यांचं साल १९२६. आणखी एक मौज म्हणजे २८ जुलैलाच पहिलं महायुद्ध सुरू झालं. शब्दांच्या लढाईतसुद्धा असे योगायोग असतात तर!
ही घटना आहे १४ मार्च २००१ची. नियती आणि निसर्ग यांची लीला कसल्या नि कुठल्या कार्यकारण संबंधांत आपण समेटणार?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 26 February 2019
लेखातनं नामवर सिंह व डॉक्टर तगारे यांची माहिती मिळायला हवी होती. -गामा पैलवान