अजूनकाही
वेदना आणि संताप.
पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर उमटलेल्या या प्रतिक्रिया मी समजू शकतो. किंबहुना, अशा कोट्यवधी भारतीयांमधलाच मी एक उद्विग्न झालेला नागरिक आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तोडून एक आत्मघातकी दहशतवादी घुसतो आणि आमचे ४२ जवान शहीद होतात ही सहजासहजी विसरता येण्यासारखी घटना नाही. हा हल्ला जैश-ए- मोहम्मदने केला आणि त्याला पाकिस्तानचा पाठिंबा होता यातही काही शंका नाही. या भयंकर प्रकाराचा फक्त निषेध करून भागणार नाही, तर पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल याविषयीसुद्धा काही शंका नाही. पण हा धडा कसा शिकवायचा याचा निर्णय भारत सरकारने घ्यायचा आहे. १९७१ साली इंदिरा गांधींनी जनरल सॅम माणेकशा यांच्या सल्ल्याने तो निर्णय घेतला होता. आता ती जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्याचे लष्करप्रमुख यांची आहे. १९७१नंतर आता ४८ वर्षं उलटली आहेत आणि सगळ्या जगाचं राजकारण बदलून गेलं आहे, हे हा निर्णय घेताना विसरून चालणार नाही. युद्धापलीकडे जाऊन पाकिस्तानच्या मुसक्या बांधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. यातला कोणता मार्ग वापरायचा, हा निर्णय भारत सरकारला अत्यंत शांतपणे घ्यावा लागेल.
या हल्ल्याच्या विरोधात देशभर प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. पण माणसं जेव्हा आपली मर्यादा सोडून हैवान बनतात, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊ लागतात, तेव्हा गप्प बसणं निव्वळ अशक्य असतं. पुलवामानंतरच्या काही प्रतिक्रिया पाहून डोकं अक्षरश: सुन्न होतं. एकीकडे छाती फोडत ‘कश्मीर हमारा है’ अशा घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे काश्मिरी जनतेवर हल्ले करायचे हा कसला प्रकार आहे? जम्मूमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी या हल्ल्यानंतर निषेध मोर्चा काढला. पण अत्यंत प्रक्षोभक घोषणा देत त्यांनी स्वत:च अतिरेक केला. ४०हून अधिक गाड्यांची मोडतोड करण्यात आली, दहा गाड्या पेटवल्या गेल्या, काश्मिरी व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली. तिथे डेहरादूनमध्ये हॉस्टेलवर राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना धमकावून बाहेर काढण्यात आलं. हाच प्रकार पंजाब, बिहारमध्ये घडला. काश्मिरी व्यापारी हे जणू पाकिस्तानचे हेर आहेत असं सांगणाऱ्या खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आल्या. मग जमावाने ठिकठिकाणी या व्यापाऱ्यांना लक्ष्य केलं. कोलकातामध्ये पंचवीस वर्षं प्रॅक्टिस करणाऱ्या एका श्रीनगरच्या डॉक्टरला जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. दिल्लीत एका हॉटेलमध्ये हा ‘देशभक्त’ जमाव घुसला आणि त्यांनी तिथल्या वेटर्सना ‘भारत माता की जय’ अशा घोषणा द्यायला लावल्या.
यात मोदी समर्थक आघाडीवर होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी व्हॉट्सअॅपवर अशा समविचारी मंडळींचा एक ग्रुपच तयार केला. मोदी जर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतात तर आम्ही देशातल्या अँटी नॅशनल्सवर तो का करू नये असा त्यांचा सवाल होता. सरकारवर टीका करणार्या, युद्धखोरीला आक्षेप घेणाऱ्या लोकांना धमकावणं, त्यांची अवहेलना करणं आणि त्यांच्यावर खटले टाकून त्रास देणं असे उपदव्याप हा ग्रुप गेला आठवडाभर करतो आहे. या सगळ्या हैदोसाला देशभक्ती कसं म्हणायचं? अतिरेक्यांविरुद्ध लढायची एवढी खुमखुमी या मंडळींमध्ये असेल तर त्यांनी लष्करात भरती व्हायला हवं किंवा सीमेवर जायला हवं. पण तेवढी हिंमत या विकृत लोकांमध्ये नसल्याने ते हा धुडगूस घालत आहेत. शहीद झालेल्या जवानांत एक काश्मिरी जवानही होता याचंही भान त्यांना राहिलेलं नाही. शहिदांच्या कुटुंबियांचे अश्रू सुकण्यापूर्वीच त्यांनी हे किळसवाणं राजकारण सुरू केलं आहे.
जैश-ए- मोहम्मदचा दहशतवाद अशा हिंदुत्ववादी दहशतवादाने संपेल असं मानणं हा निव्वळ खुळचटपणा आहे. विशेष म्हणजे, देशातली ही फूटच दहशतवाद्यांना हवी आहे. भारतात धर्मा- धर्मात भांडणं लागावीत, दंगली व्हाव्यात आणि हा देश कमकुवत व्हावा हीच या दहशतवाद्यांची इच्छा आहे. हे हिंदुत्ववादी गुंड नेमकी त्यांनाच मदत करत आहेत. दु:खाची गोष्ट म्हणजे या हिंसक प्रकारांचा ना पंतप्रधानांनी निषेध केला, ना भाजपने. उलट, असे प्रकार घडल्याचंच भाजपच्या काही मंत्र्यांनी नाकारलं. मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी तर कहर केला. काश्मिरी लोकांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. राज्यपाल झाल्यावरही संघाची टोपी न उतरवणाऱ्या या उपटसुंभाची घटनात्मक पदावर राहण्याची पात्रता नाही. त्यांची ताबडतोब हकालपट्टी झाली पाहिजे.
पुलवामा हल्ल्यानंतर राजकारण न करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. त्या आवाहनाला सर्व विरोधी पक्षांनी प्रगल्भ प्रतिसाद दिला. या मुद्यावर आम्ही सरकारच्या बाजूने उभे आहोत, असं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरं द्यायला ठाम नकार दिला. एखाद् दुसरा अपवाद वगळता सर्व विरोधकांनी हा संयम पाळला. पण भाजपला एवढा धीरही निघाला नाही. याची सुरुवात पंतप्रधानांपासून झाली. दहशतवादी हल्ल्यानंतर आपला एकही कार्यक्रम त्यांनी रद्द केला नाही. सगळीकडे भूमीपूजन आणि उद्घाटनं करत ते फिरले आणि हसतमुख फोटोही काढून घेतले.
सगळ्यात संतापजनक बाब ही की, यातल्या प्रत्येक कार्यक्रमाचा उपयोग त्यांनी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी तर केलाच, पण भाजपचा निवडणूक अजेंडा रेटण्यासाठीही केला. दहशतवादी हल्ल्यामुळे पंतप्रधानांनी सगळं काम थांबवावं का, असा खवचट सवाल मोदीभक्त विचारत आहेत. पण काम थांबवावं असं कुणाचंच म्हणणं नाही. पण प्रत्येक कार्यक्रमाचा ‘इव्हेंट’ करण्याची सवय तर ते या दु:खाच्या काळात आवरू शकतात? भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर हल्ल्याच्या दिवशीसुद्धा सभा घेतली आणि खासदार मनोज तिवारी नाचगाण्याच्या कार्यक्रमात मग्न होते. गुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. शहिदांच्या अंत्यविधीला हजर राहण्याचे आदेश भाजपने आपल्या स्थानिक नेत्यांना दिले. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली.
हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी. एनडीटीव्हीसारखा एखादा अपवाद सोडला तर बहुसंख्य चॅनेल्सनी आपल्या न्यूजरुम्सच्या वॉररुम्स बनवल्या. अँकर जणू लष्कराचे कमांडर बनले आणि ‘धडा शिकवा’, ‘चेचून टाका’, ‘तुकडे करा’ असे ओरडू लागले. जनरल बक्षींसारख्या लष्कराच्या काही माजी अधिकार्यांनीही धडधडीत खोटं बोलून यात तेल ओतलं. आपल्या हातात असलेल्या प्रभावी माध्यमाचा उपयोग कसा करू नये याचा धडा या सर्व मंडळींनी घालून दिला. वास्तविक अशा वेळी माध्यमांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे. समाजातली शांतता बिघडेल असं कोणतंही कृत्य त्यांच्या हातून होता कामा नये. पण प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्या वेळी बहुसंख्य भारतीय माध्यमं आपली नैतिकता गुंडाळून ठेवतात आणि शहीदांच्या चितेवर टीआरपीची पोळी भाजतात. अशी चॅनेल्स पाहताना किळस तर येतेच, पण आपण पत्रकार आहोत याची लाज वाटते. खरं तर, लोकभावना भडकवून, युद्धज्वर पसरवल्याबद्दल यांच्यावर खटले घातले पाहिजेत. किंवा समंजस नागरिकांनी अशा भडकाऊ चॅनेल्सवर बहिष्कार घातला पाहिजे.
हे कमी म्हणून की काय, सत्य सांगण्याचं काम करणार्या आणि शांततेचं आवाहन करणार्या मोजक्या पत्रकारांना लक्ष्य बनवण्यात आलं. रविशकुमार, राजदीप सरदेसाई, अभिसार शर्मा, बरखा दत्त यांचे फोन नंबर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यांच्यावर धमक्या, शिव्या, अश्लील मजकूर यांचा वर्षाव करण्यात आला. एकट्या बरखा दत्तला असे एक हजाराहून अधिक मेसेज आले. बरखा आणि अभिसारने पोलिसांत तक्रार केली, मध्य प्रदेशातून एका विकृताला अटकही करण्यात आली. पण एकट्यादुकट्याला अटक करून हा प्रश्न सुटणार नाही. कारण अशा अनेक विकृतांना आमचे पंतप्रधान ट्विटरवर ‘फॉलो’ करतात आणि सत्ताधारी पक्षाचा त्यांना उघड पाठिंबा आहे. ही विकृत मंडळीसुद्धा दहशतवाद्यांना मदतच करत आहे.
काश्मीरचा प्रश्न ही काही लुटुपुटुची लढाई नाही. तो टीव्ही स्टुडिओत किंवा रस्त्यावर सुटणारा प्रश्न नाही. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी आपण चुटकीसरशी हा प्रश्न सोडवू असं म्हटलं होतं. माजी पंतप्रधान वाजपेयींच्या ‘इन्सानियत, काश्मिरियत आणि जमुरियत’ या सूत्रांत आपण काम करू असं मोदींनी म्हटलं होतं. पण गेल्या पाच वर्षांत झालं उलटंच. लष्करी बळाचा वापर करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. गेल्या पाच वर्षांत काश्मीरमध्ये ६२६ दहशतवादी हल्ले झाले, ४८३ जवान मृत्युमुखी पडले आणि २१० नागरिक मारले गेले. २००९ ते २०१४ या मनमोहन सिंग सरकारच्या काळात १०९ दहशतवादी हल्ले, १३९ जवानांचा मृत्यू आणि फक्त १२ नागरिक मारले गेले होते. (आकडेवारी - साऊथ एशिया टेररिझम पोर्टल). केवळ लष्करी सामर्थ्याने काश्मिरचा गुंतागुंतीचा प्रश्न सुटणार नाही हे अनेक लष्करी अधिकाऱ्यांनीही आजवर सांगून झालं आहे. संवाद आणि राजकीय प्रक्रियेतूनच या समस्येतून मार्ग निघू शकतो. पण दिवसेंदिवस काश्मिरी जनता आणि सरकारमधली दरी वाढतच जाते आहे. काश्मिरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा नवा संवाद घडेल अशी अपेक्षा होती. पण त्याऐवजी भाजपने संघाचा अजेंडा राबवायला सुरुवात केली आणि हे सरकार पडलं.
पुलवामा हल्ल्यातला आत्मघातकी बॉम्बर पाकिस्तानी नव्हता तर तो आदिल अहमद दार नावाचा भारतीय तरुण होता. गेल्या चार वर्षांत शेकडो काश्मिरी तरुण दहशतवादाच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्या दहशतवादाचं समर्थन करायचं कारण नाही, पण ते अशा हिंसक मार्गाकडे का वळतात याचा विचार केल्याशिवाय संवाद साधला जाणार नाही. पाकिस्तान याच तरुणांचा वापर करून घेत आहे. आदिल अहमद पोलीस आणि सैन्याने केलेल्या छळाला वैतागून दहशतवादाकडे वळला. बुर्हाण वाणी मारला गेला तेव्हा झालेल्या निदर्शनात तो सामील झाला होता. त्याच्या पायात गोळी गेली. त्याला सहा वेळा अटक झाली. एक दिवस तो घरातून गायब झाला आणि असा आत्मघातकी अतिरेकी बनला. सुरक्षाविषयक धोरणात कोणतीही तडजोड न करता अशा तरुणांचा मनपरिवर्तन करणं आवश्यक आहे. नाहीतर काश्मीर फक्त अधिकृतरित्याच आपलं राहील.
या सगळ्या काळोख्या परिस्थितीत काही आशेचे किरण मात्र दिसतात. काश्मिरी तरुणांना धमक्या मिळायला लागल्या तेव्हा अनेक दिल्लीकरांनी आपली दारं त्यांच्यासाठी उघडली. शीख समाजातले तरुण आपल्या या देशबांधवांच्या मदतीसाठी पुढे आले. काही संस्थांनी त्यांच्यासाठी आसरा तयार केला आणि त्यांना अत्यावश्यक वस्तूही पुरवल्या. दुसरीकडे सीआरपीएफनं या तरुणांच्या मदतीसाठी हेल्पलाईन चालू केली. लष्करानं या आठवड्यात भरती चालू केली, तेव्हा काश्मिरी तरुणांनी मोठमोठ्या रांगा लावल्या. आज ना उद्या, दहशतवादाचा पराभव होईल ही आशा यातून निर्माण होत नाही काय? जगाच्या इतिहासात अंतिम विजय माणुसकीचाच झाला आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.
............................................................................................................................................
लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.
nikhil.wagle23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ameya Tupate
Fri , 22 February 2019
"जगाच्या इतिहासात अंतिम विजय माणुसकीचाच झाला आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही", असे म्हणणाऱ्या वागळे सरांचे इतिहासाचे वाचन तोकडे आहे, एवढेच यातून वाचकाच्या हाती लागते. असो. अशा उथळ विद्वानांमुळे मोदींसारख्या क्रूरकर्मा व्यक्तीचे फावते.
Prashant Bavane
Fri , 22 February 2019
Sagal satya aani neet mandley ...pan troll army , road army - Bajrang Dal , VHP , Karani Sena etc ya RSS chya hajaro different navachya branches aahet ...aani Police , Media , administration , courts ikade RSS che je lok aahet ....ya saglyanpasun lokana jagrut ani sanghtit karun , yanchya manuvadi vruttila sanghatit ( rajkiy parties kadun he kadhich shakya nahi) virodh kasa karta yeil yavar lekh aani vicharvantani ekatra yeun kam karaychi garaj aahe ... nahi tar nuste lekh ne kahi farak nahi padnar
PANDURANG DHAKANE
Thu , 21 February 2019
अगदी खरं आहे सर खूप छान लेख लिहीलात..