अजूनकाही
मराठी वृत्तवाहिन्यांच्या सौजन्यानं आपण गेली काही वर्षं मानवी वस्तीत घुसणारे बिबटे, उडणारी घबराट, तारांबळ, दहशत आणि नंतर वनखात्यानं बिबट्याला घेरून, डार्ट मारून, बेशुद्ध करून पिंजऱ्यात घालून न्यायचं व नंतर त्याच्या ‘नैसर्गिक’ अधिवासात सोडायचं, याचे वृत्तान्त सातत्यानं पाहिलेत. त्यामुळे जनतेला हा सारा घटनाक्रमही पाठ झालाय.
१८ तारखेला संध्याकाळी म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला असाच एक बिबट्या डार्ट मारून, ताब्यात घेऊन, ‘नैसर्गिक’ अधिवासात सोडला! बाकी साम्य सारखंच. फक्त तपशिलात फरक होता. म्हणजे बिबट्या चार पायांचा नव्हता, तर दोन पायांचा होता. तो स्वत:स ‘ढाण्या वाघ’ म्हणवतो, पण ज्यांनी डार्ट मारला त्यांच्यासाठी तो ‘बिबट्या’च होता. घटना घडली, मुंबई शहरात, बांद्रे उपनगरात. तिथं मातोश्री नामक चिरेबंदी वाड्यात हा बिबट्या ठाण मांडून बसलेला. सोबत एक बछडाही! आता बिबट्याचा बछडा असल्यानं, त्यालाही डार्ट नाही, पण कमळातल्या परागकणांची भूल देऊन बिबट्यासह जेरबंद करण्यात आलं.
वाघ, चित्ता, बिबट्या असे जे काही प्रवर्ग आहेत, त्यात बसणाऱ्यांना जंगलचा राजा ही उपाधी नसली त्याच्या डरकाळीला मोठी किंमत. आता हा दोन पायांचा बिबट्या ‘शिवसेना’ अशी डरकाळी वडिलोपार्जित वारशानं गेली ५० वर्षं महाराष्ट्रात फोडतोय. मूळ ‘ढाण्या वाघा’नं आपला अवतार सन्मानानं संपवल्यावर नव्या वाघानं गादी ताब्यात घेतली. ढाण्याच्या तुलनेत नवे युवराज सौम्य प्रकृतीचे. त्यामुळे ढाण्याचा ‘बिबट्या’ झाला.
ढाण्याच्या तुलनेत बिबट्या मनुष्यमात्रास अधिक सरावलेला. आता झालं असं- नव्या वाघास प्रत्येक गोष्टीस ‘शिव’ जोडण्याची आवड. म्हणजे ‘शिवसेना’ आहेच, ‘शिवशाही’ मंत्रालयातून थेट एसटीपर्यंत रस्त्यावर आली. मध्यंतरी वडापाव हा ‘शिववडा’ झाला. त्यानंतर स्वराज्य कंकणासारखं ‘शिवबंधन’ आलं. या ‘शिव’प्रयोगामुळे बिबट्याचा ‘शिवट्या’ झाला! आता कुणी म्हणतात कमळाचा डार्ट मारणाऱ्यांच्या कुजबूज आघाडीतला हा टाळी देत हसण्याचा शब्द आहे. असो.
तर आता प्रतीकात्मकतेतून बाहेर येत थेट सांगायचं तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कमळाच्या डार्टनं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांना बेहोश करून, स्वत:च्या गाडीत घालून वरळी येथे तमाम माध्यमांसमोर सादर करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं! बांद्रयाहून वरळीला पोहचेपर्यंत भूल उतरल्यानं शिवट्याही नैसर्गिक अधिवासात येणंच कसं नैसर्गिक होतं, मध्ये काही अनैसर्गिक गोष्टी घडल्या, पण आता नैसर्गिक अधिवासात, नैसर्गिकपणे जगू देण्याचं वचन मिळाल्यामुळे आम्ही पुन्हा वनात (आणि वनाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली!) परतलोय, असं सांगितलं गेलं!
...............................................................................................................................................................
या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
...............................................................................................................................................................
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच भाजपनं शिवसेनेची वाघनखं काढून घेतली, तुतारीची पिपाणी केली, डरकाळीची भूपाळी केली, दातांसह सगळी बेलगाम वक्तव्यं घशात घातली. मागच्या वेळी दुधाच्या दातानं चावा घेँणारा बछडा सॉफ्ट टॉयसारखा शोभिवंत झाला. तर ‘दैनिक नव्हे सैनिक म्हणणारे’ थेट पहारेकरी वाटू लागले!
आपल्या दमदारपणासाठी एक काळ गाजवलेली मनगटशाही, ठोकशाहीचा वापर करत दहशत बाळगून असलेली संघटना, साहेबांच्या ललकारीसह मुंबई बंद पाडणारी, दंगलीत उघड हिंदुत्ववादी भूमिका घेऊन मतदान हक्क गमावून बसलेले शिवसेनाप्रमुख, ‘बाबरी पाडली ’असं मुंबईत बसून छातीठोकपणे सांगणारे ठाकरे महिन्याभरापूर्वीच महाराष्ट्रासह देशभर लोकांना पाहिले, ऐकले होते. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी हे असं दाती तृण धरून शरण जावं आणि वर ‘आम्ही वाऱ्याची दिशा ओळखतो, तलवार म्यान नाही केलीय’, असं उसन्या अवसानात सांगावं? इतकी हास्यास्पद आणि जीवघेणी माघार महाराष्ट्राच्या ५०-६० वर्षांच्या राजकारणात पहिलीच असावी. ज्या मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व येऊन पदस्पर्श करत, त्याच मातोश्रीवरून गठडी वळून न्यावी, तसं दोन नेत्यांना नेलं!
भाजप हा संघाच्या मुशीतून घडलेला, केडर बेस राष्ट्रीय पक्ष आहे. पेशन्स हा त्यांचा स्थायीभाव आहे. दक्ष कधी, विश्राम कधी आणि आक्रमण कधी याची कवायत त्यांना शिशू असल्यापासून मिळते. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जनसंघाचा भाजप झाल्यापासून भाजपही काँग्रेसप्रमाणे प्रतिमांचं, मॅसेज द्यायचं राजकारण कांकणभर जास्त शिकलाय. त्यांच्या सहजकृतीतही एक मेथड असते. परवा त्यांनी ही मेथड छान वापरली.
अमित शहा व देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाणार या बातमीनं वातावरण असं तयार केलं की, जणू काही ‘खान’ स्वत:हून ‘महाराजांना’ भेटायला त्यांच्या शामियान्यात जातोय.
त्यानंतरची दृश्यप्रतिमा होती, शहा आणि मुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या गाड्यांचा काफिला मातोश्रीकडे जाताना. यात पोलिस व सुरक्षा दलाच्या गाड्यांनी एक आब, दाब, रुबाब प्रस्थापित केला. भासवलं असं की, बाहुबली शरण येतोय. प्रत्यक्षात गोष्ट उलटीच होती!
पुढची दृश्यप्रतिमा मातोश्री बाहेरची. आत खलबतं चालू आणि बाहेर अधिरता वाट पाहतेय. काय म्हणतात आता उद्धवजी? डरकाळीनं महाराष्ट्रासह दिल्ली हलवणार?
पण सहज प्रक्रियेची मेथड ठरलेली होती. त्यामुळे लगेचच दृश्यं सुरू झाली. वरळीच्या नियोजित पत्रकार परिषदेच्या हॉलची. तिथलं वातावरण भाजप-सेना कार्यकर्ते-नेत्यांसह असं होतं की, लग्न तर झालंय आता पोशाख बदलून वधू-वर स्वागतसमारंभास येताहेत. आदेश बांदेकर सूत्रसंचालनाची तालीम करत होते. भाजपनेते वरपक्षासारखे दृश्यात राहून मंगल समारंभाच्या साक्षीस आल्यासारखे हसतखेळत होते. त्यांच्या हास्यात वधूपक्षाच्या मागण्या कशा सकृतदर्शनी मान्य करून नारळ कसा घ्यायला लावला असेच भाव होते. या दृश्यांनी मातोश्रीवरच्या अधिर दृश्यांची पार रयाच घालवली. पेपर फोडला गेला.
पुढचं दृश्यही सहजपणाच्या मेथडमधलं. पुन्हा तसाच काफिला, मात्र एक महत्त्वाचा फरक. एकाच गाडीत चालकाशेजारी मुख्यमंत्री मधल्या सीटवर अमित शहा, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे. या गाडीच्या मागून इतर सारे. कलानगरमधून बाहेर पडताना माध्यमांना गाडी टिपता येईल, अशा वेगात ठेवली गेली!
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फडणवीसांच्या चेहऱ्यावर शिवट्या जेरबंद केल्याचे वनाधिकाऱ्याचे भाव होते, तर ठाकरेंची दोन्ही पाती निमूट होती. एरवी थुई थुई नाचणारे धाकले राजे वडिलांसह सिनेमाला जातोय, असा भाव घेऊन कोपरा पकडून मंद हसत!
या सहज कृतीतून भाजपनं उद्धव ठाकरेंना मी माझ्या वाहनानं स्वतंत्रपणे येतो, माझा ताफा, आब, दाब, रुबाब घेऊन ही संधीच ठेवली नाही! ज्यांना संघ व भाजप माहितीय, त्यांना या सहजकृतीमागील राजकारण कळू शकेल. उद्धव ठाकरे तहाची बोलणी तर हरलेच, पण तहाची दृश्यंही त्यांचा पाणउतारा करणारी होती. पण एकदा शरणागती पत्करली की, मग तुमच्या हाती काही राहत नाही.
प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत अमित शहांना मध्यभागी बसवून फडणवीसांनी सूत्रधार कोण हे अधोरेखित करून टाकलं. प्रतिमापूजन होताच मुख्यमंत्र्यांनी माईक हातात घेऊन प्रथम मराठीत नंतर हिंदीत युतीची घोषणा केली. उद्धवजी ऐकत होते तर अमित शहा मधून मधून मिश्किल हसत होते. उद्धवजींनी मग नैसर्गिक वगैरे पाठांतर बेमालून वठवलं आणि नंतर शहांनी चार शब्द बोलून परिषदच गुंडाळली!
आता क्रम लावला तर काय दिसतं? फडणवीस-शहा आले. मातोश्रीवर गेले. दोन्ही ठाकरेंना गाडीत घातलं. वरळीत आणलं. घोषणा फडणवीसांनी केली, समारोप शहांनी. मध्ये सहमतीचे चार शब्द ठाकरेंचे! संपलं. सर्व भाजपीयांचा भाव असा होता, मुलगा भरकटला होता, त्याला समजावून परत आणलंय, चुका पोटात घेऊन समजही दिलीय!
पुढचे काही दिवस समाजमाध्यांवर सर्व ठाकरे, नेते, प्रवक्ते, सामना संपादक यांची वक्तव्यं पुनर्प्रसारित केली जातील. पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जाईल. अगदी ज्या दिवशी युतीची घोषणा झाली, त्या सकाळी ‘राजकीय स्वार्थासाठी शहिद जवानांचा वापर म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणं’ असा शेरा मारणारेच संध्याकाळी मृतावस्थेत जाऊन टाळूवर लोणी लावून बसले होते, तोडे हेही खा म्हणत!
नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यानंतर इतकी मानहानीकारक स्थिती उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रथमच आली असेल. खरं तर ठाकरी आणि मराठी बाणा दाखवायची मोठी संधी होती.
मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा ही सेनेची प्रबळस्थानं. यापैकी मुंबई, ठाणे, कोकण इथून मराठी माणसाची टक्केवारी वेगानं कमी होत असल्याच्या बातम्या आल्यात. जिथं मराठी माणूसच संपला, तिथं संघटना तरी कशी राहणार?
उद्धव ठाकरे मारे जोशात अयोध्येला गेले, शरयु किनारी आरती केली, पण भाजपनं त्यांना ‘राम’ आम्हीच, तुम्ही ‘हनुमान’ हे महाराष्ट्रात पार मातोश्रीवर येऊन सांगितलं.
स्लिपर घालून प्रचार करणाऱ्या शिवसैनिकाला नव्या ठाकरेंनी रडायलाही जागा ठेवली नाही!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nikkhiel paropate
Thu , 21 February 2019
अत्यंत योग्य शब्दांत पडद्यामागच राजकारण मार्मिक शब्दांत व्यक्त केलेय..!!