किती सोपं आहे, ‘देशद्रोही’ आणि ‘देशभक्त’ ठरवणं!
पडघम - माध्यमनामा
प्रशांत शिंदे
  • पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचे एक छायाचित्र
  • Wed , 20 February 2019
  • पडघम माध्यमनामा पुलवामा हल्ला Pulwama Attack जम्मू-काश्मीर Jammu-Kashmir पाकिस्तान Pakistan

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात चाळीस जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. सर्व स्तरांतून या हल्ल्याचा निषेध केला गेला. ‘पाकिस्तानबरोबर युद्ध करा’ किंवा ‘आंतरराष्ट्रीय बाजारात पाकची नाकेबंदी करून धडा शिकवा’ अशा लोकांच्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे.

टीआरपीच्या मागे लागलेल्या काही वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्याचं भडक वार्तांकन केलं. या हल्ल्यातील शहीदांच्या सहानुभूतीचा फायदा व्यवसायासाठी काही वृत्तवाहिन्यांनी करून घेतला. समाजात शांतता निर्माण होण्याऐवजी आणखीन रोष वाढवला. हल्ल्यानंतर सोशल मीडियातून फेक मॅसेज व्हायरल झाले. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांचे समर्थन करणारे व्हिडिओ, छायाचित्रे काश्मिरी लोकांची आहेत म्हणून पसरवण्यात आली. यामुळे वातावरण अधिकच गढूळ झाले आहे. विहिप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इतर प्रांतात राहणाऱ्या काश्मिरी तरुणांवर हल्ले केले. देशातील अनेक नेते पाकवर हल्ला करून बदला घेण्याची भाषा बोलत आहेत. काही वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांनी वृत्तवाहिन्यांवरच पाकबरोबरचे युद्ध सुरू केले. समाजात शांतता प्रस्थापित करण्यात माध्यमाची महत्त्वाची भूमिका असते, याचा त्यांना विसर पडला.

माध्यमे आणि नेते लोकभावनेच्या आहारी जाऊन वास्तवतेकडे दुर्लक्ष करत आहेत. भारत- पाकयुद्ध झाले तर त्यात भारताचेही अनेक जवान शहीद होतील. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असून युद्धाचे परिणाम भीषण होतील. जगात शांतता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केलेल्या असतात. युद्धावर होणारा खर्च जनतेकडून वसूल केला जातो. महागाई वाढू शकते आणि आर्थिक आणीबाणी लागू शकते. आधीच जनता दुष्काळाने त्रस्त आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून त्या शांततेत पार पाडणे आवश्यक आहे.

भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. देशाची अर्थव्यवस्था २.५ हजार अब्ज डॉलरच्या पुढे आहे. नव्याने उदयाला येणारी महासत्ता म्हणून जगभारताकडे पाहत आहेत. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती राहिली तर देशाला मूलभूत प्रश्न बाजूला सारून सैन्यदल आणि क्षेपणास्त्रावर जास्त खर्च करावा लागेल. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलरपर्यंत आहे. हा देश अंतर्गत आणि बाह्य दहशतवाद्यांनी पोखरलेला आहे. रात्रंदिवस तेथील जनता युद्धजन्य परिस्थिती अनुभवत आहे. युद्धात गमवण्यासारखे त्याच्याकडे जास्त काही नाही.

दहशतवादी, नक्षलवादी हल्ल्यानंतर कोणी काय बोलायचे हे सगळे ठरलेले असते. पंतप्रधान, गृहमंत्री, लष्करप्रमुख ‘पाकिस्तानला धडा शिकवू, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे भ्याड हल्ले देश खपून घेणार नाही’ ही ठरलेली विधानं माध्यमांतून करतात. आठ-पंधरा दिवस वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या एकच प्रश्न विचारतात, ‘पाकिस्तानचं काय करायचं?’

आजवर या विषयावर माध्यमांत खूप चर्चा झाल्या, अनेक अग्रलेख छापून आले. अनेक सरकारे आली, अनेक गेली. कोणाची छाती ५६ इंच होती, कोणाची कमी होती. पण जवानांचे सीमेवर सांडणारे रक्त कोणी थांबू शकले नाही. या रक्तांच्या पाटाला देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा मुलामा चढवला की झाले! एकदा ‘जय जवान, जय किसान’ घोषणा दिल्या की, सीमेवर जवानांनी आणि शेतात शेतकऱ्यांनी मरत राहायचे.

हिंदी कवी साहीर लुधियानवी म्हणतात,

ख़ून अपना हो या पराया हो

नस्ल-ए-आदम का ख़ून है आख़िर

जंग मशरिक़ में हो कि मग़रिब में

अमन-ए-आलम का ख़ून है आख़िर

बम घरोंपर गिरें कि सरहदपर

रूहता-उम्र ज़ख़्म खाती है

खेत अपने जलें कि औरों के

ज़ीस्त फ़ाक़ों से तिल मिलाती है

टैंक आगे बढ़ें कि पीछे हटें

कोख धरती कि बाँझ होती है

फतह का जश्न हो कि हार का शोक

ज़िंदगी मय्यतों पे रोती है

जंग तो ख़ुदही एक मसला है

जंग क्या मसलोंका हल देगी

आग और ख़ून आज बख़्शेगी

भूख और एहतियाज कल देगी

इसलिए ऐ शरीफ़ इंसानो

जंग टलती रहे तो बेहतर है

आप और हम सभी के आँगन में

शम्मा जलती रहे तो बेहतर है।

२०१३पासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तीन वर्षे भाजप आणि पीडीपी सत्तेत सहभागी होते. गेल्या वर्षी भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकार पाडले. अतिशय नाट्यपूर्ण घटना घडल्या आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. जम्मू-काश्मीरची पूर्ण सूत्रे केंद्र सरकारकडे आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये २०१३ सालापासून २०१७पर्यंत वेगवेगळ्या १२६४ घटना घडल्या आहेत. यापैकी २०१६ मध्ये ३२२ घटना घडल्या. सर्वाधिक ३४२ घटना २०१७ मध्ये घडल्या. या काळातील हल्ल्यात ३०१ जवान शहीद झाले. २०१६ मध्ये ८२ जवान शहीद झाले, तर २०१७मध्ये ८० जवान शहीद झाले. यामध्ये ११५ निरपराध काश्मिरी नागरिक  मारले गेले. १२६४ हल्ल्यांत ६४८ दहशतवादी मारले. सर्वाधिक २१३ दहशतवादी २०१७ साली मारले. (संदर्भ ‘द वायर’) निसर्गाच्या कुशीत वसलेले काश्मीर आत्ता रक्ताळले आहे. पांढरा बर्फ लाल दिसत आहे.

पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू सुकले नव्हते, तोच पंतप्रधान आणि भाजप नेते मताच्या जोगव्यासाठी लोकांच्या दारात उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ व धुळ्यात उदघाटन सभा झाल्या. त्याच दिवशी बुलढाण्यात हजारो जनसमुदाय शहीद जवानांना निरोप देत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युतीसाठी मातोश्रीवर बैठक होत होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल तामिळनाडूत अण्णा द्रमुकबरोबर युतीसाठी वाटाघाटी करत होते. आसाममध्ये अमित शहा यांची प्रचारसभा घेत होते. केंद्रीय कॅबिनेट मंत्री अल्फोस कन्ननथनम यांनी सैनिकाच्या शवपेटीबरोबर सेल्फी घेतला. समाजातील काही घटक अपवाद वगळता श्रद्धांजली सभा, कॅडल मार्च काढण्याकडेसुद्धा एक राजकीय संधी म्हणून पाहतात. ठरल्याप्रमाणे इव्हेंट होतात. ग्रामीण भागात एक म्हण आहे – ‘मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणं!’

आत्तापर्यंत देशात प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर जे घडते, तेच पुन्हा सुरू झाले. भारतातील मुस्लिम अभिनेते, अभिनेत्री, खेळाडूंना देशभक्तीचे सर्टिफिकेट मागणे सुरू झाले. शबाना आझमी, जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये कार्यक्रम केले म्हणून त्यांना ‘देशद्रोही’ म्हटले जाते आहे. (मोदी केक खाऊन आले, पण त्याबद्दल कोणी ब्र काढायचा नाही!) ‘सानिया मिर्झा पाकिस्तानची सून असून तिला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनू नका’, असे विधान एका भाजप आमदाराने केले आहे. शाहरुख खानला तर नेहमीच देशभक्ती सिद्ध करावी लागते. अजय देवगण, सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटातून काढले. कपिल शर्माने सिद्धूच्या भूमिकेचे समर्थन केले म्हणून त्याच्यावर टीका झाली. राहुल गांधी, प्रियांका गांधी, कन्हैयाकुमार, अरविंद केजरीवाल यांचे फेक फोटो तयार करून व्हायरल केले.

आपल्या देशात किती सोपे आहे, ‘देशद्रोही’ कोण आणि ‘देशभक्त’ कोण हे ठरवणे!

.............................................................................................................................................

लेखक प्रशांत शिंदे पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत.

shindeprashant798@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 February 2019

कितीबी आपटा, मोदीच निवडन येनार हाय. चार दीस झालं त्या अमरसिंगानं घरची जिमीन संघाला दान केली म्हन्लं. त्ये येडं हाय काय आसं पानी सोडायला हातच्या जमिनीवर, आँ? वारा येईल तशी पाठ फिरवणारं ब्येणं हाय त्ये. मोदीच निवडून येनार ते त्या पैशेवाल्याला बराब्बर कळतं. -गा.पै. बातमीचा संदर्ब : https://m.dailyhunt.in/news/india/marathi/latestly+marathi-epaper-latmar/amar+sinh+yachyakadun+12+koti+rupayanchi+sampatti+rashtriy+seva+bharati+sansthela+dan-newsid-109338628


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......