‘गली बॉय’ : आजच्या तरुण पिढीचं जगणं मांडणारा सिनेमा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘गली बॉय’ची पोस्टर्स
  • Tue , 19 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie गली बॉय Gully Boy रणवीर सिंग Ranveer Singh आलिया भट Alia Bhatt झोया अख्तर Zoya Akhtar

स्वप्न गाठताना होणारी धडपड आणि त्या धडपडीत जे काही सापडतं ते आयुष्याला उजळून टाकतं. स्वत्वाची ओळख असलेल्यांनादेखील कितीतरी अडचणीला सामोरं जावं लागतं. अपयशी लोकांच्या कथा ते यशस्वी झाल्यानंतर मोठ्या चवीनं चघळल्या जातात. मात्र जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत अशा व्यक्तींच्या वाट्याला पदोपदी येतो, तो फक्त अपमान.

‘गली बॉय’ची कथा याच सूत्राभोवती फिरते. सर्वसामान्य माणसाचं जीवन कसं चढ-उतारानं भरलेलं असतं, हेच सांगण्याचा प्रयत्न या सिनेमात दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी केला आहे. त्यासाठी ‘रॅप’ या संगीत प्रकाराचा पुरेपूर आणि अत्यंत प्रभावी उपयोग त्यांनी करून घेतला आहे.

भारतात ‘टॅलेंट’ची कमी नाही. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरातील झोपडपट्टीत जिथं मूळ मानवी गरजा पूर्ण होत नाहीत, तिथंदेखील ‘टॅलेंट’ची कमी नाही. हे ‘टॅलेंट’ ओळखून त्याला योग्य व्यासपीठ मिळालं तर काय होऊ शकतं, याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे.

रॅप हा खरं तर पाश्चिमात्य संगीत प्रकार. पण अलीकडच्या काळात भारतातल्या तरुणांमध्ये रॅप आणि रॅपरची भलतीच ‘क्रेझ’ वाढली आहे. रॅप म्हणजे एक यमक जुळवणारी कविता असते. ज्यात सलग पद्धतीनं ती कविता गायली जाते. त्यात शब्दांची अचूक मांडणी आणि संगीत साधनांचा त्रोटक वापर करून रॅपर रॅपद्वारे भावना व्यक्त करतो. त्यामुळे रॅपचे बोल ऐकणाऱ्यांच्या थेट काळजाला भिडतात. स्वतःच्या वेगळ्याच तोऱ्यात जगणारा प्रेक्षकवर्ग रॅप आणि अभिनय यामुळे सिनेमात नक्कीच धुंद होतो. 

सिनेमाची कथा सुरू होते ती मुरादला (रणवीर) व्यक्तिगत पातळीवर तोंड द्याव्या लागणाऱ्या संघर्षापासून. मुराद हा मुंबईच्या झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या मुस्लिम कुटुंबातला एक तरुण. सर्वसामान्य तरुणांप्रमाणेच मुरादचंदेखील एक स्वप्न असतं. मात्र या स्वप्नामध्ये अडसर ठरते ती गरिबी. मुरादचे वडील (विजयराज) गाडी चालकाची नोकरी करणारे, तर आई (अमृता सुभाष) गृहिणी. घरात एकूण पाच माणसं. आई, वडील, आज्जी, मुराद आणि त्याचा छोटा भाऊ. मुराद महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतो. शालेय वयापासून सोबत असणारी त्याची प्रेयसी आहे आलिया भट. असे तगडे कलाकार सिनेमात आहेत. सिनेमातील प्रत्येक पात्राच्या आयुष्याची एक वेगळीच कहाणी, मात्र त्यातला समांतर धागा म्हणजे संघर्ष.

झोपडपट्टीत जन्मलेला मुराद रॅपच्या जोरावर आपली ओळख निर्माण करू पाहतो. ही ओळख निर्माण करण्यासाठी घरच्यांपासून ते समाजातील अनेक घटकांपर्यंत त्याला संघर्ष करावा लागतो. मुरादला रॅप हा संगीत प्रकार वाटत नाही, तर त्याच्यासारख्या चढ-उताराचं आयुष्य जगणाऱ्यांची व्यथा मांडण्याचं साधन वाटतं. शिक्षण घेऊन नोकरी करावी आणि सुखी-समाधानी आयुष्य जगावं. या पारंपरिक भारतीय मानसिकतेला छेद देऊन पाहणारा झोपडपट्टीतला मुराद त्याच्यासारखं जगू पाहणाऱ्याला जवळचा वाटू लागतो.

सिनेमामध्ये पारंपरिक पद्धतीनं रंगवलेली प्रेमकथा आहेच. बाकी नैराश्याच्या गर्तेत लोटल्या गेलेल्या प्रेक्षकांना क्षणभर प्रेरणा मिळेल, असे मोजके संवाद याही सिनेमात आहेतच. दिग्दर्शिकेनं सिनेमाद्वारे सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी तिची पकड सिनेमावर बसत नाही. त्यामुळे मध्येच कुठेतरी कथा लय सोडून देते. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून ‘कॅमेऱ्या’सोबत बरेच नवीन प्रयोग सिनेमात केल्याचे दिसते.

गाणी, संवाद, अभिनय याबाबतीत सिनेमा चांगलाच प्रभावी ठरतो. मात्र कथेच्या बाबतीत असं म्हणता येत नाही.

झोपडपट्टीत आयुष्य जगणाऱ्यांचं दुःख आणि वेदना मांडत असताना त्यातला कोरडेपणा प्रेक्षकांना सहज जाणवतो. रणवीर आणि आलियाचा अभिनय दमदार आहे. रणवीरला साथ देणारा सिद्धांत चतुर्वेदी हा नवखा कलाकारही विशेष लक्ष वेधतो. मात्र विजयराज, कल्की, अमृता सुभाष या अनुभवी कलाकारांचा अभिनय कुठेतरी कमी पडतो, असं जाणवतं.

दिग्दर्शिका झोया अख्तरची २०१५ साली आलेल्या ‘दिल धड़कने दो’ सिनेमानंतरची ही ‘एंट्री’ मात्र बॉक्सवर चांगलीच कमाई करणारी ठरणार आहे.

एकूण काय तर भारतीय प्रेक्षकवर्गाला ‘सक्सेस स्टोरी’ आणि ‘हॅपी एंडिंग’मध्ये विशेष रस आहे. ‘कॉमन मॅन’ असलेला एखादा पुढे जाऊन खूप मोठं काहीतरी उभारू शकतो. याची कल्पना भारतीय प्रेक्षकवर्गाला भारावून टाकते आणि हेच हेरून त्यावर सिनेमा तयार करण्याचं आव्हान झोया अख्तर यांनी स्वीकारलं असणार.

थोडक्यात हा सिनेमा एकदा बघावा असा आहे. भारतात ‘रॅप’ संगीताची लोकप्रियता का वाढते आहे, या प्रश्नाचं उत्तर सिनेमातून प्रेक्षकवर्गाला मनोरंजनासहित मिळतं. ‘गली बॉय’ हा सिनेमा आजच्या तरुण पिढीचं जगणं प्रेक्षकांसमोर मांडतो. त्यासाठी झोया अख्तर यांना दाद द्यावीच लागेल.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख