अजूनकाही
१. गेल्या काही दशकांत हिंदूंनी शिक्षणात चांगली प्रगती साधली असली तरी जगभरातील सर्व धर्मियांच्या तुलनेत हिंदू लोकांचं औपचारिक शिक्षण कमी असल्याचा अहवाल प्यू संशोधन संस्थेनं दिला आहे. सर्वधर्मियांच्या तुलनेत ज्यू हे सर्वाधिक शिकलेले आहेत. हिंदूधर्मीय माणूस आयुष्यात सरासरी ५.६ वर्षं शिक्षण घेतो, तर ४१ टक्के हिंदूंकडे कोणतंही औपचारिक शिक्षण नाही. केवळ एक टक्का हिंदू कनिष्ठ महाविद्यालयाची पायरी चढतात, असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे.
हे पाहा, ज्यांची तक्षशिला, नालंदा विद्यापीठांची परंपरा आहे, ज्यांनी शून्याचा शोध लावला आहे, ज्यांच्या पूर्वजांनी विमानांपासून अणुबॉम्बपर्यंत सगळे शोध लावून टाकले होते, त्या जगाच्या स्वघोषित जगद्गुरूंना औपचारिक शिक्षणाची गरज काय? पश्चिमी संकल्पनांवर बेतलेल्या उपयुक्त माहितीआधारित पोटभरू शिक्षणपद्धतीत मिळतं ते काही ज्ञान नव्हे; ज्ञानप्राप्ती आम्हाला आपोआप ध्यानमग्न स्थितीत (म्हणजे रोजच्या वामकुक्षीत) होत असते!
…………………………………….
२. काँग्रेस पक्षाने देशाचा मूड जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार आता देशभरात लोकसभेची निवडणूक झाल्यास काँग्रेसला ५४५ पैकी २०० जागा मिळतील. दिल्ली आणि नोएडा परिसरात फोनवरून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अतिशय आनंदित झाल्याचं वृत्त आहे.
दिल्ली आणि नोएडा परिसरातल्या काही लोकांना फोन करून देशाचा अंदाज निघतो? त्यापेक्षा एक, अकबर रोडवर सर्वेक्षण केलं असतं, तर बहुमत मिळालं असतं… पण, दुर्दैवानं आता निवडणूक घेतली जाईल, असं काहीच चिन्ह नाही. मग या सर्व्हेची सुरळी करावी का? तिच्या एका टोकाला डोळा लावला की, दुसऱ्या टोकातून माणसं न्याहाळायला खूप मजा येते… राहुल गांधी त्यानेही आनंदतील.
…………………………………….
३. नोटाबंदी, किरण रिजीजू आणि ऑगस्टा वेस्टलँड वगैरे प्रकरणांवरून गोंधळ घालून संसदेचं कामकाज सतत तहकूब केलं जात असल्याने अतिशय व्यथित झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी ‘आता संसद-सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा असं वाटतं,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.
अडवाणी असं म्हणाले म्हटल्याबरोब्बर किमान भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी तरी चिडिचुप्प होऊन त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखायला हवा होता. निवृत्त भीष्म पितामहांच्या उद्विग्नतेला त्यांच्या पक्षातच किंमत मिळत नसेल, तर काँग्रेस वगैरेंकडून काय अपेक्षा करणार? विरोधी पक्ष म्हणून भाजप गोंधळ घालत होता, तेव्हा कुठे गेला होता लालकृष्णांचा उद्वेग, असा औद्धत्यपूर्ण प्रश्नच ते विचारणार, हो ना?
…………………………………….
३. आधीचे विरोधक (म्हणजे भाजप) भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी सरकारविरोधात एकत्र यायचं. मात्र आता विरोधक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात एकत्र येत आहेत. काँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे. मात्र भाजपसाठी देशहित महत्त्वाचं आहे. : पंतप्रधान नरेंद्र मोदी
काही म्हणा, मोदींच्या धाडसाला दाद द्यायला हवी. आपण रोज श्वास घेतो, तोही देशहितासाठीच, असं स्वत:चंच कंडिशनिंग त्यांनी इतकं उत्तम करून घेतलंय की, आपल्या घोडचुकाही देशासाठी केलेला महान त्याग वगैरे आहे, असं त्यांना वाटतं आणि तेच इतरांना का वाटत नाही, याबद्दल त्यांना अगदी मनोमन, खरंखुरं आश्चर्य वाटतं.
…………………………………….
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं जाहीरपणे समर्थन करणारे एकमेव प्रमुख विरोधी नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३० डिसेंबरपर्यंत वाट पाहून त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण करू; या समर्थनाला एक्सपायरी डेटही असेल, असं सांगून भाजपला बिहारी दणका दिला आहे.
नोटाबंदीचा निर्णय आपल्या खास एकतर्फी आक्रमकतेनं आणि घाईनं लादून देशभर हसं करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिच्या अंमलबजावणीचा तेवढ्याच घाईघाईनं विरोध करून 'देशद्रोही' आक्रोशकर्ते ठरलेले विरोधक, या दोहोंना एकाच डावात धोबीपछाड केलं की नितीशबाबूंनी!
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment