अजूनकाही
लोकसभा निवडणुकीची चाहूल देशाला कधीचीच लागलेली आहे. आता या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन संपल्यानं निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बहुदा मार्चच्या पहिल्या, जास्तीत जास्त दुसर्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील, अशी हवा दिल्लीत आहे. १९७७ ची जनता पक्षाची हवा निर्माण झालेली निवडणूक पत्रकारितेच्या बाहेरून (खरं तर जनता पक्षाचा प्रचार करून!) अनुभवली आणि नंतर पत्रकारितेत आलो. तेव्हापासून १० लोकसभा आणि ९ विधानसभा निवडणुकाचं वृत्तसंकलन करण्याची संधी एक राजकीय वार्ताहर म्हणून मिळाली. आणीबाणीच्या विरोधात जनमत तयार झालेली, इंदिराजी गांधी तसंच राजीव गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या शोकानंतर उसळेलल्या सहानुभूतीच्या आणि गेल्या निवडणुकीतल्या नरेंद्र मोदी, या लाटा अनुभवता आल्या. दैनिक ‘सागर’ ते ‘लोकसत्ता’, ‘लोकमत’ असा तो निवडणुकांचे वृत्तसंकलन करण्याचा हा वृत्तपत्रीय प्रवास आहे.
प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं त्याप्रमाणं, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत बसून २०१४च्या निवडणुकीचा साक्षीदार होता आलं. या इतक्या अनुभवाच्या आधारे सांगतो आपल्या लोकशाहीत निवडणुका ही राजकीय विधिनिषेध शून्यतेची ‘इव्हेंट’ झालेली आहे. अनेकांना आवडणार नाही पण, निवडणुका म्हणजे सुंदोपसुंदीचा हंगाम असं समीकरण असं माझं ठाम मत झालंय, हे सांगायलाच हवं. मतं मिळवण्यासाठी कधीही अंमलात न येणारी आश्वासनं देण्याचा हा हंगाम असतो. दिवसेंदिवस आपल्या देशात होणार्या निवडणुकातील राजकीय नीतीमत्ता ढासळते आहे आणि प्रचाराची पातळी प्रत्येक निवडणुकीत आधीच्या निवडणुकीपेक्षा आणखी खालच्या स्तरावर जात आहे, ही सर्वपक्षीय आणि सर्वसंमत राष्ट्रीय लागण आहे.
आधी आपण राजकीय साधनशुचिता आणि नीतीमत्तेचं कसं भजं झालेलं आहे ते बघू- आजवर सर्व पक्ष किंवा/आणि आणखी एक तिसरी आघाडी काँग्रेसच्या विरोधात एकवटण्याची/लढण्याची भाषा होत असे. आता अशी एकजूट करण्याची भाषा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सुरू आहे. बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे यात कांहीच वावगं नाही. राजकारणात हे असं घडतच असतं.पण घडतंय कसं ते बघा- एकीकडे भाषा भाजपच्या विरोधात महाआघाडी निर्माण करण्याची, त्यासाठी व्यासपीठावर हातात हात घालून आणि ते उंचावत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची ग्वाही द्यायची, प्रत्यक्षात मात्र कृती दुहीची.
.............................................................................................................................................
'सूळकाटा' हे ल. सि. जाधव यांचं आत्मकथन विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4774/Sulkata
.............................................................................................................................................
शरद पवार हे एक महत्त्वाचे नेते आणि त्यांचा (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता एकही महत्त्वाचा आणि मोठा राज्यस्तरीय पक्ष राहुल गांधी म्हणजे काँग्रेस सोबत जायला तयार नाही, पण तसं स्पष्ट बोलूनही दाखवलं जात नाही. कारण एकच, अनेकांना अनेकांना एकाच वेळी पडणारं पंतप्रधानपदाचं स्वप्न! कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या निमित्तानं देशातील २०/२२ विरोधी पक्षांनी बंगलुरूत दिलेल्या एकतेच्या ग्वाहीचे सूर विरत नाहीत, तोच उत्तर प्रदेशात मुलायमसिंह c/o अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि मायावती यांची बहुजन समाज पक्ष युती करून मोकळे झाले. तिकडे ममता बॅनर्जी यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर भाजपच्या विरोधात मोठं शक्तीप्रदर्शन केलं, पण त्यात राहुल गांधी सहभागी झाले नाहीत.
‘डाव्यांना विरोध असला तरी मोदी विरोधात एकत्र लढू’ असा निर्वाळा दिला ममता बॅनर्जी यांनी देऊन चार दिवस उलटत नाही, तोच नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील दुर्गपुरात झालेल्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि बंगालच्या रणात लढाई तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप होणार अशी शक्यता वाटल्यानं भूमिका बदलून ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीला, उत्तर प्रदेशात समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीला, तामीळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम(द्रमुक)ला, आंध्र प्रदेशात तेलगू देसमला पाठिंबा जाहीर केला.
तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू राहुल गांधी यांना भेटले, पण पाठिंबा मात्र तिकडे ममता बॅनर्जी यांना दिला. तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव काँग्रेसकडे ढुंकूनही पाहत नाहीयेत ओडिशात बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक भाजप विरोधी आघाडीत न जाता ‘एकला चलो रे’ची भाषा करताहेत. हे सर्व पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची भाषा उच्चारतात, पण कृती मात्र काँग्रेसला दूर ठेवण्याची करतात.
अखिलेश यादव इकडे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात लढण्याची भाषा करत असतानाच समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यांनी लोकसभेतच आगली बार मोदी सरकार अशा शुभेच्छा देतात... तरी अजून महाआघाडीची चर्चा सुरूच आहे. जन्माला येण्याधीच जे बाळ अचेतन झालंय त्याच्या बारशाची तयारी सुरू असल्यासारखी ही महाआघाडी ठरलेली आहे. राजकीय सुंदोपसुंदी यापेक्षा आणखी काही वेगळी असूच शकत नाही.
काँग्रेस हा देशातील सर्वांत जुना, खेडोपाडी पाळंमुळं पसरलेला आणि अजूनही व्यापक जनाधार असणारा पक्ष आहे, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. २०१४च्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून राहुल गांधी यांनी या पक्षाला गेल्या वर्षभरात चांगल्यापैकी सावरलेलं आहे याबद्दलही कोणतंच दुमत नाही. मात्र राहुल गांधी जितकी अहोरात्र मरमर आणि धावपळ करत आहेत, तितकी या पक्षाचे सर्व नेते करताना दिसत नाहीत. राहुल गांधी एकीकडे अनिल अंबानीला धारेवर धरत असताना कपिल सिब्बल मात्र अनिल अंबानीची वकिली करतात, असा विरोधाभास या पक्षात आहे. गेली निवडणूक हरल्यावर या पक्षाचे बहुसंख्य नेते पक्षाची पडझड थांबण्याचं सोडून त्यांच्या मूळ उद्योगाकडे वळले आहेत; जणू काही पक्षाला पुन्हा उभारी मिळवून देणं ही राहुल गांधी यांच्यासह कांही मोजक्या नेत्यांची जबाबदारी आहे, अशी ही बेफिकरी आहे.
राफेल प्रकरणातही अजून एकही ठोस पुरावा राहुल गांधी यांनी दिला नाहीये; जो दिला तो एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीचा भाग आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात मुख्यमंत्रीपदी तरुणांऐवजी बुजुर्गांना संधी देऊन राहुल गांधी यांनी पक्षाकडे युवकांना आकर्षित करण्याची हातची संधी गमावलेली आहे. तिहेरी तलाकला आधी दिलेला पाठिंबा काढून मुस्लीम महिलांची नाराजी ओढावून घेतलेली आहे; शहाबानो प्रकरणासारखीच ही काँग्रेसची चूक आहे. गोशाला काढण्याचा आणि मंदिरांना भेटी देण्याचा धडाका सुरू करून राहुल गांधी यांनी मवाळ का होईना हिंदुत्व स्वीकारण्याचा केलेला प्रयत्न काँग्रेसच्या सेक्युलर मतदारांना कितपत पसंत पडेल याची शंका आहे. हे निर्णय काँग्रेसच्या आजवरच्या भूमिकेला छेद देणारे आणि सुंदोपसुंदीचेच निदर्शक असून त्यामुळे काँग्रेसचा कांही मतदार तिसर्या आघाडीकडे वळण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
भारतीय जनता पक्षाने साधन सुचिता, नीतीमत्ता आणि शहाणपण कधीच खुंटीला टांगून केवळ सत्ता हेच एक उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. अन्य पक्षातल्या अनेक भणंग आणि गणंगांना भाजपनं अजूनही शुद्ध न झालेल्या गंगेचं जल शिंपडून कसं पवित्र करून घेतलेलं आहे, याबद्दल बोलावं/लिहावं तितकं कमीच आहे. सत्तेची नशा उतरुन आता भानावर आलेल्या या पक्षाच्या नेत्यांना आता सत्ताप्राप्तीसाठी पुन्हा मित्र पक्षांची आठवण झालीये, अशी ही मैत्रीची ढोंगी कथा आहे.
फार लांब जायला नको , महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ यात. राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपच्या एकजात सर्व नेत्यांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला कायम तुच्छतेची वागणूक दिली आणि आता स्वबळावर जिंकण्याची आशा मुळीच दिसत नसतांना युती होण्यासाठी सेनेसमोर शरणागती पत्करली आहे; शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवसभरात वेळ नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर रात्री मातोश्रीचा उंबरठा झिजवला. शिवसेनेचंही या काळातलं वर्तन केवळ विधिनिषेधशून्यच नव्हतं तर तो लाचारीचा कळस होता. शिवसेनेनं कथित बाणा विसरून, राजीनामे खिशातच ठेवून सत्तेला चिकटून राहात सरकारवरच यथेच्छ टीका करणं आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना आता सेक्युलर झाली असल्याचा साक्षात्कार राष्ट्रवादीला होणं, यापेक्षा आणखी सुंदोपसुंदी ती कोणती असूच शकत नाही.
.............................................................................................................................................
'गांधी उद्यासाठी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4773/Gandhi-Udyasathi
.............................................................................................................................................
निवडणूक जिंकण्यासाठी गुंड शक्तीचा सहारा ही गरज बनली आहे, हे एक आता उघड गुपित आहे. एकदा ज्येष्ठ सहकारी कुमार केतकर, अरविंद गोखले यांच्यासोबत एका ‘साधन सुचिता’वाल्या एका बड्या नेत्याकडे जेवायला गेलो होतो. आपण निवडणूक जिंकणारच असा दावा करताना त्यांनी जी कारणं दिली, त्यात एकाबद्दल ते म्हणाले ‘आता या शहराच्या अंडरवर्ल्डवर काँग्रेसचं नाही तर आमचं (म्हणजे भाजपच्या त्या नेत्याचं!) नियंत्रण आहे’. त्यावर आम्ही तिघंही एकदम गप्प व गारच झालो. अशा मदतीला फारच थोडे नेते अपवाद असतील अशी समकालीन स्थिती आहे.
अलिकडच्या प्रत्येकच निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. मौत का सौदागर, पप्पू आणि चौकीदार चोर है, इटली की बेटी... असे अनेक उल्लेख लाजावेत अशी पातळी या निवडणुकीत गाठली जाणार आहे, हे सांगायला कुण्या भविष्यवेतत्याची गरज नाही. तशी पातळी गाठणारे नरेंद्र मोदी, उमा भारती, स्वामी आदित्यनाथ, लालूप्रसाद यादव ते मणीशंकर अय्यर , कपिल सिब्बल... अशी ती एक सर्वपक्षीय राष्ट्रीय शृंखला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चड्डी’चा उल्लेख करणारे शरद पवार आणि विरोधकांना कुत्रा म्हणणारे देवेंद्र फडणवीस हेही आता त्या रांगेत उभे आहेत. अश्लाघ्य टीका हे आता आपल्या निवडणुकांतील प्रचाराचं तंत्र होतांना दिसत आहे; या निवडणुकीत तर हे वाचाळवीर नेते कोणाच्या अब्रुची असल्या-नसल्याही लक्तरं धुवायला कमी करणार नाहीत, अशी चिन्हं स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
लोकशाहीतला निवडणूक नावाचा सुंदोपसुंदीचा हंगाम आता मतदारांच्या घराचा दरवाजा ठोठावतो आहे...
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 16 February 2019
प्रवीण बर्दापूरकर, लेखाशी नव्व्याण्णव टक्के सहमत. 'मौतका सौदागर' याबद्दल एक टक्का असहमती. कारण की हे विशेषण सोनिया गांधींनी मोदींना उद्देशून बऱ्याच पूर्वी वापरलेलं आहे. ते बहुधा परत वापरलं जाणार नाही. नेमक्या याच गलिच्छ पार्श्वभूमीवर मोदींची मर्यादशील टीका उठून दिसते. आपला नम्र, -गामा पैलवान