अजूनकाही
व्यासपीठावरील मान्यवर आणि कन्नड- मराठी संतसाहित्याचे उपासक जन, गेले तीन दिवस पांडुरंगाच्या सान्निध्यात चाललेल्या चर्चासत्राची आज सांगता होत आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावं आणि तुम्हा सर्वांच्या सहवासात चार क्षण संतसाहित्याची चर्चा ऐकावी, अशी माझीही उत्कट इच्छा होती, परंतु शारीरिक क्षीणतेमुळे मला अशा सुखक्षणांचा लाभ घेता आला नाही.
या त्रि-दिवसीय चर्चासत्राचं आयोजन हंपी येथील कन्नड विद्यापीठाच्या ‘पुरंदरदास अध्ययन पीठा’नं केलं, ही घटना मला विशेष नोंद घेण्यासारखी वाटते. संत पुरंदरदास कर्नाटक-महाराष्ट्राच्या समन्वयाचे एक थोर शिल्पकार आहेत. इथं पांडुरंगाच्या पुरातन मंदिरात पुरंदरदासांची चिरंतन स्मृती सांभाळणारा स्तंभ आजही उभा आहे. त्या स्तंभाशी बसून पांडुरंगाच्या समचरणावर दृष्टी खिळवणारं, त्या सावळ्या सुंदर रूपाला आपल्या अंत:करणात साठवणारं, पुरंदरदासांचं ध्यान मी आत्ता या क्षणीही अनुभवतो आहे. जोवर हा युगादींचा देव दोन्ही कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे, तोवर त्याच्या रूपचिंतनात निमग्न झालेल्या पुरंदरदासांची स्मृतीही मराठी मनात अभंगच राहणार आहे. प्राचीन मराठी वाङ्मयात संतांचं नामस्मरण करण्यासाठी ज्या अनेक ‘संतमालिका’ रचल्या गेल्या आहेत, त्यात पुरंदरदासांचं नाव प्रेमादरानं समाविष्ट झालेलं आढळतं. गीतसम्राट ग. दि. माडगूळकर यांनी एका भक्तिप्रधान चित्रपटासाठी रचलेल्या गीतात ‘पुरंदरांचा हा परमात्मा, पंढरीचा कानडा राजा’ या शब्दांत आहे माडगूळकरांनी पुरंदरदासांचं वर्णन अगदी सहजपणे प्रकटवलं आहे.
पुरंदरदासांनी आपलं विठ्ठलभक्तिमय जीवन पंपाक्षेत्रात म्हणजे हंपी या विठ्ठलाच्या गाजत्या-जागत्या ठाण्यातच व्यतीत केलं. त्यांचं वैकुंठगमनाचं स्थानही हंपी हेच. मध्यकालीन इतिहासात ‘विजयनगर’ या नावानं गाजलेलं हे विठ्ठलक्षेत्र. विजयनगर साम्राज्याची अखेर आणि पुरंदरदासांची समाधी या दोन्ही घटनांचा काळही एकच. पुरंदरदासांनी आपल्या परमआराध्याच्या मंदिराचा विध्वंस पाहिला असेल का? निश्चयानं काही सांगता येणार नाही. विजयनगरच्या पाडावानंतर तिथली विठ्ठलोपासना खंडित झाली एवढं मात्र खरं. विठ्ठलाच्या देवत्वाचा मूलत: अविभाज्य घटक असलेला विरुपाक्ष/ ‘पंपावती’ विरुपास विध्वंसाच्या त्या प्रलयंकर सत्रातही सुरक्षित राहिला. त्याची पूजाअर्चा सातत्यानं चालू राहिली आणि विठ्ठल मात्र त्याचं अतिभव्य, शिलसुंदर मंदिर सोडून गेला याचं रहस्य काय, ते समजत नाही.
कारणं काहीही असोत, कर्नाटकातील विठ्ठलभक्तांचा ओघ पुढे उडुपी आणि वेंकटगिरीकडे वळला हे एक इतिहाससिद्ध वास्तव आहे. उडुपी हे गोपाळकृष्णाचं क्षेत्र. तिथला गोपालकृष्ण हे मध्वाचार्यांचं परमाराध्य दैवत. उडुपीत त्यांनी जे आठ मठ स्थापन केले, त्या मठांतील आपल्या शिष्यांना नित्यार्चनेसाठी विठ्ठलमूर्ती दिल्या. पंढरपूरचा विठ्ठल हा भक्तदृष्टीनं गोपाळकृष्णच आहे. प्रख्यात माध्व आचार्य व्यासराय यांनी प्रवर्तित केलेला हरिदास संप्रदाय अथवा दासकूट संप्रदाय अगदी स्वाभाविकपणेच उडुपी कृष्णाशी निगडित झाला. तिथल्या कृष्णमंदिराच्या खिडकीतून कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी लोभावणारा कनकदास पंढरपूरच्या चोखामेळ्याची आठवण करून देतो. उडुपीच्या मंदिरातील कनकदासाची खिडकी/ ‘कनकन भिंडी’ पाहताना कोणाही संवेदनशील यात्रिकाचं अंत:करण भरून आल्याशिवाय राहत नाही.
उडुपी इथं माध्वमठांच्या गाभ्यातच चंद्रमौलीश्वर आणि अनंतेश्वर ही दोन पुरातन शिवमंदिरं आहेत. विशेष म्हणजे ती मध्वाचार्यांच्या उदयापूर्वीची आहेत आणि मध्वाचार्य हे कडवे वैष्णव असूनही त्यांनी या दोन्ही शिवस्थानांचं प्राचीनत्व आणि पावित्र्य झाकोळू दिलेलं नाही. समन्वयसूत्र सांभाळणाऱ्या विठ्ठल तत्त्वाचाच हा विजय नव्हे का? इकडं महाराष्ट्रात ‘विठोने शिरी वाहिला देवराणा’ हा हरिहरैक्याचा घोष दुमदुमतो आहे. विठ्ठलाच्या परिसरात मल्लिकार्जुनही नित्य पूजिला जात आहे, तर कर्नाटकात विठ्ठलानं घेरलेल्या पावित्र्य संभारात चंद्रमौलीश्वर आणि अनंतेश्वर भक्तीचं अर्ध्य स्वीकारीत पूर्वप्रतिष्ठा राखून नांदताहेत.
इथंच हे सांगायला हवं की, मध्वाचार्यांच्या ग्रंथांचे भाष्यकार जयतीर्थ हे मूळचे महाराष्ट्रीय आहेत. ‘टीकाचार्य’ म्हणून माध्व परंपरेत गौरवाचा विषय ठरलेले जयतीर्थ हे एकटेच नाहीत. अनेक थोर आचार्यांत महाराष्ट्रीय आचार्यांचाही समावेश आहे. त्यांच्यामुळे आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या माध्ववैष्णव घराण्यांमुळे महाराष्ट्रात माध्व वाङ्मयाचा प्रसार तर झालाच, परंतु मराठी माध्वांच्या श्रद्धांचं संतर्पण व्हावं, म्हणून मराठीत माध्व वाङ्मय नव्यानं निर्माण होत राहिलं. प्राचीन मराठी वाङ्मयाची ही माध्वधारा आजवर अलक्षित राहिली आहे, उपेक्षित राहिली आहे. या लुप्त सरस्वतीचा उद्धार साक्षेपानं झाला तर कर्नाटक- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाची सविस्तर मांडणी करण्यासाठी ते एक महत्त्वाचं साधन अभ्यासकांच्या हाती येईल. आवर्तात सापडलेलं आपलं शोधक्षेत्र विस्तारायला हवं.
आंध्र कर्नाटकातील माध्व वैष्णवांप्रमाणे महाराष्ट्रातील माध्व घराणी वेंकटेशाची उपासक आहेत. कर्नाटक- आंध्र- महाराष्ट्र या प्रदेशातील सांस्कृतिक समन्वयाचे प्रतिनिधी विठ्ठल, वेंकटेश आणि मल्लिकार्जुन हे तीन देव. यापैकी मल्लिकार्जुनाचा महाराष्ट्राशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मी माझ्या अल कुवतीनुसार ‘शंभुमहादेवा’च्या निमित्तानं स्पष्ट केला आहे. श्री विठ्ठल हे महासमन्वयाचं जागतं प्रतीक कसं आहे, तेही विठ्ठलविषयक ग्रंथात दोन दशकांपूर्वीच अनेकानेक आधार देऊन विशद केलं आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल आणि वेंकटेश यांच्या नाट्यावरही प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात वेंकटेशाचं स्थान, हा एका महाप्रबंधाचा विषय आहे.
देऊळगाव राजा, वाशिम, पाटोळा, जमखंडी, नाशिक इत्यादी महाराष्ट्रातील वेंकटेशक्षेत्रं भक्त-भाविकांच्या गर्दीनं गजबजलेली असतात. यातल्या काही क्षेत्रांची संस्कृत-मराठी स्थलपुराणंही रचली गेली आहेत. त्याचप्रमाणे गिरीच्या वेंकटेशाची जी संस्कृत स्थलपुराणं आहेत त्यांचे मराठी ओवीबद्ध अनुवाद झालेले आहेत. पंढरीच्या विठ्ठलाचे प्रख्यात भक्त आणि रामविजयादी ग्रंथांचे कर्ते श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी रचलेलं ‘वेंकटेशमाहात्म्य’ कर्त्याच्या प्रासादिक शैलीनं वेंकटेशभक्तात ख्याती पावलं आहे. चैतन्यांकित देवादीस या शिवकालीन भक्तकवीचं ‘वेंकटेशस्तोत्र’ आर्ततेनं इतकं भारलेलं आहे की, अनेक भक्तभाविक त्याचं नित्य पठण करताना सद्गदित होत असल्याचं दृश्य मी सातत्यानं अनुभवलं आहे. अशा दीर्घ ओवीबद्ध रचनांबरोबर अभंग, आरत्या, भूपाळ्या, लघुस्तोत्रं, पदं अशी वेंकटेशभक्तिार रचना मराठी संतकवींनी सांप्रदायिकतेच्या सीमा उल्लंघून केली आहे. महाराष्ट्रातील ही वेंकटेशभक्तिपर रचनांची धाराही तशी अलक्षितच राहिलेली आहे. ‘मल्लिकार्जुन आणि महाराष्ट्र’ या संबंधाच्या शोधाप्रमाणेच ‘वेंकटेश आणि महाराष्ट्र’ यांच्या हार्दिक संबंधाचा व्यापक शोध घ्यावा, असा माझा एक संकल्प होता. आजही तो माझ्या मनातून पुसला गेलेला नाही.
हरिहरैक्याचा घोष अनुभवाच्या साक्षीनं करणाऱ्या मराठी संतांच्या परंपरा आंध्र-कर्नाटकात विस्तारल्या होत्या. याची विपुल प्रमाणं उपलब्ध आहेत. माझे दिवंगत स्नेही डॉ. पंडित आवळीकर यांनी उजेडात आणलेले ‘मुडळगीचे स्वामी’ हे मुकुंदराजांच्या परंपरेतील आहेत. या स्वामींनी मराठी आणि कन्नड या उभय भाषांत भक्तीची अभिव्यक्ती केली आहे. एकनाथ आणि दासोपंत या दत्तभक्त संतांच्या शिष्यपरंपरा आंध्रात नांदत राहिल्या आणि त्या परंपरेतील साधूंनी तेलुगु भाषेतही रचना केल्या. कारवंडीचे महिपती, त्यांचे पुत्र महिपतिसुत कृष्ण सिंदगीचे भीमाशंकर हे कन्नड- मराठी या दोन्ही भाषांत आपले पारमार्थिक अनुभव प्रकट करणारे संतकवी ज्ञानदेवांच्या परंपरेतील आहेत. विजापूरचे रुक्मांगद पंडित आणि लक्ष्मीपती हे दोघेही पंढरपूरच्या पांडुरंगाचे परमभक्त होते. त्यांच्या उभय भाषांतील रचनांतून उत्कट भक्तीचा प्रांजळ आविष्कार घडलेला आहे. गुर्लहोसूरच्या चिदंबर दीक्षितांचे प्रख्यात शिष्य राजाराम हे औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावचे. त्यांनी ओवी आणि अभंग या दोन्ही छंदात विपुल रचना केल्या आहेत. त्यांची शिष्या विठाबाई हिनं मराठीत आपली पारमार्थिक आत्मकथा निवेदिली आहे. बेळगावचे बाबा गर्दे हे विजापूर परिसरातील तिकोट्याच्या रामचंद्रनाथांचे शिष्य. ही ज्ञानदेवांचीच परंपरा आहे. कल्याणनगरीच्या जवळच असलेल्या हुमणाबादचे माणिकप्रभू ‘सकलमत संप्रदाया’चे प्रवर्तक म्हणून प्रख्यात आहेत. एक्वेहाळीचे आत्माराम स्वामी यांनी रचलेला ‘दासविश्रामधाम’ हा महाग्रंथ केवळ समर्थ संप्रदायाचाच नव्हे तर महाराष्ट्र-कर्नाटक- आंध्र यांच्या अध्यात्मधारांचा परिचय घडविणारा विश्वकोशच आहे. चार-पाच वर्षांपूर्वी मी गदगच्या वीरनारायण मंदिरात गेलो होतो. तिथल्या एका स्तंभाला टेकून कन्नड महाभारताची रचना करणारा महाकवी कुमार व्यास हा चंद्रात्मज रुद्र या मराठी महाभारतकर्त्याला कसा प्रेरक ठरला, याचं साधार विवेचन चंद्रात्मजाच्या उद्योगपर्वाच्या संपादनात डॉ. आवळीकरांनी केलेलं आहे. ‘कुमारव्यास’ या नावाप्रमाणे ‘बालकव्यास’ हे नम्र नाव धारण करणाऱ्या विजापूर परिसरातील एका कवीनं पांडुरंगमाहात्म्या‘ची रचना मराठी ओवीछंदात केलेली आहे.
वास्तविक वैष्णवांप्रमाणेच कर्नाटकातील शैव भक्तिधारेचाही महाराष्ट्राशी/ मराठीशी दृढ संबंध आहे. वीरशैव मराठी वाङ्मय, वीरशैव संत संत्पुरुष, कन्नड वीरशैव ग्रंथाचं मराठीत घडलेलं अवतरण हे माझ्या नितांत जिव्हाळ्याचे विषय आहेत. विसोबा खेचरांचा ‘षट्स्थल’ हा मराठीतील आद्य वीरशैव ग्रंथ योगायोगानं माझ्याकडूनच शोधला गेला आहे.
चामरसाच्या ‘प्रभुलिंगलीले’चा मराठी ओवीबद्ध अनुवाद ‘लीलाविश्वंभर’ या नावानं ज्या बह्मदास कवीनं केला आहे, तो कवी वीरशैव परंपरेतील नाही. त्याची परंपरा आहे नरसिंह सरस्वतींची/ दत्त संप्रदायाची. त्यानं मल्लम प्रभूंसारख्या वीरशैव महामानवाची चरित्रगाथा मराठीत वर्णावी, हा महासमन्वयाच्या ओढीचाच पुरावा आहे, हे नि:संशय!
बह्मदासाचा ‘लीलाविश्वंभर’ हा ग्रंथ जसा अल्लमप्रभूंच्या असाधारण प्रभावाखाली चरित्र-चरित्र्याचा अनुभव मराठी संतप्रेमिकांना घडविणारा आहे, तसाच राघवांच्या कन्नड सिद्धरामचरित्रांचा शिवदास कवीनं केलेला मराठी ओवीबद्ध अनुवाद. ‘सिद्धेश्वरपुराण’ हा ग्रंथ सिद्धरामेश्वरांचं चरित्र मराठी भाविकांच्या अनुभवास आणणारा ग्रंथ आहे. माझ्या दृष्टीनं शिवदासाचा ग्रंथ कन्नड न समजणाऱ्या अभ्यासकांना सिद्ध रामेश्वरांच्या जीवनगाथेतील गूढ उकलून दाखवण्याचं एक विश्वसनीय साधन आहे.
समन्वयाच्या दृष्टीनंच अतिमहत्त्वाचा ठरणारा आणखी एक सिद्धपुरुष आहे निजगुणशिवयोगी. द्वैताद्वैताच्या सीमा सहज उल्लंघून जाणारा षट्स्थळाचार्य. निजगुणशिवयोगी यांच्या ‘विवेकचिंतामणि’ या बृहद्ग्रंथाचा मराठी ओवीबद्ध अनुवाद शांतलिंग स्वामींनी केला. शांतलिंगस्वामी हे शिखर शिंगणापूर या शैव क्षेत्राचे रहिवासी. शिवछत्रातींचे पितामह मालोजीराजे त्यांचे समकालीन. कृष्णाप्पा हे शांतलिंगांचे शिष्य आणि जयरामस्वामी हे कृष्णाप्पांचे शिष्य.
सातारा जिल्ह्यातील वडगाव या ठिकाणी जयरामस्वामींचा जो मठ आहे त्याला ‘जंगमाची गादी’ असे नाव आहे. हे जयरामस्वामी शिवछत्रातींच्या नितांत आदराचा विषय असलेले साधू ‘कृष्णदास जयराम’ म्हणून मराठी संतमंडळात प्रसिद्ध आहेत. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे परम उपासक होते आणि त्यांच्या अंत:करणात शिंगणापूरचा शंभूमहादेव आणि पंढरपूरचा पांडुरंग सदैव क्षेमालिंगन देत नांदत होते. पंढरापूर क्षेत्रात आजही जयरामस्वामींचा मठ आहे.
येथवर मी जे ओझरते उल्लेख केले आहेत ते कर्नाटक- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाची पुष्टी करण्यासाठी पोषक आहेत, प्रेरक आहेत. प्रदेश, भाषा, संप्रदाय, दार्शनिक भेद यांच्या पलीकडे जाऊन शाश्वताचा शोध घेणाऱ्या महासंतांचा हा वारसा आपण वाया जाऊ देता कामा नये. त्या वारशाची विटंबना होईल, असं काही आपल्या हातून घडता कामा नये.
माझी कुलस्वामिनी आहे बदामीची बनशंकरी शांकभरी. मला कन्नड भूमीशी बांधणारी आदिशक्ती. चौदाव्या-पंधराव्या शतकात शहाजीपूर्व काळात आठ देशस्थ बाह्मण घराणी कर्नाटकातून पुण्यात आली आणि गणेश मंदिराच्या अवतीभवती स्थिरावली. एका लहानशा खेड्याचं ‘कसबा पुणे’ बनलं, ते या आठ घराण्यांमुळे. त्या आठ घराण्यांतील एक घराणं माझं. त्याचमुळे काहीशा ‘सात्त्विक अहंकारा’तून मी असं म्हणू शकतो की, कर्नाटक- महाराष्ट्राच्या महासमन्वयाचा एक लहानसा दुवा मीही आहे. मी आता थकलो आहे. मायशारदेनं, बदामीच्या जगदंबिकेनं माझ्या हातून जे अल्पस्वल्प शोधकार्य आजवर करून घेतलं आहे ते आपल्या चरणी रुजू आहे. त्यात उणं-अधिक जे असेल ते आपण कृपाळूपणे साजरं करून घ्याल, असा मला विश्वास आहे. श्री पांडुरंगाच्या समचरणांच्या साक्षीनं मी आपणा सर्वांना विनमाणे विनवत आहे की, शेवटच्या श्वासार्यंत माझ्या समन्वयसाधनेला बाधा येऊ नये, यासाठी आपली कृपा माझ्यावर असू द्यावी!
(७, ८, ९ जुलै २००५ दरम्यान पंढरपूर इथं कन्नड-मराठी संतसाहित्यावर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याच्या समारोपाप्रसंगी ढेरे यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश.)
डॉ. ढेरे यांच्या पुस्तके खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Pashte
Wed , 19 October 2016
Test Comments
Nilesh Pashte
Wed , 19 October 2016
Test Comments
Nilesh Pashte
Wed , 19 October 2016
Test Comments
Nilesh Pashte
Fri , 14 October 2016
टेस्ट प्रतिक्रिया