भस्मासूर आणि श्रीविष्णूचं मोहिनी नावाचं सोंग
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • चित्र - ‘अमर चित्र कथा’मधून साभार
  • Tue , 12 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली भस्मासूर Bhasmasur मोहिनी Mohini

लंकानगरी निव्वळ निखळ सुवर्णाची होती. नगरीमधील वाडे, वास्तु, शाला, मंदिरं-गोपुरं, प्रासादही सोन्या-चांदीचे असून त्यांत अष्टपैलू रत्ने व माणिक-पाचू-वैडूर्य चपखलपणे जडवली होती. दिवसातच नव्हे तर रात्रीही ती अद्भुत नगरी स्वयंतेजानं चमचम करत असे. सागराच्या पाण्यात पडणारी नगरीची नयनरम्य छाया पाण्याच्या लाटांबरोबर हेलकावे घेत असे. नगरी म्हणजे विश्वकर्म्याला पडलेलं गोड स्वप्न होतं. कारण ही निर्मिती त्याची स्वतःची होती. स्वर्गीय देवदेवता, यक्षकिन्नर व अप्सरा या नगरीकडे विस्मयानं व कौतुकानं पाहात असत. सागरामुळे तर तिचं लावण्य द्विगुणीत झालं होतं.

या रत्नखचित सुवर्णनगरीचा शास्ता होता रावण. तो कुंभनसी राक्षसी व विश्रवण मुनी यांचा ज्येष्ठ कुलदीपक. त्याला दहा मस्तकं होती, म्हणून त्याला दशाननही म्हणत असत. सारी पृथ्वी दशाननाच्या अंकीत होती. पृथ्वी, स्वर्ग व पाताळ या तिन्ही लोकांत त्याचा विलक्षण दरारा व वचक होत. तो दशग्रंथी विद्वान ब्राह्मण असून कट्टर शंकर भक्त होता. आपल्या शिवभक्तीचा त्याला फाजिल अभिमान होता. तो नित्यनेमानं पुष्पक विमानातून वैभवाचं प्रदर्शन करत कैलासावर जाऊन फळं-फुलं, पानं, धान्य व रत्नं इत्यादी वस्तूंची लाखोली (१ लक्ष) शंकराला वाहून पूजा करत असे. एकदा कमळाचा लक्ष वाहताना एक कमल कमी पडलं तर यानं आपलं नेत्रकमल वाहून लक्ष पुरा केला. असा हा भक्त शंकराला प्रिय नसता तरच नवल! शंकर चिताभस्माचा भोक्ता असल्यानं रावण तेसुद्धा शंकराला अर्पण करत असे.

रावणानं यम, ब्रह्म, वरुण, नाग, चंद्र आदींची वैभवशाली नगरं जिंकून अधिकार प्रस्थापित केला होता. राज्याचं क्षेत्र वाढल्यामुळे त्याच्या कामाचा व्यापही वाढू लागला. साहजिकच राजकारणांतून वेळ काढून रोज कैलासावर जाणं त्याला जमेना. म्हणून त्यानं आपली खास दासी जृम्भा हिच्यावर शंकराला चिताभस्म नेऊन देण्याचं काम सोपवलं.

जृम्भेनं काही दिवस न कंटाळता कैलासावर भस्म नेऊन दिलं, पण नंतर तिला आपलं काम सोडून जाणं जमेना. तिनं ते काम आपल्या सुपुत्रावर सोपवलं. हा पुत्र, भस्मासुर आळसी व ऐदी होता. तो कायम स्मशानामध्ये लोळत असायचा. ना काम, ना धाम. त्याला जर असं कामाला लावलं तर तो आळस झटकेल. मग त्याला बायको मिळेल व प्रत्यक्ष शिवाची कृपा झाली तर आकाशीचे चंद्रसूर्यही त्याला मिळतील, असा सूज्ञ विचार त्या मातेनं केला. चार-पाच वेळा त्याला कैलासावरही नेलं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

.............................................................................................................................................

आता भस्मासुराच्या मागे काम लागलं. पण काही दिवसांनी स्वारी कंटाळली. पृथ्वीवर जी माणसं मरत त्यांत पापी लोकांचा भरणा असे. पुण्यवान, आयुष्यमान असे कमी असत. पुण्यवान माणसाचं चिताभस्म पोहोचवण्याचं नसतं झेंगट मातेनं आपल्यामागे लावलं आणि आपल्या आरामाला सुरुंग लावला असं त्याला वाटू लागलं. तो कुरकुरत ते काम करू लागला. पहिलं स्मशानच बरं होतं. हे काम असं मध्येच सोडणं म्हणजे शंकराच्या तिसर्‍या नेत्राची शिकार होणं, हे साधं गणित त्याला माहीत होतं.

धडाडणार्‍या पुण्यवान माणसाची चिता शोधण्यातच त्याचा बराच वेळ खर्च होई. तेव्हा विनासायास भस्म मिळवण्यासाठी काय करावं असा विचार करत जंगलातून जात असताना एका निर्जन पायवाटेवरून एक माणूस लगबगीनं जाताना त्याला दिसला. त्याच्या वेषभूषेवरून व हातांतील सामानावरून तो वैद्य असून कुठल्यातरी रोग्याकडे जात असावा असं त्यानं अनुमान केलं. त्या किर्रर्र जंगलात श्वापदरूपी मृत्युचं लक्ष जाण्यापूर्वी वसतीचं ठिकाण गाठावं असा विचार करून तो लगबगीनं जात होता.

त्या दिवशी भस्मासुराला कुठेच भस्म मिळालं नव्हतं. स्मशानांत पापी माणसांच्या चिता धडाडत होत्या. श्रमानं व रागानं त्याला तिरीमिरी आली आणि त्यानं अदृश्यपणे आपल्या तळहात त्या वैद्याच्या टाळूवर हाणला. अकस्मात वर्मी आघात बसल्यामुळे वैद्य महाशय वाटेवरच गतप्राण झाले. इकडे तो रुग्णही औषधपाणी वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावला. सुदैवानं दोघंही पुण्यवान असल्यानं भस्मासुराची दोन दिवसांची चिंता मिटली. तत्क्षणी एक विचार त्याच्या मनात चितेसारखा धडाडला. रुग्णाचं क्रियाकर्म त्याच्या आप्तांनी केल्यावर भस्मासुरानं ते भस्म शंकराला नेऊन दिलं. विशेष मन लावून भोळ्या सांबाची पूजा केली व नेहमीप्रमाणे लगेच निघून न जाता तो तिथंच घुटमळत राहिला. शंकरानं विचारल्यावर त्यानं चिताभस्म मिळण्यामागची अडचण सांगितली व नंतर म्हणाला, ‘‘हे प्रभो, ज्याच्या मस्तकी मी हात ठेवीन त्याचं भस्म होईल असं वरदान दिलं तरच हे शक्य आहे, एरवी भस्म मिळणं खरोखर दुरापास्तच!’’

या वरामुळे कोणता अनर्थ ओढवेल याचा जरासुद्धा विचार मनात न येता प्रभुनं भक्ताला संतुष्ट केलं. या अद्भुत वरामुळे माकडाच्या हाती कोलीत मिळालं. वर सफल झाल्याची प्रचिती आल्यावर तर त्याचा आनंद त्याच्या नगार्‍याएवढ्या उदरांत, रांजणाएवढ्या मस्तकांत आणि कोत्या मनात मावेना. तो आपला ‘शुभहस्त’ वर दिल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या मस्तकावर ठेवू लागला. कोण पापी अन् कोण पवित्र याचा सारासार विचार त्याला राहिला नाही. पोरगं मार्गी लागलं याचा जृम्भेला आनंद झाला. पण वरप्रसादाविषयी ती अनभिज्ञ राहिली. परिणामी, ठायी ठायी भस्माचे ढीग दिसू लागले. यामागे आपले ‘कर्तृत्ववान’ चिरंजीव आहेत अशी पुसटशी शंकाही तिला आली नाही. काही दिवसांनी तशी कुणकुण तिच्या कानी आली, पण सर्व आपल्या पुत्रावर ‘जळतात’ असं समजून तिनं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आश्रम, मंदिरं, शाला ओस पडू लागल्या. ‘महान लोकोत्तर’ कार्याच्या गडबडीत भस्मासुर कैलासावर जायचं विसरलं व शंकरही समाधिस्त झाल्यावर त्यांना भस्माची गरज लागली नाही.

भस्मासुरानं आपल्या कर्तृत्वानं त्रिभुवनांत दहशत निर्माण केली. त्यानं एकदा पाताळात जायचं मनावर घेतलं. इतकं होईपर्यंत मिळालेल्या वराची वार्ता सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. जृम्भेच्या कानीही गेली, पण ती गप्प बसली. न जाणो पुत्रानं आपल्यालाच भस्म केलं तर?

भस्मासुर पाताळात आलेला कळताच नागराज शेषाची हबेलहंडी उडाली. तो भयानं जागच्या जागी चुळबुळू लागला. तशी त्याच्या शिरांवरील भूमाता थरथरू लागली. शेषाकडे कुत्सितपणे पाहात भस्मासुर क्षीरसागरांत शिरला. नेहमी सासुरवाडीस आरामात शेषशय्येवर विसावा घेत देवी लक्ष्मीशी सुखसंवाद करणारा श्रीविष्णू तिच्यासह वैकुंठाला गेला असल्याचं त्याला कळलं. गर्वानं उन्मत्त होऊन त्यानं इंद्राच्या पुष्करमालीनी सभेत धुमाकूळ मांडला. सोमरसाचा आस्वाद घेत सुंदर अप्सराचं नृत्य बघणार्‍या इंद्राला त्याच्या आगमनाचा ‘पवित्र’ उद्देश कळताच ऐरावतावर स्वार न होता त्यानं शचीसह वैकुंठ गाठलं. मंदाकिनी नगरीचा स्वामी भस्मासुर येण्यापूर्वीच आपल्या मर्जीतील स्त्रियांसह वैकुंठाला पळाला. ब्रह्माची मनोहारिणी सभाही अशीच रिती झाली. ब्रह्मा-ब्रह्माणीसह मुनी, नारद यांनी चिपळ्या व ब्रह्मविणा तिथंच ठेवून वैकुंठाचा मार्ग धरला. यमाची संयमनी नगरी, वरुणाची सुखानगरी व नागांची भोगावती नगरीही भस्मासुराच्या आगमनासरशी ओस पडली.

सर्व देवता विष्णुगृही गेल्याचं भस्मासुराला कळताच त्याला अस्मान ठेंगणं झालं. कितीतरी वेळ त्याच्या गडगडाटी हास्याचे पडसाद त्या ओस पडलेल्या नगरीत आदळत राहिले. उन्मादात तो कैलासावर येऊन धडकला. त्यावेळी उमा-महेश सारीपाट खेळत होते. नंदी, भृंगी, शृंगी व इतर गण कौतुकानं खेळ अवलोकित होते. पार्वती फासे टाकणार तोच भस्मासुराचे तिथं आगमन झालं. त्याच्या थरकाप उडवणार्‍या हास्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या एकंदर अवतारावरून शंकराला अंदाज आला व त्याच्या कटीचं नागबंधन सैल होऊन गजचर्म फिटायची वेळ आली. आपल्या स्वामीची अवस्था पाहून नाग, चंद्र व गंगा अदृश्य झाले. शंकरालाही पलायनाविना मार्ग उरला नाही. पार्वतीचा विचार न करता तो वैकुंठावरील शृंगारवनांत कमलाच्छादित सरोवराकाठी एका वटवृक्षाच्या रूपांत उभा राहिला.

चित्र - ‘अमर चित्र कथा’मधून साभार

कैलासावरील रम्य प्रदेशांत त्रिभुवन सुंदरी पार्वतीला पाहून भस्मासुर सारासार विवेक विसरला व तिच्याशी लगट करू लागला. वासनेने बरबटलेले अमंगल शब्द उधळू लागला. पूर्वी रोज शंकराला विविध लक्ष वाहणारा तो कामी दैत्य आता अपशब्दांची लाखोली वाहू लागला. पार्वती आपल्या भोळ्या पतीराजांवर संतापली. ‘कुणाला कसला वर द्यावा याचं तारतम्य नसावं म्हणजे काय? खुशाल या राक्षसापायी पत्नीला सोडून पळून गेले आणि सेवकांनीही स्वामीचं अनुकरण केलं. आता या पाप्यानं आणखी पुढे पाऊल टाकण्यापूर्वीच आपण लक्ष्मीकडे जावं’ असा विचार करून देवी पार्वतीही गुप्त झाली.

वैकुंठावर येऊन पाहाते तो ही गर्दी! अप्सरा, विद्याधर, कुबेर, नारद यांच्याबरोबर यम, वरुण, नाग श्रेष्ठही तिथं होते. चंद्रही सत्तावीस नक्षत्रांसह आला होता. सर्वांच्या मुद्रा चिंतेनं म्लान झाल्या होत्या. सर्वांनी भस्मासुराच्या भयानं पलायनवाद स्वीकारला होता. त्या गर्दीत पार्वतीला पती दिसेना. कुठे गेले नकळे. श्रीविष्णूनं सर्वांचं गार्‍हाणं ऐकून सर्वांना अभय दिलं. मनात कसलासा निश्चय केला व असंच करावं असं ठरवून सर्वांच्या नकळत शृंगारवनांतील वटवृक्षाजवळ आले. ते वन नावाप्रमाणे शृंगारीक भावनांना उत्तेजन देणारं होतं. सृष्टीच्या गात्रागात्रांत वसंत फुलला होता. तो वटवृक्ष पानाफुलांनी व लाल फळांनी परिपूर्ण होता. वृक्षाच्या पारंब्या थेट पायापर्यंत लोळत होत्या. नेमक्या याच वृक्षाच्या शितल छायेत भस्मासुराची स्वारी अंमळ विसाव्यासाठी आडवी झाली होती. नाहीतरी तिन्ही लोकांमध्ये व देवांच्या नगरीमध्ये भिंगरीप्रमाणे फिरल्यामुळे त्याचे गोल मुसळासारखे पाय कुरकुरायला लागले होते. अमृतप्राशन करून अमर झालेल्या देवांची फजिती आठवून त्याला हसू येत होतं. जवळच काही अंतरावर यौवनानं निथळणारी एक रुपगर्विता उभी राहून आपल्याला न्याहाळत आहे, हे त्याच्या गावीही नव्हतं.

‘‘प्राणनाथ...! हृदयेश्वरा...!’’

चांदीच्या नाजूक घटिकासारखा मधुर मंजुळ ध्वनी भस्मासुराच्या कर्णविवरांत निनादला. त्यानं कुशीवर वळून आवाजाच्या अनुरोधानं पाहिलं आणि तो पाहतच राहिला. आश्चर्यानं विस्फारलेले बटबटीत नेत्र व दुर्गंधीयुक्त वासलेलं तोंड मिटण्याचं भानही त्याला राहिलं नाही. कारण जिच्या सौंदर्यात तिळमात्र उणीव नव्हती असं मनोरम स्त्रीशिल्प वटवृक्षाच्या पारंबीला धरून आकर्षकपणे उभं होतं. आकाशी वर्णाचं झिरझिरीत वस्त्र तिनं परिधान केलं होतं. वस्त्राला चांदण्या जडवल्या होत्या व त्यांचा सौम्य प्रकाश तिच्याच भोवती विखुरला होता. हिरव्या रंगाची कंचुकी तिची प्रमाणबद्ध काया दर्शवत होती. कटीवर सुवर्णमेखला रुळत होती. केशसंभारांत इंद्राच्या नंदनवनातील सदासतेज गंधसुमनं मोठ्या कलात्मक रीतीनं माळली होती. सुवर्णमंडीत पाचूचे मोजके अलंकार तिचं लावण्य द्विगुणीत करत होतं. गुलाबी वर्णाची पारदर्शक ओढणी तिनं संपूर्ण चेहर्‍यावर घेतली होती. तरीही तिचं अनाघ्रात लावण्य विरळ मेघपटलाआडून डोकावणार्‍या चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अमृतमय आणि लोभस दिसत होतं. निळ्या निर्मळ जलाशयांत अर्धोन्मिलीत कमळकळी दिसावी तशी ती दिसत होती. दैत्याच्या मनाचा सुखलोलुप भ्रमर तिच्याभोवती कर्णकर्कश स्वरांत भोंगारव (गुंजारव) करू लागला.

भस्मासुराचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत करून ती रमणी गजगतीनं थोडी दूर जाऊन उभी राहिली. तिच्या पायांतील नुपूरांचा मंजूळ ध्वनी व रत्नजडीत सुवर्णकंकणांची किणकिण त्याच्याविषयी मनाला गुदगुल्या करून गेली. त्याच्या सर्वांगावर बाभळीएवढे रोमांच उभे राहिले, पण तो आळशी गडी काही उठून बसला नाही. त्या रतीसदृश्य कामिनीच्या ठायी नाग, हरिण, चंपक, सिंह, गज व मीन (मत्स्य) यांचे सौंदर्यगुण एकवटले होते. भरगच्च कुरळ्या केसांची एकच वेणी - जिच्यात दिव्य गंधपुण्यांचे वळेसर माळले होते - तिच्या पाठीवर नागसर्पाप्रमाणे रुळत होती. हरिणाच्या नेत्राप्रमाणे असलेले टपोरे काळेभोर नेत्रद्वय तिनं दैत्यावर रोखले होते. चाफेकळीसारखी नासिका व पिकल्या तोंडल्याप्रमाणे असलेले तिचे अधर प्रणयाला आव्हान देणारे होते. तिच्या यौवनाचा भार सिंहकटीला सोसवत नव्हता. तिची चाल मदोन्मत्त हत्तीणीप्रमाणे होती.

तिच्या दर्शनानं भस्मासुर आपले श्रम, दगदग, धावपळ सारं विसरला. ते आरसपानी देखणं स्त्रीशिल्प जवळून न्याहाळावं म्हणून तो उठून उभा राहण्यापूर्वीच तो स्वर्गीय सुखाचा ठेवा हळूवार पदन्यास करत त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. त्यावेळी सुरणाच्या मातीनं लडबडलेल्या कंदापाशी नैसर्गिक ताजेपणानं रसरसलेला पारदर्शी डोंगरी आवळा ठेवावा तशी ती जोडी दिसत होती. कमळासारखे करकमल जोडून तिनं त्याला प्रणाम केला. मंजुळ घटिकांप्रमाणे ती किलकिलली.

‘‘प्राणवल्लभा, मी मोहिनी. आपल्या दर्शनानं मी आज धन्य झाले. इतके दिवस मी जोडीदाराच्या शोधार्थ वणवण भटकले, पण मनाला भावेल असा पुरुष मिळाला नाही. आज मात्र मला माझं सुखनिधान गवसलं. जीवन आणि श्रम सार्थकी लागले. लक्षात येतंय ना माझं म्हणणं?’’

‘काय? तू माझ्याशी विवाह करू इच्छितेस? मी स्वप्नांत तर नाही ना?’ भस्मासुराला गगन ठेंगणं झालं. कारण आत्तापर्यंतचा त्याचा अनुभव उलट होता. त्याच्या निष्क्रिय व ऐदी वृत्तीमुळे एकही स्त्री, अगदी राक्षस कुळातीलही त्याच्या वार्‍याला उभी राहिली नव्हती. वरप्राप्तीमुळे तर कुणी तसं धाडस दाखवलं नाही अन् ही सौंदर्याची व नाजुकतेची गंधकुपी आपण होऊन त्याच्या रुक्ष जीवनांत प्रवेश करायला उत्सुक होती. त्या भिक्षेकर्‍याच्या कंगाल पार्वतीची ऐशी की तैशी! ‘भस्मासुरा, गड्या तू नशीब काढलंस खरं!’ त्यानं मनातल्या मनात आपली फरसबंदी पाठ दणादणा ठोकली. जीवनाचा रोख आज बदलणार होता.

‘‘प्रिये, लाडके, जीवलगे’’ भस्मासुराला नेमका चपखल शब्द सापडेना. ‘‘राणी, प्रेमसारीके चल. आधी मातेचं दर्शन घेऊ. आपली चंद्रमुखी चारुगात्री स्नुषा पाहून ती धन्य होईल. विवाह करू व स्वर्गसुखाचा मनमुराद उपभोग घेऊ. माझ्या मातेला नातवंडांची खूप हौस आहे. चल आता, विलंब उपयोगाचा नाही.’’

त्या उतावळ्या नवरोबाचे मनसुबे ऐकून मोहिनी मधाळ हसली. भस्मासुराच्या दगडी अंगावर बकुळपुष्पं टपटप पडली. ‘‘चला स्वामी. नाहीतरी आता मी आपल्यालाच वरण्याचा संकल्प केला आहे. देवलोकी, मृत्यूलोकी, नागलोकी विशेष असं काय आहे? केवळ वस्त्रप्रावरणांनी व अलंकारांनी नटलेले पुरुष पाहून मनच उडालं. आपल्यासारखं मर्दानी देखणेपण मला कुठेच आढळलं नाही, हे एका दृष्टीनं बरंच झालं. अन्यथा मी या भाग्याला मुकले असते. पण स्वामी विवाहापूर्वी मी माझा नवस पुरा करीन म्हणते.’’

‘‘कोणता नवस प्रिये? बोल बोल’’ गुडघ्याला बांधलेले बाशिंग उतावीळपणे जोरांत हिंदकळलं.

‘‘विवाहापूर्वी मी माझ्या भावी जोडीदारासह नृत्य करेन हा नवस. मी हावभाव करून जसे पदन्यास करीन, त्याचं फक्त आपण अनुकरणच करायचं. जमेल ना?’’ तिच्या लाडीकपणावरून जीव ओवाळून टाकावा असं त्याला वाटलं. स्वारी पूर्णपणे आपल्या कह्यात आली अशी तिची खात्री पटली. भस्मासुर म्हणाला, ‘‘का नाही? का नाही? चौसष्ट कला व चौदा विद्या मला ज्ञात आहेत. शरसंधान, रथयुद्ध, गदायुद्ध, तलवाजबाजी, भालाफेक यांत माझा हात कुणी धरणार नाही.’’

‘‘पण मी आपला हात धरणार आहे तो आयुष्यभरासाठी हं.’’

‘‘हो हो. माझी ना नाही आणि प्रिये, मुष्टीयुद्धाबरोबरच गायन, वादन व नृत्य...!”

‘‘अं हं, फक्त नृत्यच. बाकीच्या युद्धाचं इथं काय प्रयोजन? ही प्रणयभूमी आहे, रणभूमी नाही. खरं ना? आता नृत्य करू. मग विवाह. मग...!’’

गळणारी लाळ हातानं पुसत नंदीबैलाप्रमाणे मान हलवत त्यानं आपलं कटीवस्त्र घट्ट केलं. मोहिनीनं यक्ष-किन्नर व विद्याधर यांना वाद्यं वाजवण्यासाठी पाचारण केलं. अप्सराही नृत्य बघायला आल्या. वैकुंठावर जमलेले सर्व देवदेवताही तिथं आल्या.

प्रथम मोहिनीनं भूमीला वंदन करून अर्धनारीनटेश्वरासारखी नृत्यमुद्रा धारण केली. भस्मासुरानेही तिचं अनुकरण केलं. जसं ती करेल तसं तो करू लागला. हळूहळू नृत्याला व वाद्यांनाही वेग येऊ लागला. मोहिनी बेफामपणे नृत्य करू लागली. भस्मासुरही. मोहिनीचा सुकुमार चेहरा घर्मबिंदूंनी डवरला. त्याच्या अंगातून चिकट घामाचे ओघळ वाहू लागले. ती मोहक दिसू लागली व तो ओंगळ. या गर्दीत पार्वतीचं लक्ष नृत्याकडे नव्हतं. ती भिरभिरत्या नजरेनं शंकराला शोधत होती, पण अजून ते दिसत नव्हते. मोहिनी मात्र उस्फूर्तपणे नाचत होती. भस्मासुर थकला. मोहिनीनं हे हेरलं व एका बेसावध क्षणी तिनं आपला उजवा हात आपल्याच मस्तकावर ठेवला. त्यानंही तिचं अनुकरण केलं व वरदान फळास आलं. भावी आयुष्याच्या मधुर सोनेरी स्वप्नांच्या गाठोड्यासह भस्मासुर राख होऊन कोसळला.

‘‘स्वामी...भस्म!’’ अशी आर्त किंकाळी मारून मोहिनी नाटकीपणानं भस्माच्या ढिगाकडे धावली. संकटाचं निवारण झाल्यावर भगवान शिव वटवृक्षातून मूळ स्वरूपांत अवतरले. ‘‘अगबाई! आपण? धन्य आहे हो. मी आपली खुळ्यासारखी इकडेतिकडे शोधत बसले.’’ शिव हसला. मोहिनी उठली व गजगतीनं शिवाजवळ जाऊन श्रद्धापूर्वक त्यांच्या ललाटी भस्म लावलं. शिवाला ती खेटूनच उभी राहिली. शिवानंही तिला डाव्या हातानं अगदी जवळ घेतलं. ते पाहून तर पार्वती क्रोधानं लक्ष्मीला म्हणाली, ‘‘नारायणी, माझे स्वामी पळून गेले म्हणून देवी शचीजवळ बोललीस. आता आपले पतिराज कुठे आहेत? कैलासात, क्षीरसागरांत व इथंही वैकुंठावर दिसत नाहीत. पळपुटे कुठले!’’ पतीवरचा राग लक्ष्मीवर काढला दुसरं काय? खरं म्हणजे लक्ष्मीलाही आपलं सौभाग्य कुठल्या कामगिरीवर गेलं ते ठाऊक नव्हतं. बिचारी निरुत्तरच झाली. विष्णूनंही आता जास्त ताणून धरलं नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain

.............................................................................................................................................

‘‘हा काय इथंच तर आहे मी आदी माते.’’ शिवापासून अंमळ दूर होत मोहिनी उद्गारली व काही निमिषातच तिच्या जागी विष्णूची चतुर्भुज मूर्ती साकार झाली.

‘‘आं? आपण? बाई बाई बाई. काय म्हणावं या सोंगाला?’’ लक्ष्मीचा हात नवलानं तोंडावर गेला.

‘‘मातोश्री, या सोंगामुळेच आपण आज तरलो हे विसरू नका.’’ विष्णूची बाजू घेणार नाही तो भक्त कसला. नारदमुनी तर भक्तश्रेष्ठच. चंद्राची पत्नी मात्र मुनींना म्हणाली, ‘‘पण देवर्षी, आपल्याला पाहून मला सावित्रीसूताविना विप्र व सौभाग्यालंकाराशिवाय सुवासिनीच डोळ्यांसमोर उभी राहते. आपल्या चिपळ्या अन् विणा कुठे दिसत नाही ती?’’

तिच्या बोलण्यातली खोंच जाणवून देवर्षी ओशाळून म्हणाले, ‘‘त्याच काय आहे रोहिणीदेवी, मोहिनीचं स्वर्गीय नृत्य बघण्याच्या नादात दोन्ही ब्रह्मलोकीच विसरून आलो.’’

‘‘नृत्याच्या नादांत की पलायनाच्या गडबडीत? बाकी आपल्यालाच बोल लावण्यांत काय अर्थ आहे म्हणा!’’ सर्वांकडे पाहात इंद्रानं म्हटलं.

‘‘चिपळ्या अन् वीणा नसली म्हणून काय झाल? नुसतं ‘नारायण नारायण’ म्हटलं तरी कानांना किती गोड वाटत नाही का गं इंद्राणी.” पार्वतीनं हसत टोमणा मारला. तशी लक्ष्मीनं कृतक्कोपानं दोघींकडे पाहून म्हटलं, ‘‘भगवती, कुणाला वर द्याल तेव्हा विचार करून देत जा असं आपल्या पतीराजांना सांग. निष्कारण इकडच्या स्वारीला निवारणार्थ कष्ट घ्यावे लागतात.’’ लक्ष्मीही कुरकुरली. त्या दोघींच्या प्रश्नोत्तरानं सर्वांचीच करमणूक झाली. भस्मासुराचं संकट टळलं म्हणून शंकराच्या आज्ञेनं पुनःएकदा शृंगारवनात रंभा-मेनका, मंजुघोषा, विप्रचित्ती आदी लावण्यरवनी देवांगनाचं नृत्य झालं. त्यानंतर शंकर विष्णूकडे पाहात म्हणाले, ‘‘आता आमची मोहिनी नृत्य करेल.’’ त्यावर लक्ष्मी फुरंगटून म्हणाली, ‘‘काही नको नृत्य वगैरे. आता सर्व आपापल्या सदनी जातील. चला हो.’’

परस्परांचा निरोप घेऊन ब्रह्म-ब्रह्माणी हंसावरून, वरुण-गौरी मगरीवरून, उमा-महेश नंदीवरून, शची-इंद्र ऐरावतावरून व लक्ष्मीनारायण गरुडावरून मार्गस्थ झाले. नंतर नारदमुनींनी टाळ्यांच्या तालांवर हरीभजन म्हटलं व तेही सत्यलोकाकडे निघाले.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 12 February 2019

मस्त कथा! -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख