भारताची फाळणी खरंच का महात्मा गांधींमुळे झाली?
सदर - गांधी @ १५०
अजित धनवडे
  • म. गांधींच्या विविध भावमुद्रा आणि भारताचा फाळणीपूर्व व फाळणीनंतरचा नकाशा
  • Wed , 06 February 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

१९४२च्या आधी ब्रिटिशांविरुद्ध ज्या चळवळी आणि बंड झाले, त्यात हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून आले होते. १७६३ चे दक्षिणेतले उठाव आणि १८५७चे बंड ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणे म्हणता येतील. त्यामुळे आपली सत्ता भारतावर अशीच ठेवायची असेल तर हिंदू व मुस्लिम अशी फूट पाडावी लागेल आणि ‘फोडा आणि झोडा’ हे धोरण स्वीकारावे लागेल हे इंग्रजांनी ओळखले.

यातला पहिला टप्पा म्हणून लॉर्ड कर्झनने १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. ‘राज्यकारभाराची सोय’ या गोंडस नावाखाली १९ जुलै १९०५ रोजी बंगालची फाळणी जाहीर केली आणि १६ ऑक्टोबर १९०५ रोजी तिची अंमलबजावणी केली गेली. पण हिंदू-मुस्लिमांनी हातात हात घालून बंगालच्या फाळणीविरोधात लढा दिला आणि ब्रिटिशांना फाळणी रद्द करण्यास भाग पाडले. त्यामुळे एवढ्या-तेवढ्या गोष्टींनी हिंदू-मुसलमान यांच्यात फूट पडणार नाही याची जाणीव इंग्रजांना झाली.

मधल्या काळात १८८५ ला काँग्रेसची स्थापना झाली आणि हां हां म्हणता अत्यंत वेगाने देशभर काँग्रेस पसरत गेली. त्याच वेळी लॉर्ड डफरीनने काँग्रेस सभासदांचा अभ्यास केला. तेव्हा त्याला दिसून आले की, काँग्रेसमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत आणि तुलनेत मुसलमान कमी आहेत. त्याच वेळी १८८८ ला डफरीनने भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे आहेत, असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला… आणि फाळणीची पहिली बीजे भारतात रोवली गेली.

हीच ती वेळ होती जेव्हा हिंदू-मुसलमान या दोन्ही धर्मातल्या कर्मठ आणि धर्मवादाचे राजकारण करणाऱ्यांचे लहान लहान गट निर्माण होऊन धर्माधिष्ठित राजकारणाचे छोटे छोटे प्रवाह वाहायला सुरुवात झाली होती. हे गट/प्रवाह एकमेकांचा द्वेष करू लागले. त्यामुळे भारताच्या फाळणीची बीजे जशी ब्रिटिश लोकांच्या ‘फोडा आणि झोडा’ या धोरणात आहेत. किंबहुना तशीच ती मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि तत्सम गटांच्या धर्माच्या आणि एकमेकांच्या द्वेषाच्या राजकारणात आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4712/Streevad-Sahitya-ani-samiksha

.............................................................................................................................................

१९४७ ला झालेल्या फाळणीत स्वतंत्र पाकिस्तानचा पुरस्कार करणारे जीना १९४० पर्यंत अखंड भारताचे पुरस्कर्ते होते. सुरुवातीला तर ते मुस्लिम लीगचे सभासदसुद्धा नव्हते. द्विराष्ट्रवाद, हिंदूंचे वर्चस्व इत्यादी केवळ बागुलबुवा आहेत. मुसलमानांचे मन विचलित करून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ नये, यासाठी इंग्रजांनी खेळलेला हा डाव आहे अशा स्पष्ट मताचे जीना होते. १९१७ च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. १९४० पर्यंत त्यांची हीच मते कायम होती. पण १९४० च्या मुस्लिम लीग अधिवेशनात प्रथमच स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर झाला.

जीनांच्या या बदललेल्या भूमिकेचे एक कारण हेही होते की, जीनांना भारताचे नेतृत्व करायचे होते. पण राजकारणात गांधीजींचा प्रभाव वाढत गेला आणि आपसूकच देशाचे नेतृत्व गांधीजींकडे गेले. लोकांच्या धार्मिक भावना चेतवून गांधींनी नेतृत्व आपल्याकडे घेतले असा समज जीनांचा झाला. त्यातूनच मग पूर्ण भारताचा नाही ते नाही, कमीत कमी मुसलमान समाजाचा गांधींसारखा नेता व्हावे ही महत्त्वाकांक्षा जीनांची अखंड भारताविषयीची भूमिका बदलण्यास पूरक ठरली. परिणामी १९४० च्या मुस्लिम लीग अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडला गेला.

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामावर लिहिलेल्या पहिल्या इंग्रजी ग्रंथात सावरकरांनी म्हटले होते की, ‘मुसलमान हे हिंदूंप्रमाणे प्रखर राष्ट्रवादी आहेत.’ पण काही काळानंतर जसे जीनांसह मुस्लिम लीगचे नेते इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा’ धोरणाला बळी पडले, तसेच काही प्रखर हिंदू नेतेही बळी पडले. आणि ज्यांना आधी ‘राष्ट्रवादी’ म्हटले त्यांनाच ‘राष्ट्रद्रोही’ म्हणणे राष्ट्रभक्तीचे वाटू लागले.

१९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकर म्हणाले की, ‘आज हिंदुस्थान एकजीव व एकात्म राष्ट्र झालेले आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये. उलट या देशात मुख्यतः हिंदू आणि मुसलमान ही दोनही राष्ट्रे आहेत हे मान्य करून चालले पाहिजे’. हे सावरकरांचे कट्टर भक्त व अनुयायी मामाराव (शं. रा.) दाते यांनी त्यांच्या ‘हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

या दोन्ही धर्मांच्या कट्टर नेत्यांमध्ये गांधीजींना ‘महात्मा’ मानायचे नाही, या गोष्टीवर एकवाक्यता होती. यापैकी जीनांनी ५ ऑगस्ट १९४४ ला वृत्तपत्रांना निवेदन देताना गांधीजींना ‘महात्मा’ म्हटले आहे. आणि विशेष म्हणजे १९९० नंतर हिंदुत्ववादी लोकांना जेव्हा भारतात काही राज्यांत सत्ता मिळाली, तेव्हा त्यांनी गांधींना ‘महात्मा’ म्हटले आहे. तोपर्यंत त्यांनीही गांधीजींना ‘महात्मा’ आणि ‘राष्ट्रपिता’ म्हणून नाकारले होते. एकूणच हा धर्मवादी नेत्यांच्या राजकीय मतलबाचा भाग आहे.

महात्मा गांधींनी मुस्लिम अनुनयाचे राजकारण केले आणि गांधीच फाळणीला जबाबदार होते, असा कुप्रचार हिंदुत्ववादी लोकांकडून नेहमीच केला जातो. आणि सामान्य माणूस या प्रचाराला बळी पडतो. इतिहास याच्या नेमका उलट आहे. फाळणी टाळण्यासाठी गांधीजींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींनी एक नऊ कलमी योजना व्हॉईसरॉयच्या समोर ठेवली होती. ती योजना अशी होती -

१. मंत्रीमंडळ बनवण्याचा पर्याय जीनांना द्यावा.

२. मंत्र्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार जीनांकडे असावेत आणि त्यातून त्यांनी सर्व जाती-धर्मांना प्रतिनिधित्व मिळेल असे मंत्रीमंडळ बनवावे.

३. भारतीयांच्या हिताच्या गोष्टींसाठी काँग्रेस जीनांना सर्व प्रकारचे सहकार्य करेल.

४. लॉर्ड माउंटबॅटन कोणत्या गोष्टी भारतीयांच्या हिताच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाहीत, हे ठरवतील. 

५. ज्या पक्षाचे सरकार जीना बनवतील, त्या सरकारच्या वतीने जीना शांततेसाठी प्रयत्न करतील.

६. या चौकटीत राहून जीना त्यांना अभिप्रेत असलेल्या पाकिस्तानची संकल्पना सत्तांतरापूर्वी सादर करतील.

७. नॅशनल गार्डस किंवा खासगी सैन्य असणार नाही.

८. भारतीयांच्या हिताच्या आणि कल्याणाच्या मुस्लिम लीगच्या उपाययोजनांना काँग्रेस पाठिंबा देईल.

९. हा प्रस्ताव जर जीनांना मान्य नसेल तर पर्याय म्हणून काँग्रेस समोर ठेवण्यात येईल.

हा प्रस्ताव व्हॉईसरॉयला चांगला वाटला होता.

या प्रस्तावावरून हे दिसून येते की, फाळणी टाळण्यासाठी गांधीजी कोणत्या टोकाला जायला तयार होते. याउपर फाळणी टाळण्यासाठी गांधीजींनी राजाजी योजनेलादेखील पाठिंबा दिला होता. राजाजी योजना अशी होती- 

१. स्वतंत्र भारताच्या घटनेबाबत पुढे नमूद केलेल्या अटी मान्य झाल्यास हिंदी स्वातंत्र्याच्या मागणीला लीग मान्यता देईल आणि संक्रमण काळात हंगामी सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसशी सहकार्य करेल.

२. युद्ध समाप्तीनंतर वायव्य आणि ईशान्य भारतातील मुस्लिम बहुसंख्येच्या सलग जिल्ह्यांची फेररचना करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल. या प्रकारे पुनर्रचित अशा विभागात प्रौढ मतदानाने वा इतर व्यवहार्य रीतीने सार्वमत घेऊन हिंदुस्थानातून फुटून निघण्याबाबत निर्णय घेतला जाईल. बहुमताने स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करायचे ठरले तर सीमेवरील जिल्ह्यांना दोनपैकी कोणत्या राज्यात सामील व्हायचे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य राहील.

३. सार्वमत घेण्यापूर्वी सर्व पक्षांना आपापली भूमिका मांडता येईल.

४. वेगळे होण्याचे ठरले तर संरक्षण, व्यापार, दळणवळण आणि इतर आवश्यक बाबतीत दोन्ही राष्ट्रांत करार होतील.

५. लोकसंख्येची अदलाबदल त्या त्या लोकांवर अवलंबून राहील.

६. ब्रिटिश सरकार संपूर्ण स्वातंत्र्य देणार असेल आणि हिंदुस्थानच्या कारभाराची जबाबदारी संक्रमित करणार असेल तरच या सर्व अटी बंधनकारक राहतील.

या योजनेत सरळ फाळणी हे तत्त्व अभिप्रेत नव्हते. त्यामुळे जीनांनी ही योजना फेटाळून लावली. याउलट ‘गांधींनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानची मागणी मान्य करावी आणि लीगशी हातमिळवणी करावी म्हणजे हिंदी लोकांचे स्वातंत्र्य जवळ येईल’ असे मुस्लिम लीगच्या कार्यकारिणीत जीना म्हणाले. राजाजींच्या तोडग्याला गांधीजींचा पाठिंबा होता म्हणून फाळणी झाली हा निष्कर्ष बालिश आहे. कारण राजाजी योजनेला जीनांनी कधीच पाठिंबा दिला नाही, उलट कडाडून विरोध केला होता.

प्रत्यक्षात जशी फाळणी झाली तशीच फाळणी जर राजाजी योजनेतून व्हावयाची होती, तर जीनांनी राजाजी योजनेला विरोध केला नसता. या दोन्ही घटनांवरून हे दिसून येते की, गांधीजींना फाळणी मान्य नव्हती आणि ती होऊ नये म्हणून त्यांनी जीनांसमोर वेगवेगळे पर्यायदेखील ठेवले होते. पण ‘आम्हाला निखळ पाकिस्तान पाहिजे, आम्ही वेगळेच पाकिस्तान मान्य करू’ अशा हट्टाला जीना पेटले होते. त्यावर गांधीजी म्हणाले की, ‘मुस्लिम लीग मुसलमानांची मोठी घटना आहे. तुम्ही तिचे नेते आहात हे पण मान्य. पण याचा अर्थ असा नाही की, भारतातील सर्वच मुसलमानांना वेगळा पाकिस्तान हवा आहे’.

काही हिंदुत्ववादी हा दावा करतात की, फाळणी टाळण्याच्या प्रयत्नांआडून गांधींनी मुसलमानांचा अनुनय केला. म्हणूनच गांधी जीनांना पंतप्रधान होऊ द्यायला तयार होते, लीगला सरकार स्थापायला देत होते!

एका बाजूला म्हणायचे ‘गांधींमुळे फाळणी झाली’ आणि दुसऱ्या बाजूला फाळणी टाळावी म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना ‘मुसलमानांचा अनुनय’ म्हणायचे! पण याबाबतीत गांधींनी लोकमान्य टिळकांचेच विचार पुढे नेले होते. स्वातंत्र्यासाठी परकीय शक्तीशी भांडण करताना आपण आपापसातले जातीभेद, धर्मभेद बाजूला ठेवून एक झाले पाहिजे. आणि असे करताना मुसलमानांना अधिक हक्क मिळाले किंवा सर्व राज्य जरी ब्रिटिशांनी मुसलमानांना दिले तरी हरकत नाही, पण हे राष्ट्र स्वतंत्र झाले पाहिजे, असे टिळकांचे लखनौ कराराच्या समर्थनार्थ मत होते.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करणारे फक्त गांधीजीच नव्हते, त्यांचा राजकीय उदय व्हायच्या कितीतरी आधीपासून न्या. महादेव गोविंद रानडे हेसुद्धा याच भूमिकेचे पुरस्कर्ते होते.

याशिवाय पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये दिले म्हणूनसुद्धा गांधीहत्येचे समर्थन हिंदुत्ववादी लोक करतात. पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याला तेव्हाच्या जनतेनेदेखील विरोध केला नाही. उलट स्वातंत्र्य मिळाल्यावर जनता आनंदात होती. म्हणून मग जनतादेखील फाळणीला जबाबदार आहे असे म्हणावयाचे का?

मुळात जे हिंदुत्ववादी फाळणीबद्दल गांधीजींना दोष देतात, त्यांनी किंवा त्यांच्या संघटनांनी फाळणी होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले? कदाचित तेव्हा त्यांच्या संघटनांची ताकद जास्त नसेलही. पण जी काय ताकद होती त्या ताकदीनुसार का नाही आंदोलन केले? मुळात ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, अशा संघटनांना अखंड भारताबद्दल बोलायचा नैतिक अधिकारच नाही.

ब्रिटिशांच्या, हिंदुत्ववाद्यांच्या आणि मुस्लिम लीगच्या महत्त्वाकांक्षी राजकारणाचे अपत्य म्हणजे फाळणी. फाळणी दुर्दैवी आहेच, पण भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि भारताला स्वातंत्र्य मिळत असताना याच संघटना सुतक पाळत बसल्या होत्या. अशा संघटना आज अखंड भारताच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, फाळणीसाठी गांधीजींना दोषी धरतात आणि त्यांच्या हत्येचे समर्थन करतात.

गांधीजींबद्दल अपप्रचार करणारे लोक प्रामाणिक नाहीत. प्रामाणिक असते तर असा अपप्रचार त्यांनी केला नसता आणि गांधींमुळे फाळणी झाली नाही, हे सत्य त्यांनी स्वीकारले असते. जरी त्यांना हे सत्य उमगले तरी ते जाहीरपणे कबूल करण्याइतका मोठेपणा त्यांच्याकडे नाही. पुढे हिंदुत्ववादी लोकांनी आपला मोर्चा पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडे वळवला. आणि नेहरू-पटेल यांनी सत्ता मिळवण्यासाठी फाळणी स्वीकारली अशी कुजबुज चालू केली. त्यातही नेहरूंवर जास्तच आगपाखड होती.

काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला होता. त्या ठरावाला काँग्रेस बांधील होती. हंगामी सरकारनंतर वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्या फाळणीविषयक भूमिकेत फरक पडला आणि ते फाळणीच्या प्रश्नांवर गांधीजींच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेऊ लागले. फाळणी स्वीकारली तर शांतता प्रस्थापित होईल, असे पटेल आणि नेहरू यांना वाटत होते. त्यावेळी गांधीजी म्हणाले की, ‘जर फाळणी अपरिहार्यच असेल तर ती ब्रिटिश सरकार भारतावर असताना होऊ नये. पटेल आणि नेहरूंना काय करायचे ते करू द्यात, पण देशाच्या फाळणीच्या पापाचा गांधी भागीदार होता असे म्हणू नका. सर्वांनाच स्वातंत्र्याची घाई झालेली आहे.’

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

हंगामी सरकारात लियाकत अली यांना अर्थखाते दिले होते. पटेल तेव्हा गृहमंत्री होते. पण अर्थखात्याची मंजुरी घेतल्याशिवाय पटेलांना एका पोलिसाचीदेखील नेमणूक करता येईना. शिवाय लियाकत अलींनी काँग्रेसच्या ठरावांशी सुसंगत पण हिंदी भांडवलदारांना अडचणीत आणणाऱ्या करपद्धतीचे तत्त्व लागू केले. यामुळे पटेल संतप्त झाले. लीगसोबत आपल्याला काम करत येणारच नाही, त्यामुळे फाळणी हाच पर्याय आहे असे त्यांच्या मनाने घेतले.

फाळणीला प्रथम पटेल यांची मान्यता घेतली गेली. पटेलांनी फाळणीला मान्यता दिल्यानंतर नेहरूंचा फाळणीला असलेला प्रखर विरोध हळूहळू कमी होत गेला. पटेल आणि नेहरू यांचा निर्णय अगतिकतेतून आलेला होता. त्यामुळे त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी फाळणी स्वीकारली म्हणणे अगदीच भाबडेपणाचे आहे.

.............................................................................................................................................

dhanawadeajitd@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 08 February 2019

अजित धनवडे, गांधी 'Vivisect me before vivisecting India' म्हणलेले ना? मग का नाही टाळली फाळणी? हिंदूंनी काँग्रेसला १९४६ साली निवडून दिली ते फाळणी टाळायच्या मुद्द्यावरच ना? नेहरूंनी आपण ४० वर्षं संघर्ष करून थकल्याने फाळणी स्वीकारंत आहोत असं स्वत:च कबूल केलंय. असो. तुम्ही म्हणताय की फाळणीच्या विरुद्ध ओरडणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनी फाळणी टाळायला काय केलं. प्रश्न रास्त दिसतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारत या प्रचंड खंडप्राय देशाची फाळणी अवघ्या १० महिन्यांत केली गेली. माहितीकरता सांगतो की चेकोस्लोव्हाकिया या चिमुकल्या देशाच्या फाळणीची प्रक्रिया तब्बल ३ वर्षं चालू होती (१९८९ ते १९९२). ऑगस्ट १९४६ पासून पुढे देशभर जिनाच्या डायरेक्ट अॅक्शनने भडकावलेल्या दंगली उसळल्या होत्या. दंगलीत अडकलेल्या हिंदूंना मदत करायचं पाहिलं तातडीचं काम होतं. त्यातूनही जरा उसंत मिळाली असती तर हिंदूंनी पाकिस्तान ताबडतोब नष्ट केला असता. नेहरूंनी ब्रिटीश एजंटची कामगिरी बिनचूक बजावली. पुढे १९४८ साली पाकने काश्मिरात आक्रमण केल्यावर भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याने त्यांना पाळता भुई थोडी झाली. त्यावेळेस भारतीय सेना काश्मीर ओलांडून पंजाबात घुसली असती तर पाकिस्तानचा तिथल्या तिथे निकाल लागला असता. पण नेहरूंनी भारतीय सेनेचं पेट्रोल रोखून धरलं व आगेकूच थांबवली. नेहरूंना पाकिस्तान हवा होता हे स्पष्ट दिसतं. आजूनेक म्हणजे खान अब्दुल गफारखान भारतवादी मुस्लिम होते. म्हणून याच गांधीनेहरूंनी वायव्य सीमा प्रांतास मुद्दाम पाकिस्तानात ढकलून दिलं. कारण जर खानसाहेबांचा मुस्लिमबहुल वायव्य सीमाप्रांत भारतात सामील झाला असता तर पाकिस्तानच्या प्रयोजनाचं नरडंच तत्काळ घोटलं गेलं असतं. गांधीनेहरूंची फाळणीखेरीज इतरही अनेक पापे आहेत. पाकिस्तानला उभे राहण्यासाठी सबळ करणे हे गांधीनेहरूंचंच पाप आहे. पाकला ५५ कोटी रुपये देण्यासाठी गांधी उपासास बसला ते पाप याच मालिकेतलं आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......