‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ : शोषितांच्या कथा शोषितांनीच सांगाव्यात!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनुज घाणेकर
  • ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चं पोस्टर
  • Wed , 06 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie एक लडकी को देखा तो ऐसा लगा Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga

(स्पॉयलर्स अॅलर्ट)

कलम ३७७ रद्दबातल झालं आणि भारतातील समलैंगिक समुदायास सुखद दिलासा मिळाला. कायद्यातील समानतेमध्ये एक पाऊल पुढे टाकल्यावर मानसिकतेमधील बदलांच्या लढाईसाठी देश सज्ज झाला. भारतीय मानसिकतेवर अधिराज्य गाजवणाऱ्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे बॉलिवुड चित्रपट. या बॉलिवुडच्या मुख्य प्रवाहात जेव्हा समलैंगिकतेचं कथानक येतं, तेव्हा त्याची दखल घेणं आवश्यक ठरतं. पण चित्रपटाची बौद्धिक समीक्षा करणं वेगळं आणि ज्यांची कथा आहे त्यांनी आपला अनुभव व्यक्त करणं वेगळं.

पाहू या, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट पाहणाऱ्या ‘त्यांच्या’पैकीच एकाचा अनुभव प्रश्नोत्तरांद्वारे.

(मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे.)

प्रश्न – चित्रपट बघायला जाताना मनात काय भावना होत्या?

उत्तर - शोषितांच्या कथा शोषितांनीच सांगाव्यात, त्यासुद्धा मुख्य प्रवाहातील चित्रपटात आणि मुख्य प्रवाहातील पात्रांच्या माध्यमातून, मुख्य प्रवाहातील भडक गिमिके वापरून, विषयाचा बौद्धिक ऊहापोह न करता, हेच मुळात विशेष. यापूर्वी बॉलिवुडमध्ये समलैंगिकतेची कथा मांडली गेली नाही, असं नाही. पण एक तर ते तिकीटबारीवर गर्दी गोळा करणारे चित्रपट नव्हते (उदाहरणार्थ, ‘फायर’ किंवा ‘अलिगढ’) किंवा विनोदाची फोडणी असलेले, खिल्ली उडवणारे होते (उदाहरणार्थ, ‘दोस्ताना’) किंवा चित्रपटातला एक मर्यादित भाग होते (उदाहरणार्थ, ‘कपूर अँड सन्स’, ‘बॉम्बे टॉकीज’)!

या पार्श्वभूमीमुळे ‘आपलं अस्तित्व मांडलं जातंय’ ही मुख्य भावनाच मनात पुरून उरणारी होती. त्याला आनंद या भावनेचं नाव देणं, म्हणजे संकुचित शब्दांकन होईल. म्हणजे आपण स्वतः जर एखाद्या चित्रपटात काम केलं असेल आणि पडद्यावर दिसणार असू, तर ज्या संमिश्र भावना उमटतील, त्यात आनंद, उत्सुकता, हुरहूर, भीती अशा अनेक घटकांचा समावेश होतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain

.............................................................................................................................................

प्रश्न – चित्रपट मांडणीत फसला आहे असं अनेक समीक्षकांनी म्हटलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

उत्तर – ‘कमिंग आऊट’ (स्वत:ची लैंगिकता आप्तस्वकियांसमोर व्यक्त करणं) ही कोणत्याही समलिंगी व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची आणि अवघड प्रक्रिया. त्यातील घुसमट, कोंडमारा, पिंजऱ्यात बंद केली जाणारी भावना, सांगू की नको – कसं सांगू हा संघर्ष, चित्रपटाच्या पहिल्या एका तासात कासावीस करतो. ‘रेंगाळलेला चित्रपट’, ‘पहिल्या तासाभरात संथ चालणारा चित्रपट’ अशी या चित्रपटाची संभावना करणारी अनेकांची समीक्षा वाचण्यात आली. पण ‘बाहेरच्या’ व्यक्तीला वाटणारा ‘संथपणा’ हा ‘आतल्या’ व्यक्तीसाठी ‘घुसमट’ असू शकतो. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उणा नाही, असं नाही. पण संवेदनशीलता बाळगून बघितला तर अधिक गहिरा आहे, हे नक्की.

प्रश्न – चित्रपटगृहात इतर लोकांसोबत हा वेगळा विषय बघण्याचा अनुभव कसा होता?

उत्तर - मध्यंतरापर्यंत कथेची नायिका आपण समलिंगी (लेसबियन) असल्याचं सांगते तेव्हा चित्रपटगृहातले आजूबाजूचे अनेक लोक हसू लागले. इतकंच नव्हे तर चित्रपटात नायकसुद्धा पहिली प्रतिक्रिया म्हणून जोरजोरात हसतो. तेव्हा ही प्रतिक्रिया तिच्या कितीही सवयीची असली तरी नायिका कावरीबावरी होते. चित्रपटगृहात आजूबाजूचे लोक हसत असतात, आपापसात खिल्ली उडवतात, नायिकेवर विनोद करतात.

माझी नजर त्या वेळी चित्रपटगृहात अंधारातसुद्धा आपल्याला कुणी बघत तर नाही ना, अशी चाचपणी करत होती. त्यावेळी अश्रू आले तरी अंधाराचा खूपच आधार वाटला. आणि मध्यांतराचा उजेड कसाबसा पार पडला. पण चित्रपटाचं वैशिष्ट्य हे की, कथा अशा प्रकारे पुढे सरकते की, प्रेक्षकांचा एक समूहच पडद्यावर अवतरतो आणि तशाच प्रतिक्रिया देतो, जशा खरा प्रेक्षक माझ्या बाजूला बसून देत होता. याची गंमत वाटली आणि पटकथा-संवाद लेखनाच्या शैलीचं कौतुक वाटलं.

प्रश्न – चित्रपटातून सकारात्मक संदेश पोहोचेल, असं वाटतं का?

उत्तर - तुम्हाला पिंजऱ्यात कोंडलं असेल आणि कुणी पिंजऱ्यातून सुटकेची नुसती आशा जरी व्यक्त केली तरी त्या क्षणी तुम्हाला विलक्षण आधार मिळतो. स्वतःला अभिव्यक्त करण्यातला सुटकेचा निःश्वास तुम्हाला मोकळं करतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात जेव्हा जेव्हा नायिकेला वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्वरूपात आधार मिळतो, तेव्हा तेव्हा ही भावना डोकं वर काढते.

चित्रपट हे एक जादुई माध्यम आहे. तिथं न घडणाऱ्या गोष्टी घडतात. शेवट सुखात्म होतो. दोन तासांच्या अवधीत आपण खूप काळाचा प्रवास करतो. लार्जर दॅन लाईफ– म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात कदाचित न घडणारी घटना पडद्यावर बघायला मजा येते.

उदाहरणच द्यायचं झालं तर ‘शोले’मधील जय-वीरूची दोस्ती, ‘जी ले अपनी जिंदगी’ असं सिमरनला म्हणणारे ‘दिलवाले दुल्हनिया’मधील बाबूजी किंवा ‘बाहुबली’मधील एकनिष्ठ कटप्पा, अशी सगळी पात्रं आपल्याला प्रत्यक्ष आयुष्याचा विसर पाडतात. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’च्या कथेतसुद्धा असंच काही घडतं. एक आशा निर्माण होते. चेहऱ्यावर हास्य येतं. रंगमंच, प्रतीक आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणारे प्रेक्षक प्रत्येकाची लढाई कशी वेगळी आहे, हे दाखवून देतात आणि ‘गोड शेवट माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकासाठी गरजेचा असतो’ हे पटवून देतात!

.............................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......