अजूनकाही
नऊ जानेवारी २०१९ रोजी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. तशा त्यांच्या सभा सर्वत्र आणि सतत चालूच असतात. पण सोलापूरची सभा तशी नव्हती. ही सभा भाजपने आयोजित केलेली असली तरी ती यशस्वी व्हावी यासाठी भाजपप्रमाणेच त्यांच्याशी देशभर विळा-भोपळ्याचे संबंध असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अाडम मास्तर यांनीही प्रयत्न केले होते. या सभेला त्यांचे २०,००० लोक उपस्थित होते. स्वखर्चाने आलेले हे लोक भाजपने चहापाणी, नाष्टा-जेवण, रोजंदारी देऊन आणलेल्या लोकांत उठून दिसत होते. म्हणून भाजपनेदेखील मोठ्या उदार मनाने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल विद्यासागर राव यांच्या बरोबर व्यासपीठावर स्थानापन्न केले. अाडम मास्तरही त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले. इतकेच नव्हे तर भाजपने त्यांना साडेतीन मिनिटे भाषण करण्याची संधीही दिली. मग काय, या संधीचे सोने करत अाडम मास्तरांनीही ‘बहाद्दर’ मुख्यमंत्री फडणवीस आणि ‘प्यारे’ पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केली.
या तोंडभरल्या स्तुतीने सभेस उपस्थित असलेल्या कितींना आश्चर्यचकित केले असेल ते नक्की सांगता येणार नाही, पण व्यासपीठावर विराजमान असलेल्या फडणवीस, मोदी, गडकरी, राव इत्यादींना निश्चितच गहिवरून आले असणार. आणि का येऊ नये? ते ज्या ‘बंच ऑफ थॉटस’ला आदर्श ग्रंथ मानतात, त्या त्यांच्या ‘विचारांच्या गठ्ठ्यात’ मुस्लिम, ख्रिश्चनानंतर कम्युनिस्टच प्रमुख शत्रुस्थानी आहेत. म्हणूनच तर सत्तेवर आल्यानंतर कम्युनिस्ट ‘देशद्रोह्यां’चा वैचारिक अड्डा असलेल्या जेएनयुविरोधात त्यांनी मोहीम उघडलेली आहे. पण अजूनही तेथील ‘कन्हैय्या’ त्यांना आटपत नाही.
त्याशिवाय त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्टांचा पराभव झाल्यानंतर तेथील कित्येक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना संघाने यमसदनी पाठवले, त्यांच्या घरादारांची राखरांगोळी केली, त्यांची कार्यालये उदध्वस्त केली. केरळमध्ये तर संघ आणि कम्युनिस्टांचा कायमच जीवघेणा संघर्ष चालू असतो. तरीही ते आटोक्यात येत नाहीत. म्हणून तर तेथील मुख्यमंत्र्यांचे ‘शीर’ आणून देणाऱ्यास १०-१० लाखाची बक्षीसे संघ स्वयंसेवकाकडून जाहीर केली जातात. कारण प्रत्येक संघ स्वयंसेवकाला हे माहीत आहे की, आपले खरे शत्रू कम्युनिस्टच आहेत, काँग्रेसी नव्हे. अशा या खऱ्या शत्रूपैकी एक, तीन वेळा आमदार राहिलेले आणि आता माकपचे राज्य सेक्रेटरी असलेले कम्युनिस्ट आपली स्तुती करतात म्हणजे काय?
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain
.............................................................................................................................................
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर आणि जगभर सभा घेत फिरतच असतात. पण अशा कोणत्याही सभेत एखाद्या कम्युनिस्टाला बोलू द्यावे व त्या कम्युनिस्टाने त्यांची स्तुती करावी असा करिश्मा आजपर्यंत कोठेच घडला नाही. संघ-कम्युनिस्टांचे हाडवैर अाडम मास्तरांना माहीत नाही असे थोडेच आहे? त्यांना या संबंधाची पुरेपूर कल्पना आहे, तरीही त्यांनी संघ स्वयंसेवकाची स्तुती केली. याला जबाबदार आहे काँग्रेसचे राजकारण.
अाडम मास्तर यांनी आपल्या भाषणात ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी...राज्य के प्यारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी...’ असा उल्लेख करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुढे ते म्हणाले, “मोदीजी, या कामासाठी गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष करतोय. मागच्या आघाडी सरकारनं या प्रकल्पाला तीन वर्षं बासनात गुंडाळून ठेवलं होतं. पण आमच्या बहाद्दर मुख्यमंत्र्यांनी या फाईलवरची धूळ झटकली आणि पंतप्रधानाकडे सुपुर्द केली. आज ते स्वप्न साकार झालं आहे. २०२२ पर्यंत आम्ही घरं बांधून पूर्ण करू. आज तुम्ही आम्हाला या कामाचा चेक देत आहात, पण लवकरात लवकर सबसिडीचा प्रश्न मार्गी लावा. या प्रकल्पातील सभासद हे भाजी विक्रेते, कचरा गोळा करणाऱ्या महिला यांसारख्या थरातून आलेल्या आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेनं यापूर्वी १० हजार घरं गोरगरिबांना दिलीत. तेव्हा मोदीसाहेब, हे घर नव्हे तर बंगला आहे. आम्ही स्वप्नातही विचार करत नव्हतो की, हे स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही आमच्या घरांना मंजुरी दिली ही गोष्ट आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही.” शेवटी ३० हजार घरकुलांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मास्तरांनी मोदी आणि फडणविसांचे आभार मानले.
मोदींनीही देशभरातून गोरगरिबांना किती कोटी घरे दिली याची आकडेवारी देऊन ‘आम्ही दिखाव्यासाठी काम करीत नाही, कोनशिला लावा आणि निवडणुका उरकून घ्या... त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी. ही राजकीय संस्कृती आम्ही पूर्णपणे बंद करून टाकली आहे. गोरगरिबांच्या ३० हजार घरांची कोनशिला आज आम्ही लावली आहे. २०२२ मध्ये या घरांच्या चाब्या देण्यासाठीही आम्हीच येऊ,’ असे सांगितले.
या प्रकारे मोदी व फडणविसांनी अाडम मास्तरांनी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरकुलांसाठी दाखवलेल्या चिकाटीचा स्वत:च्या प्रचारासाठी फायदा घेतला. असा फायदा काँग्रेसवाल्यांना का घेता आला नाही? त्यासाठी त्यांचे संकुचित स्थानिक राजकारण जबाबदार आहे. यावरून असे सिद्ध होते की, काँग्रेसवाल्यांना व भाजपवाल्यांना गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरकुलादी समस्यांशी काहीच देणेघेणे नाही. त्यांना फक्त गोरगरिबांच्या नावे संकुचित राजकारण करायचे असते. अाडम मास्तरांनी मात्र राजकारणाबरोबरच गोरगरीब कष्टकऱ्यांप्रती असलेली आपली तळमळही त्यांच्या या प्रयत्नातून दाखवून दिली.
वास्तविक पाहता सोलापुरात काँग्रेसचे समंजस नेते म्हणून मागासवर्गीय जातीतून आलेले व अनेक मंत्रीपदापासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदे भूषविलेले सुशीलकुमार शिंदे आहेत. त्यांची मुलगी, प्रणिती शिंदे या अाडम मास्तरांच्या विरोधात आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांच्याच राजकीय दबावामुळे त्यावेळचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर प्रकल्पाची फाईल ठराव करून केंद्राकडे पाठवली नाही. हे जे मास्तर बोलले ते सत्य आहे. तशी ती पाठवली असती व प्रकल्प पूर्णत्वास गेला असता तर त्याचे श्रेय अाडम मास्तरांना मिळाले असते. कदाचित प्रणिती शिंदे यांना आमदारकीला निवडून येण्यात अडचणी आल्या असत्या, असा संकुचित विचार करून गोरगरिबांचे उठताबसता नाव घेणाऱ्या काँग्रेसने ही फाईल थंड्या बस्त्यात ठेवली.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व अाडम मास्तर यांच्यातच झाली होती. त्यात ते पराभूत झाले. पण तेव्हा ते दुसऱ्याच क्रमांकावर होते. पुन्हा २०१४ ला झालेल्या निवडणुकीत ते सरळ चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना व तिसऱ्या क्रमांकावर भाजप आले. त्यामुळे निदान पुढे येणाऱ्या निवडणुकीत तरी हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन, आपले राजकारणही भाजप, संघाच्या मदतीने पुढे नेण्याचा अाडम मास्तरांचा हा प्रयत्न तर नाही ना अशी रास्त शंका उपस्थित होते. कारण अशा प्रयत्नातून जमल्यास पुढील निवडणुकीत भाजप व अाडम मास्तरांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना सहकार्य करण्याचा संकेत दिला गेला. पण हा संकेत वास्तवात कोणाच्या बाजूने कसा उतरेल याबाबत मात्र प्रचंड शंका आहेत. कारण जेवढे सख्य भाजप-काँग्रेसचे आहे, त्याच्या तसूभरही भाजप-कम्युनिस्टांचे नाही, किंबहुना ठिकठिकाणचा भाजप म्हणजे निम्मी काँग्रेसच आहे, हे देशभरच्या अनेक घटनांनी दिसून येते. तेव्हा अाडम मास्तरांचा हा प्रयत्न यशस्वी होईल की, नाही ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल.
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment