“आम्ही गावाची सुबत्ता रस्त्यावरून नव्हे तर शाळेच्या मैदानावरून ठरवतो”
सदर - चिनी माती
टेकचंद सोनवणे
  • चीनमधील डाली गाव, पहाटेच्या वेळी
  • Fri , 16 December 2016
  • चिनी माती चीन China चायना पब्लिक डिप्लोमसी असोसिएशन China public diplomacy association

चीनमधील दहा महिन्यांच्या फेलोशिपच्या काळात तिथली इथली खेडी, रस्ते, माणसे, खानपान, संस्कृती, जीवन, स्त्री-पुरुष संबंध, एकाच अपत्याची सक्ती, छोटी कुटुंबे, छोटी घरे, श्रीमंत-गरिबांमधील भेद, तंत्रज्ञानाचा प्रभाव, अमेरिकेचे आकर्षण, रात्रजीवन सारे काही जवळून अनुभवता आले. चिनी मातीतले हे अनुभव आधुनिक, बदललेल्या, बदलू पाहणाऱ्या चीनचे आहेत... नवं साप्ताहिक सदर...दर शुक्रवारी...

शाळेत असताना पाठ्यपुस्तकात आम्हाला एक धडा होता. बसमधून प्रवास करताना सकाळी-सकाळी तोंडाला रूमाल लावावा लागला म्हणजे समजावं की, आपण खेड्यात एखाद्या पोहोचलो आहेत, असं काहीसं वाक्य त्या धड्यामध्ये होतं. त्यामुळे भारतात ज्या-ज्या राज्यात गेलो तिथल्या खेड्यांमध्ये हे साधर्म्य सातत्यानं कळत-नकळत शोधलं गेलं. आपल्याकडे खेडी ही अविकासाची केंद्र झाली आहेत. ‘स्वयंपूर्ण ग्राम’वर व्याख्यानं झोडणाऱ्यांच्या यादीत (अण्णा) हजारे-पवार (पोपटराव) या पलीकडची उदाहरणं मी माझ्या कळत्या वयापासून तरी ऐकली नाहीत. त्यामुळे चीनसारख्या कम्युनिस्ट देशातील खेड्यांबद्दल खूप उत्सुकता होती. तिथं पहिलं खेडं पाहिलं ते हायनान प्रांतातलं. हा प्रांत म्हणजे मधुचंद्रासाठीचं राज्य, चीनचा गोवा!  समुद्रकिनारी असल्यानं खाऊन-पिऊन सुखी लोकांचं राज्य. त्यामुळे इथल्या खेड्यांमध्येही गोव्यासारखीच समानता होती. खाण्यापिण्याची आबाळ नसलेलं गाव.

पण खरं गाव अनुभवता आलं ते युनान प्रांतात. डाली नावाचं. पौर्णिमेच्या आसपासची रात्र होती. चंद्रप्रकाशात या चंद्रमौळी खेड्यात आम्ही पोहोचलो. रस्त्यावरचे दिवे चकचकीत होते. सीपीसीची शिस्त रस्त्यारस्त्यावरच्या खेड्यामध्येही होती. गुळगुळीतपणा होता, पण पाय घसरणारा नव्हता. आम्ही दक्षिण आशियातील सात पत्रकार, आमच्या चायना साऊथ एशिया प्रेस सेंटरच्या संचालक, समन्वयक सहकारी जेन व एक शिकाऊ विद्यार्थिनी,. असा आमचा मोठा ग्रुप कुनमिंग ते डाली असा लांबचा प्रवास करून या खेड्यात दाखल झाला.

गावात पोहोचल्या पोहोचल्या सव्वाशे वर्षं जुन्या हॉटेलमध्ये पोहोचलो. गल्लीबोळातलं हॉटेल. एखाद्या ग्रामपंचायतीची कौलारू दुमजली नेमस्त वास्तू शोभावी असं ते हॉटेल होतं. सरकारी मालकीचं. चीनच्या विस्कटलेल्या काळात हे हॉटेल गावच्या प्रमुखाचं घर होतं. आता गावाच्या मालकीचं. स्वयंपूर्ण गावासाठी सीपीसीच्या स्थानिक शाखेनं हे हॉटेल (रीतसर कायदेशीर पद्धतीने) मूळ मालकाच्या वारसदाराकडून विकत घेतलं. त्याची प्रत हॉटेलच्या भिंतीवर शोभिवंत फ्रेममध्ये लटकवून ठेवली. कारण, चीनमध्ये सरकार कुणाचीही परवानगी न घेता संपत्ती ताब्यात घेऊ शकतं, या आख्यायिकेला छेद देण्यासाठी. ही आख्यायिका तशी जुनी आहे. कंड्या पिकवण्यासारखी. त्यात कथा-किश्श्यांचा हातभार मोठा.  

हॉटेलमधून बाहेर पडल्यावर श्वास भरूनही उरणाऱ्या सुगंधाचा पाठलाग केल्यावर आम्ही पोहोचलो ते थेट चावडीवर. गावाच्या मधोमध ग्रामदैवतेचं देऊळ. त्यात लावलेल्या उदबत्तीचा तो सुगंध होता. उत्तम बांधकाम. आखीव-रेखीव. लाकडी प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराबाहेर द्वारपाल. बलदंड देहयष्टी असलेले. उंचच उंच गाभाऱ्यात लांबलचक देव सिंहासनावर विराजमान झालेला. गावाचा संरक्षक म्हणून त्याच्या एका हातात शस्त्र नि दुसऱ्या हातात नैवेद्याची वाटी. गणपतीसारखा बसलेला. चेहरा रागीट. गावाची सुरक्षा नि खानपानसमृद्धतेची महती सांगणाऱ्या या देवाचं दर्शन अल्पकाळासाठी होतं. रात्री हा देवही आपल्या देवासारखाच बंदिस्त होतो!

गाव झोपण्याच्या तयारीत. आमची व्यवस्था एका टुमदार घर शोभणाऱ्या हॉटेलमध्ये केली होती. म्हणजे घराचं हॉटेल बनवलेलं. टेरेसवर गेल्यावर चंद्रप्रकाश दूरवर पसरलेला दिसला. अख्खा गाव पर्वतराजींनी वेढला होता. वळणवाटातल्या झाडीत हिरवे छंद म्हणावे असे... गवतावरच्या किड्यांना विशिष्ट वास येत होता. तो स्वच्छ चंद्रप्रकाशासह हवेत बेमालूमपणे मिसळून गेला.  

पहाटे साडेपाच... गाव अजूनही पेंगुळलेल्या नक्षत्रकुशीत. आम्ही गाव अनुभवायला निघालो. स्वच्छ रस्ते... दगडी कचराकुंडी... त्यातून डोकावणारा थोडाबहुत कचरा. घरांची, दुकानांची नावं चिनी भाषेत. इंग्रजीचा गंध दूरदूरवरही नाही. त्यामुळे आमची वाचण्याची अडचण झाली. सुदैवानं जेन सोबत होती. आमच्यासोबत तिला तिचा गाव अनुभवायचा होता. नव्वदीच्या दशकात जन्मलेली जेन बीजिंगमध्येच वाढली. गाव तिला माहितीच नव्हता. खेड्यापाड्यातून शिकायला आलेल्या मुला-मुलींशी मैत्री झाल्यानंतर तिला गाव बघण्याची तीव्र इच्छा झाली. या इच्छेपोटी पहाटे साडेपाच वाचता जेन आमच्यासमवेत गावभर भटकायला आली होती.

साधारण हजारेक वस्तीचं गाव असेल. कौलारू, मातीनं सारवलेली घरं. घरासमोर सडा टाकलेला. रस्त्यावरचे मंद दिवे, भुंकणारी कुत्री... घराघरातून कसलासा धूर निघत होता. खरपूस मांस भाजलं जात होतं. गल्लीच्या कोपऱ्यावर सरपण रचून ठेवलं होतं. जेन सांगत होती, दरवर्षी खूप थंडी असते. त्याची बेगमी वर्षभर केली जाते. पूर्वी म्हणे गावातल्या लोकांना शहरं माहितीच नव्हती. लाँग मार्चमध्ये गावांचं हे रूपडं शहरवासीयांच्या लक्षात आलं. सांस्कृतिक क्रांतीत गावंच्या गावं सहभागी झाली. गावागावातून परंपरा हद्दपार झाल्या. परंपरा गेल्या, पण देऊळं मात्र तशीच राहिली. सीपीसीची सदस्य असलेली जेन भरभरून बोलत होती.

साधारण नव्वदच्या दशकात डाली गावातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत होतं. हिरव्या वळणवाटाच या गावाच्या विकासात अडथळा होत्या. रस्ते नाही म्हणून विकास नाही, विकास नाही म्हणून स्थलांतर. उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित होण्याची वेळ या गावावर आली होती. काही कुटुंबं स्थलांतरीतही झाली. त्यावेळेस गावात प्यायला पाणी नसायचं. कचरा, अस्वच्छता, रोगराई, आरोग्याच्या सुविधांची मारामार. अशा अत्यंत कोंदट वातावरणात हे गाव तीन दशकांपूर्वी होतं. त्यातून सीपीसीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या गावाला बाहेर काढलं.

फिरता-फिरता सकाळचे साडेसहा झाले. गावाचे प्रमुख हुमिन यांनी आम्हाला गाठलं. ते सांगत होते, “आमची स्थानिक समिती आहे (आपल्याकडची ग्रामपंचायत म्हणा हवं तर). या समितीत गावातील पंचवीसेक सदस्य आहेत. या सदस्यांनी गावाच्या विकासाचा आराखडा तयार केला. तीनेक शाळा उभारल्या. शाळेच्या तिप्पट खेळाची मैदानं. ही मैदानं अहोरात्र खेळण्यासाठी खुली केलीत.” गावात प्रत्येकाकडून स्वच्छता कर वसूल केला जातो. तशी नोटीस गावाच्या वेशीवर चिटकवण्यात येते (हो वेशीवरच). जेनने लगेचच त्या नोटीशीकडे बोट दाखवलं. लोक वेळेवर कर भरतात. त्यातून विकासकामं होतात. भरीव आश्वासनं व सुमार विकासकामांची आपल्यासारखी रेलचेल नाही तिकडे.

बोलता बोलता आम्ही एका बोळात येऊन पोहोचलो. गल्लीच्या दोन्ही बाजूंना खळाळणाऱ्या निर्झरासारखं गटार होतं. स्वच्छ, नितळ पाणी. त्यामुळे त्याला गटार म्हणणं अपमान केल्यासारखं होईल. छोटा झरा म्हणूयात. गल्लीच्या टोकाशी आल्यावर मोठ्ठा होतो. त्यातील पाणी जुनाट (म्हणजे साधारण शंभरेक वर्षांपूर्वीच्या) दगडी नळातून बाहेर पडत होतं. “हेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था. पिण्यासाठी मात्र हीच व्यवस्था. गावात कधीकाळी पिण्यासाठी शुद्ध पाणी नव्हतं, पण गाव बदललं. आम्हाला शहरांपासून तोडणारी नैसर्गिक साधनसंपत्तीच आमच्यासाठी वरदान ठरली. आम्ही त्याचंच मार्केटिंग केलं.” गावच्या प्रमुखांनी मोकळेपणानं गप्पा मारायला सुरुवात केली.

त्यांनी त्यांना उमगलेली विकासाची व्याख्या सांगायला सुरुवात केली.  “आम्ही गावाची सुबत्ता रस्त्यावरून नव्हे तर शाळेच्या मैदानावरून ठरवतो. आमच्या गावात मोठमोठी मैदानं आहेत. त्यावर शाळकरी मुलं-मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी असतात. त्यांच्या आरोग्यावर आमच्या गावाचं आरोग्य ठरणार आहे. आमच्या (चीन)समोर आता आव्हान आहे ते वयवाढीचं. २०२० पर्यंत आमच्या देशात वृद्धांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे विकासाची गती कायम राखायची असेल तर युवकांनी तंदरुस्त राहण्याची गरज आहे. म्हणून ही खेळाची मैदानं नि व्यायामशाळा.”

गावाचा प्रमुख व्यवसाय शेती व पर्यटन. जो कसेल तो शेतकरी, या तत्त्वामुळे इथं जो काम करतो, त्यालाच जमीन कसायला दिली जाते. ज्यांना ते शक्य झालं नाही, त्यांनी पर्यटनाला प्रमुख व्यवसाय बनवला. म्हणजे शहराच्या धकाधकीतून लोक इकडे येतात ते ग्रामीण जीवन जगण्यासाठी. दरवर्षी हजारोंनी पर्यटक येतात. त्यांच्या सरबराईत हे गाव सदैव मग्न असतं.

डाली हे गाव चीनच्या नकाशावर आपला ठसा उमटवून आहे. निसर्ग, स्वच्छता, सुबत्ता याखेरीज नजीकच्याच डोंगरात मुक्कामाला आलेला शाक्यमुनी बुद्ध (हा बुद्धाचा बोधीत्व प्राप्त झालेला अवतार असल्याचं सामान्य चिनी माणूस मानतो!) . यामुळे हे गाव प्रसिद्ध झालं. चीनच्या अशा अनेक गावाची ही कहाणी सुरू होते ती सांस्कृतिक क्रांतीपासून. उन्नत व उदात्त करणारी ही कहाणी आहे. एका मुक्कामात सांगता न येणारी, न संपणारी. त्यासाठी सुरुवात केली ती चेअरमन माओच्या युनान प्रांतातून.

चीनमधील खेडी बदलली. गावोगावी रस्ते झाले, इंटरनेट आलं. साक्षरता आली, आरोग्याच्या सुविधा आल्या. मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं. त्यामुळे इथल्या पिढ्यांना ‘स्वातंत्र्य हे कंच्या गाढवीचं नाव आहे’, असं विचारावंसं वाटलं नाही. इथल्या ग्रामीण पिढ्यांचे प्रश्न भिन्न आहेत. ते त्यांच्या राज्यकर्त्यांना थेट भिडणारे आहेत. विकास झाला की, प्रश्नही बदलतात. आपली चर्चा अंमलबजावणीऐवजी सुरू होते ती निर्णयच का घेतला इथपासून. चीनच्या ग्रामीण पिढीची चर्चा सुरू होते ती अंमलबजावणीपासून. विकसित व विकसनशील अवस्थेतला हा मूलभूत फरक आहे. सर्वांत जवळ वाटणारं मोठं शहर अडीचशे किलोमीटर दूर असूनही डाली गावाला अविकसित असल्याची खंत वाटत नाही.

चीनमधल्या खेड्यांची ही कहाणी रंजक आहे. जी युनान प्रांतातून सुरू होऊन सिचवान, जिंगक्षिया, तिबेटमार्गे बोधीत्व होते.

(पूर्वार्ध)

लेखक, बीजिंगस्थित चायना पब्लिक डिप्लोमसी असोसिएशनमध्ये संशोधक पत्रकार आहेत.

stekchand@protonmail.com

Twitter handle - @stekchand

Post Comment

Rajendra Kulkarni

Fri , 16 December 2016

ही चीनी सुविधाची (रस्ता/लाईट/इंटरनेट) पोस्ट भारतीय राजकारण्यानी वाचावी एवढीच माफक अपेक्षा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......