अजूनकाही
जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं. गेल्या पाच वर्षांत २०व्या शतकातले भारतीय राजकारणातले अनेक मोहरे काळाच्या पडद्याआड गेले. जयललिता, करुणानिधी, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि आता जॉर्ज फर्नांडिस. या सर्वांची धगधगती पर्वं त्यांच्या अस्ताआधीच दशकभर मुखपृष्ठावरून मलपृष्ठावर गेली होती. या सगळ्यात वय, वकुब आणि राजकीय कारकीर्द यांबाबतीत जयललिता या कच्चा लिंबू ठराव्यात. पण त्याही एका दीर्घ आजाराचा सामना करून गेल्या.
मात्र अटलबिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी जवळपास एका दशकाचा काळ स्मृतिभ्रंशात घालवला. दोघांची राजकीय जडणघडण अनुक्रमे ‘उजवी’ आणि ‘डावी’ इतकी स्पष्ट भेद असलेली होती. तरीही स्मृतिभ्रंशाआधीचं एक दशक दोघंही सत्तेच्या प्रवासात सहप्रवासी होते. यात अटलबिहारी ‘उजवी’कडे ‘अटल’ राहिले, जॉर्ज मात्र ‘यू टर्न’ घेऊन त्यांना जाऊन मिळाले होते. ‘समाजवादी’ ही संज्ञा सत्तरच्या दशकापासूनच टिंगलीचा विषय झाली होती. ‘जे कधीही एकत्र राहू शकत नाहीत, ते समाजवादी’ अशीही व्याख्या आज(ही) केली जाते. तरीही ‘समाजवाद’ हा शब्द काही प्रमुख पक्षांच्या नावात आहे. समाजवादावर निष्ठा ठेवून समाजवादी झालेलेच आजच्या घडीला समाजवादापासून (आचार-विचारासाह) इतके दूर गेलेत की, त्या सर्वांचा उल्लेख ‘पूर्वाश्रमीचे समाजवादी’ असा करावा लागतो! जॉर्ज हे त्यातलं अखेरचं निशाण मानता येईल.
अखेरचं यासाठी आज राष्ट्रीय राजकारणात मुलायम, शरद, लालू हे यादव; नितीशकुमार, रामविलास पासवान वगैरे मंडळी पूर्वीश्रमीची समाजवादी असली तरी जॉर्जसारखा इतिहास त्यांना नाही. लोहिया ते लिमये व्हाया दंडवते यातला शेवटचा खांब होते जॉर्ज.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4712/Streevad-Sahitya-ani-samiksha
.............................................................................................................................................
माझ्या पिढीला जॉर्जची ओळख झाली ती साठच्या दशकाच्या उत्तरार्धात. तोवर ‘मुंबई बंद’चा ‘अनभिषिक्त सम्राट’ हा किताब त्यांना कष्टकरी, कामगार, माध्यमं आणि सत्ताधारी यांनी दिला होता. त्या काळात डांगे, रणदिवे हे कामगार नेतेही जोरात होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर समितीत समाजवादी व कम्युनिस्टांचा भरणा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर विरोधी पक्षांना यश मिळालं होतं. पण ते टिकलं नाही. त्यात ६६नंतर बाळ ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांनी डांगे, एसेम, अत्रे यांच्यासह सगळ्यांनाच मोडीत काढत मुंबईवर स्वत:चं साम्राज्य स्थापित केलं. त्यात जॉर्जच्या ‘बंदसम्राट’ पदालाही धक्का बसला. मुंबई बंदमागे कामगार, कष्टकऱ्यांची संविधानिक ताकद होती, तर सेनेच्या बंदमध्ये मराठी अस्मिता आणि बेरोजगारीच्या रागातून पसरलेली दहशत असे. जॉर्जचा बंद ‘होत’ असे, सेनेचा बंद ‘केला’ जात असे!
त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस हे नाव चर्चेत आलं ७४सालच्या ऐन मे महिन्यात त्यांनी ‘चक्का जाम’चा नारा देत भारतभर जाळं असलेली महाकाय रेल्वे तब्बल दोन आठवडे ब्रेक डाऊन केली तेव्हा. मुंबईतली टॅक्सी, बस, हॉटेलं बंद करणाऱ्या जॉर्जचं कामगार नेता म्हणून हे मोठं यश होतं. याचा वचपा पुढे इंदिरा गांधींनी आणीबाणीत पार दंडाबेडी ठोकून जॉर्जला शब्दश: जायबंदी करून केला. डायनामाईट प्रकरणात त्याच्यावर देशद्रोहाचा ठपका लागला. पण आजच्यासारखी उथळ माध्यमं आणि प्रचारकी राजकीय पक्ष नसल्यानं जॉर्ज तुरुंगातून निवडणूक लढवून जिंकले!
जॉर्ज यांच्या स्मृतिभ्रंशाच्या प्रवासाची सुरुवात ७७ सालच्या जनता पक्षाच्या फसलेल्या प्रयोगापासून झाली. विचारानं सुरू होत तो रोग पुढे प्रत्यक्ष शरीरव्याधीत परावर्तित झाला.
आर. के. लक्ष्मणच्या ‘कॉमन मॅन’सारखा जॉर्जला भारतानं एकाच वेषात व अवतारात कायम पाहिलं. मग ती गेट मिंटिंग असो की केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून सियाचीनची भेट असो.
जॉर्ज यांनी उशिरा विवाह केला. एका दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख जॉर्जवर बोलताना म्हणाले की, ‘मला कळेना की हा असा काय बोलतोय? मग लक्षात आलं समोर प्रेक्षकात लैला बसली होती. तेव्हाच म्हटलं हा ‘मजनू’ इतका उडतोय!’ जॉर्ज यांचं उशिराचं लग्न आणि त्यात भावी पत्नीचं नाव लैला, यामुळे त्यावेळच्या मर्यादित माध्यमविश्वातही काही दिवस चर्चा रंगल्या होत्या. ‘लैला-मजनू’चं गारुड ६०-७०च्या दशकात फारच मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळेही कदाचित या चर्चा रंगल्या.
जॉर्जना मी प्रत्यक्ष शेवटचं ऐकलं ते पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात. पर्वती पायथ्याला असलेल्या साने गुरुजी स्मारकात ऐंशीच्या दशकात तो कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमाचा तपशील आठवत नाही, पण त्यावेळी केलेल्या आपल्या छोट्याशा भाषणात जॉर्ज यांनी एक कबुलीजवाब दिला होता. ते म्हणाले- ‘आम्ही खूप मोठ्या युनियन चालवल्या, आंदोलनं केली, वेतन करार केले. वेगवेगळ्या प्रकारच्या कामगारांसाठी आम्ही हे केलं. या सर्व आंदोलनात जे कामगार एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे, तेच कामगार धार्मिक दंगलीत एकमेकांना भोसकतात. तेव्हा आम्ही त्यांना रोखू नाही शकलो. समाजवादी म्हणून जातीअंताच्या लढाईचं महत्त्व कळूनही नामांतर आंदोलनात आमच्या कामगार संघटना उतरवत्या आल्या नाहीत. पगारवाढ मिळेपर्यंत एक असणारे नंतर वाढीव पगार घेऊन सत्यनारायण घालतात, तेव्हा ते हिंदू होऊन मुसलमान सहकाऱ्याला विसरतात. काही प्रमाणात दिलजमाई होते, पण विचार म्हणून रुजवता नाही आला.’
आजच्या भाषेत ज्याला“कंडिशनिंग’ म्हणतात, तसलाच हा प्रकार, पण ही खंत ते मनापासून बोलले. कदाचित सेवा दलाच्या मंचावर मोकळे झाले असं म्हणूया!
नंतर व्ही.पी. सिंग ते वाजपेयी या प्रवासात त्यांचं गलबत कसं हेलकावलं, भरकटलं आणि शेवटी कसं तळ गाठत गेलं, हे गेल्या दोन-तीन दिवसांत, त्यांच्यावर जे असंख्य लेख विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले, त्यातून आपण वाचलंच असेल. त्याची पुनरावृत्ती नको. पण जॉर्ज हे एकमेव राष्ट्रीय नेते, माजी केंद्रीय मंत्री असतील ज्यांना जिवंतपणी आणि मरणानंतरही सर्वांनी एखाद्या मित्राला ‘अरे-तुरे’ करावं अशा भाषेत आठवलं आणि सुनावलंही!
स्मृतिभ्रंशात शिरण्याआधीचा काळ पाहता जॉर्ज यांच्या स्मृतिपटलावर नेमकं काय उमटत असेल? स्मृतिभ्रंशावर वैद्यकीय तपशीलवार माहिती आज उपलब्ध आहे. पण त्या रुग्णाच्या मन:पटलावर नेमकं काय उमटत असेल याचा शोध अद्याप घेता आलेला नाही. विकलता हे बाह्यरूप झालं. पण आत वेगळीच गोळा-बेरीज सुरू असेल? वाजपेयी, जॉर्ज यांनी काय पाहिलं असेल या एवढ्या मोठ्या स्मृतिभ्रंश काळात? आज दिलीपकुमार त्याच अवस्थेत आहे. हा ‘अभिनयसम्राट’ही स्मृतिभ्रंशाच्या पडद्यावर कुठलं कथानक पाहत असेल? स्मृतिभ्रंशातली माणसं त्या प्रवासात सुरुवातीची काही वर्षं असंबंद्ध बडबडतात. नंतर वाचा बंद होते आणि नुसतेच भावहीन डोळे उरतात.
वाजपेयी, जॉर्ज आणि आता दिलीपकुमार या तिघांनी आपल्या अमोघ वाणीनं, आकर्षक देहबोलीनं अवघ्या भारतावर गारुड केलं. ते त्यांची ही शस्त्रं काढून घेतल्यावर आतल्या आत किती आणि कसे आक्रंदत असतील?
आयुष्याच्या अखेरीस स्मृति जाणं हे चांगलं का वाईट? कोरी पाटी घेऊन आलो, ती तशीच कोरी घेऊन जायची, यालाच पूर्णविराम म्हणायचा?
एम.एफ.हुसेन यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की, मरणापूर्वी मला माझ्या सर्व कलाकृती नष्ट करायच्या आहेत. ते माझं होतं, माझ्याबरोबर संपेल!’ त्यांना वेगळ्याच पद्धतीनं शेवटचा स्ट्रोक मारावा लागला.
मरणानंतर काहीच नसतं. काहीच उरत नाही असं विज्ञान सांगतं. अध्यात्म सांगतं, आत्मा अमर; तर कार्यरूपानं अमरपण बहाल करण्याची सोय माणसानं विकसित केलेली.
अशा वेळी जिवंतपणीच स्वत:च्या विस्मरणात शिरलेली ही थोर क्रियाशील मंडळी त्या शेवटच्या काळात नेमकी कशाशी झुंजत असतील?
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 01 February 2019
संजय पवार, समयोचित लेख व समर्पक व्यक्तीचित्रण आहे. कधी नव्हे ते तुमच्याशी चक्कं सहमत. जॉर्जबुवांची ही कबुली मूलगामी वाटली : >> या सर्व आंदोलनात जे कामगार एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे, तेच कामगार धार्मिक दंगलीत एकमेकांना भोसकतात. तेव्हा आम्ही त्यांना रोखू नाही शकलो. >> धर्म ही अफूची गोळी आहे, हे गृहीतक मुळातून चुकलेलं आहे. ज्या उताऱ्यात म्हणतो मार्क्स धर्माला अफूची गोळी म्हणतो, त्याच परिच्छेदात तो धर्माला हृदयशून्य जगाचं हृदय असंही म्हणतो. साहजिकंच 'अफूची गोळी' हे धर्माचं एकांगी चित्रण झालं ना? ते सुधरायचं कोणी? आपला नम्र, -गामा पैलवान