संस्कृतीहीन राज्याचे नेतृत्व देशपातळीवर कोण स्वीकारणार?
पडघम - माध्यमनामा
सदा डुम्बरे
  • ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Wed , 30 January 2019
  • पडघम माध्यमनामा सदा डुम्बरे Sada Dumbre साप्ताहिक सकाळ Saptahik Sakal

‘साप्ताहिक सकाळ’चे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे यांच्या सत्तरीनिमित्त २२ जानेवारी २०१९ रोजी पुण्यात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना सत्काराला उत्तर देताना केलेलं भाषण...

.............................................................................................................................................

ज्यांच्यामुळे माझे आयुष्य आकाराला आले, आनंदी झाले, संपन्न झाले, अर्थपूर्ण झाले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून मी या कार्यक्रमाकडे, समारंभाकडे पाहतो. माझा वाढदिवस ही नेहमीच माझी वैयक्तिक गोष्ट होती. घराच्या उंबऱ्याबाहेर ती कधी गेली नाही. मित्रांपैकीही फार थोड्यांनाच ती माहिती होती. पण आम्ही कधी माझा वाढदिवस ‘साजरा’ केला नाही. एकाही वाढदिवसाला मी कधी सुट्टी घेतली नाही. त्यांनी माझ्यावरचे मित्रप्रेम वेगळ्या तऱ्हेने व्यक्त केले. त्यांना माझ्याबद्दल वाटणारे ममत्व म्हणजे माझ्या आनंदवर्धनाचे अमृत आहे. सगळ्या मित्र-मैत्रिणींनी माझं आयुष्य समृद्ध आणि संपन्न केलं आहे. तो माझा मोठा ठेवा आहे.

प्रत्येक व्यक्तीची जडणघडण त्याच्या घरापासून सुरू होते. माझीही तशीच झाली. त्या काळातील घरं ‘बालक केंद्री’ म्हणजे Child centric नव्हती. घराचं सगळं लक्ष मुलांवर केंद्रित झालं आहे, असं कधी व्हायचं नाही. त्यामुळे लहानपणापासूनच ‘स्वतंत्र’ होता आलं. त्या स्वातंत्र्याचं मोल प्रौढ वयात कळलं. माझ्या आजी-आजोबांबद्दल त्यासाठी माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे. त्यांची ‘सेवा’ करण्याची संधी मला मिळाली नाही म्हणून गेल्या काही वर्षात स्मृतिलुब्धतेची, गतार्ततेची भावना माझ्या मनात प्रबळ होते. सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे लक्षण असावे असे आता मला वाटते.

माझं गाव, माजी शाळा, माझे गुरुजी या सगळ्यांची माझा ‘मी’ होण्यात फार महत्त्वाची भूमिका आहे. ‘मेकिंग ऑफ सदा डुम्बरे’ची सगळी Basic elements आहेत ती. मूलभूत घटक. नेहरू शर्ट आणि गांधी टोपी घालणाऱ्या आमच्या अनेक गुरुजींनी माझ्यासारख्या अनेक सदा डुम्बरेंचे पालकत्व यशस्वीपणे निभावले आहे. आमच्या गावाबद्दल, म्हणजे ओतूरबद्दल, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील एका छोट्याशा खेड्याबद्दल दोन-तीन वर्षांपूर्वी एक प्रदीर्घ लेख मी लिहिला आहे. ‘गरीब लोकांचं श्रीमंत गाव’ या शीर्षकाचा. त्यात हा सगळा तपशील आला आहे. ओतूरच्या जवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या कथा ऐकतच आम्ही मुलं शाळा शिकलो. ओतूरला बाबाजी चैतन्यांची समाधी आहे. बाबाजी चैतन्य म्हणजे संत तुकोबांचे सद्गुरू असे परंपरा मानते. ओतूर सोडून तुकोबांचे मंदिर इतरत्र बहुधा नसावे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भजन, कीर्तन, अभंग, दिंड्या, प्रवचन आणि पारायण हे ओतूरचं आणखी एक वैशिष्ट्य. शिवायर ओतूर म्हणजे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी अनुयायांचा प्रभावशाली गड. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे शक्ती आणि भक्तीचा समन्वय, स्वातंत्र्य आणि समतेची एकात्मता, आधुनिकता आणि परिवर्तनाचा मेळ. या वातावरणात माझी वैचारिक जडणघडण झाली.

It was in the air, I just inhaled it.

जीवन शिक्षण मंदिर ही ओतूरची देखणी सुंदर प्राथमिक शाळा, तिथलंच चैतन्य विद्यालय आणि नंतर पुण्याचं मॉडर्न हायस्कूल या, नामवंत शिक्षकांमुळे ओळखल्या जाणाऱ्या शाळा, फर्ग्युसन कॉलेजसारखं प्रतिष्ठित महाविद्यालय आणि माझं पत्रकारितेच शिक्षण झालं ती रानडे इन्स्टिट्यूट. ‘मार्क’ आणि ‘क्लास’च्या पलीकडे इथे माझं शिक्षण झालं.

माझ्या पत्रकारितेचा पाया जिथं घातला गेला, त्या पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागावर, रानडे इन्स्टिट्यूटवर ‘रानडेतले दिवस’ हा माझा दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला लेख केवळ ‘स्मरणरंजन’ नाही. ‘संस्थात्मक पाया असल्याशिवाय शाश्वत सामाजिक विकास होत नाही.’ या न्या. रानडे यांनी पुरस्कार केलेल्या तत्त्वाचा परिपोष या संस्थेत होतो, म्हणून रानडेवर लिहावे असे मला वाटले. रानडेचे विद्यार्थी हे मराठी पत्रकारितेचा कणा आहेत असं विधान मी केलं तर ते अमान्य होण्याची शक्यता कमीच. स्वत: रानडे यांनी त्यांच्या हयातीत अशा अनेक संस्थांची स्थापना केली. त्याला ते ‘मंडळीकरण’ असे म्हणत. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली त्याची प्रेरणाही न्या. रानडेच होते, आणि त्या संस्थेसाठी सुचवलेल्या अनेक नावातून Indian National

‘Congress’ हे न्या. रानडे यांनीच सुचवलेले नाव स्वीकारले गेले. पारतंत्र्याच्या काळात न्या. रानडे अशा सामाजिक संस्थांचं महत्त्व प्रतिपादित होते. स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीत तर अशा स्वायत्त संस्थांची गरज ही राजकीय संरचनेची मूलभूत गरज आहे.

वृत्तपत्रं किंवा सर्व प्रकारच्या माध्यमांना म्हणूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ असं कळीचं स्थान प्राप्त झालं आहे.

रानडे इन्स्टिट्यूटधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझा ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहात प्रवेश झाला. त्यावेळचे ‘सकाळ’चे संपादक श्री. ग. मुणगेकर माझे रानडेतले अतिथी प्राध्यापक. ‘देणारं झाड’ या माझ्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या व्यक्तीचित्रांच्या पुस्तकात मुणगेकरांवरील माझा लेखही आहे. संपादक म्हणून मला त्यांचा स्नेह, मार्गदर्शन मिळालं. पत्रकार म्हणून माझी जडणघडण झाली त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. १९९० मध्ये ‘प्रतिबिंब’ हे माझं दुसरं किंवा तिसरं पुस्तक प्रकाशित झालं ते मी प्रभाकर पाध्ये आणि श्री. ग. मुणगेकर यांना अर्पण केलं आहे. इतरांचे साहेब असले तरी शेवटपर्यंत ते माझे सरच राहिले.

पत्रकार म्हणून मी स्वत:ला नेहमी ‘सकाळ स्कूल ऑफ जर्नालिझम’चा विद्यार्थी मानतो. ‘सकाळ’चे संस्थापक आणि अनेक वर्ष संपादक असलेले डॉ. नानासाहेब परुळेकर यांची वृत्तपत्रांकडे, पत्रकारितेकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी होती. मघाशी मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या ‘देणारं झाड’ या माझ्या पुस्तकात नानासाहेबांवरही एक लेख आहे.

‘सकाळ’चा माझ्यावर जो संस्कार झाला, त्यात मी काही कळीची मूल्यं आत्मसात केली. पत्रकारितेची ‘Cardinal Principles’ असं मी त्यांचं वर्णन करील. सकाळ कार्यालयाच्या भिंतीवर ती सोनेरी अक्षरांनी कुठे लिहिली आहेत असे नव्हे. ती वातावरणात असतात. एका अखंड प्रक्रियेचा ती अदृश्य भाग असतात. तुमच्या मनाचा अँटेना सशक्त असेल, संवेदनशील असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही ती पाहू शकत नाही, पण अनुभवू शकता.

पहिलं तत्त्वं - वृत्तपत्र हा लोकांचा आवाज आहे आणि विरोधी मताला त्यात महत्त्वाचं स्थान आहे. People's voice आणि Voice of dissent हे ते अद्वैत.

दुसरं तत्त्व - संपादक म्हणजे समाजाच्या सदसद्विवेकाचा विश्वस्त आहे. समाजाचा ‘आतला’ आवाज आहे.

आणि तिसरं तत्त्व - वृत्तपत्र ही खाजगी मालकीची सार्वजनिक संस्था आहे. Privately owned public institution. वाचकच मालक आहेत!

सकाळ हे आमच्या उमेदीच्या दिवसांत एक कुटुंब होतं. ज्याला आपण sense of belonging म्हणतो, तो तेव्हा फार प्रभावी होता. आपण इथं नोकरी करत आहोत अशी भावनाच नव्हती. It belonged to us, everyone. ‘सकाळ’च्या यशात प्रत्येकाचे ‘स्टेक्स’ निर्माण होत असत.

माझी पत्रकारितेची सगळी कारकीर्द ‘सकाळ’मध्ये झाली. ३६ वर्षांच्या काळात ‘सकाळ’ सोडून एक ओळ मी इतरत्र लिहिली नाही. सगळेच दिवस सुखाचे व आनंदाचे होते असे नाही. मतभेद झाले. संघर्षही करावा लागला. ऑफिसमधलं राजकारण होतं आणि वैचारिक मतभेदही होते. भूमिका बदलल्या होत्या. ‘बाजारकेंद्री परीप्रेक्ष्य’ निर्णायक ठरत होते. पत्राचं प्रॉडक्ट होणं, वाचकाचं ग्राहक होणं, आणि संस्थांची दुकानं होणं. ही प्रक्रिया सार्वत्रिक होती. We are in the business of selling space हा तथाकथित सर्वाधिक खपाच्या राष्ट्रीय पत्राचाच ‘फंडा’ असेल तर इतर लहान स्पर्धक वृत्तपत्रांना मार्केटला शरण जाण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभच लोकशाहीचा मारेकरी होत असल्याची स्थिती निर्माण होत असताना फार थोडी वृत्तपत्रं, जी कमिटेड होती, या ‘सुनामी’त आपला बचाव करू शकली.

‘Truth and nothing but the truth’ या वचनाशी बांधिलकी मानणाऱ्या, ते अभिमानाने मिरवणाऱ्या वृत्तपत्रांची सत्योत्तर काळात काय स्थिती झाली आहे?

‘सकाळ’ स्कूलचं product असा माझ्यावर जो शिक्का बसला, त्यामुळे जणू ‘सकाळ’ व्यतिरिक्त इतर वृत्तपत्रात काम करण्यास मी लायकच राहिलो नव्हतो, असा माझा ठाम समज झाला होता; पण ते खरं नव्हतं. गोविंदराव तळवलकर आणि माधवराव गडकरी या दोघांनीही मला अनुक्रमे ‘म.टा.’ आणि ‘लोकसत्ता’त येण्याचं आमंत्रण दिलं होतं. दोघांचाही स्नेह मला लाभला. अरुण टिकेकर आणि कुमार केतकरांच्या बाबतीतही तेच. वृत्तपत्रांच्या पारंपरिक स्पर्धेच्या पलीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती.

दिल्लीत ‘सकाळ’चं सुसज्ज कार्यालय होतं. आर.एन.एस. या दिल्लीतील फार प्रतिष्ठित संकुलात. आम्ही प्रसंगपरत्वे दिल्लीला जात असू; परंतु पत्रकाराने पहायलाच हवी अशी दिल्ली मला दाखवली अशोक जैन यांनी. अशोक तेव्हा म.टा.चा दिल्लीतील बातमीदार होता. मी दुसऱ्या वर्तमानपत्रातला, प्रतिस्पर्धी पेपरातला आहे अशी ‘सावत्रपणाची’ वागणूक मला कधी मिळाली नाही. कोणाकडूनच. तो काळच वेगळा होता.

मालकांनी संपादकांना स्वातंत्र्य देण्याचा तो काळ होता. ‘सकाळ’मध्ये ते मला भरपूर मिळालं. मुणगेकर, डॉ. बानू कोयाजी आणि नंतर प्रतापराव पवार यांचे प्रेम आणि विश्वास मिळवण्यास मी पात्र ठरलो. माझ्या यशात मला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फार मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य अर्थात आपोआप मिळत नाही. ते मिळवावं लागतं, आणि त्याची किंमतही चुकवावी लागते. ‘करके देखो’ या माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी हे ऋण मोकळ्या मनाने मान्य केले आहे.

चांगले वाचक संपादकाला मोठे करतात, चांगले लेखक यश मिळवून देतात, आणि स्वातंत्र्य देणारे मालक असले तर प्रॉडक्टचा ब्रँड होतो. ‘साप्ताहिक सकाळ’ हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे. लेखकांना लिहायचा मोह पडावा असे वाचक ‘सा. सकाळ’ला मिळाले. It has the best readership profile; and it became the neighbour's envy. अनेक नावं घेता येतील, उदारहणं देता येतील, पण एकच प्रतिनिधिक नाव सांगायचं झालं तर डॉ. सदानंद मोरे यांचं सांगता येईल. ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’ आणि ‘गर्जा महाराष्ट्र’ या त्यांच्या तिन्ही प्रदीर्घ लेखमाला वाचकांच्या उत्तम प्रतिसादाशिवाय शक्यच झाल्या नसत्या. तिन्ही मालिकांचे ग्रंथ झाले, त्याला अनेक पारितोषिके मिळाली. महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. ‘रविवार सकाळ’ आणि नंतर ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखनाची सुमारे पन्नास पुस्तके प्रकाशित झाली. A class magazing for the masses हे ‘साप्ताहिक सकाळ’चे वर्णन अस्थानी नव्हते असे विधान आजही करता येईल.

माझ्या घडण्यात पुण्याचा फार मोठा वाटा आहे. अभिमानाच आहे या शहराचा आपल्याला. दुरभिमानच म्हटलं तरी चालेल. म्हणूनच मी त्यावर अनेकदा टीकात्मकही लिहिलं आहे. पुणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं, उत्तम गुणवत्तेचं शहर होण्याच्या सगळ्या शक्यता होत्या. निसर्गाची केवढी देणगी त्याला लाभली आहे. It it a gifted city in so many ways. ‘त्रिवेंद्रम, कोचीन, बंगलोर आणि म्हैसूरकडून पुणे काही शिकू शकेल काय?’ अशा आशयाचा एक लेख मी ‘रविवार सकाळ’ मध्ये १९७८मध्ये लिहिला होता. एका अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून त्या काळी देशातील सर्वाधिक खपाच्या ‘मल्याळम् मनोरमा’ या दैनिकाच्या कोट्टारममधील मुख्यालयात मी पाच-सहा आठवडे काम करत असतानाची ही गोष्ट आहे. सात-आठ वर्षांपूर्वी एम. के. सी. एल.चं प्रकाशन असलेलं आणि माझे मित्र भानू काळे संपादित करत असलेल्या ‘Change for Better’ या त्रैासिकात ‘Can streets be our Homes?’ या शीर्षकाचा एक मोठा लेख मी लिहिला होता. पुण्याच्या पन्नास वर्षातील वाढीचा, विकासाचा आलेख त्यात आहे. संधी गमावली आहे, Opportanities lost अशी भावना त्यात प्राधान्याने व्यक्त झाली आहे. अर्थात पुण्याचा अपवाद नाही. शहरांचं बकालीकरण ही सगळ्या देशाशीच गोष्ट आहे. Urban Decay असं त्याला म्हटलं जातं.

‘Growth can kill’चा प्रत्यय सर्वच क्षेत्रात वारंवार येत राहतो. असं असूनही पुण्यावर आपलं प्रेम आहेच. कारण ते ‘आपलं’ शहर आहे. त्याचं स्वास्थ्य सुधारावं, नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था, आपापल्या परीने आणि कल्पकतेने काम करत आहेत. पुणं हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे.

‘पुणे हे भारताचे महानगर असून मुंबई त्याचे उपनगर आहे असे न्या. रानडे म्हणत असत’ असा एक संदर्भ गोविंदराव तळवलकर यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर २०१५ मध्ये लिहिलेल्या लेखात आहे. याला समांतर जाणाऱ्या एका विषयावर ‘पुण्यभूषण’च्या दिवाळी अंकासाठी मी एक लेख लिहावा असं त्यांच्या संपादकांनी मला सांगितलं. पाच-सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विषय होता, ‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे काय?’ असा. त्या निमित्ताने मी महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती आणि पुणे शहर याविषयी पुष्कळ वाचन केलं. त्या लेखातला माझा निष्कर्ष होता, ‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहेच, ती असायलाच हवी, त्याला पर्यायच नाही. By default ती तशी आहे.’ पण माझा लेख या भरतवाक्याने संपला नाही. माझ्या हाती जो तपशील होता त्याने मी एक पायरी आणखी वर चढलो आणि वरील विधानाचा उत्तरार्ध लिहिला, ‘एकेकाळी Pune was the intellectual capital of the country.’ आता या दाव्याला कोणाला आव्हान द्यायचं असेल त्यांनी ते जरूर द्यावं, मात्र पुराव्यानिशी द्यावं.

पण एक गोष्ट नक्की, पुणे हा आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा पाळणा होता. लोकहितवादी, महात्मा जोतीराव फुले, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, ‘सुधारक’कार गोपाळराव आगरकर, नामदार गोखले, रा. गो. भांडारकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, रँग्लर परांजपे, बॅ. जरकर, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, धनंजयराव गाडगीळ आणि वि. म. दांडेकर... ही यादी न संपणारी आहे. ही सगळी माणसं, महान माणसं, लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं पुण्याची आहेत. भिन्न प्रकृतीची, विविध विचारांची, विरोधक आणि सहकारीही. वैचारिक संघर्षाला न घाबरणारी. पटलं नाही तर स्वतंत्र संस्था काढणारी, पण एका शहरात राहणारी. पुण्याला ‘पुणेपण’ देणारी पुण्यवान माणसं. देहू-आळंदी, शिवनेरी आणि सिंहगड, मुळा आणि मुठा यांच्या कोंदणातील पुण्याच्या परंपरेचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. परंपरेवर हक्क सांगताना ती सर्जनशीलतेने पुढे नेण्याची जबाबदारीही आहे.

माझी बहुतेक करिअर पुण्यात झाली तरी सुरुवातीचा काही काळ मुंबईत आणि नंतर कोल्हापूरमध्येही काम करण्याची संधी मला मिळाली. आणीबाणीपूर्वचं तापलेलं राजकीय वातावरण, मोर्चे, घेराओ, बंद, रेल्वे संपापासून पहिल्या अणुचाचणीपर्यंत आणि मुंबई महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत असंख्य घटना बातमीदार म्हणून मला कव्हर करता आल्या, पण त्यापेक्षाही जीवन संघर्षाचे अनेक धडे मला मुंबईने शिकवले.

कोल्हापूरला ‘सकाळ’ची आवृत्ती सुरू झाली १९८०मध्ये. संपादकीय विभागाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आणि पत्रकारितेकडे व्यापक परिप्रेक्ष्यात पाहण्याची माझी दृष्टीही विकसित झाली. मी पुणेकर असलो तरी सांगली आणि कोल्हापूर मला खूप आवडलं. खूप मित्र मिळाले. रहायला जागा मिळाली तीही वि. स. खांडेकरांच्या बंगल्यात. प्रा. गो. मा. पवारांपासून प्रा. चंद्रशेखर जहागीरदार यांच्यापर्यंत आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर व मालतीबाई किर्लोस्कर यांच्यापर्यंत अनेकांशी स्नेह जुळला. या दोन्ही शहरांनी मला खूप प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणा दिला. माहेरी जावं तसं दरवर्षी सातारा, सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूरला मी जात राहिलो. विठ्ठलाचे भक्त दरवर्षी पंढरपूरची वारी करतात, मी या शहरांची करतो. त्याच भक्तीभावाने.

पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे काय? हे प्रमेय पडताळून पाहताना महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती यावर बरंच वाचत गेलो. आधी उल्लेख केलेल्या सदानंदच्या तिन्ही महामालिका महाराष्ट्र केंद्रितच होत्या. ते सगळे लेख एकत्र केले तर अडीचशे-तीनशे होतील. म्हणजे तेवढेच आठवडे. सदानंदचा प्रत्येक लेख मी वाचल्याशिवाय कधी टाईपसेटिंगसाठी गेला नाही. म्हणजे किमान १५ वर्षे माझं महाराष्ट्राचं वाचन सुरूच होतं. मी मराठी आहे, महाराष्ट्रीय आहे म्हणजे कोणत्या गुणसमुच्चयाने युक्त आहे, याविषयीची माझी समज या कालखंडात वाढत गेली. महाराष्ट्रीय हा शब्द उच्चारायला जरा कठीण आहे आणि त्याचा वापरही अलीकडेच सुरू झाला आहे. त्याचा ऐतिहासिक पर्याय ‘मराठा’ आहे. महाराष्ट्रात राहणारे ते सगळे मराठे असा तो प्रदेशवाचकच आहे; परंतु राजकारण बदललं की शब्दांनाही नवे अर्थ फुटतात. राजकीय सोय आणि स्वार्थासाठी जातीय अस्मितांना फुंकर घालण्याच्या सध्याच्या काळात शब्दांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी आता भाषा वैज्ञानिकांनाच पाचारण करावे लागणार! पण ते असो.

या प्रक्रियेत महाराष्ट्र नावाच्या घटिताचं, Idea of Maharashtraचं माझं आकलन अधिक समृद्ध झालं. त्यात मला महाराष्ट्र नेहमीच मध्यममार्गी असल्याचं दिसतं. इंग्रजी शब्द वापरायचे तर liberal, plural, inclusive असं म्हणता येईल. कधी तो ‘राईट ऑफ द सेंटर’ला गेल्याचं दिसतं, पण त्याचा स्थायीभाव ‘लेफ्ट ऑफ द सेंटर’ असाच आहे. डाव्या, उजव्या विचारांचं विसर्जन मध्यममार्गात करण्याची प्रक्रिया सातत्याने चालू असते. Mainstreaming of the left and right.

अती डाव्या आणि अती उजव्या प्रवृत्तींना इथे थारा मिळाल्याचं दिसत नाही. तशा व्यक्ती दिसतात, परंतु त्याची प्रवृत्ती होत नाही. समकालीन परिभाषेत बोलायचं तर महाराष्ट्राचा पिंड लोकशाहीवादी आहे. महाराष्ट्राने इतिहासकाळापासून राजकारण केलं ते देश केंद्रस्थानी ठेवून. म्हणूनच महाराष्ट्र कायम देशाच्या केंद्रस्थानी राहिला. वारकरी संप्रदायाने याचा पाया घातला आणि हे मूल्यभान सामान्य माणसांपर्यंत संक्रमित केलं. शिवरायांच्या आणि तुकोबांच्या काळात ते शिखरस्थानी होतं. स्वातंत्र्य चळवळीत त्याचा उत्कटतेने प्रत्यय आला. रानडे, टिळक आणि गोखले अखिल भारतीय नेते झाले तो अपघात नव्हता. अगदी यशवंतराव चव्हाणांचं राजकारण आणि नेतृत्वही याच परंपरेतील आणि याच जातकुळीचं होतं.

अलीकडच्या काळात मात्र महाराष्ट्राने देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला वेगळी दिशा देण्याची क्षमता आणि सामर्थ्य गमावलं असल्याचं दिसतं. तशी आकांक्षाच दिसत नाही. प्रादेशिक अस्मितेचा आविष्कार म्हणून मी हे बोलत नाही. राष्ट्रकारण करण्याची मराठ्यांची दृष्टी लोकशाहीवादी आहे, त्यांच्या जनुकातच हे मूल्यभान आहे म्हणून मी हे बोलण्याचे धाडस करतो आहे. महाराष्ट्राचा प्रभाव कमी झाला आहे.

लोकशाहीच्या रक्षणाची भाषाही देशद्रोहाची ठरू लागल्याच्या काळात आपण जगतो आहोत. संवादाची जागा विसंवादाने घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्या पाहिल्या की, आपला देश यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे की काय अशी चिंता वाटते. मन भयभीत होतं. साहित्य संमेलनात विरोधी मताच्या व्यक्तीचं भाषण ऐकण्याचा आत्मविश्वास राहिला नाही इतके आपण गलितगात्र झालो आहोत. महाराष्ट्र कन्येला महाराष्ट्रात येण्याची बंदी घालणाऱ्या संस्कृतीहीन राज्याचे नेतृत्व देशपातळीवर कोण स्वीकारणार? असो. या स्मरणरंजनातून बाहेर पडून आत्मचिंतनाचे आवाहन करून मी येथे थांबतो.

.............................................................................................................................................

लेखक सदा डुम्बरे ‘साप्ताहिक सकाळ’चे माजी संपादक आहेत.

sadadumbre@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 31 January 2019

अनावश्यक व अतिरिक्त तीव्र भाषा वापरल्याबद्दल मी सदा डुंबरे यांची माफी मागंत आहे. वस्तुत: त्यांचं अनुभव, कर्तृत्व व वय यांच्यापुढे माझी काहीच औकाद नाही. म्हणूनंच सर्व वाचकांचीही माफी मागंत आहे. जे लिहायचं होतं ते चांगल्या शब्दांत लिहिता आलं असतं. परंतु बुद्धी चळल्याने सद्सद्विवेक राहिला नाही. संपादकांनी उदार मानाने कृपया क्षमा करावी ही विनंती. -गामा पैलवान


Gamma Pailvan

Wed , 30 January 2019

काय हो सदा डुंबरे, तुमच्या या प्रश्नाचा अर्थ नक्की काय हो : >> महाराष्ट्र कन्येला महाराष्ट्रात येण्याची बंदी घालणाऱ्या संस्कृतीहीन राज्याचे नेतृत्व देशपातळीवर कोण स्वीकारणार? >> आत्मवंचनेचा वसा घेतलाय का तुम्ही ? नयनतारा सहगल यांचे पिताश्री सोडले तर दुसरं काय आहे त्यांच्यात महाराष्ट्रीय ? एव्हढीच जर का वैचारिक खाज असेल तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण याचं उत्तर द्या बरं. जवाहरखान नेहरू बोललात तर तुम्हांस महाराष्ट्र कळलाच नाही. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान राघोबादादा आहेत. मुघल राजा दुसरा औरंगजेबला त्याचा शत्रू अफगाणी टोळ्यांचा प्रमुख अहमदशहा दुराण्याने कैदेत ठेवलं होतं. नयनतारा बाई मुघलांना भारतीय मानतात ना? मग मुघल राजाला कैदेतनं सोडवणारा माणूस स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान म्हणायला हवा ना? ( संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Delhi_(1757)#Aftermath ) जा, शिकवा हे बहुमोल ज्ञान तुमच्या महाराष्ट्रकन्येस. आपला नम्र, -गामा पैलवान


daya Salgaonkar

Wed , 30 January 2019

सदर लेख अतिशय सुंदर आहे. जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचायला हवा असे वाटते. धन्यवाद, दया.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......