जॉर्ज फर्नाडिस : एकवचनी, एकबाणी
संकीर्ण - श्रद्धांजली
रंगा राचुरे, जयदेव डोळे
  • जॉर्ज फर्नांडिस (जन्म- ३ जून १९३० , निधन - २९ जानेवारी २०१९)
  • Tue , 29 January 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली जॉर्ज फर्नांडिस George Fernandes

‘जॉर्ज- नेता, साथी, मित्र’ या रंगा राचुरे व जयदेव डोळे यांनी संपादित केलेले व हर्मिस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले पुस्तक १७ जून २०१३ रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकाला संपादद्वयींनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.

.............................................................................................................................................

समाजवादी विचार आणि आचार यांमध्ये व्यक्तिस्तोम नामंजूर आहे. समाजवादी विचारांचे राजकीय पक्ष व्यक्तीचे माहात्म्य कटाक्षाने टाळतात. स्वत:ला मार्क्सवादी म्हणवून घेणारे जगातील करोडो लोक त्या अर्थाने व्यक्तिवादी नसतात. कारण कार्ल मार्क्स हा एक विचार होऊन बसला. मार्क्सचे जीवन माहीत नसताना मार्क्सवादी झालेले वा होणारे करोडो लोक आहेत. भारतात गांधीजींनी असे काही कार्य केले की, करोडो भारतीय गांधीवादी होऊन गेले. परंतु त्यांचे गांधीवादी असणे व्यक्तीपुरते मर्यादित नव्हते. गांधीवाद ही एक आचारपद्धती व मूल्यव्यवस्था बनून गेली. गांधीजींच्या पाठोपाठ जवारहलाल नेहरू, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नावाने राजकारण सुरू झाले. नेहरूवादी, लोहियावादी अशी विशेषणे भारतात रूढ होत चालली. कोणी अशा ‘वाद्यां’ना ‘अनुयायी’ म्हणू लागले, तर कोणी अनुयायीवर्गाला ‘पंथ’ संबोधू लागले. भगत, चमचे, पंटर, दलाल अशी बदनामी तर त्या कार्यकर्त्यांबाबत पुष्कळ झाली.

आपल्या नेत्यांभोवती मोजकेच कार्यकर्ते कोंडाळे करतात व त्याला भलतेसलते सांगून फिरवतात; त्या नेत्याचा अहंकार मग फुलतो आणि तो आत्ममश्गूल होऊन सारे संघटन स्वत:च्या ताब्यात ठेवू पाहतो; थोडासाही विरोध त्याला सहन होत नाही. तरीही विरोध अथवा मतभेद थांबेनासे झाले की, तो आपलाच एक पक्ष काढतो आणि आपले स्थान पक्के करतो. विरोध वा मतभेद वैचारिक होते की, व्यक्तिगत स्पर्धेमुळे, याचा छडा कधीच लागत नाही. अखेर ज्या विचारांसाठी तो पक्ष काढला गेला त्याचे तुकडे आणखी पडत जातात आणि एक आश्वासक, तळमळीचे, चारित्र्यवान लोकांचे संघटन विदीर्ण होत होत कायमचे संपून जाते. भारतातील असंख्य राजकीय पक्षांचा इतिहास असाच आहे.

जॉर्ज फर्नाडिस यांच्यावरील लेखांचे पुस्तक तयार करताना व्यक्तिस्तोम, गटबाजी, कोंडाळे, पंथ, फाटाफूट असे सारे संदर्भ डोळ्यांसमोर उभे राहिले. मात्र, हा माणूस आपल्या अद्वितीय कार्यकर्तृत्वाने या संदर्भासकट एका वेगळ्याच उंच ठिकाणी उभा असलेला आढळतो. जॉर्ज यांनी वेगळी कामगार संघटना काढली, स्वतंत्र राजकीय पक्ष काढला. मात्र कोंडाळे, पंथ आणि व्यक्तिस्तोम यांच्या कचाट्यात ते कधी अडकले नाहीत. इतरांचे नेतृत्व बाजूस सारून त्यांनी स्वत:चे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न कधी केला नाही. संसदेत त्यांनी दोन दिवसांत दोन विरुद्ध भूमिका मांडल्याचे जे कुप्रसिद्ध उदाहरण दिले जाते, ते पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे! त्यामुळे लोहिया असोत की लिमये, मोरारजी असोत की चरणसिंह; नेते जसे सांगतील तसे आपले कार्यकौशल्य ते वापरीत. स्वत:च्या लहरीप्रमाणे ते वागत नव्हते, हे कोणाच्या लक्षात येत नाही. ज्या विचारांचा एकदा पत्कर केला, त्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे, हा त्यांचा विशेष. समता पार्टीच्या जन्माची कथा येथे वाचायला मिळेल. त्यातून जॉर्ज पक्षफोडे नाहीत हे कळून येईल. ते आत्मकेंद्री, स्वार्थी वागले नाहीत, हेही समजेल.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

.............................................................................................................................................

जॉर्ज यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, मोहक आहेच; पण त्यांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे, कार्यक्रमांमुळे, रोखठोक भूमिका आणि थेट कार्यक्रम या त्यांच्या बाण्याने त्यांना भरपूर चाहते व अनुयायी मिळत गेले. ते स्वभावाने लाघवी, मधाळ, अघळपघळ, गप्पिष्ट किंवा गोडबोले नसूनही त्यांच्या बेधडक, निर्भयी अन् नि:स्वार्थी वृत्तीवर लाखो लोक लट्ट व्हायचे. या प्रेमाचा व आदराचा नमुना म्हणजे या माणसाला कोणीही ‘जॉर्ज’ असे एकेरी उल्लेखू लागतो. वैयक्तिक ओळख नसणारी माणसेही आपल्याला हा मोठा नेता किती आवडतो, हे व्यक्त करताना ‘जॉर्ज बोलला, जॉर्जने अमुक केले’ असेच म्हणू लागतो. या लेखसंग्रहातही त्याचे नमुने आढळतील. एकाच लेखात लेखक ‘जॉर्ज’ असे एकेरी आणि ‘जॉर्ज फर्नाडिस यांनी’ असे आदरार्थी बहुवचन वापरतात. आम्ही ते तसेच ठेवले आहे. कारण त्या, त्या लेखकांच्या या मोठ्या माणसाबद्दलच्या भावना आहेत. एखाद्या नेत्याविषयीच्या औपचारिक व अनौपचारिक भावना एकाच वेळी व्यक्त होणे, ही भारतीय राजकारणातील फार दुर्लभ गोष्ट आहे. पवारांविषयी शरद आणि शरदराव असे संबोधन कोणी वापरत नाही. समवयस्कांनी एकेरी हाक मारणे वेगळे आणि वयाने धाकट्या असणाऱ्यांनी एकेरी संबोधन वापरणे वेगळे. हा भेद जॉर्ज यांच्या बाबतीत गळून पडला. एवढी आपुलकी, जिव्हाळा फार थोड्या नेत्यांबद्दल भारतीय माणसाने दाखवला.

कामगार चळवळ अर्थवादी म्हणजे निव्वळ अर्थकेंद्री झाल्याचा निष्कर्ष अनुभवांती काढून जॉर्ज त्यांच्या मूळच्या कार्यापासून दूर गेले. तोवर कामगार प्रश्नांसाठी संसदीय राजकारण असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या या राजकीय परिवर्तनाचा वेध या संग्रहात नाही. ते मोठे स्थित्यंतर टिपणारी व्यक्ती आम्हाला दिसली नाही असे नाही; परंतु तो विषय अख्ख्या एका पुस्तकाचाच वाटल्याने आणि छोट्याशा लेखाने उगाच गैरसमज होतील म्हणून आम्ही जॉर्ज आणि त्यांचे कामगार चळवळीबद्दलचे विश्लेषण सविस्तर घेणे टाळले. या संग्रहात महिला एकही नाही. ओल्गा टेलीस या पत्रकार महिलेने जॉर्ज यांच्याविषयी लिहावे, असा निरोप आम्ही त्यांच्यापर्यंत धाडला होता. त्या मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी जॉर्ज यांची कामगार चळवळ जवळून बघितली आहे. परंतु त्यांना बहुधा वेळ मिळाला नाही. त्यामुळे हा लेखसंग्रह पुरुषी झालेला आहे याचा खेद आम्हाला वाटतो. शरद राव किंवा जॉर्ज यांचे काही निकटचे सहकारी त्यांच्यापासून इतके दुरावले आहेत, की त्यांच्याकडून जॉर्जविषयीचे अनुभवकथन आम्हाला हवे तसे झाले नसते, अशी शंका आम्हाला वाटली. म्हणून एकेकाळचे जॉर्ज यांचे डावे-उजवे हात आम्ही लिहिते केले नाहीत.

जॉर्ज यांचे खासगी व कौटुंबिक आयुष्यही आम्ही चिवडलेले नाही. जया जेटली, लैला फर्नाडिस यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगून आम्ही त्या दोघींच्या अनुषंगाने स्वतंत्र लेख घेणे टाळले. धर्माधिकारी यांच्या लेखात जेटली यांच्याविषयी जो उल्लेख आहे, तो त्यांचा स्व-अनुभव आहे. त्यांचे मत इतरांना पटेलच असे नाही. जॉर्ज यांचे अवघे चरित्र सादर करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. हा जॉर्ज यांचा गौरवग्रंथही नाही. भाई वैद्य व पन्नालालजी यांच्यासारख्या जॉर्ज यांच्या जुन्या साथींनी जॉर्जवरचे प्रेम जसेच्या तसे व्यक्त केले आहे.

अपेक्षाभंग, विचारत्याग, असंगाशी संग, मूल्यशून्य तडजोड यांचे पडसाद काही लेखांतून उमटतात. पण ना कोणी जॉर्ज यांना जाब विचारला, ना जॉर्ज यांनी या समाजवाद्यांच्या प्रश्नांना स्वत:हून उत्तरे दिली! सत्तेच्या राजकारणात माणसे कठोर, निर्दयी, भावनाशून्य, व्यवहारवादी, कातडीबचावू होत असतात. जॉर्ज अशा भावनाशून्यतेत गुंतले नाहीत. पण मागे वळून पाहत बसलेत असेही वागलेले दिसत नाहीत. भारतीय राजकारणात प्रखर काँग्रेसविरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जॉर्ज यांच्यामध्येच दिसतो. या काँग्रेस तिरस्कारापायी जॉर्ज आपल्या मित्रांना, साथींना सोडून गेले ते गेलेच. ना त्यांनी आपल्या बदलत्या भूमिकांचा बचाव केला, ना त्या बदलांविषयी हळहळ व्यक्त केली. पुढे पुढे जात राहणे आणि हाती घेतलेले काम निष्ठेने, सचोटीने, पारदर्शकतेने आणि नि:स्वार्थ हेतूने पूर्ण करणे, एवढेच गेल्या २०-२५ वर्षांतील त्यांचे राजकारण दिसते. विश्वनाथ प्रताप सिंह त्यांना मागे टाकून पुढे गेले. चंद्रशेखर एकट्याच्या जिवावर पंतप्रधान झाले. या दोघांपेक्षा जॉर्जमध्ये त्याग कमी होता की राजकीय पराक्रम कमी होता? पण असे दिसते की, पराक्रमी जॉर्जविषयी त्यांच्याच काही सहकाऱ्यांना असूया वाटू लागली आणि हा पंतप्रधानपदाचा खराखुरा दावेदार, सामान्य माणसाचा सच्चा कैवारी जाणीवपूर्वक बाजूला टाकला गेला.

२००९ची लोकसभा निवडणूक ते मुझफ्फरपूर येथून लढले आणि पराभूत झाले. त्याबद्दलचे विवेचन त्यांच्याच संपादनाखालील त्यांनी ‘अदरसाईड’ मासिकाच्या जून २००९च्या अंकात केले आहे. आपल्या प्रकृतीविषयी कशा अफवा सोडल्या गेल्या आणि आपल्या तब्येतीला कसे काही झाले नाही, असे त्या लेखात ते सांगतात. नीतीशकुमारांनी काँग्रेसची आडून आडूनसुद्धा मदत घेऊ नये, अन्यथा मुलायमसिंह यादवांची काँग्रेसची मर्जी संपादन करण्यासाठी जी खटपट चालली आहे, तशी नीतीशकुमारांना करावी लागेल; एवढेच नाही तर मंडलच्या लाटेवरून ज्यांचा उदय झाला त्या सर्वांचा खेळ अशाने खलास होईल, अशा इशारा जॉर्ज देतात.

पुढे नीतीशकुमारांनी लोकलज्जेस्तव जॉर्ज यांची पाठवणी राज्यसभेत करवली. परंतु तोवर जॉर्ज खरोखर फार आजारी पडले. गेली तीन वर्षे ते अचेतन अवस्थेत आहेत. त्या अग्रलेखात जॉर्ज स्वत:ला एक लढवय्या आणि आशावादी जाहीर करतात. “माझ्या संपूर्ण आयुष्यात मी लोकशाहीवरच विश्वास ठेवला… लढायांत पराजय महत्त्वाचा नाही तर संघर्ष महत्त्वाचा असतो असे मी मानत आलो… माझ्या साऱ्या लढाया लोकशाही मूल्ये आणि गरीब व उपेक्षित यांच्या समस्यांसाठीच मी लढलो… मी आशा करतो की भ्रष्टाचार, दारिद्रय आणि सर्व प्रकारचा अन्याय घालवण्यासाठी आपण आपला लढा चालू ठेवू. त्यातून ‘स्व’ला विसरायला लावणारी आणि देशाला अग्रस्थानी आणणारी एक पारदर्शक, आपुलकीची अन समतेवर आधारलेली समाजनिर्मिती आपण करू… अजूनही खूप लढाया शिल्लक आहे.” असा समारोप ते या अग्रलेखाचा करतात.

जॉर्ज १९७१ची लोकसभा निवडणूकही हरले होते. (१९७३ साली ते मग एका पोटनिवडणुकीत जिंकले.) त्यावेळी ते ‘प्रतिपक्ष’ या नावाचे एक साप्ताहिक चालवत. पाचव्या लोकसबेत (१९७१-७७) या साप्ताहिकाच्या एका अंकाने मोठी खळबळ उडाली होती. त्या अंकात जॉर्ज यांनी संसदसदस्यांना खोटारडे, लबाड, दलाल आदी म्हटले होते. काँग्रेसचे ३७०पेक्षा अधिक सदस्य त्यावेळी लोकसभेत होते. विरोधी पक्षांचे सहा-सात सदस्य या सर्वांवर फार भारी पडायचे.

पुढे १९७३मध्ये जॉर्ज लोकसभेत आले आणि रेल्वेचा संप, आणीबाणीचा प्रतिकार यांतून देशाचे नेते झाले.

कामगार-कष्टकरी यांचे वर्गीय राजकारण पूर्णपणे थांबवून जॉर्ज  संपूर्ण संसदीय राजकारणात पडले. वर्गीय राजकारणात दोनच पक्ष असतात. एकाचा शोषिताचा, तर दुसऱ्याचा शोषकाचा. संसदीय राजकारणात आघाड्या उभ्या राहू लागल्याबरोबर तडजोडी, समझोते, माघार अशा गोष्टी कराव्या लागतात. तिथे फक्त दोनच बाजू नसतात. जॉर्ज अशा राजकारणात रुळले होते का? धंदेवाईक नेत्यांसोबत राहूनही त्यांना सत्तेचे डावपेच कळत होते का? अमाप पैसा, खोलवरचे हितसंबंध, विचारशून्य व मूल्यरहित नेते आणि सामान्य माणसाची फसगत यांत अडकलेल्या दिल्लीच्या राजकारणातून जॉर्जना कधीच सुटका नको होती का? सारेच अपरिहार्य झाले होते का?

प्रश्न खूप आहेत व ते खुद्द जॉर्जही जाणून असणार. इतकी वर्षे संघर्षांच्या व सत्तेच्या राजकारणात घालवलेल्या अव्वल दर्जाच्या नेत्याला ते पडलेच असणार. जॉर्जची खरी अडचण झाली ती जात्याधारित राजकारणाचा आरंभ मंडल आयोगापासून झाला तेव्हा. खरे तर मागासवर्गीयांचे राजकारण समाजवाद्यांनी सुरू केले. ‘सारी बातों में एकही बात, पिछडा पावे सौ में साठ’ अशी घोषणा डॉ. लोहियांच्या नेतृत्वाखाली समाजवादी आंदोलनाने द्यायला सुरुवात करताच काँग्रेस, कम्युनिस्ट आणि जनसंघ यांचे राजकीय आधारच खिळखिळे झाले. या तिन्ही पक्षांमधील उच्चवर्णीय नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. लोहिया अखेरी-अखेरीस एकत्र आले. आंबेडकरांच्या निधनामुळे ही आघाडी खंडित झाली. तरीही समाजवाद्यांच्या व्यतिरिक्त मागासवर्गीयांचे राजकारण देशाच्या पातळीवर न्यायला अन्य पक्षांना यश आले नाही. जातीचा विचार समाजवाद्यांच्या आग्रहामुळेच मंडल आयोगाच्या रूपाने राजकीय मंचावर आला. रामसुंदर दास, कर्पुरी ठाकूर, रामविलास पासवान, शरद यादव, मुलायमसिंह यादव आदी त्या रंगमंचावरील ठळक नावे. त्यांना जात आणि वर्ग यांची सांगड आरंभी घालता आली. मात्र, पुढे जात हा एकमेव घटक सत्तेच्या राजकारणात विराजमान होताच समाजवादी आंदोलनाच्या मर्यादाही उघड झाल्या. धनदांडग्या, सरंजामी वृत्तीच्या आणि भांडवली विकासास प्रतिसाद देणाऱ्या ओबीसींना समाजवादाची ‘व्यर्थता’ जाणवू लागली. प्रादेशिक पक्षांचे नेतृत्वही या जातींच्या हाती पडू लागले. आणि पाहता पाहता समाजवाद ही आंतरराष्ट्रीय बंधुभावाची, ऐक्याची, समतेची आणि सामाजिक न्यायाची विचारसरणी लुळी पडत गेली. त्याबरोबर जॉर्ज यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय, समताधिष्ठित आणि शोषितांचे नेतृत्वही आटत चालले. जॉर्जना ना एखादा प्रदेश होता, ना एक भाषा, ना बलाढ्य जात! नव्या राजकारणाचा पायाच त्यांना नसल्यामुळे त्यांचे नेतृत्व कोणाच्याही उपयोगास येईना. ते वेगाने निस्तेज, निकामी, निष्प्राण होत गेले. ते ज्यांच्यासमवेत सत्तेत होते, त्यांचा हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांचे ते विरोधकच होते. त्यामुळे तिथे ते पाहुणे कलाकार म्हणूनच वावरत. थोडक्यात, एका भव्य वैश्विक राजकारणाची अखेरची घरघर आपल्याला जॉर्ज यांच्या ‘गैरलागू’ अवस्थेत प्रतीत होते. जात, धर्म, प्रदेश, भाषा, यांचा खराखुरा त्याग करणारा नेता असा ‘निसंदर्भ’ व्हावा, ही गेल्या वीसेक वर्षांतील भारताच्या राजकारणाची शोकांतिका आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......