जॉर्ज फर्नांडिस : कोण होतास तू? काय झालास तू?
संकीर्ण - श्रद्धांजली
विनय हर्डीकर
  • जॉॅर्ज फर्नांडिस (जन्म- ३ जून १९३० , निधन - २९ जानेवारी २०१९)
  • Tue , 29 January 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली जॉॅर्ज फर्नांडिस George Fernandes

एकेकाळी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ म्हटल्या जाणाऱ्या, आपल्या एका हाकेवर मुंबई बंद पाडणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी दिल्लीमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांविषयीचा हा एक लेख... हा लेख २००९ साली लिहिला गेला आहे. आणि नंतर तो ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या हर्डीकरांच्या पुस्तकात समाविष्ट केला गेला.

.............................................................................................................................................

आजकाल मला जॉर्जचा चेहरा पाहवत नाही- मग तो वर्तमानपत्रात असो की टीव्हीवरती. ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ या धमाल लेखात पुलंनी म्हटलं आहे- ‘सर्कशीतली नोकरी सुटल्यामुळे संध्याकाळची भ्रांत पडलेल्या वाघासारखा नानांचा चेहरा दिसत होता!’ जॉर्जचा चेहरा गेली काही वर्षे तसाच दिसतो. याच परिसंवादाचा दुसरा विषय शरद जोशी आहेत- त्यांचाही चेहरा आता त्याच वळणावर चालला आहे; मात्र त्यांना अजून एक वर्ष राज्यसभा आहे. त्यामुळे इतक्यातच ‘संध्याकाळची भ्रांत’ पडण्याची शक्यता नाही. कोणी सांगावं, एनडीएच्या मेहेरबानीमुळे जॉर्जही राज्यसभेत बसेल- पण तो पूर्वीचा जॉर्ज असणार नाही. उद्देश हरवल्यानंतरचा केविलवाणा भाव या दोन्ही ‘वाघां’च्या चेहऱ्यावर गडद होत चालला आहे हे नक्की.

तो भाव ओळखून आणि संघ-जनसंघ-भाजप यांच्याबद्दलची या दोघांची जुनी मते आणि निरनिराळ्या कागाळ्या-कारवाया-निंदानालस्ती यांच्याकडे दुर्लक्ष करून दोघांचंही पुनर्वसन करण्यामध्ये अटलजींचा उमदेपणा दिसत असला तरी यांचा केविलवाणेपणा लपत नाही तो नाहीच- दत्ता सामंत झोटिंगशाही (आर्ग्युमेंट ऑव्ह फोर्स)च्या मार्गाने आले आणि गेलेही- त्यांच्यावर अशी नामुष्की कधी ओढवली नव्हती!

माझं बालपण मुंबईत गेलं- शालेय शिक्षण मुलुंडला झालं- परळला राहणाऱ्या मावशीकडे सतत येणं-जाणं-राहणं चालूच असे; त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पीटर अल्वारिस आणि साठीच्या दशकात जॉर्ज फर्नांडिस या दोन ख्रिश्चन कार्यकर्त्यांची नावे भिंतीवर वाचत, त्यांच्या भाषणांच्या-सभांच्या बातम्या ऐकतच आमची राजकीय जाणीव आकार घेत होती. त्यामुळे यातला एक गोवेकर आणि दुसरा मंगळुरी आहे. एका अर्थाने हे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा मुंबईशी जास्त जोडले आहेत, असंही कधी मनात आलं नाही. आम्ही जॉर्जचा उल्लेख तेव्हाही एकेरीच करत होतो आणि आताही एकेरीच करणार याचं नवल वाटू नये इतका जॉर्ज आमच्या राजकीय जडणघडणीमध्ये सामील होताच. त्यामुळे बहुधा आताचा त्याचा चेहरा पाहवत नाही! आणि परवाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वार्थाने एकाकी झालेल्या जॉर्जचा पराभव करून मतदारांनी त्याची मुक्तता केली असंच वाटलं. ‘अ‍ॅपॉकॅलिप्स नाऊ’ या चित्रपटात मार्टिन शीन मार्लन ब्रँडोची हत्या करून त्याला स्वत:ला व इतरांना यातनांतून सोडवतो, तेव्हा हायसं वाटतं तसंच! १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्जने स.का.पाटलांना ‘मुक्ती दिली’ होती; २००९ च्या निवडणुकीत बिहारच्या मतदारांनी जॉर्जवर तेच महदुपकार केले?

जॉर्जचा जन्म ३ जून १९३०चा. घरचे त्याला पाद्री बनवायचे मनसुबे करत होते- बोहल्यावरून पळ काढणाऱ्या रामदासांसारखा जॉर्ज मुंबईला आला. तेव्हा तो विशी-पंचविशीत असला पाहिजे. प्रथम मुंबईचे हॉटेल कामगार संघटित केले, कारण त्या वेळी गिरणगावात कम्युनिस्ट घट्ट पाय रोवून होते. स्वत: डांगे त्यांचं नेतृत्व करत होते, मग गिरणी कामगार संघटना, १९६७ मध्ये स. का. पाटलांना दिलेला दणका, मग रेल्वे कामगार युनियन, १९७४ चा रेल्वेसंप, आणीबाणीत वर्षभर भूमिगत असणे, बडोदा डायनामाइट खटल्यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटक होणे, सव्वातीन लाखांचा लीड मिळवून १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाचा खासदार होणे, मोरारजींच्या सरकारात उद्योगमंत्रिपद मिळणे, चिकमंगळूर निवडणुकीत इंदिरा गांधींना (त्या निवडून आल्या तरी) सळो की पळो करून सोडणे, जनता पक्षामध्ये मधू लिमयांच्या बरोबरीने दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा लावून धरून जनसंघ गटाला चाप लावण्याच्या नादात पक्षच फुटेल व सरकारही पडेल याचे भान सुटणे, त्यातच आज मोरारजी सरकारला पाठिंबा देणारे भाषण करून उद्या त्याविरुद्ध मतदान (‘मंत्री होतो म्हणून समर्थन केलं आणि पक्ष कार्यकर्ता म्हणून सद्सद्विवेकबुद्धीस (!) अनुसरून विरोधात मत दिलं’) करून स्वत:ची, जनता पक्षातल्या लोहियावाद्यांची आणि एकूणच जनता पक्षाची प्रतिमा कायमची मलीन करून ठेवणे- या जॉर्जच्या राजकीय वाटचालीच्या पहिल्या टप्प्यातच त्याच्या यशापयाशाचं इंगित सामावलं आहे. नंतरही तो मंत्री होताच- रेल्वेमंत्री असताना त्याने कोकण रेल्वे रुळावर आणली, मंगलोरपर्यंत भिडवली, संरक्षणमंत्री असताना बिनइस्त्रीचा पायजमा-शर्ट घालून पार कारगिलच्या सैनिकांना भेटून आला. एनडीएचा सन्माननीय (!) निमंत्रक म्हणून त्याला महत्त्व आलं तरी जॉर्जची प्रतिमा उंचावली नाहीच! त्यातच जया जेटलीची जवळीक आणि लुडबुड, संरक्षण मंत्री असताना अकारण वचावचा (कम्युनिस्ट आणि लोहियावादी किंवा एकूणच समाजवादी यांच्यातील जुनी खुन्नस काढण्यासाठी?) बोलून परराष्ट्र धोरण अडचणीत आणणे, नीतीशकुमारसारख्या सक्षम आणि पुढच्या पिढीच्या नेत्यांशीच आपल्याच पक्षात स्पर्धा करून त्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न करणे असले ‘अव्यापारेषु व्यापार’ त्याने केले. किंवा त्याच्या हातून घडले. तहलका प्रकरण, बरॅक क्षेपणास्त्रविरोधी मिसाइल प्रकरण इ. वादविषयही याच दुसऱ्या टप्प्यांत माध्यमांनी बऱ्यापैकी लावून धरलेच! हा धावता गोषवारा पाहिला तरी जॉर्जच्या वाटचालीत सततची अस्थिरता, अनाकलनीयता, अनपेक्षितपणे मोठ्या संधी त्याच्याकडे चालून येणे, अपेक्षितपणे त्याने त्यांची उपेक्षा करणे, काही वेळा तर चुथडाच करून टाकणे, मग पुन्हा काही काळ राजकीय विजनवासात घालवून परत एकदा देशतपाळीवरची बरी/वाईट भूमिका बजावणे हाच क्रम अव्याहतपणे चाललेला दिसतो.

मला आठवणाऱ्या जॉर्जच्या मुद्रा वेगळ्याच आहेत. साथी जॉर्ज फर्नांडिसच्या ‘मराठा’, ‘लोकसत्ता’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या सर्वसाधारणपणे काँग्रेसविरोधी पेपरमध्ये पाहायला मिळालेल्या- सध्याच्या ‘लोकसत्ता’चा अपवाद करावा लागेल. मोर्चे, सभा, आंदोलने यांच्या पोस्टर्सवरच्या अस्ताव्यस्त केस, भव्य कपाळ, पाणीदार डोळे, हमखास जाणवावेत अशा- मात्र अमरशेख यांचा अस्ताव्यस्तपणा जॉर्जमध्ये नव्हता हेही सांगायला हवं. अरुण साधूंच्या ‘मुंबई दिनांक’मध्ये जॉर्जचं सूचक चित्र-शब्दातलं आणि रेषांतलंही आहे तितका तो देखणा कधीच नव्हता, पण ‘मुंबई दिनांक’च्या चित्रपटातल्या सतीश दुभाषीइतका मूर्ख आणि बावळटही कधीच नव्हता (तो दिग्दर्शक आणि त्याचं दिग्दर्शन धन्य होय.) चोवीस तास एकत्र राहिल्याशिवाय व्यक्ती नीट समजत नाही असा माझा यशस्वी आडाखा आहे. चिकमंगळूर निवडणुकीत जॉर्जबरोबर चार-पाच दिवस ‘राउंड द क्लॉक’ राहण्याची संधी मिळाली होती म्हणून इतक्या नि:शंकपणाने हे लिहितो आहे.

१९७८ चा नोव्हेंबर महिना. आणीबाणी आम्हीच उलथवल्याचा उन्माद अजून ओसरायचा होता- जनता पक्षाच्या नेत्यांचाही आणि आम्हा कार्यकर्त्यांचाही! मला तर निवडणूक आणि मतदान कशाशी खातात तेही कळलं नव्हतं. जॉर्जला कळलं असणारच. पण त्यामुळेच इंदिरा गांधी निवडून येणार हे पक्कं माहिती असूनही सर्व जागतिक आणि भारतीय माध्यमांचं लक्ष स्वत:कडे खेचून घेण्याची हीच संधी आहे हे ओळखून तो चिकमगळूरमध्ये उतरला होता. कानडी, कोकणी, तुळू या त्या मतदारसंघातल्या तिन्ही भाषा सहजपणे बोलता येणं आणि किरकोळ संवाद साधण्याइतकं तामिळही बोलणं (कॉफीच्या मळ्यांत तामिळ मजुरांची संख्या लक्षणीय होती!) हेही त्याचे खास हुकमी एक्के होते. स्वत:चा दौरा ठरवताना त्याने फार चतुराई केली होती. इंदिरा गांधींच्या पाठोपाठ तो त्यांनी सभा घेतलेल्या प्रत्येक गावात स्वत:ची सभा ठेवत होता. इतकं साधं पण चाणाक्ष नियोजन करून त्याने बाईंची झोप उडवली होती. जनता उमेदवार (खरं तर संघटना काँग्रेसचे) वीरेंद्र पाटील हरणार कशावरून नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर, ‘मी त्या शक्यतेचा विचारच करत नाही,’ असं बेधडक, डोळ्याला डोळा भिडवून ठोकून देण्याचा बेमुर्वतपणा त्याने कमावलेला होताच- मात्र तोही शोभून दिसत असे! इंदिरा गांधीपेक्षा मी जास्त सेक्युलर भारतीय आहे, हे तो पुन:पुन्हा सांगत असे. धर्म ख्रिश्चन, मातृभाषा कोकणी, व्यवहारभाषा कानडी-इंग्रजी, कर्नाटकातून मुंबईकडे, मग इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी भाषांची ओळख होऊन त्या अवगत होणं, पत्नीची आई बंगाली, वडील पंजाबी त्यामुळे बंगाली, पंजाबी, तामिळ संस्कृतींशी परिचय असं आत्मपुराणही मधूनमधून लावून धरणं, इंदिरा गांधींच्या ‘मी या देशाची धाकटी (चिक्क) मुलगी धाकट्या मुलाच्या गावी (चिक्कमगळूर) आले आहे’ या आवाहनाची ‘ही तर दोड्ड (मोठ्या) बारपूरची दोड्ड (मोठी) मुलगी निघाली’ अशी धम्माल टिंगल करणे,’ ‘मी केंद्राचा प्रतिनिधी आहे, देवराज अर्स केवळ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत,’ असा टोला लगावणे हेही चालू असे.

हॉटेल कामगारांत काम केल्यामुळे मध्यरात्री सभा घेणं हा तर हातखंडा- शेवटची सभा पहाटे चार-पाच वाजता संपत असे. त्यात मध्ये मध्ये माझ्याशी गप्पा, भारत-पाकिस्तान कसोटी सामना चालू होता त्याचा स्कोअर, मुंबईच्या आठवणी (रात्री साडेनऊ दहाला फोर्टमधून निघालो की, पहाटेची शेवटची मीटिंग कधी मुलुंडला तर कधी बोरिवलीला व्हायची) वगैरे कोकणी अनुनासिकयुक्त मराठीतून चालायचं. बऱ्याच दिवसांनी त्याला मोकळेपणाने लुंगी लावून वावरता येत होतं म्हणूनही कदाचित मोकळाढाकळा (!) झालाही असेल (त्या वस्त्राचा तो गुण आहेच) पण त्याच्याबरोबर फिरताना त्याची स्वत:ची ऊर्जा सतत उसळत असे आणि तिचा परिणाम फार वेगाने आसमंतात जाणवत असे. एकदा मी सहज जॉर्जला म्हणालो (कधी कधी मलाही खुशामत करता येते) ‘‘अ‍ॅम आय टॉकिंग टू द फ्युचर प्राइम मिनिस्टर...?’’ त्यावर तो प्रसन्न हसला होता- ती खुशामत होती हे कळूनही! मला तो चेहरा आठवतो- म्हणूनच सध्याचा चेहरा बघवत नाही.

त्या वेळी मी जरी जॉर्जला सुखावण्यासाठीच तसं म्हटलं तरी जॉर्जकडून माझ्या- आणि माझ्या पिढीच्या अनेकांच्या अपेक्षा फार मोठ्या होत्या. उत्कटपणे असं वाटत असे की आता जनसंघ, समाजवादी (दोन्ही प्रसोपा व संसोपा) या काँग्रेसच्या तुलनेत (कदाचित कधी सत्ता न मिळाल्यामुळेच) स्वच्छ पक्षांमधील विचार करणारी, राजकारणाला तात्त्विक अधिष्ठान असलंच पाहिजे असं मनापासून मानणारी तरुण (राजकीय अर्थाने म्हणजे चाळिशी- पन्नाशीतली) मंडळी लवकरच चरणसिंगांच्या भारतीय लोकदलामध्ये आणि काँग्रेसमधल्या ‘तरुण तुर्कां’मधले आपले समानधर्मी शोधून काढतील आणि मोरारजी-चरणसिंग-जगजीवनराम या म्हाताऱ्यांच्या जोखडातून जनता पक्षाची सुटका करून एका नव्या पारदर्शक, कार्यक्षम राजकीय संस्कृतीची पायाभरणी करतील. चंद्रशेखर जनता पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा तर या अपेक्षेला पाठबळच मिळालं. ते अत्यंत स्पष्टवक्ते तेव्हाही होतेच. ‘जनता पार्टी टूट रही है’ या काँग्रेसच्या प्रचाराला त्यांनी ‘जो पार्टी अभी बनीही नहीं, वो टूटेगी कैसे?’ असा जो स्पष्ट जवाब दिला त्यातूनही आता चंद्रशेखर- अटलबिहारी-अडवाणी- सुब्रमण्यम स्वामी (!)- मधू लिमये-जॉर्ज- रामकृष्ण हेगडे ही सर्व पन्नाशीच्या अलीकडे-पलीकडे असलेली फौज जेपींच्या संपूर्ण क्रांतीच्या स्वप्नांचं एक वास्तव राजकीय मॉडेल देशात रूजवेल अशी आम्हाला खात्री वाटत होती. जनता पक्षामधून सर्वप्रथम संघटना काँग्रेसचे लोक बाहेर पडून ‘स्वगृही’ परत जातील- जगजीवनरामही तेच करतील. चरणसिंग तर बोलूनचालून हट्टी- दुराग्रही! तेही तेच करतील. पण त्यामुळे काहीच बिघडणार नाही. कारण वर नावे घेतलेली मंडळीच जनता पक्षाला तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम देणार आहेत, हा आमचा विश्वास भाबडा आणि अव्यवहारी तर होताच-मात्र, मधू लिमये-राजनारायण- जॉर्ज यांनी ज्या घिसाडघाईने दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा पुढे आणून, लावून धरून, पक्ष फोडून चंद्रशेखर आणि स्वत: जेपींना हतबल करून टाकलं- ‘बाग उजड गया’ ही खंत घेऊनच जेपी गेले- ते पाहून आम्ही हादरून गेलो. बुद्धिजीवींनी राजकारणात किमान सहप्रवासी तरी असलंच पाहिजे ही जॉर्ज ऑर्वेलची भूमिका माझ्या अंगी भिनलेली होतीच- म्हणूनच विफल झालो नाही- माझा अ‍ॅक्टिव्हिझम पुढेही २०-२५ वर्षे चालू राहिला. इतर मात्र उबग, शिसारी येऊन दूर गेले. जॉर्जच्या चेहऱ्यावर डाग पडायला सुरुवात झाली ती चिकमगळूरला पाहिल्यापासून एकाच वर्षात-एखादी एकांडी व्यक्ती स्वत:च्या खासगी जीवनाच्या मर्यादेत इतकं परस्परविरोधी वर्तन इतक्या वेगाने करूही शकेल (ते अयोग्य असलं तरी!) मात सतत गर्दीत वावरणाऱ्या, जनतेला आपण उत्तरदायी आहोत, असं मानणाऱ्या, आपल्या भूमिकांकडे गांभीर्याने पाहणारी भरपूर मंडळी आहेत हे माहीत असणाऱ्या जॉर्जने असं वागावं हे कोणालाच रुचलं नाही. तेव्हा कोसळलेली त्याची प्रतिमा कोकण रेल्वे प्रकल्पाचं यश मिळूनही परत कधीच उजळी नाहीच, पण सावरलीही नाही! शरद पवारांकडे सर्वजण संशयानं पाहतात तसेच जॉर्जकडेही ‘याचा काही भरवसा नाही’ या भावनेनेच पाहू लागले. इतर पक्षाचे कार्यकर्ते, नेते, माध्यमे, बुद्धिजीवी, मतदार सगळेच!

पण जॉर्जचा सगळा प्रवासच असा दुभंगलेला आहे, असं आता जाणवतं. जनसंघ गटाच्या संघनिष्ठेमुळे जनता पक्ष स्किझोफ्रेनिक झाला आहे- त्यात अगदीच तथ्य नव्हतं असं नाही. जनता पक्षात १/३ खासदार जनसंघाचे होते आणि जेपी-नानाजी देशमुख यांची वैयक्तिक जवळीक आणि अटलबिहारींची मिठ्ठास वाणी आणि सर्वसमावेशक कार्यसरणी यांच्या जोरावर जनता पक्षावर वचक ठेवण्याचे त्यांचे उद्योग चालू होतेच. अशी हाकाटी करणारा जॉर्ज स्वत:च पोलिटिकली स्किझोफ्रेनिक आहे! परस्परविरोधी भूमिका हीच त्याची शैली नाही, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ती जवळपास गरजच असावी. पाद्री व्हायचं सोडून एकदम राजकारणात शिरायचं आणि तेही धर्माला अफूची गोळी मानणारांच्या जाळ्यात घुसायचं ही कृती धाडसी आणि चित्ताकर्षक असेल तरीही तिच्यामागेही हाच स्किझोफ्रेनिया होता आणि अगदी गेल्या वर्षीच्या नितीशकुमार-विरोधामध्येही तोच दिसला. त्याचं अगदी केविलवाणं उदाहरण म्हणजे जॉर्जने भाजपाप्रणीत एनडीएचा निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारणं!

दुसरं असं की, लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही जॉर्ज तसा एकाकीच होता. मंगलोर-मुंबई-दिल्ली-बिहार- कुठेही त्याला स्वत:ची मुळं घट्ट रोवता आली नव्हती. ६७च्या निवडणुकीत स.का.पाटलांना धूळ चारली खरी. पण लगेच ७१ च्या निवडणुकीत मुंबईच्या मतदारांनी जॉर्जला नाकारलं होतंच. मुझफ्फरपूरमधून जॉर्ज बऱ्याच वेळा सलग निवडून आला, त्यात लोहियांनी मांडणी केलेल्या ओबीसी राजकारणाचं श्रेय अधिक होतं. जॉर्जच्या लोकप्रियतेचा भाग अनुषंगिक होता. आता याच ओबीसी राजकारणाचे अनेक तुकडे झाले- बहुजन समाज पार्टी, सत्राशे साठ जनता दल (दल), मुलायमसिंहांची समाजवादी पार्टी, जॉर्जची स्वत:ची पार्टी इ. (आणि आणखीही होतील) आणि जॉर्जची मुझफ्फरपूरमधली मक्तेदारीही संपुष्टात आली. हे अटळच होतं. तेव्हा ‘तुमच्यापेक्षा मी अधिक सेक्युलर आणि बहुभाषिक असल्यामुळे अखिल भारतीयत्व माझ्यामध्ये अधिक आहे’ असं इंदिरा गांधींना ठणकावणारा जॉर्ज हे विसरला की, त्या नेहरूंच्या कन्या आहेत आणि निश्चयीपणाही आपल्यापेक्षा त्यांच्यात जास्त आहे, करारीपणाही तितकाच. आपण भारतीय राजकारणात ‘भटके-विमुक्त’ आहोत हा अर्थही आपल्या अतिविविध भारतीयत्वाच्या प्रौढीमधून निघतो हेही जॉर्जच्या लक्षात आलं नाही?

कुठेच धड न रुजल्याने तो सतत विस्थापितच होत राहिला. कधी त्याचं पुनर्वसन झालं, तर कधी विजनवासच वाट्याला आला.

पन्नास-साठ वर्षे धामधुमीच्या राजकारणात घालवणाऱ्या इतर नेत्यांशी जॉर्जची तुलना करून पाहावी. सत्ता मिळो, न मिळो या सर्व नेत्यांनी उत्तम बस्तान बसवलेलं असतं. त्यांना त्यांचे खास मित्र असतात. काही सन्मान्य अपवाद वगळले तर सर्वांच्या कुटुंबीयांनी, निकटवर्तीयांनी प्रचलित पोलिटिकल इकॉनॉमीमध्ये जम बसवलेला असतो. (सत्ताधाऱ्यांचे कुटुंबीय/ निकटवर्तीय तर आपल्या भारतीय लोकशाहीत समांतर सरकारच चालवत असतात!) माध्यमांमध्ये त्यांचे पंटर्स- पित्तेही असतात. प्रत्येकाने काही संस्था उभ्या करून निवृत्तीच्या दिवसांची सोय लावलेली असते, त्यांच्याविषयी अनेक खरे-खोटे किस्से तयार होऊन पसरलेले असतात, नेता देखणा आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा असला तर त्याच्या मैत्रिणींची अनधिकृत चर्चा सतत चालू असते आणि नेता कुरूप असला तर त्याचे आर्थिक व्यवहार विशेषत: स्विस बँकेतली खाती- चर्चेला, सांगोवांगीला (गॉसिप) रुचकर खाद्य पुरवत असतात. अगदी गेल्या दोन दशकांत कोणी, कुठे, किती जमीन (सध्याचा सर्वात मोठा अ‍ॅसेट) हडपली याची चर्चा असतेच. त्यामुळे पराभूत झाला तरी नेता चर्चाविषय असतोच. जॉर्जच्या बाबतीत खास मित्र, किस्से, मोठ्या रकमा (‘मुंबई दिनांक’मधली हिंट खरी मानूनही) खूप मैत्रिणी यांची रसाळ चर्चा फारशी होत नाही (माझ्या कानावर तरी नाही)! त्याच्या नावावरची स्कँडल्ससुद्धा तशी तांत्रिक, रुक्ष, नीरसच आहेत. तरी जॉर्ज पन्नासहून अधिक वर्षे सार्वजनिक जीवनात आहे. त्याचा प्रवास संपतच नाही आणि त्याला मुक्कममही सापडत नाही, या पराकोटीच्या स्किझोफ्रेनियाचं मूळ कशात असावं? जॉर्जची अनेक लहान-मोठी भाषणं, मुलाखती, प्रासंगिक लिहिणं वा लिहून घेणं यातूनही एक सुसंगत भूमिका उभी राहत नाही. त्याच्या राजकीय खेळीही सर्वसाधारणपणे पहिल्या वीस वर्षांत प्रस्थापित विरोधी आणि नंतर प्रस्थापितांमध्ये सामील होऊनही स्वत:ची वेगळी ओळख जपणाऱ्याच असतात. काँग्रेसविरोध, नेहरू (घराणे) विरोध हीच एक ठळक रेषा या वाटचालीत जाणवतो. पण ती काही त्याची एकट्याची मक्तेदारी नाही आणि तिचा उगमही लोहियांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये (विचारामध्ये नाही) शोधावा लागतो. जॉर्जचा खास अभ्यासाचा/ व्यासंगाचा विषय नाही. कामगार-संघटन, उद्योग, संरक्षण अशा क्षेत्रात त्याने कामं केली पण यातल्या कोणत्याच विषयांत स्वत:चं स्वतंत्र नाणं त्याला पाडता आलं नाही.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥’ या रामदासांच्या ओवीचे पहिले दोन चरण जॉर्जने ठळकपणे राबवले. तिसऱ्या चरणाचा अर्थ रामदासांच्या काळात ईश्वरनिष्ठ (नियुक्त) राज्यकर्त्यांची स्वामीभक्ती (हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा) असा होता. आधुनिक जगात ते अधिष्ठान आयडियॉलॉजीचं असणं अपेक्षित आहे. (आयडियॉलॉजीवर ‘साधना- १५ ऑगस्ट २००७ मध्ये मी सविस्तर लिहिलं आहे.) पोलिटिकल इकॉनॉमी हा शासनाचा प्राण मानून, त्यात आवश्यक ते बदल ओळखून तसा अजेंडा मांडणे, तो जनतेपुढे ठेवून सत्ता हस्तगत करणे वा इतर मार्गांनी सत्ता काबीज करणे, सत्ता मिळाल्यावर तोच अजेंडा योग्य ते आर्थिक बदल घडून येईपर्यंत कठोरपणे राबवणे व त्यानंतर पोलिटिकल इकॉनॉमीचे पुन्हा परीक्षण करून नवीन अजेंडा मांडणे या निकषांवर जॉर्ज आणि त्याचा संयुक्त समाजवादी पक्ष यांची तपासणी करून पाहण्यातून या दिशाहीन प्रवासाची कारणं सापडतील.

जॉर्जचा राजकीय स्किझोफ्रेनिया-कधी स्वपक्षातला तर कधी इतर मित्रपक्षांशी वागतानाचा- त्याचा खास स्वत:चा असला तरी दिशाहीनतेचं श्रेय मात्र ‘लोकशाही समाजवाद’ नावाची जी आयडियॉलॉजी मानली गेलेली भंकस आपल्याकडे ५० हून अधिक वर्षे चालू आहे तिला द्यायला हवं. काटेकोर मार्क्सवादी विश्लेषणाप्रमाणे समाजवाद आणि लोकशाही एकत्र असूच शकत नाहीत कारण समाजवादी क्रांतीनंतर स्टेटचीच गरज राहत नाही. व्यवस्था असते ती प्रोलिटारिएटच्या हुकूमशाहीची! कोणत्याही महत्त्वाच्या साम्यवादी देशात लोकशाही मार्गाने क्रांती झाली नव्हती. सशस्त्र लढ्यामधून सत्ता हस्तगत करून तिथे साम्यवादी धोरणे कठोरपणे राबवून त्या देशांपैकी काहींनी स्वत:ला ‘समाजवादी’ म्हणून घेतलं होतं. अतिउत्साही, पोरकट भारतीय कम्युनिस्टांना, ‘तुम्ही काँग्रेसकडून भारतात लोकशाही क्रांती घडवून आणा’ असा सल्ला देण्यात स्टालिनच्या मनात धूर्त तुच्छताच अधिक असावी. ज्यांना केडर-बेस्ड पक्षसंघटना तयार करता येत नाही, तिच्या मार्फत प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देऊन, ती उलथून टाकता येत नाही आणि सत्ता मिळाल्यानंतर साम्यवादी धोरणे राबवण्यासाठी योग्य ते निर्णय घेऊन कठोरपणे- समोर कोण आहे याचा विचार न करता- राबवण्याची मानसिक- राजकीय इच्छाशक्ती ज्यांच्याकडे नाही अशा बुळ्या, रोमँटिक मंडळीसाठी ‘लोकशाही समाजवाद’ नावाची तडजोड आयडियॉलॉजी म्हणून खपवली जाते- महाराष्ट्रापुरतं बोलायचं (कारण जॉर्ज मुंबईला दत्तक आला होता) तर साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांसाठी लोकशाही समाजवाद ठीक होता!

या गोंधळाचा दुसरा एक पैलू आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वत:ला समाजवादी म्हणवणाऱ्या सर्व पक्षांचे नेते स्वातंत्र्याची चाहूल लागण्यापूर्वी काँग्रेसमध्येच होते- खरं म्हणजे त्यांनी तिथेच पाय रोवून काँग्रेसवर ताबा मिळवायला हवा होता. म्हणजे स्वातंत्र्यानंतर काही वचक निर्माण करता आला असता. पण ४२ च्या धामधुमीत जो विस्कळीतपणा या मंडळीच्या स्वभावात शिरला तो पुढे वाढतच गेला. ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात’ हे गीत म्हणजे ‘प्रॅक्टिकल जोक’ ठरण्याची ती सुरुवात होती. सगळेच त्यागी, सगळेच उत्साही, सगळेच निष्ठावंत, सगळेच रोमँटिक आणि लोकशाही समाजवाद हा (दारुडा) सुधाकर असला तरी सिंधूच्या समर्पित वृत्तीने त्याचा पुनर्विचार कदापि न करणारे! त्यातच जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन ही मंडळीही दूर गेल्यानंतर या घोळक्याला निर्णायक स्वरूप आलं. पुढे ते वाढतच गेलं. संसोपा-प्रसोपा यांनी एकमेकांवर निर्नायकी चढवलेले हे आठवून पाहावेत. जॉर्जचा पक्षीय वारसा हा असा विस्कळीत अहंमन्यतेचा होता.

तिसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा. मुळात लोकशाही समाजवाद हा वदतोव्याघातच आहे, पण नेहरूंनी तोही बळकावला, हायजॅक करून टाकला. सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य, नियोजनबद्ध अर्थव्यवस्था, विकासाची व्याख्या स्वरूप-कार्यक्रम- अंमलबजावणी करण्यामध्ये लोकनियुक्त शासनाची मक्तेदारी ही सर्व तत्त्वे (जरी त्यांनी प्रभावीपणे राबवली नाहीत तरी) काँग्रेसच्या अजेंड्यावर होतीच. दुसऱ्या टोकाला ‘काँग्रेस जरी समाजवादी भाषा वापरत असली तरी मुळात नेहरू व काँग्रेस हे दोघेही प्रतिगामीच आहेत, त्यांचा परिवर्तनाचा आव उसना आहे’ हे वेळीच ओळखून चोख कम्युनिस्ट तंत्राने पक्ष, संघटना, व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व या तत्त्वानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्ष कामाला लागलाच होता. म्हणजे तथाकथित लोकशाही समाजवाद म्हणून काही असलंच तरीही ते राबवण्यासाठी राजकीय अवकाश (पोलिटिकल स्पेस) शिकच नव्हता. त्यातच नेहरूंनी या मंडळींचा बुळेपणा चाणाक्षपणे हेरला होता; व्यक्तिगत पातळीवर सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवायचे, ‘बी अ फिअरलेस पार्लमेंटॅरिअन’ असा सल्ला देऊन यांना वावदूक बनवून टाकायचं त्यांचं धोरण असावं- या वावदुकीलाच क्रांतिकारक मांडणी म्हणण्याची भाषिक चापलुसी तयार झाली आणि सर्वच समाजवादी नेत्यांच्या- मग ते ‘साथी’ असोत वा ‘भाई’- ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा तयार झाल्या. यातल्या प्रत्येकाबद्दल ‘सत्ताधारी पक्षात असते तर कुठच्या कुठे असते!’ अशी आदरयुक्त गॉसिप माझ्या पिढीला फार ऐकावी लागली; त्यामुळे हे मुळातच ‘कुठच्या कुठे’च आहेत आणि ‘काहीच्या काही’च करतात हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. कधी कधी मनात येतं- हे असं होणार हे जे.पीं.च्या लक्षात आलं होतं? आणि पाणी अगदी गळ्याशी आलं तेव्हाच ते पुन्हा राजकारणात आले, तरी स्वत:कडे कोणतंही पद, अधिकार असू नये म्हणून इतके जागरूक झाले होते? लोहियांनी या बुळ्या आयडियॉलॉजीचं काही खास भारतीय स्वरूप मांडलं आणि ओबीसी राजकारणाचं महत्त्व वेळीच ओळखलं- सध्या हिंदी भाषिक पट्ट्यात जे चाललं आहे, तो लोहियांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहेच- पण तेही सुदैवी होते म्हणून लवकर केले! नाही तर मधू लिमये, दंडवते, राजनारायण, जॉर्ज, मृणाल गोरे, बापू काळदाते या आणि अशाच इतर स्वयंमग्न मंडळींना एकत्र ठेवता ठेवता त्यांचेही जे.पीं.सारखेच हाल झाले असते. कारण जनता पक्षाच्या सत्ता-समीकरणांमध्ये जे.पीं.ना मोरारजी-चरणसिंग-जगजीवनराम यांनी दमवलं असलं तरी ‘बाग उजड गया’चं दु:साहस संसोपावाल्यांनीच करून दाखवलं होतं! प्रसोपा आणि संसोपा यांच्यात ‘मवाळ बुळे’ आणि ‘जहाल बुळे’ एवढाच फरक करता येईल!

नेहरूंनी लोकशाही समाजवादाची भाषा आणि अजेंडा पळवला तर तिसरीकडे कम्युनिस्ट मंडळी समाजवाद्यांना कटाक्षाने दूर ठेवून होती. या मंडळींना आपली कडवी पक्षशिस्त झेपणार नाही आणि यांच्या स्वयंमग्नतेची लागण आपल्या पक्षाला झाली की मग आपल्यातही तोच विस्कळीतपणा येईल (सध्या तो आलाच आहे, पण लोकशाही समाजवाद्यांना त्याचं श्रेय घेता येणार नाही!) हे ओळखून अपवादात्मक प्रसंगीच (‘संस्थानिकांचे तनखे रद्द करणे’, ‘बँकांचे राष्ट्रीयीकरण’) त्यांनी त्यांना जवळ येऊ दिलं पण अंतरावर ठेवूनच! राजकीय उपरोध (पोलिटिकल आयरनी) असा की, समाजवादी आणि कम्युनिस्ट यांचे खरे शत्रू काँग्रेस, जनसंघ, स्वतंत्र पक्ष, मुस्लिम लीग हे असूनही यांनी एकमेकांवरच सतत जोरदार हे चढवून एक प्रकारे प्रस्थापितांचं- सुरुवातीला काँग्रेसचं व नंतर जनसंघ-भाजपाचं- बळ वाढवलं! जॉर्जनं केंद्रात संरक्षणमंत्री असताना चीनबद्दलची वक्तव्ये अकारण आणि अवेळी केली, त्यांच्या मुळाशी हे जुनं कम्युनिस्ट वैरच होतं.

आज प्रसोपा, संसोपा, क्रांतिकारी समाजवादी पक्ष हे शब्द मागे पडले आहेत, पण ‘जनता दल’ नावाने ज्या प्रादेशिक पक्षसंस्कृतीची ओळख हिंदी पट्ट्यात आहेत, त्यांच्यामागे हीच मंडळी आहेत. मुलायमसिंग नाव वेगळं सांगत असले तरी ते मधू लिमयांना गुरुस्थानी मानतात. लालूप्रसाद-नीतीशकुमार तर जे.पीं.च्या आंदोलनामधूनच पुढे आलेले आहेत. मधल्या काळात हिंदी पट्ट्यात- मुख्यत: उत्तर प्रदेश व बिहारमध्ये-काँग्रेसचा उच्छेद होऊन ती मते भाजपा, बसपा यांच्यात त्या-त्या निवडणुकीतल्या जातनिहाय गणिताला अनुसरून वाटली जातात. मुस्लिम मतही पूर्वीइतकं एकगठ्ठा राहिलेलं नाही. ‘पिछडा पावे सौ मे साठ’ ही लोहियांची घोषणा स्वत:चा प्राणच गमावून बसली आहे. ओबीसींना एकत्र आणणं आणि दीर्घ काळ एकत्र ठेवणं हिंदू संघटनांइतकंच अशक्यप्राय आहे आणि साठ टो मागासवर्गीयांत अक्षरश: सत्राशे साठ गुणिले दोन (३५०० ओबीसी जाती!) प्रकार आहेत. त्यांना राजकीय आघाडी करून प्रस्थापित व्यवस्था उलथून सत्ता काबीज करून एका नवीन राजकीय संस्कृतीचा पाया घालण्यापेक्षा आपापल्या जातीसाठी ‘आरक्षण’ मागण्यातच धन्यता वाटते! कुठल्याही राज्यात डोकावून पाहिलं तर पूर्वाश्रमीची समाजवादी मंडळी यशस्वी दिसली तर त्यांनी जातीय समीकरणांवर पकड ठेवून यश मिळवून समाजवादाचा खूनच पाडलेला असतो; ज्यांना हे जमत नाही किंवा ज्यांची जात बोलून चालून अल्पसंख्येची आहे ती मंडळी सावकाश पण निश्चितपणे निस्तेज होताना दिसतात. निर्दय पोलिटिकल इकॉनॉमीमध्ये त्यांचा अंत आता फार दूर नाही.

मुळात आयडियॉलॉजीच नसणे, जी काय होती ती नेहरूंनी पळवणे, काँग्रेस सरकारवर आपण वचक ठेवू किंवा हिंदुत्ववादी राजकारणाला शह देऊन त्याला पर्याय उभा करू अशा भ्रमात राहणे, त्यातल्या त्यात जवळ असणार्‍या कम्युनिस्टांशी उभा दावा धरणे आणि स्वत:च्या हट्ट, आग्रह, दुराग्रहांचा पुनर्विचार पुढे ढकलत राहणे, अद्यापही आपण जगातली शेवटची नैतिक व्यक्ती आहोत आणि क्रांती आपल्याच हातून होणार आहे या राजकीय अद्भुतामधून (पॉलिटिकल फँटसी) बाहेर न येण्याची अपार दक्षता घेणे या सर्व भ्रमांचा  हा परिपाक आहे. मग जॉर्ज असो वा इतर समाजवादी यांच्याकडे एकच काम आलं. कोणत्याही व्यवस्थेमध्ये कोणावर तरी अन्याय होतच असतात. तसे गट शोधून काढणं, त्यांना एकत्र आणणं, प्रचार आणि आंदोलने करताना रक्त ओकणे, काही प्रश्न मार्गी लागून तो गट प्रस्थापितात सामील (संघटित कामगार व कर्मचारी वर्गाची सध्याची अरेरावी आपल्यासमोर आहेच) झाला की तसा दुसरा गट शोधून काढणे. (जॉर्जने शेतकरी संघटनेत शिरण्याचीही धडपड केली होती. १९७९-८० मध्ये शरद जोशी तुरुंगात असताना नाशिक शहरात पदयात्रा काढून बादल्यांतून निधी गोळा केला होता. पण ‘जोशी साहेबां’नी ते सहकार्य झिडकारले होते.) त्यातून एखाद्या ठिकाणी जम बसला तर निवडणुकीत भाग घेणे, जिंकल्यास सत्ता तुच्छ मानणे (निदान सुरुवातीच्या वीस वर्षांत); हरल्यास नैतिकतेवर आधारित राजकारणाची प्रवचने झोडणे. संघर्ष करण्याचं वय आणि उमेद कमी झाल्यावर प्रस्थापितांकडे स्वत:चं स्थळ सुचवणे आणि फारशा अटी न घालता, नाकझाडेपणा न करता मी अजून जहाज सोडलं नाही (मग आता मी कप्तान नसलो तरी) असं कृतक समाधान मिळवणे, असा हा जॉर्ज ब्रँडच्या लोकशाही समाजवादाचा मुक्कामहीन पण अथक प्रवास आहे.

हे असंच होणं अपरिहार्य होतं! कारण ज्या लोकशाही समाजवादाच्या नावावर इतका ऊतमात जॉर्ज आणि मंडळींनी केला त्याचा पोकळपणाही सिद्ध झाला आहे. भारताबद्दल बोलायचं तर आमचा शरद जोशीप्रणीत (जात मृत-स्टिल बॉर्न) स्वतंत्र भारत पक्ष सोडला तर सर्वच पक्षांचा लोकशाही समाजवादावर विश्वास आहे- कम्युनिस्टांना भारतात क्रांती होणं शक्य नाही हे पटलं आहे म्हणून आणि काँग्रेस-भाजप व इतर पक्षांना लोकशाही समाजवादाची गोलमाल भाषा सोयीची वाटते म्हणून. अटलजींनी तर ‘गांधीवादी समाजवाद’ नावाचा विनोदही करून दाखवला. म्हणून भारतीय संदर्भात हे गारूड आवरल्यात जमा आहे. जागतिक पातळीवरही त्याला काही अर्थ उरला नाही. रशिया-चीनमध्ये आर्थिक उदारीकरण जाणीवपूर्वक झालं, तर कट्टर भांडवलशाही देशांनी वेल्फेअर स्टेट स्वीकारून वर्गीय शोषणाची धार बोथट करून टाकली- पूर्व युरोपीय देश तर समाजवाद या शब्दाच्या धसक्यातच अजूनही असतील. पश्चिम युरोपीय देशात काही राजकीय पक्षांच्या नावात समाजवाद शब्द येतो पण तो मार्क्सवादी अर्थाने नाही. त्यात आर्थिक मंदगती (स्लोडाऊन), दहशतवाद, नवनवे व्हायरस अशी नवी आव्हाने सर्वच देशांना गांगरून टाकत आहेत. वर्गीय शोषण हा समाजवादी विश्लेषणाचा पाया होता पण आता अनेक समृद्ध राष्ट्रांत वांशिक संघर्ष हा कळीचा मुद्दा होऊ पाहतो आहे. त्याची धार वाढत चालली आहे. बुळ्यांचा असो वा जहालांचा- लोकशाही समाजवाद कालबाह्य झाला आहे- कारण मुळातच तो हवेतला इमला होता.

‘देवाच्या आळंदीला निघालो/ले होतो/ते पण चोरांच्या आळंदीला जाऊन पोहोचलो/ले’ हे वाक्य राजकारण्यांच्या संदर्भात वापरलं जातं. काही प्रामाणिक (वा निर्लज्ज?) राजकारणी ते स्वत:च स्वत:बद्दलही वापरतात. त्यात प्रवाहपतित झाल्याची कबुलीही असते. शिवाय बहुतेकांचं असंच झालेलं उघड दिसत असल्यामुळे (इस हमाम में सब नंगे हैं।) संकोच वाटत नाही. अशा माहौलमध्ये अस्तित्वातच नसलेल्या ‘देवाच्या आळंदी’ला निघालेला वारकरी कुठे जाऊन पोहोचेल?

.............................................................................................................................................

(‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या विनय हर्डीकरांच्या जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/3486/Jan-Thayi-Thayi-tumbala

.............................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nikkhiel paropate

Wed , 30 January 2019

हाच लेख लोकसत्ता च्या दिवाळी अंकात २००९ की २०१० साली वाचला होता.. यातील संदर्भ आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत.


Gamma Pailvan

Tue , 29 January 2019

विनय हर्डीकर, लेख समर्पक आहे. विशेषत: हे वाक्य अगदी किमान शब्दांत कमाल अर्थोत्पत्ती साधणारं आहे : >> आपण भारतीय राजकारणात ‘भटके-विमुक्त’ आहोत हा अर्थही आपल्या अतिविविध भारतीयत्वाच्या प्रौढीमधून निघतो हेही जॉर्जच्या लक्षात आलं नाही? >> नेमक्या याच्या उलट भूमिका मोदींची आहे. स्वत:स गुजरातनो शेर म्हणवून घ्यायला जराही कचरंत नाहीत. लेखानिमित्त धन्यवाद! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......