अजूनकाही
एकेकाळी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ म्हटल्या जाणाऱ्या, आपल्या एका हाकेवर मुंबई बंद पाडणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी दिल्लीमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांविषयीचा हा एक लेख...
.............................................................................................................................................
जॉर्जचा आणि माझा परिचय सुमारे ३७-३८ वर्षांचा. महाराष्ट्रात एकाच काळात भिन्न कारणाने आम्ही दोघे गाजत होतो. १९६७ साली जॉर्जने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नेते स. का. पाटील यांचा मुंबईत पराभव केला होता. स. का. पाटलांचा पराभव म्हणजे जगातले आठवे आश्चर्य, असे लोकांना वाटत असे. पाटील हे काँग्रेस श्रेष्ठींपैकी एक प्रभावी नेते होते. अखिल भारतीय काँग्रेस पक्षासाठी ते एकटे मुंबईत पैसे गोळा करत. जॉर्ज त्यावेळेला फक्त कामगार नेता होता. एक साधा लढावू कामगार नेता भांडवलदारांच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्यक्तीला कसा पाडू शकणार? जॉर्ज पराभूतच होणार. पण एका बड्या धेंडाविरुद्ध कोणीतरी लढण्याची हिंमत करतोय याचे कौतुक अधिक होते. जॉर्जने आपली प्रचारपद्धती इतक्या कार्यक्षमतेने चालवली की स. का. पाटील पराभूत झाले. खासदार झाल्यानंतर जॉर्जभोवतीचे वलय वाढले. त्याच काळात माझी जॉर्जसोबत दोस्ती झाली.
जॉर्जला प्रत्यक्ष ‘अॅक्शन’मध्ये पाहणे खूप विलोभनीय असे. मी त्याचा टॅक्सीचा वा बेस्ट कामगारांचा वा मुंबई कॉर्पोरेशनच्या चतुर्थ श्रेणी कामगारंचा संप सुरू झाला की, किमान एक दिवस जॉर्जसोबत राहत असे. मुंबईच्या घामाघूम करणाऱ्या हवेत जॉर्ज फक्त लुंगी व बनियन घालून फिरत असे. टॅक्सीत केळ्याचा घड ठेवलेला असे. वडापाव व भरपूर केळी खावून तो लगातार कामगारांच्या बैठका घेत असे. त्यावेळेला त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विलक्षण चैतन्य सळसळत असे. ते चैतन्य एरवी त्याच्यात दिसत नसे. जॉर्जचे बालपण इतर पुढाऱ्यांपेक्षा अगदी वेगळे गेले. त्याचे कुटुंब मंगलोर येथे राहत होते. ख्रिश्चन कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्यांची एक प्रथा होती. घरातल्या थोरला मुलगा धर्मकार्यासाठी वाहून टाकायचा म्हणजे धर्मोपदेशक (फादर) होण्यासाठी मठात द्यायचा. देवाला माणसे वाहणे ही प्रथा भारतीयांच्या रोमारोमात आहे.
जॉर्जचे भाषाविषयक ज्ञान इतके अफाट होते की त्याला बंगाली, कन्नड, तेलुगु, तमिळ, इंग्रजी, हिंदी इत्यादी भाषा सहज अवगत होत्या. त्याच्यामध्ये जिद्द व चिवटपणा हे विलक्षण गुण होते. मुंबईत आल्यानंतर ऑफिससमोरच्या फूटपाथवर जॉर्ज झोपत असे. कधी कधी ‘माझ्या राखीव जागेवर का झोपला?’ म्हणून त्याच्याआधी मुंबईत आलेल्या लोकांच्या लाथा खात असे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha
.............................................................................................................................................
जॉर्जला समाजवादी नेते व कामगार नेते डिमेलो यांनी मुंबईत आणले. हार्ट अटॅक येऊन ते अचानक निधन पावल्यानंतर जॉर्जने सूत्रे हातात घेतली. हॉटेल कामगारांची यूनियन बांधणी रात्री बारानंतर सुरू व्हायची. हा गृहस्थ हॉटेलसमोर रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात जाऊन कामगारांसोबत चर्चा करण्यासाठी मिटिंग घ्यायचा. जॉर्जने आठ-नऊ महिने असे दीर्घकाल हॉटेल कामगारांचे संप चालवून ते यशस्वी केले. जॉर्ज ‘कामगार नेता’ म्हणून प्रसिद्ध झाला. अपार कष्ट, उत्तम अभ्यास व मनस्वी जिद्द या गुणांच्या जोरावर जॉर्ज मुंबईचा ‘बंदचा बादशहा’ झाला. जॉर्जच्या यूनियनमधील एखाद्या कामगारावर अन्याय झाला तर त्याच्या यूनियनमध्ये संप चालू व्हायचा, टॅक्सी बंद व्हायच्या, अख्या मुंबईचा कचरा काढणे बंद व्हायचे. कामगार एकमेकांना पाठिंबा द्यायचे, श्रमिकांची एकजूट असायची व त्या सर्वांचा विश्वास साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर असायचा. मी एकदा जॉर्जला विचारले, ‘कामगारांची यूनियन बांधून मुंबईसारख्या राक्षसी आकाराच्या शहराला मुठीत ठेवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?’ त्यावर त्याने उत्तर दिले, ‘लहानपणापासून माझ्या मनात एक कल्पना रुंजी घालत होती. चाकात गती आहे. चाक थांबले की सर्वांचीच गती थांबते. म्हणून जिथे चाक असेल त्याचा ताबा आपल्याकडे असला तर आपण जगाचे नियंते होऊ. ताबा आपल्याकडे राहावा असे वाटायचे.’
लोहियावादी-समाजवादी पक्षाचे नेते डिमेलो हे मुंबईमधील फार मोठे गोदी कामगार नेते होते. ते जॉर्जचे राजकीय गुरू. जॉर्जला ख्रिश्चन मठातील शिस्त आयुष्यभर उपयोगी पडली. त्याला कोणतेही व्यसन नाही, ही त्या ख्रिश्चन सेमेनरीचीच देणगी. अडचणीच्या परिस्थितीत राहून जनतेची सेवा करण्याचा जॉर्जचा बाणा हीदेखील तिथलीच देणगी. डिमेलो यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर जॉर्जने मुंबईत समाजवादी पक्षाचे नेतृत्व हातात घेतले आणि काम सुरू केले. देशातील समाजवादी पक्षाचे दोन तुकडे झाले होते. समाजवाद्यांचा एक गट डॉ. रामनमोहर लोहिया यांचे नेतृत्व मानत होता. लोहियावादी-समाजवादी पक्षाचे मुंबईतील नेते मधू लिमये होते. त्यांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्यावर जॉर्ज व मृणाल गोरे हे ‘मास लीडर’ तयार केले. जॉर्ज कामगार नेते होते व मृणाल गोरे कॉर्पोरेशनचे प्रश्न सोडवणाऱ्या नेत्या होत्या. त्यांना ‘पाणीवाली बाई’, ‘लाटणेवाली बाई’ अशी दोन विशेषणे लागली होती. बहुतांश समाजवादी मंडळी प्रजासमाजवादी पक्षात होती. त्यामुळे तसा हा पक्ष महाराष्ट्रात आणि इतरत्र बाजूलाच पडला होता. पण जॉर्जमुळे मुंबईत त्यांचा पक्ष रणांगणात अग्रभागी होता.
१९६७ला निवडून आलेल्या जॉर्जचा नंतरच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यामुळे काही काळ निरोशेपोटी अधिक आक्रमक बनला होता. ते संसेदवर टीका करत. कधी ती टीका अण्णा हजारे यांच्या टीमच्या भाषेपेक्षाही अधिक तीव्र भाषेत असे. जॉर्जचा स्वभाव मनस्वी होता. मधू लिमये यांचा बौद्धिक लगाम नसता तर त्याचे नेतृत्व भावनेच्या अंगाने विकसित झाले असते. त्या काळात भारतात देशातली अहिंसक लढाईचे सर्वेाच्च सेनापती म्हणता येईल असे जॉर्जचे स्थान होते. संघर्षात प्रतिपक्षाची गती थांबवणे वा प्रतिपक्षाच्या चाकावर ताबा मिळवून त्याची गती रोखणे, यात त्याचा हातखंडा होता. ती त्याची खास रणनीती होती. जॉर्ज रेल्वेच्या कामगार यूनियनचा नेता झाला. भारतीय रेल्वे यूनियन ही जगातील सर्वात मोठी यूनियन. पंचवीस ते तीस लाख कामगार या यूनियनच्या झेंड्याखाली आहेत. केवळ जॉर्जच्या नेतृ्त्वामुळे भारतात रेल्वेचा संप घडून आला. विशेष म्हणजे तो दीर्घकाळ चालला. जॉर्जला संपाचे नेतृ्त्व भूमिगत राहून करावे लागले.
रेल्वे संपाचा इंदिरा गांधींनी फार धसका घेतला. खरे म्हणजे त्या संपामुळेच इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. देशावर आणीबाणी लादल्यावर सर्व नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. जॉर्ज मात्र भूमिगत झाले. त्यांनी मनुष्यहानी होणार नाही हे पथ्य पाळून जिलेटीनचे छोटे स्फोट देशात सर्वत्र घडवून आणायचे ठरवले. तसे त्यांनी संघटन बांधले. स्फोट झाल्यानंतर पत्रके वाटली जायची, ‘आणीबाणीला आमचा विरोध आहे. आणीबाणीचा निषेध म्हणून आम्ही हे स्फोट घडवत आहोत.’ त्याला काळजी वाटे की आणीबाणीचा प्रतिकार काही काळाने विझून जाईल आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाचा आणीबाणी हा अविभाज्य भाग बनेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी ही रणनीती आखली होती. आणीबाणीच्या शेवटच्या पर्वात जॉर्जला अटक झाली. हातापायात दंडाबेडी ठोकून त्याला तिहारच्या मध्यवर्ती कारागृहात डांबून ठेवण्यात आले. हातात दंडाबेडी असतानाच आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत तो प्रचंड मतांनी बिहारमधून निवडून आला. जनतेने त्याचे पुतळे करून चौकाचौकात ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर जॉर्जची सुटका झाली. मोरारजीभाईंच्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री होते. त्यावेळी त्यांनी अत्यंत प्रशंसनीय काम केले.
काळाच्या ओघात क्रमाक्रमाने जनता पक्षाची वाट लागत गेली, तसे जॉर्ज यांचे राजकारण भरकटत गेले.
त्यांना स्मृतिभ्रंश हा आजार होण्यापूर्वी मी भेटलो होतो. खूप गप्पाही मारल्या. डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीतरी गडबड होत आहे हे मला जाणवले.
जॉर्जचे धोरण चुकले असे आपण म्हणू शकतो. पण त्यांच्याइतका अफाट बुद्धीचा व असीम परिश्रमाची तयारी असलेला दुसरा नेता मी पाहिलेला नाही. अशी माणसे समाजात वारंवार जन्माला येत नाहीत. एखाद्यात असे गुण असले तर त्याला भांडवलशाही व्यवस्था उचलून दत्तक घेते. जॉर्जबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम व आदर राहील.
(‘जॉर्ज- नेता, साथी, मित्र’ या रंगा राचुरे व जयदेव डोळे यांनी संपादित केलेल्या व हर्मिस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील लेख संपादित स्वरूपात.)
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Tue , 29 January 2019
In his later years as a politician; George became so pro Hindutvawadi that he was called Sarsanghachalak in jest