‘घरवापसी’, ‘लव्ह-जिहाद’, ‘गौरक्षण’, ‘धार्मिक विद्वेषाचं राजकारण’ आणि आपण
पडघम - देशकारण
अंतोन बळीद
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 26 January 2019
  • पडघम देशकारण Ghar Wapsi घरवापसी लव्ह-जिहाद Love Jihad गौरक्षण Gau Rakshan भाजप BJP संघ RSS

मी आपल्याशी ‘घरवापसी’ या अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहे. त्याचं कारण काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं धर्मांतर. ‘घरवापसी’ या शब्दाचं माध्यमांमध्ये इतकं ब्रॅण्डिंग झालं आहे की, हा शब्द उच्चरताच आपल्या डोक्यात धर्मांतर येतं. म्हणजे विशेषतः मुस्लिम व ख्रिस्ती यांचं पुन्हा हिंदू धर्मामध्ये धर्मांतरण.

आपण ‘घरवापसी’ या शब्दाचा मूळ अर्थ समजून घेऊ. एखादा व्यक्ती जेव्हा आपलं घर सोडून जाते, तेव्हा त्याच्या घरचे त्याचा शोध घेतात. प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात करतात की, ‘तू कुठे असशील तिथून निघून ये. तुझ्यावर कोणी रागावणार नाही. तुला समजून घेतलं जाईल. तुझ्या आई-वडिलांनी खाणंपिणं सोडलं आहे. तू लगेच घरी ये.” अशी भावनिक हाक दिली जाते. पण घरातील परिस्थिती खरंच बदललेली असते का? घरामध्ये खरंच प्रेमाचं व जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं का?

भाजपचे नेते सतत सांगत असतात की, भारतातील मुस्लिम व ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदू होते. मग मुस्लिम व ख्रिस्ती यांना आपलं घर सोडून म्हणजे हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात का प्रवेश करावासा लागला, याचं ते कुठेही स्पष्टीकरण देत नाहीत. त्याचं उत्तर आहे - पराकोटीची अस्पृश्यता, शिक्षणाचा संधी नाकारणं, जातीनं दिलेला परंपरागत व्यवसाय करणं आणि हेच काम ईश्वरानं दिलेलं आहे आणि त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसं न केल्यास पुढील जन्म हा पशूचा मिळेल असा समज असणं.

असा जगामध्ये कोणता धर्म आहे की, जो आपल्याच अनुयायांना त्यांच्या हक्काच्या प्रार्थनास्थळांवर प्रवेश नाकारतो? सार्वजानिक ठिकाणी त्यांना विषमतेची वागणूक दिली जाते? इतर धर्मातील लोकांना प्रवेश नाकारणारे अनेक धर्म आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन केलं. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशावेळी त्यांना जे अनुभव आले, त्यातून त्यांनी असं सांगितलं की, या धर्मात आम्हाला समानतेची वागणूक मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणून त्यांनी १९३५ मध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि १९५६ साली लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. मागील २१ वर्षांच्या काळात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष दिलं नाही. अजूनही देशामधील काही मंदिरात दलितांना प्रवेश नाकारला जातो किंवा त्यांच्यासाठी वेगळी रांग असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल मंदिरात मिळणाऱ्या असमानतेच्या वागणुकीमुळे बरेचसे दलित बाबांच्या डेऱ्यात जातात, कारण तिथं त्यांना समानतेची व सुरक्षतेची वागणूक मिळते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4712/Streevad-Sahitya-ani-samiksha

.............................................................................................................................................

सहा महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका गावात रामायण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दलितांना सांगण्यात आलं की, कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. कायद्याचं कवच मिळूनही काही समाजातील लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची जी कारणं होती, तीच पूर्वी ज्या लोकांनी धर्मांतर केलं, त्याचीही कारणं होती. बौद्ध, ख्रिस्ती आणि मुस्लिम या धर्मांमुळे दलितांना एक नवीन पर्याय मिळाला- ‘नका देऊ तुमच्या मंदिरात प्रवेश.’ त्यांची पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका झाली. ‘शूद्र वर्णामध्ये जन्मलो तर पुढील जन्मही शूद्राचा मिळणार’, या कल्पनेतून त्यांची मुक्तता झाली.

दलितांबरोबर काही उच्चवर्णीय हिंदूंनीदेखील इतर धर्मात प्रवेश केला आहे. त्यापैकीच एक रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि पंडिता रमाबाई. त्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या. पुढे त्यांना ख्रिस्ती धर्माचं आकर्षण निर्माण झालं. रेव्हरंड नारायण वामन टिळक हे स्वतः कवी आणि संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी मराठी-ख्रिस्ती भक्तीगीतं तयार केली व भाषांतराचं काम केलं. ते असं लिहितात की, मेंदूस बरीच कसरत पडेल अशा विषयात ब्राह्मणांचं लक्ष लागावयाचं हा त्यांचा जणू काय स्वभावच बनून गेला आहे. जर हिंदू धर्मावरील संस्कृत ग्रंथाची प्राकृत भाषांतरं करून ब्राह्मणांच्या हातात दिलं तर ते केर-कचऱ्यासारखी समजून फेकून देतील. त्यातलं एक अक्षरही समजत नाही, असा मंत्र कोणी म्हणू लागला की, हे लोक खुश, पण तोच जर कोणी भाषांतर म्हणेल तर त्याची टर उडालीच समजा. जातीव्यवस्था पाहून टिळकांचं पित्त खवळे. त्यांनी पुण्यातील भीक मागणाऱ्या एका मुलीला आणि एका दलित मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं.

पंडिता रमाबाई यांनी आपल्या वडिलांकडून संस्कृतचे धडे घेतले. त्या वेळी स्त्री शिक्षणाला भारतात विरोध होता. त्या असं म्हणाल्या की, हिंदू धर्मामध्ये स्त्रीला शूद्राचं स्थान आहे. त्यांना शिक्षणाची संधी नाही. त्यांना समानता नाही. त्यांनी बालविवाहास जोरदार विरोध केला. पुढे त्यांना ख्रिस्ती धर्माचं आकर्षण निर्माण होऊन त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. अमेरिका-युरोपमध्ये स्त्रियांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते. त्यामुळे प्रेरित होऊन माझ्या भारतातील भगिनींना याच पद्धतीनं वागणूक का मिळू नये, या करिता त्यांनी लढा दिला. अंध व विधवा स्त्रियांसाठी त्यांनी आश्रम काढले. परंतु त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या कार्यास बाधा आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांकडून असा प्रचार करण्यात येतो की, भारतातील मुस्लिम, ख्रिस्ती यांनी लाचारी पत्करून आणि कुठल्या तरी अमिषाला बळी पडून तलवारीच्या जोरावर धर्मांतर केलं आहे. कोणतीही सामान्य व्यक्ती जेव्हा धर्मांतर करते, तेव्हा ती काही कुराण, बायबल व धर्माचा अभ्यास करत नाही, तर त्या धर्मातील धर्माचरण करणारे कसे आहेत, ते आपल्या अनुयायांना कसं वागवतात याकडे पाहतात. जसं ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अत्यंत दुर्गम भागात जाऊन आरोग्य, शिक्षण व सेवा या गोष्टींवर काम केलं. मुस्लिम सुफी संत आपल्या अनुयायांसोबत नमाज पढतात आणि त्यांच्यासोबत एका थाळीमध्ये जेवण करतात. अजूनसुद्धा ही पद्धत आहे. कदाचित आपणाला आश्चर्य वाटेल, परंतु ज्यांना स्पर्शही नाकारला गेला होता, त्यांना सुफी संतांबरोबर जेवताना समानतेची भावना निर्माण होऊन त्या धर्माबद्दल आकर्षण निर्माण झालं असावं.

पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानात आणि आताच्या केरळ राज्यात कधीही मुस्लिम व ख्रिस्ती म्हणजे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांनी राज्य केलं नाही. तरीही या राज्यात मुस्लिम, ख्रिस्ती यांची संख्या भारतातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. ती का? जिथं मुस्लिमांची राजवट होती, तिथं मुस्लिमांची संख्या वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे. मग केरळ राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर कसं झालं?

पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताचे शिष्य सेंट थॉमस हे केरळमध्ये आले होते. त्यांनी येशूचा संदेश सांगितला. त्यांच्या नावानं अनेक चर्च आहेत. तिथं त्यांची हत्या झाली. आपल्या पाठ्यपुस्तकात भारतात ख्रिस्ती धर्म १६व्या शतकात वास्को-द-गामा आल्यानंतर आला असं सांगितलं जातं. पूर्वी भारताचे अरबस्तानबरोबर व्यापारी संबध होते. त्यावेळी अरबस्तानातील सुफी संत हे केरळ राज्यात आले आणि त्यांनी मोहम्मद पैगंबरांचा विचार सांगितला. तो लोकांना भावला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं. कोणीही जबरजस्तीनं धर्मांतर केलं नाही.

धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे. धर्म बदलल्यामुळे त्यांचं या देशाशी नातं तुटतं का? त्यांनी आपली भाषा, संस्कृती व खाण्यापिण्याच्या सवयी सोडलेल्या नाहीत. त्या स्थानिक आहेत. शिवाय काही अभ्यासकांनी धर्मग्रंथाची भाषांतरं करून ख्रिस्ती व मुस्लिम या धर्माला इथल्या मातीशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात जी ख्रिस्ती माणसं दिवाळीला फराळाचं करतात, तीच नाताळ सणासाठीही करतात. याचबरोबर लग्नात हळदीचा कार्यक्रम यांसारख्या बऱ्याच पद्धती भारतीय आहेत. इतर राज्यांतही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे लोक पूर्णतः भारतीय आहेत, यात मुळीच शंका नाही.

आता आपण मूळ मुद्द्याकडे वळू या. ‘घरवापसी’चा असा प्रयोग यापूर्वी कोणी केला होता का? त्याचं उत्तर आहे, हो. आर्यसमाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी १८८७ मध्ये केला होता. त्यावेळी त्या मोहिमेचं नाव ‘शुद्धीकरण’ असं होतं. त्यांनी हिंदूधर्माचा प्रचार करणं, धार्मिक मेळावे भरवणं अशी कामं केली. त्यांना असं वाटलं की, बरेचसे हिंदू लोक मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध व शीख या धर्माकडे आकर्षित होऊन त्यांनी धर्मांतर केलं आहे. आपण पुन्हा त्यांना हिंदू धर्मात आणण्याचा प्रयत्न करू. त्यावेळी त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला हिंदू धर्मात शुद्धीकरण करून प्रवेश दिला. परंतु त्याला कोणतीही जात मिळाली नाही. त्यांच्या या शुद्धीकरणाला उच्चवर्णीयांकडून कडाडून विरोध झाला. त्यामुळे त्यांची मोहीम बारगळली.

स्वामी दयानंद सरस्वती यांना अपयश का आलं? त्याचं महत्त्वाचं कारण होतं- ‘जात’. जातिसंस्था या स्वायत्त संस्था आहेत, त्या कोणालाही जुमानत नाहीत. जातीचं सभासदत्व हे फक्त जन्मानं मिळतं, ते ईश्वरनिर्मित आहे, असा हिंदूंचा समज आहे. म्हणून दयानंद सरस्वतींना त्या मुस्लिम व्यक्तीला जात देता आली नाही आणि त्यांच्या हिंदू धर्माच्या प्रचाराला बाधा आली.

हिंदू धर्म कधी प्रचारक धर्म होता का? तर, होता. तसं नसतं तर संपूर्ण भारतात त्याचा प्रचारच होऊ शकला नसता. परंतु हिंदूंमध्ये जातीयता वाढल्यामुळे या धर्माचा प्रचार खुंटला. जोपर्यंत जातीव्यवस्था आहे, तोपर्यंत हिंदू धर्म मिशनरी धर्म बनवता येणार नाही. ‘घरवापसी’ किंवा ‘शुद्धीकरण’ही फोल ठरेल.

मग जी ‘घरवापसी’ झाली, ती कशी यशस्वी झाली? त्यांना कोणत्या जातीमध्ये स्थान मिळालं? ज्यांनी ‘घरवापसी’ म्हणजे हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला, त्यांच्या पूर्वजांनी ५० ते ६० वर्षांपूर्वी मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यांना आपल्या पूर्वजांची जात माहिती होती. त्यामुळे त्यांनी त्याच जातीत प्रवेश मिळवला आणि चातुर्वर्ण्याचा स्वीकार केला असं म्हणता येईल. ज्या ख्रिस्ती व मुस्लिम व्यक्तीनं ५०० व १००० वर्षांपूर्वी धर्मांतर केलं आहे, त्याची ‘घरवापसी’ कोणत्या जातीत करायची, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही.

‘घरवापसी’ आताच का करावीशी वाटली याचंही स्पष्ट उत्तर आहे. ‘धार्मिक ध्रुवीकरण’ करून त्याचा राजकीय लाभ मिळविणं. संघाचे प्रचारक राजेश्वरसिंग यांनी धर्मांतरासाठी मुसलमान व्यक्तीस पाच लाख रुपये आणि ख्रिस्तीस दोन लाख रुपये जाहीर केले होते. एकीकडे पंतप्रधान ‘सबका साथ सबका विकास’चा नारा देत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या समांतर संघटना ‘घरवापसी’बरोबर ‘गौरक्षण’ करत, ‘लव्ह-जिहाद’च्या माध्यमातून अशांतता पसरवण्याचं काम करत आहेत. या संघटनांवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही. या संघटना दहशतीबरोबर खोटा प्रचार करण्यात पटाईत आहेत.

मध्यंतरी ‘लव्ह-जिहाद’ हे प्रकरण खूप गाजलं. विशेषतः कर्नाटक, केरळ आणि गुजरात या तीन राज्यांत अनेक तक्रारी समोर आल्या. २०१० मध्ये जनजागृती समितीनं दावा केला की, दक्षिण कर्नाटकमध्ये तीस हजार मुलींना मुसलमान मुलांनी फसवलं आणि त्यांचं धर्मांतर केलं. पोलिसांनी तपास केला, तेव्हा असं समजलं की, ४०४ केसेसच्या तपासात ३३२ मुली हिंदू मुलांबरोबर पळून गेल्या आहेत. कर्नाटक पोलिसांना तपासात हाती काहीही लागलं नाही. विशेष म्हणजे त्यावेळी तिथं भाजपची सत्ता होती. साहजिकच तीस हजाराचा हा आकडा समाजात अस्वस्थता निर्माण होऊन समाजात ध्रुवीकरण करण्यासाठी होता हे उघड आहे. ‘लव्ह-जिहाद’ ही एक काल्पनिक कल्पना आहे आणि अजून तरी त्यामध्ये फारसं सत्य नाही.

गंमत म्हणजे बौद्ध धर्मीयांच्या ‘घरवापसी’बद्दल बोललं जात नाही. असा प्रचार करण्यात येतो की, बुद्ध हा विष्णूचा अवतार होता आणि बौद्ध धर्मही हिंदू धर्माची शाखा आहे. त्या धर्माचं वेगळेपण आणि महत्त्व कमी करून मुस्लिम आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लय झाला.

जनतेमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली वितुष्ट निर्माण केलं जात आहे. त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. हे धार्मिक विद्वेषाचं राजकारण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अलाहाबादच्या भाषणात इशारा दिला होता की, तुम्ही धर्म आणि जात या मुद्द्यांवर जर निवडणूक लढवली तर संविधानाला धोका निर्माण होईल आणि संविधान निरुपयोगी ठरेल. त्यासाठी धर्म ही खाजगी आणि वैयक्तिक बाब आहे. त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचं आचरण करण्याचा, तसंच कोणताही धर्म स्वीकारणाचा संविधानानं अधिकार दिलेला आहे.

तेव्हा आपण संविधानाच्या मूल्यांचा प्रचार करू या.

.............................................................................................................................................

anton.balid@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 27 January 2019

आंतोन बळीद, तुमचा लेख वाचला. माझी मतं सांगतो. १. >> पराकोटीची अस्पृश्यता, शिक्षणाचा संधी नाकारणं, जातीनं दिलेला परंपरागत व्यवसाय करणं आणि हेच काम ईश्वरानं दिलेलं आहे आणि त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसं न केल्यास पुढील जन्म हा पशूचा मिळेल असा समज असणं. >> बौद्धांच्यात कडवी अस्पृश्यता होती. हिंदूंमध्ये ती आली कारण काही जाती मेलेल्या गुराढोरांचं मांस खायच्या. म्हणूनंच आंबेडकर म्हणाले होते की मेलं ढोर खाऊ नका, मेलं ढोर ओढू नका'. बहुजनांना शिक्षण नाकारलं ते इंग्रजांनी. भारतीयांनी नव्हे. बाकी, हिंदू परंपरागत व्यवसायालाच चिकटून राहिले असते तर ज्योतिरादित्य शिंदे आज मेंढ्या पाळतांना दिसावयास हवे. पण अंगी पराक्रम हवा ना त्यासाठी. ख्रिस्ती पंथ स्वीकारूनही आज कितीतरी लोकं दलितांचे दलितंच राहिले आहेत. ते स्वत:स ख्रिश्चन दलित म्हणवून घेतात. माणूस कर्तृत्वहीन निपजण्यास हिंदू धर्म आजिबात जबाबदार नाही. २. >> असा जगामध्ये कोणता धर्म आहे की, जो आपल्याच अनुयायांना त्यांच्या हक्काच्या प्रार्थनास्थळांवर प्रवेश नाकारतो? >> ख्रिस्ती धर्म ! अमेरिकेत क्याथलिक चर्च मध्ये मेथडिस्ट मनुष्यास प्रवेश असतो का? ३. >> असा जगामध्ये कोणता धर्म आहे की, जो आपल्याच अनुयायांना त्यांच्या हक्काच्या प्रार्थनास्थळांवर प्रवेश नाकारतो? >> हे निखलास चुकीचं आहे. रामनामावर सर्वांचा अधिकार आहे. ४. >> पुढे त्यांना ख्रिस्ती धर्माचं आकर्षण निर्माण होऊन त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. >> पण पुढे ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या संकुचित वृत्तीमुळे भ्रमनिरासही झाला. सेवेच्या नावाखाली फक्त येशूचा कळप वाढवणे इतकाच हेतू पाहून रमाबाई वैतागल्या. त्यांच्या मुलीने मनोरमाने स्वत:च्या (म्हणजे मनोरमाच्या) मृत्यूसमयी स्वत:स हिंदू घोषित केलं होतं. मी नावापुरतीच ख्रिस्ती आहे, खरंतर मी हिंदूच, असे उद्गार मृत्युशय्येवर असतांना काढले होते. ५. >> कोणतीही सामान्य व्यक्ती जेव्हा धर्मांतर करते, तेव्हा ती काही कुराण, बायबल व धर्माचा अभ्यास करत नाही, तर त्या धर्मातील धर्माचरण करणारे कसे आहेत, ते आपल्या अनुयायांना कसं वागवतात याकडे पाहतात. >> हे फक्त पुस्तकांत वाचायला म्हणून ठीक आहे. प्रत्यक्षात आमिष दाखवून घाऊक पंथांतरे झाली आहेत. आणि वर्तनाचं म्हणाल तर पोप व त्याचे बिशप, कार्डीनल इत्यादिंचे चवचाल चाळे जगजाहीर आहेत. कुणाची लायकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते, हे आम्हांस व्यवस्थित ठाऊक आहे. ६. >> जसं ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अत्यंत दुर्गम भागात जाऊन आरोग्य, शिक्षण व सेवा या गोष्टींवर काम केलं. >> सेवा करायची असेल तर पीडीताचा पंथ बदलायची गरजच काय मुळातून? पंथ न बदलताही सेवा करता येते ना? ७. >> मग केरळ राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर कसं झालं? >> भीती दाखवून अथवा पैसे वाटून. ८. >> अरबस्तानातील सुफी संत हे केरळ राज्यात आले आणि त्यांनी मोहम्मद पैगंबरांचा विचार सांगितला. तो लोकांना भावला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं. कोणीही जबरजस्तीनं धर्मांतर केलं नाही. >> तुम्ही म्हणता तसं पंथांतरं घडली, पण त्यातल्या अनुयायांची संख्या अत्यल्प होती. घाऊक पंथांतरं तलवार वा अमिषाच्या जोरावरंच झाली. केरळात मुस्लिमांची मोठी संख्या टिपू सुलतानामुळे आहे. ९. >> धर्म बदलल्यामुळे त्यांचं या देशाशी नातं तुटतं का? >> हो. जिथून हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासनं तुटले. १०. >> त्यामुळे हे लोक पूर्णतः भारतीय आहेत, यात मुळीच शंका नाही. >> करेक्ट. पण तरीही पाकिस्तान व बांगलादेश वेगळे झालेच ना? हिंदूंनी पंथांतराकडे संशयाने पाहिलंच पाहिजे. नाहीतर त्यांचा निर्वंश होईल. ११. >> हिंदू धर्म कधी प्रचारक धर्म होता का? तर, होता. तसं नसतं तर संपूर्ण भारतात त्याचा प्रचारच होऊ शकला नसता. >> योगाचा प्रत्यक्ष अनुभव आला की माणूस आपसूक हिंदू धर्म स्वीकारतो. वेगळ्या प्रचारकाची गरज नसते. १२. >> परंतु हिंदूंमध्ये जातीयता वाढल्यामुळे या धर्माचा प्रचार खुंटला. >> असहमत. क्षात्रतेजाच्या अभावामुळे हिंदू धर्माची म्हणजे वैदिक परंपरेची वाढ खुंटली. १३. >> ज्या ख्रिस्ती व मुस्लिम व्यक्तीनं ५०० व १००० वर्षांपूर्वी धर्मांतर केलं आहे, त्याची ‘घरवापसी’ कोणत्या जातीत करायची, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही. >> म्हणूनंच अशांची घाऊक घरवापसी झाली पाहिजे. त्यामुळे त्यां सर्वांना एकसमान समूहाचं सामायिक व्यासपीठ उपलब्ध होईल. आवडत्या वा इष्ट देवतेचे उपासक ही ओळख त्यांना मिळू शकेल. स्वतंत्र जात हवीच हा अट्टाहास हिंदूंपेक्षा गैरहिंदूच जास्त धरतात. चायसे किटली गरम कायको भाय ? १४. >> ‘घरवापसी’ आताच का करावीशी वाटली याचंही स्पष्ट उत्तर आहे. ‘धार्मिक ध्रुवीकरण’ करून त्याचा राजकीय लाभ मिळविणं. >> तुमचं आकलन पार चुकलंय. मोदी हिंदू व्होट बँकेच्या आधारे सत्तेवर आलेत व तसेच कायम सत्तेत राहू शकतात. घरवापसीद्वारे मतांची मशागत करायची काहीच त्यांना गरज नाहीये. घरवापसीचं प्रमुख उद्दिष्ट 'हिंदूंची संख्या वाढवून भारत सुरक्षित करणं' हे आहे. १५. >> ‘लव्ह-जिहाद’ ही एक काल्पनिक कल्पना आहे आणि अजून तरी त्यामध्ये फारसं सत्य नाही. >> साफ चूक. लव्ह जिहाद ही समस्या असल्याचं केरळ उच्च न्यायालयानं मान्य केलं आहे. संदर्भ : https://www.news18.com/news/india/investigate-love-jihad-and-religious-conversions-kerala-hc-to-top-cop-1416387.html १६. >> गंमत म्हणजे बौद्ध धर्मीयांच्या ‘घरवापसी’बद्दल बोललं जात नाही. >> एकदम बरोबर. कारण की बौद्ध व नवबौद्ध भारतास आई मानतात. १७. >> जनतेमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली वितुष्ट निर्माण केलं जात आहे. >> बरोबर. म्हणूनंच आडमुठे पंथ सत्वर त्यागून सर्वसमावेशक हिंदू धर्माचा स्वीकार करावयास हवा. १८. >> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अलाहाबादच्या भाषणात इशारा दिला होता की, तुम्ही धर्म आणि जात या मुद्द्यांवर जर निवडणूक लढवली तर संविधानाला धोका निर्माण होईल >> अगदी अचूक. म्हणूनंच जातीवर फूट पाडणारं आरक्षण ताबडतोब बंद केलं पाहिजे. आपला नम्र, -गामा पैलवान


Anil Bhosale

Sat , 26 January 2019

अतिशय महत्वपूर्ण माहिती.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......