‘आभाळ पेलताना’ : आंबेडकरी कवयित्रींचा महत्त्वाचा दस्तावेज
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ‘आभाळ पेलताना’चं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र संजय पवार यांचं
  • Fri , 25 January 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar आभाळ पेलताना Aabhal Peltana दलित कवयित्री Dalit Kavyitri Dalit Women Poetry

सध्याच्या शताब्दीयुगात दलित साहित्याची पन्नाशी, साठी किंवा सत्तरी दलित, आंबेडकरी, बौद्ध, भटके, स्त्रीवादी इ. सगळ्यांकडून दुर्लक्षित राहिली. आंबेडकरी जलशांपासून गणना केली तर शताब्दीच साजरी व्हायला हवी आता. असो. या विचाराला निमित्त ठरलाय नुकताच प्रकाशित झालेला एक कवितासंग्रह.

‘आभाळ पेलताना’ या शीर्षकाचा हा कवितासंग्रह तब्बल १९ कवयित्रींचा प्रातिनिधिक कवितासंग्रह आहे. या संग्रहातील सर्व कवयित्री आंबेडकरी प्रेरणेतून लेखन करतात. हे संपादकियातून मांडले गेले आहेच. पण प्रत्येक कवयित्रीचा परिचय व लेखनप्रेरणाविषयक टिपणातून ते दृग्गोचर झाले आहे.

‘दलित साहित्य’ ही संज्ञा बाद ठरवून अलीकडे अनेक गट, व्यक्ती आवर्जून ‘आंबेडकरी’ अथवा ‘बौद्ध साहित्य’ अशी संज्ञा वापरतात. यावरून मत-मतांतरे आहेत. त्या चर्चेत या लेखाच्या मर्यादेत शिरत नाही.

याच संग्रहाच्या संज्ञेने आंबेडकरी साहित्यात आजवर पुरुष लेखकांच्या लेखनाची प्रामुख्याने दखल घेतली गेली आहे. अनेक पुरुष लेखकांवर स्वतंत्र अथवा समकालीन अशा अर्थाने पिढींवर चर्चा, समीक्षा बोलणे झाले आहे. त्या तुलनेत ‘आंबेडकरी लेखिका’ अशा प्रकारच्या नोंदीपासून बऱ्याच दुर्लक्षित राहिल्या आहेत. दलित लेखिकांची आत्मचरित्रं जेवढी चर्चेत आली, तेवढं त्यांचं कविता, कथा, कादंबरी, नाट्य अथवा संकीर्ण लेखन आंबेडकरी विचारविश्वासह मराठी साहित्यविश्वातही अदखलपात्र राहिलेय.

या पार्श्वभूमीवर १९ कवयित्रींचा प्रातिनिधिक संग्रह येणं ही तशी महत्त्वपूर्ण घटना आहे. मात्र हा पहिलाच प्रयत्न नाही. प्रज्ञा दया पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार असा प्रयत्न ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार यांनी केला होता, तसाच मुंबई विद्यापीठानेही. मात्र विद्यापीठाची निर्मिती अनेक पातळ्यांवर सदोष होती. त्यामुळे ती पुढे आलीच नाही.

आता डिसेंबर २०१८मध्ये ‘आभाळ पेलताना’ची निर्मिती झालीय. प्रा. आशालता कांबळे यांच्या प्रभा प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला आहे आणि उषा अंभोरे व शारदा नवले यांनी कवितांची निवड व संपादन केले आहे.

या संग्रहाची आणखी वैशिष्ट्ये सांगायची तर अक्षरजुळणीपासून मुद्रणापर्यंतची जबाबदारी स्त्रियांनीच पेलली आहे. सानिका ढाकेफळकर या तरुण मुलीने चितारलेले या पुस्तकाचे मुखपृष्ठ शैलीच्या दृष्टीने वेगळे व संग्रहाच्या आशयास समर्पक असे आहे.

हिरा बनसोडे, उषा अंभोरे, उर्मिला पवार, कुसुम गांगुर्डे, हिरा पवार, संजीवनी राजगुरू, आशालता कांबळे, छाया कोरगावकर, शारदा नवले, लता इंगळे, प्रज्ञा दया पवार, श्यामल गरुड, अभिनया रोकडे, दीपा राजवर्धन, वर्षा मारुती भिसे आणि कविता मोरवणकर अशा १९ कवयित्रींच्या प्रत्येकी ३ ते ४ कविता या संग्रहासाठी निवडण्यात आल्या आहेत.

या यादीवरून लक्षात येते की, आंबेडकरी प्रेरणेतून लिहिणाऱ्या या कवयित्रींचे लेखन म्हणजे जवळपास ५० वर्षांतील कविता या संग्रहातून वाचायला मिळतात. ५० वर्षांतील म्हणजे अगदी अनुक्रमे नाही, पण कवयित्रींची ज्येष्ठता ते ताज्या दमाच्या कवयित्रींचा यातला समावेश पाहता हा पन्नास वर्षांचा कवितेतून मांडलेला जगण्याचा, समाजाचा लेखाजोखा म्हणता येईल.

ढोबळमानाने यात तीन पिढ्या वाचायला मिळतात. हिरा बनसोडे, शकुंतला रोकडे, उषा अंभोरे, उर्मिला पवार, कुसुम गांगुर्डे, हिरा पवार, संजीवनी राजगुरू, आशालता कांबळे यांची पहिली पिढी.

छाया कोरगावकर, शारदा नवले, लता इंगळे, विद्या भोरजारे, स्मिता नगरकर, प्रज्ञा दया पवार, श्यामल गरुड, अभिनया रमेश, लता इंगळे यांची दुसरी पिढी.

वर्षा मारुती भिसे, दीपा राजवर्धन, कविता मोरवणकर ही पुढची पिढी.

या १९ जणींत अशाय, विषय मांडणी, शब्द कळा याबाबतीत प्रज्ञा दया पवार, श्यामल गरुड आणि अभिनया रमेश यांच्या कविता लक्षणीयरीत्या वेगळ्या आहेत. यापैकी प्रज्ञा दया पवार यांनी कविताच नाही तर एकुणच लेखिका म्हणून आपला लौकिक यापूर्वीच सिद्ध केलाय. श्यामल गरुड यांची कविता ही स्वत:च्या शैलीसह भक्कम बांधणीसह वाचायला मिळते. अभिनया रमेश यांचा मराठी-इंग्रजीचा वापर त्यांची कविता वेगळी ठरवतो. तिघींच्या या काही ओळी.

या चिरव्याकूळ एकाकीपणाच्या होर्डिंगवर

उभं राहून आम्ही पसरवतोय

आमच्या मोकळ्या ढाकळ्या

हाडामांसाच्या प्रतिमा

(चिरव्याकूळ एकाकीपणाच्या होर्डिंगवर\ प्रज्ञा दया पवार)

कातडी सोलून तिने सांगितल्या नाही त्याच्या रांडकथाण्या

या मेट्रो शहराच्या एका धुरकट गल्लीत

न्यूड चित्रासारखी ती फक्त डकवलेली

(इझम पलिकडील\ श्यामल गरुड)

दुपारी

तुझा आकस चेहरा ओलांडून

Lunchtime करतात

वापरतात फ्रॉईडचा anatomy is destinyचा

Retuted सिद्धान्त

जागतिक उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेत तुला केलंय sex worker

नि इथे तू मात्र ठराविक जातीची

(तू\अभिनया रमेश)

हिरा बनसोडे, उषा अंभोरे, उर्मिला पवार, शकुंतला रोकडे, हिरा पवार, संजीवनी राजगुरू, आशालता कांबळे यांच्या कवितेत बाबासाहेब, रमाई, तथागत यांचे संदर्भ तसेच गुलामीतून विद्रोह करून स्वयंप्रकाशाकडे येण्याचा संघर्ष साभिमान उतरतो. कारण ही पहिली पिढी.

मी नाहीच फक्त गृहिणी

अन नाही शोभेची चांदणी

अपरंपार वेदनेतून उफाळलेली

मी आहे विद्रोहाची जननी

(लेखणी भीमाची\हिरा बनसोडे)

परंपरेचे नकाब चढवून

त्यांनी मला देवघरात बसवले

आणि हातात शस्त्र देताना मात्र

धार लावण्यास मनाई केली

(रिंगण\उषा अंभोरे)

ओठांची कवाडं सताड उघडून जेव्हा

मी माझ्या जीभेला सोडली होती मोकाट, वस्त्रहीन

तेव्हा ती जायची तुरुतुरु नांगी घेऊन कुणाकडेही

नि बेसावध क्षणी पण सावधपणी मारून डंख

येऊन लपायची दातांच्या फटीत

(चिवर\उर्मिला पवार)

पराकोटीच्या अहिंसेचे तत्त्वज्ञान रुजलेल्या गुजरभूमीवर

पराकोटीचा हिंसाचार उसळतो तर

या भूमीला कोणाची अहिंसा अभिप्रेत आहे?

(नवा धर्म\शकुंतला रोकडे)

ठार कोऱ्या वाळवंटी आयुष्यात

तुमच्या प्रज्ञेचा

एक किरण प्रवेशला

अन बाबा

त्या प्रकाशाने हजारो वर्षाचा अंधार तेजोमय झाला

(अन बाबा\संजीवनी राजगुरू)

ज्योती-सावित्रीने घडविलेली

 मी एक आधुनिक स्त्री

बाबासाहेबांनी बहाल केलेल्या

बौद्ध तत्त्वज्ञानातील

‘स्त्रीत्वा’ला ओलांडून

माणूसपणाला साद घालणारी

(बाईपणाची किंमत\आशालता कांबेळ)

लागे भीम माळी – ओसाड भूमीला

हस्त स्पर्श झाली – सुजला सुफला

अज्ञानाच्या होती – प्रज्ञेचा नांगर

शीलाचा आसूड – जुन्या रूढीवरी

(भीम माळी\हिरा पवार)

वरील ओळींतून पहिल्या पिढीचे विषय, आशय, शब्दकळा कळते. तसेच आंबेडकरी विचारांचे दृढपणही. यापैकी हिरा पवार, हिरा बनसोडे, उषा अंभोरे या कवयित्री म्हणून तशा प्रस्थापित आहेत. उर्मिला पवार, आशालता कांबळे यांचं गद्यलेखन अधिक परिचित आहे. मात्र इथे त्या कवयित्री म्हणून भेटतात.

छाया कोरगावकर, शारदा नवले, लता इंगळे, विद्या भोरजारे, डॉ. स्मिता नगरकर या खऱ्या अर्थाने मधल्या पिढीतल्या कवयित्री म्हणता येतील. या सर्व कवयित्री सामाजिक सल मांडताना व्यक्तिगत सलही आग्रहाने नोंदवतात, पुरेशा संवेदनशीलतेने.

शरीराच्या कोणत्या बिंदूपासून

सुरू होतं बाईचं बाईपण?

नेमक्या कुठल्या ग्रंथी वितळतात

निखालस वात्सल्याच्या विराट प्रवाहात

(बाई\छाया कोरगावकर)

रिती झाली माझी ओंजळ

तरीही इच्छांची वादळं राहतात घोंगावत

अधूनमधून

यातनांची वारुळं अश्शी वाहताहेत सर्वांगाभोवती

बंड करून उठते आहे मी

पुन्हा पुन्हा तथागत शांततेसाठी

(तथागत शांततेसाठी\शारदा नवले)

मिटूनही नाही घ्यायचे मला

या पृथ्वीच्या गर्भात

मला न्हाऊन निघायचे आहे

सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात सूर्यफूल होण्यासाठी

सूर्याच्या तेजाने मला

व्हायचे आहे प्रकाशाचे तारुण्य

(उदध्वस्त नाहीच व्हायचे मला\लता इंगळे)

टचकन टोचली जाते सुई मनगटात

‘जात’ वाहून नेणारी

या पिढीतून त्या पिढीकडे अशीच वाहत जाते ‘जात’

व्यवस्थेच्या स्टँडला टांगलेली बॉटल

ग्लुकोज नसलेली

जातीच्या रसायनाने भरलेली

(जात\विद्या भोरजारे)

उर भरून हुंदका येतो तुझ्या प्रेमाच्या वात्सल्याने

दाटूनी कंठ येती तू काढलेल्या गरिबीतील कारुण्याने

राब राब राबूनी उभा ठाकला संसार

उच्च संगोपन, शिक्षण, आम्हाला दिले संस्कार

उघड्या डोळ्यांनी बघत होते, तुझ्यावर झालेले अन्याय

(आई\डॉ. स्मिता नगरकर)

वर्षा मारुती भिसे, डॉ. दीपा राजवर्धन आणि कविता मोरवणकर या विसावं शतक संपताना लिहू लागलेल्या आंबेडकरी कवयित्री.

या शहरभर

रुसलेत सगळे ऋतू

आकाश, पाणी, माती

जगण्याचे सगळे संदर्भ

वेशीवर टाकलेत या शहराने

ऐटिनावर पतंग टांगतसे

हे शहर निष्ठूर, पाषाणहृदयी

नुसतंच टिकटिकत राहतं

भिंतीवर घड्याळ टांगल्यासारखं

(या शहरावर\वर्षा मारुती भिसे)

सद्यस्थितीत पाऊस आहे आघाडीवर

धावली महिला शनीच्या मंदिरावर

तोडले धर्मग्रंथाचे मायाजाल तिने

ओतले तेल शनीवर महिलेने

पेटला गाव सारा धुतले दुधाने शनीला

काय ही व्यवस्था, धार्मिक संस्कृतीत गावच झोपला

(सद्यस्थितीतील पाऊस\डॉ. दीपा राजवर्धने)

बाईच्या आत

दिवसेंदिवस

वाढत चाललाय

वासनेचा गर्भ

वासना करू शकेल

तुमच्यावरही बलात्कार

तुम्हाला नाही शोधता येणार

तिची जात
तिचा धर्म

तिचा वर्ण

(वासनेचा गर्भ\कविता मोरवणकर)

असा हा १९ आंबेडकरी कवयित्रींचा काव्यसंग्रह. यातील प्रज्ञा दया पवार, श्यामल गरुड, अभिनया रमेश, हिरा पवार, हिरा बनसोडे, उषा अंभोरे कवयित्री म्हणून स्थिरावलेल्या आहेत. शारदा नवले, विद्या भोरजारे आणि छाया कोरगावकर यांची कविता सशक्त आहे. आणि ती अजून पुढे यायला हवी. आशालता कांबळे, उर्मिला पवार यांचा गद्यलेखनाचा प्रभाव लक्षात घेता कविता या प्रकारात त्यांची उपस्थिती जाणवते एवढेच. कविता मोरवणकर हे नाव सध्या चर्चेत आहे. मात्र आघाती लेखनाच्या व सादरीकरणाच्या मिळणाऱ्या प्रतिसादात काव्य हरवता कामा नये याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी.

या संग्रहातले प्रज्ञा दया पवार यांचे मनोगत हे अभ्यासपूर्ण चिंतन आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. या संग्रहाला एक दीर्घ प्रस्तावनेची गरज होती. संपादकीय आहे पण ते भूमिका मांडून संपते. त्यातून कवयित्री, कवितांची निवड, त्यामागची भूमिका विस्तृतपणे आली असती तर वाचकाला या प्रतिनिधिकत्वामागचे आणखी तपशील मिळाले असते. अनुक्रम काळानुसार ठेवला असता तर काळाबरोबर आंबेडकरी कविता कशी बदलत गेली, कवयित्रींचा पैस कसा बदलत गेला हे कळले असते.

एकंदरीत हा संग्रह एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहेच, पण यातील अनेक कवयित्रींकडून अधिक कवितालेखनाची अपेक्षा वाढवणारा आहे.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......