अजूनकाही
इंदिरा गांधी यांना प्रत्यक्ष आणि अगदी जवळून पाहण्याचा योग मला लाभला, तेव्हा एक सामान्य नागरीक म्हणून मी त्यांचा एका कट्टर विरोधक होतो. या कट्टर विरोधाला अर्थातच आणीबाणी-पर्वाची पार्श्वभूमी होती. आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचे सरकार आले होते. मोरारजींचे सरकार कोसळल्यानंतर आलेले चरणसिंग सरकारसुद्धा अल्पजीवी ठरले. चरणसिंगांनी राजीनामा देऊन निवडणुका जाहीर केल्या होत्या. या दरम्यान इत्तर सर्व पक्षांच्या विखारी टीकेचे लक्ष्य बनलेल्या इंदिरा गांधी स्वतः:चा नवीन इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापून निवडणूक प्रचारदौऱ्यात उतरल्या होत्या. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना वाळीत टाकले होते, तरीही न डगमगता इंदिरा गांधींनी प्रचारासाठी देश पिंजून काढला होता. त्यांच्या त्या गाजलेल्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा एक भाग म्हणून त्या गोव्यात आल्या होत्या आणि त्या वेळी मला अगदी जवळून, काही फुटांच्या अंतरावरून त्यांना पाहता आले होते.
केंद्रातून सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर अगदी मोजके पक्षनेते बरोबर असताना इंदिरा गांधींनी जवळजवळ एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. या काळात त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. चार्टर्ड विमान पुरवणारे उद्योगपती त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे जमेल तेव्हा प्रवासी विमानाने जाऊन आणि अनेकदा मोटारीने अनेक तासांचा प्रवास करून त्यांनी निवडणूक सभा घेतल्या. अशाच प्रकारे बहुधा कर्नाटकातून गोव्यात आल्यानंतर पणजीला मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या मांडवी हॉटेलात प्रवेश करताना मी त्यांना पाहिले. त्यानंतर एका तासाने पणजीतील कम्पाला ग्राऊंडवर पार पडलेल्या त्यांच्या सभेलाही मी हजर होतो.
जनता पक्षाच्या सरकारच्या अनागोंदी कारभारावर त्यांनी घणाघाती हल्ला केला. इंदिरा गांधींच्या त्या वीसेक मिनिटांच्या भाषणाने तोपर्यंत माझ्या मनात जनता पक्षाविषयी असलेले थोडेफार प्रेमही नाहीसे झाले. इंदिरा गांधींच्या त्या जोरदार देशभरातील प्रचारदौऱ्याने जनता पार्टीचा एकदम धुव्वाच उडाला आणि इंदिरा गांधी त्यांना तोपर्यंत कधीही न मिळालेल्या मताधिक्याने आणि लोकसभेच्या अधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेवर आल्या.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4511/Brahmeghotala
.............................................................................................................................................
पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा गोव्यात आल्या, त्या कॉमनवेल्थ राष्ट्रांच्या प्रमुखांच्या १९८३ साली झालेल्या बैठकीचे यजमान म्हणून. त्यावेळी मी ‘द नवहिंद टाइम्स’ या पणजीतील इंग्लिश वृत्तपत्राचा बातमीदार होतो. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासह चाळीस राष्ट्रांचे प्रमुख यावेळी गोव्यात आले होते. त्यानंतर पुढल्याच वर्षी १९८४च्या ऑक्टोबरात इंदिरा गांधींची दिल्लीत हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी १९८९ च्या अखेरीस प्रचार सुरू झाला, तेव्हा मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये बातमीदार होतो. पंतप्रधान राजीव गांधींची सर परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर प्रचारसभा होती. बोफोर्स तोफेने त्यावेळी गदारोळ उठवला होता. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात कडक सुरक्षा असायची. व्यासपीठासमोरच असलेल्या पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात मी पोहोचलो. पंतप्रधानांच्या भाषणाची बातमी लिहिण्याची जबाबदारी माझे सहकारी पत्रकार नरेन करुणाकरन यांची होती, तर सभेचे हायलाईट्स किंवा क्षणचित्रे मी लिहिणार होतो. त्यामुळे माझी नजर सगळीकडे फिरत होती. त्याच वेळी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला काही गडबड दिसली. त्या बाजूने व्यासपीठावर चढण्यासाठी जिना तयार केला होता. “राहुल गांधी आला आहे,” असे कुणी तरी म्हटले आणि पत्रकारांपैकी आम्ही काही जण त्यादिशेने धावलो. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेला विशीतला एक तरुण झपझप चालत जिन्याची पावले उतरत होता. काही क्षणात राहुल आमच्या नजरेआड झाला आणि एकाही फोटोग्राफरला त्याची छबी घेता आली नाही.
१९८९च्या या निवडणुकीत राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर अल्पकाळासाठी भारतीय जनता पक्ष आणि डाव्यांच्या पाठिब्यावर विश्वनाथ प्रताप सिंगांचे आणि नंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार आले. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राजीव गांधी पुण्यात आले होते आणि टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सभागृहात त्यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी तेथे हजर होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने प्रश्न विचारण्याची मला संधी देण्यात आली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर उपस्थित असलेल्या वीस-पंचवीस पत्रकारांपैकी प्रत्येकाशी राजीव गांधींनी हस्तांदोलन केले. अशा वेळी काय म्हणायचे, काय अभिवादन करायचे हे मला ऐनवेळी सुचलेच नाही. स्मित करीत राजीव गांधींनी हस्तांदोलन केले तेव्हा आपण इतरांशी स्वतःची ओळख करून देतो तसे मी म्हटले – ‘कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस’.. आज मागे वळून पाहताना मी त्यांना ‘गुड इव्हिनिंग, सर’ असे अभिवादन करायला हवे होते, असे वाटते.
१९९१ ला काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर चंद्रशेखर सरकार कोसळले आणि निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक प्रचार दौऱ्यात राजीव गांधींची हत्या झाली. या हत्येमुळे लोकसभेच्या राहिलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या निवडणुकीच्या फेऱ्यात राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसविषयी सहानुभूती लाट निर्माण झाली. काँग्रेसला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्याने राजीव गांधींच्या हत्येनंतर अचानक काँग्रेसध्यक्ष बनलेले पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान बनले आणि त्यांनी पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा काळही पूर्ण केला.
राजीव गांधींच्या हत्येनंतर म्हणजे १९९१ पासून तो १९९६ पर्यंत काँग्रेस पक्षात गांधी घराण्यातील कुणीही सक्रीय नव्हते. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पुरती धूळधाण उडाल्यानंतर सीताराम केसरी यांच्याकडून सोनियांनी पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतली. १९९९च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले. त्याच वेळी झालेल्या निवडणुकात महाराष्ट्रात मात्र शिवसेना-भाजप सरकारचा पराभव करून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि ते पंधरा वर्षे टिकले.
येथून पुढे सोनियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा भरारी घेतली आणि काँग्रेस पक्षाची सरकारे अनेक राज्यांत पुन्हा आली. २००४च्या निवडणुकांपूर्वी भाजपासाठी सगळीकडे ‘शायनिंग इंडिया’ आणि ‘फिल गुड’ अशी परिस्थिती असतानाही काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली. सोनियांनी डॉ. मनमोहन सिंहांची पंतप्रधानपदी निवड केली. केंद्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख या नात्याने त्या देशातील सर्वाधिक सत्ता त्यांच्याकडे आली. काँग्रेस २००९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला.
नेहरू-गांधी घराणे हे देशातील एक प्रमुख घराणे आहे असे अनेकदा म्हटले जाते. गेले कित्येक वर्षे भाजपच्या वळचणीला असलेले मनेका गांधी आणि वरुण गांधी हेसुद्धा या घराण्याचाच भाग असले तरी सोनिया आणि राहुल यांनाच या घराण्याचे राजकीय वारसदार समजले जाते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत मी असताना संपादकीय विभागातील एका बैठकीत झालेली घटना मला आठवते. प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच अपत्यप्राप्ती झाली होती आणि या घटनेस न्यूज व्हॅल्यू आहे की नाही आणि असल्यास ही बातमी कुठल्या पानावर छापावी यासंबंधी आम्हा पत्रकारांत मतभेद होते. बराच काळ वादावादी झाल्यानंतर निवासी संपादक रवी श्रीनिवासन यांनी आपला व्हेटो अधिकार वापराच्या जोरावर ही बातमी पहिल्या पानावर बॉक्स स्वरूपात छापली जाईल असे जाहीर केले. “आफ्टर ऑल, द चाईल्ड इज बॉर्न इन द नेहरू-गांधी फॅमिली!” असे त्यांचे स्पष्टीकरण होते.
स्वतंत्र भारताच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात नेहरू-गांधी घराण्याने तीन पंतप्रधान दिले आहेत आणि त्यांच्या सत्तेचा एकूण कालावधी जवळजवळ चाळीस वर्षांचा होता. त्याशिवाय सोनिया गांधी यांच्या हातात देशाची सूत्रे दहा वर्षे होती.
प्रियंका गांधी यांची आता काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने भारतीय राजकारणाला निश्चितच नवे वळण मिळणार आहे. यावेळी पहिल्यांदाच नेहरू-गांधी घराण्यातील तीन व्यक्ती एकाच वेळी राजकारणात सक्रिय असताना दिसत आहेत. त्यांच्या आगमनामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात राजकीय समीकरणे बदलू शकतात. प्रियंका यांच्या राजकीय क्षेत्रातील अधिकृत आगमनाने पुन्हा एकदा नेहरू-गांधी घराणेशाहीची काही काळ चर्चा सुरू राहिल.
आपल्या देशात राज्यपातळीवर अनेक घराण्यांनी दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तामिळनाडूमध्ये एम. करुणानिधी यांचे कुटुंब आणि नातलग, पंजाबमध्ये सुरजित सिंग बर्नाला यांचे घराणे, ओडिशामध्ये आधी बिजू पटनाईक आणि आता नवीन पटनाईक, हरियाणा येथे देविलाल यांची तिसरी पिढी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही प्रमुख स्थानिक पक्ष दोन घराण्यांतील आहेत. आंध्र प्रदेशात एन. टी. रामा राव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या हाती सत्ता आहे. बिहारने दीर्घकाळ लालू घराण्याच्या सत्तेस पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादवांची दुसरी पिढी आली आहे. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची तिसरी पिढी राजकारणात स्थिर झाली आहे, तर शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची दुसरी पिढी प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील दुसरे राजकीय वारसदार तर पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे वारसदार आहेत. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि भारतीय मतदारांनी घराणेशाही पूर्णतः स्वीकारली आहे, हे मान्यच करायला हवे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांत आणि सत्तेत मात्र नेहरू-गांधी घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे, हेच आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे असे फार तर म्हणता येईल.
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment