अजूनकाही
‘बाकी, खास काँग्रेसचे म्हणावेत असे बरेच दुर्गुण सांगता येतील, पण तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.’ या वाक्याने गेल्या अंकातील संपादकीय लेखाचा समारोप केला होता. पण तेव्हा असे अजिबात वाटले नव्हते की, त्या दुर्गुणांचा पाढा लगेचच्या अंकात लिहावा लागेल. पण नाईलाज झाला आहे. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे गेल्या आठवड्यात (२८ डिसेंबरला) काँग्रेस पक्षाचा १३४ वा वर्धापनदिन साजरा झाला. आणि दुसरे लोक सभेत तिहेरी तलाक बंदीचे विधेयक आले तेव्हाचे काँग्रेस पक्षाचे वर्तन.
हे खरे आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस व स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेस असे दोन भाग स्वतंत्रपणे दाखवता येत नाहीत, त्यात एकजीनसीपणा आहेच आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील ६५ वर्षांत काँग्रेसचे उद्दिष्ट स्वराज्यप्राप्ती हे होते आणि स्वातंत्र्योत्तर काळातील ७० वर्षांत काँग्रेसचे उद्दिष्ट सत्ताप्राप्ती हे राहिले, त्यामुळे गुणात्मक पातळीवर काहीएक फरक आहेच. स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांवर नजर टाकली तर लक्षात येते, सुरुवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस पक्ष सर्वार्थाने यशोशिखरावर होता आणि अलीकडच्या पाच वर्षांत सर्व अर्थांनी अधोगती झालेला असा आहे. या ७० वर्षांचे दोन भाग पाहिले तर चित्र असे दिसते की, आधीच्या ४० वर्षांतील केवळ अडीच वर्षे काँग्रेसकडे केंद्रिय सत्ता नव्हती आणि लालबहादूर शास्त्री यांचा काळ वगळला तर उर्वरित ३५ वर्षे नेहरू, इंदिरा, राजीव हे तिघेच पंतप्रधान होते. नंतरच्या ३० वर्षांत मात्र काँग्रेसच्या वाट्याला केंद्रिय सत्ता १५ वर्षेच आली आणि त्यात नेहरू-गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती पंतप्रधानपदावर नव्हती.
या ३० वर्षांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य हे आहे की, काँग्रेसला कधीही पूर्ण बहुमताच्या जवळ जाता आलेले नाही. म्हणजे १९८९ ते २०१९ या ३० वर्षांच्या काळात काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व केंद्रिय सत्तेवर कधीही नव्हते आणि अर्थातच या काळात देशभरातील अर्ध्याहून अधिक राज्यांमधील सत्ताही काँग्रेसेतर पक्षांचीच राहिली आहे. नेमके याच ३० वर्षांत, सर्व अर्थांनी काँग्रेसचा विरोधक असलेल्या भाजपची स्थिती कशी राहिली आहे? १९८९ च्या निवडणुका होण्यापूर्वी भाजपला लोकसभेत दोन जागा होत्या आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडे २७२ जागा आहेत. या ३० वर्षांच्या काळात भाजपच्या वाट्याला साडेअकरा वर्षे केंद्रिय सत्ता आली, एक वर्ष केंद्र सरकार (व्ही.पी.सिंगांचे) भाजपच्या पाठिंब्यावर चालले आणि १७ वर्षे भाजप लोकसभेतील प्रमुख व प्रबळ विरोधी पक्ष होता. शिवाय, याच ३० वर्षांत भाजपने एका राज्यातील पूर्ण सत्ता मिळवणे ते २२ राज्यांत पूर्ण सत्ता वा अर्धी सत्ता वा सत्तेत सहभाग अशी प्रगती केली.
वरील दोन्ही चित्रांवर नजर टाकली आणि सरासरी विचार केला तर हे स्पष्ट होते की, मागील ३० वर्षांत काँग्रेसपेक्षा भाजपचे पारडे किंचित जड राहिले आहे. भाजप हे कसे साध्य करू शकला, याची कारणमीमांसा वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. पण त्याचा मध्यवर्ती आशय हाच असेल की, भाजपने स्वत:चे बऱ्यापैकी ‘काँग्रेसीकरण’ करून घेतले. सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेले गुण व अवगुण ही काँग्रेसची खासीयत होती, ते गुण व अवगुण भाजपने मोठ्या प्रमाणात व झपाट्याने आत्मसात केले. शिवाय स्वत:चे असे काही गुण (उदा. संघटना बांधणी) भाजपला उपयोगी ठरले आणि काही अवगुण (उदा. सांप्रदायिकता) त्यांनी थोडेसे दडवून ठेवले/वापरले.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4511/Brahmeghotala
.............................................................................................................................................
काँग्रेस पक्षाचे खास गुण व अवगुण असा शब्दप्रयोग वर केलाय खरा, पण ते गुण व अवगुण यांना स्वतंत्र अस्तित्व नाहीच मुळी; ते अविभाज्य आहेत, किंबहुना गुणातून अवगुण आणि अवगुणातून गुण अशी ती (उत्पत्ती-वाढ-लय) प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ; घराणेशाही हा काँग्रेससाठी गुण आहे आणि अवगुणही. नवे नेतृत्व उदयाला येणे, विकसित होणे, सत्ता मिळवण्याची वा टिकवण्याची क्षमता प्राप्त होणे, हे लक्षात घेतले तर काँग्रेससाठी तो ‘गुण’ ठरतो; मात्र सरंजामी मानसिकता आकाराला येणे, अन्य तुल्यबळांना संधी न मिळणे, बेताच्या क्षमता असणारे नेतृत्व सत्तास्थानावर येत राहणे, हे सारे घराणेशाहीचे अवगुण ठरतात.
दुसरे उदाहरण द्यायचे तर सुभेदारी वा ठेकेदारी. ज्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे भांडवल आहे, साधनसंपत्ती आहे, लहान-मोठी संस्था(ने)रूपी केंद्रं आहेत; ते काँग्रेसला जाऊन मिळतात, तेव्हा काँग्रेसची ताकद मणामणाने वाढत असते आणि संघटनाबांधणीची काँग्रेसची गरज कमी होऊन जाते. ही अशी जोडणी किंवा सामीलकी होत राहणे काँग्रेससाठी गुण आहे, पण या अशा जोडल्या जाणाऱ्या ठिकठिकाणच्या सुभेदारांना व ठेकेदारांना सोबत ठेवायचे तर, त्यांना आहे तसे (अडगळीसह) कॅरी करावे लागते.
तिसरे उदाहरण द्यायचे तर सर्व गटातटांचे वा घटकांचे हितसंबंध कमी-अधिक प्रमाणात सांभाळले जातात, हा काँग्रेसचा गुण मानला जातो. पण त्यामुळेच अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यांच्याकडे कानाडोळा करतच पुढे जाण्याची अपरिहार्यता हा काँग्रेसचा अवगुण ठरतो.
चौथे उदाहरण द्यायचे तर, कोणत्याही घटकाचा उघड द्वेष करायचा नाही, हा काँग्रेसचा गुण आहे; पण कोणत्याही समाजघटकाबद्दल फारसे प्रेम न वाटणे हा काँग्रेसचा अवगुण त्यातूनच आकाराला येतो.
पाचवे उदाहरण द्यायचे तर, सर्व जातींना स्थान मिळत राहणे हा काँग्रेसचा गुण सर्वसमावेशकतेचा म्हणता येतो, पण जातींच्या अस्मिता व संख्याबळ यांचा वापर प्रामुख्याने सत्ता मिळवणे वा उलथविणे यासाठी होत राहणे यामुळे अवगुणही ठरतो.
ही गुण-अवगुणांची यादी बरीच लांबवता येईल, म्हणजे कसे तर... भांडवलदारांचे वर्चस्व असलेला पक्ष, पण नेहमी गरिबांची भाषा बोलतो; हिंदू बहुसंख्य असलेल्यांचा पक्ष, पण धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो; परंपरानिष्ठांचे प्राबल्य असणारा पक्ष, पण ‘लोकभावतेचा आदर केला पाहिजे’ असे म्हणत राहतो; खूप कायदेनियम करतो, पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहत नाही. इत्यादी.
वरीलपैकी बहुतांश गुण-अवगुण भाजपने कमी- अधिक प्रमाणात आत्मसात केले; त्यामुळे भाजपला सत्ता मिळवता आली/टिकवता आली. पण तरीही हा प्रश्न राहतोच की, इतके हलके असलेले भाजपचे पारडे गेल्या ३० वर्षांत इतके जड कसे झाले? जडत्व येणे, मांद्य चढणे, शिथिलता मुरणे हे सर्व काँग्रेस संघटनेबाबत घडत गेले आणि संघ-भाजपने दीर्घकाळ चालू ठेवलेली आपल्या विचारांची पेरणी व खुरपणी यांचा मोठा फायदा भाजपचे पारडे जड होण्यासाठी झाला; हे मुख्य कारण आहेच.
पण मागील ३० वर्षांवर दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येते की, एक असा मोठा गुण-अवगुण काँग्रेसकडे होता आणि अद्यापही आहे, ज्याच्यामुळे भाजपचे पारडे अधिक जड झाले. तो गुण असा की, या देशातील मुस्लिमांच्या बाजूने काँग्रेस पक्ष उभा राहिला आणि तो अवगुण असा की, काँग्रेस पक्ष कधीच मुस्लिम समाजसुधारणांचा पाठीराखा राहिला नाही. अलीकडच्या काळात स्थानिक नेत्यांपासून सोनिया गांधींपर्यंतच्या काही नेत्यांकडून अधूनमधून अशी काही वक्तव्ये आली, ज्यामुळे काँग्रेसही सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेत आहे की काय असे वाटावे. पण एकूणात विचार केला तर मुस्लिम समाज या देशाचा अविभाज्य भाग आहे या बाजूनेच काँग्रेस पक्ष कायम राहिला. मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या राज्यांत लहान-मोठे पक्ष कमी-अधिक काळ ‘तारणहार’ वाटत राहिले. परंतु मोठा व राष्ट्रीय स्तरावरचा एकमेव आधार ‘काँग्रेस’ पक्षच राहिला.
धर्माच्या आधारावर देशाच्या झालेल्या फाळणीमुळे राष्ट्राच्या एकात्मतेला व अखंडत्वाला निर्माण झालेला धोका लक्षात घेतला तर काँग्रेसची ती भूमिका पूर्णत: समर्थनीयच होती. त्यातही संघपरिवार व अन्य हिंदुत्ववादी शक्तींनी सुरुवातीची काही वर्षे उघडपणे आणि नंतर लपूनछपून मुस्लिमांबाबत ज्या भूमिका घेतल्या, जनभावना चेतवल्या, द्वेष फैलावला ते पाहता काँग्रेसचे ते वर्तन अंतिमत: देशहिताचेच होते.
मात्र काँग्रेसच्या या गुणातूनच एका अवगुणाचा उदय झाला, तो म्हणजे मुस्लिम समाजातील सुधारणावादी प्रवाहाला बळ न देण्याचा! तसे केले तर सर्वसामान्य मुस्लिम जनतेत दुरावा निर्माण होईल, असंतोष फैलावेल या भीतीपोटी काँग्रेसने ‘जैसे थे’ स्थिती राखण्याला पसंती दिली. त्यामागे मतांचे राजकारणही होतेच. अर्थातच त्याचा गैरफायदा एका बाजूला मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी उचलला आणि आपल्या समाजावरील पकड अधिक घट्ट करत नेली. तर दुसऱ्या बाजूला, काँग्रेसच्या व मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांच्या वर्तनाचा अधिक गैरफायदा हिंदू मूलतत्त्ववाद्यांनी घेतला; त्याची परिणती मुस्लिमांविषयी व काँग्रेसविषयी जनमानसात विरोधी भावना उत्पन्न होण्यात होऊ लागली. ही प्रक्रिया इतकी एकरेषीय झालेली नसणार, पण सर्वसाधारण प्रवाह असा राहिला; त्यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी होत जाणे आणि भाजपच्या बाजूला तो वळत जाणे ही प्रक्रिया घडून आली.
१९८५-८६ मध्ये या प्रक्रियेचे बीज पडले, तेव्हा शाहबानो प्रकरणात राजीव गांधी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवून एक मोठी चूक केली आणि ‘बॅलन्सींग अॅक्ट’च्या नादात रामलल्लाची पूजा करण्यास परवानगी देऊन दुसरी मोठी चूक केली. १९८९ मध्ये राजीव गांधी सरकार गेले, त्याचे एक कारण बोफोर्स व भ्रष्टाचार यांचा झालेला प्रचार हे होते आणि दुसरे कारण शाहबानो व राम मंदिर हे स्फोटक मुद्दे. त्यानंतरच्या ३० वर्षांत काँग्रेसची घसरण आणि भाजपची वरताण या प्रक्रिया एकाच वेळी चालू राहिल्या. या काळात काँग्रेसला केंद्रात कधीही पूर्ण बहुमत मिळालेले नाही.
या संपूर्ण काळात काँग्रेसने कधीही मुस्लिम समाजातील सुधारणांना गती देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, मुस्लिम समाजातील सुधारणावादी प्रवाहांना बळ देण्याचा प्रयत्न केला नाही! जर थोडेबहुत काही केले असेल तर ते हातचे राखून आणि जर काही दिसले असेल तर तो वरपांगी देखावाच होता. उलट सत्ता मिळवण्यासाठी ‘समाजसुधारक’ नुकसानकारक ठरतात, म्हणून त्यांच्यापासून दूर राहणे आणि प्रतिगामी शक्ती उपयुक्त ठरतात म्हणून लोकानुनय करत राहणे हेच काँग्रेसकडून घडत राहिले. शाहबानोपासून शायराबानोपर्यंत काँग्रेसची ही भूमिका बदलली नाही. शाहबानो प्रकरणात पोटगीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय फिरवण्यासाठी काँग्रेसने कायदा करवून घेतला. आणि शायराबानो खटल्यात ‘तिहेरी तलाकच्या संदर्भात संसदेने कायदा करावा’ या सूचनेचा काँग्रेसने स्वीकार केलेला नाही. ‘भाजप सरकार आणू पाहते तो कायदा योग्य नाही,’ असे काँग्रेसमधील सर्व लहान-थोर बुद्धिवंत म्हणत आले आहेत; पण तो कायदा कसा असावा, हे मात्र त्यापैकी कोणीही सांगायला तयार नाही. ‘तिहेरी तलाक बंदीसाठीचा कायदा असा असा करत असाल तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत’ असा प्रस्ताव काँग्रेसने गेल्या दीड वर्षात कधीच ठेवलेला नाही. आणि त्याआधीही मुस्लिम समाजातील सुधारणांना कधीही बळ दिलेले नाही.
म्हणजे मुस्लिम समाजसुधारणांना बळ न देणे हा काँग्रेसचा सर्वांत मोठा दुर्गुण आहे, या निष्कर्षाप्रत यावे लागते. हा निष्कर्ष वरवर विचार केला तर पटणार नाही. पण या दुर्गुणामुळे गेल्या ३० वर्षांत काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले, भाजपला त्यामुळेच अधिक बळ मिळाले, मुस्लिम समाजाचे व एकूण देशाचेही नकसान झाले, हे सर्व लक्षात घेतले तर हा निष्कर्ष चुकीचा ठरवता येईल?
(‘साधना’ साप्ताहिकाच्या १२ जानेवारी २०१९च्या अंकातून)
.............................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 23 January 2019
विनोद शिरसाठ, आज सूर्य पश्चिमेस तर उगवला नाही ना, हे पाहून आलो. कारण की तुमच्याशी चक्क सहमत आहे. लेखातलं काँग्रेसविषयी केलेलं प्रत्येक विधान अगदी समर्पक आहे. मुस्लिम सुधारकांच्या मागे न उभं राहून काँग्रेसने हातची संधी वाया दवडली आहे. आता काय उपयोग. आजचा सुधारणावादी मुस्लिम मोदी/संघ/भाजप कडे आशेने बघतो आहे. हे खरंतर काँग्रेसची हक्काचं स्थान होतं, पण ते आता संघ परिवाराने व्यापलं आहे. आपला नम्र, -गामा पैलवान