अजूनकाही
‘बर्ड बॉक्स’ हा इतर कुठल्याही पोस्ट-अपॉकलिप्टिक थ्रिलरप्रमाणे सुरू होत, एक बऱ्यापैकी रंजक संकल्पना समोर घेऊन येतो. मात्र पुढे जाऊन कथानकाच्या नॉन-लिनिअर मांडणीचा अट्टाहास, समोर आणलेल्या संकल्पनेची अतर्क्य आणि पटकथेला सोयीस्कररीत्या केलेली मांडणी, यामुळे तो दर क्षणागणिक अधिकाधिक समस्यात्मक बनत जातो. परिणामी चित्रपटाला अपेक्षित असलेला ‘अ क्वायट प्लेस’ किंवा ‘द वॉकिंग डेड’ मालिका किंवा खरं तर इतर कुठल्याही पोस्ट-अपॉकलिप्टिक थ्रिलरसारखा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल असा प्रभाव निर्माण होत नाही.
‘बर्ड बॉक्स’ हा समांतर पातळीवर चालणाऱ्या दोन टाइमलाइन्सच्या आलटून-पालटून केलेल्या मांडणीद्वारे पुढे सरकत राहतो. वर्तमानातील घटनाक्रम हा मॅलरी हेज (सॅन्ड्रा बुलक्स) आणि तिची दोन मुलं (ज्यांना तिनं अजूनही नावं दिलेली नाहीत), गर्ल (विवियन ब्लेअर) आणि बॉय (ज्युलियन एडवर्ड्स) यांना केंद्रस्थानी ठेवतो. हा घटनाक्रम जी काही भौतिक-आदिभौतिक आपत्ती आहे, तिची सुरुवात झाल्यापासून साधारण पाच वर्षानंतरचा आहे. ज्यात हे तिघेही निर्जन ठिकाणांहून प्रवास करत, कुठल्याशा अदृश्य धोक्यापासून वाचण्याच्या प्रयत्नांत आहेत असं दिसतं.
तर पाच वर्षांपूर्वी काय घडलं, ज्यामुळे पृथ्वी जवळपास निर्जन झाली आहे, हे एका समांतर कथानकातून उलगडत जातं. ज्यात जेसिका हेज (सॅरा पॉलसन) मॅलरी या आपल्या गरोदर बहिणीला चेक-अपकरिता दवाखान्यात नेतानाच्या दृश्याचा समावेश होतो. नेमकं इथूनच सगळं काही बदलत जातं. आणि त्याचं रूपांतर कुठल्याशा अदृश्य मॉन्स्टर/व्हायरसला केवळ उघड्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे लोकांनी अतर्क्य, आत्मघातकी आणि हिंसक कृत्यं करण्यास प्रवृत्त होण्यात होतं. दरम्यान, सगळीकडे हाहाकार माजलेला असताना ग्रेगच्या (ब्रॅडली वॉन्ग) घरात आसरा घेतलेला टॉम (ट्रेव्हन्ट ऱ्होड्स) मॅलरीला वाचवतो. डग्लस (जॉन माल्कोविच नामक अप्रतिम अभिनेता), लुसी (रोजा सालेजर), चार्ली (मिल्टन हॉवरी) असे इतरही लोक ग्रेगच्या घरात आसरा घेत असतात. ज्यांना अजून ज्याचं नक्की स्वरूप लक्षात आलेलं नाही अशा मॉन्स्टरपासून वाचायचं आहे. परिणामी हे पाच वर्षांपूर्वीचं प्रकरण अपॉकलिप्टिक हॉरर-थ्रिलरपटाप्रमाणे सुरू राहतं. तर इकडे वर्तमानात मॅलरी आणि तिच्या मुलांचा प्रवास कुठल्याशा ध्येयाच्या दिशेनं सुरू असतो.
आता हे झालं चित्रपटाचं ढोबळ आणि स्पॉयलर फ्री कथानक. पुढे जाऊन कथानकात दर काही काळानं एखादा भय किंवा रहस्य वाटावा असा मुद्दा समोर आणला जातो. मात्र, त्याची संपूर्ण रहस्य उलगडून टाकणारी तर्कहीन तऱ्हेची मांडणी त्यातील सगळी हवा काढून टाकते. याखेरीज ही रहस्याची निर्मिती आणि पुढच्याच क्षणी त्याची झालेली उकल याची पुनरावृत्ती पुढेही अनेकदा घडत राहते. त्यामुळे चित्रपटाला अपेक्षित असलेला इतर भय किंवा रहस्यपटांत निर्माण होणारा प्रभाव घडत नाही. शिवाय चित्रपटाच्या दोन समांतर पातळीवर चालणाऱ्या कथानकांच्या तशा मांडणीचा अट्टाहास भावनिक पातळीवर निर्माण होणारा परिणामही काहीसा नाहीसा करतो. कारण वर्तमानात जिवंत असलेली, एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी पात्रं भूतकाळातील घटनाक्रमाचं आणि त्यातील पात्रांचं अस्तित्वच निरर्थक ठरवतात. कारण भूतकाळातील दृश्यांतील बहुतांशी लोक मरणार हे स्पष्ट दिसत असतं. एकूणच ‘बर्ड बॉक्स’ची अशी ही तर्कहीन प्रकारची मांडणी ही त्याला पटकथा कशी असू नये, याचं मूर्तीमंत उदाहरण बनवते. याखेरीज यातील मॉन्स्टर किंवा जो काही अदृश्य, आदिभौतिक/मानसिक धोका आहे. त्याचं स्वरूप आणि परिणामही पटकथेला हवं तेव्हा, हवं त्या प्रकारे बदलत जाणारा आहे. त्यामुळे हा सगळा सावळा गोंधळ चित्रपटाच्या उणीवांमध्ये भर घालतो.
‘बर्ड बॉक्स’ हा काहीतरी रंजक संकल्पना मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे. ज्याचं अपयश हे मुख्यत्वे समस्यात्मक पटकथेत आहे. आता याच कथानकाची मांडणी कालक्रमानुसार केलेली असती, तर चित्रपटातील तणाव आणि थ्रिल कायम राहिलं असतं. ज्यामुळे हा सगळा खटाटोप यशस्वी झाला असता.
‘अरायव्हल’च्या पटकथेसाठी ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यामध्ये नामांकन मिळवलेल्या एरिक हायशररची ‘बर्ड बॉक्स’ची पटकथा मात्र बऱ्याच उणीवा असलेली आहे. दिग्दर्शिका सुझॅन बिअरचं दिग्दर्शन नेटकं आहे. सॅन्ड्रा बुलक्स नेहमीप्रमाणे चांगलं काम करते, तर ‘मूनलाईट’ फेम ऱ्होड्स इथंही आपला ठसा उमटवून जातो. सहाय्यक भूमिकेतील माल्कोविच, हॉवरी इत्यादी लोक मर्यादित कालावधीत काहीसे टिपिकल संवाद बोलत उत्तम कामगिरी करतात.
एकूणच ‘बर्ड बॉक्स’ हा एकसंध पटकथेच्या अभावामुळे ‘याहून अधिक चांगला होऊ शकला असता’ अशा प्रकारात मोडणारा एक स्वीकारार्ह चित्रपट आहे. बाकी तो ‘नेटफ्लिक्स’वर स्ट्रीम होत असल्यानं एवढ्या उणीवांचा उल्लेख असूनही पहायचा झाल्यास कधीही सुरू करून, न आवडल्यास बंद करता येईल.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment